Nirajnachi jyot in Marathi Short Stories by Aaryaa Joshi books and stories PDF | नीराजनाची ज्योत...

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

नीराजनाची ज्योत...

सीताबाई बाहेर आली. तांबडं फुटून दिवस वर आला तरी आज तिचं अजून आटपायचं होतं. गोठ्यातली गंगु हंबरून हाकारे देत होतीं. दावणीचं वासरूही भुकेने कासावीस झालं होतं. " आले रे सोन्या.. आज जरा उशीरच झाला बघ मलाही..."सीताक्काने वासराला प्रतिसाद दिला.

सीताक्का हे तिचं गावातलं नाव. तळकोकणातल्या छोट्याशा खेड्यात काहीशा जंगलातच सीताक्केचं घर. आता ती एकटीच होती. पूर्वी घर भरलं होतं तेव्हा लगबग असे. आता मुलं, सुना,लेकी, नातवंडं शहरात, पती देवाघरी आणि सीताक्का या घरात एकटीच.कोकणातल्या अनेक गावातल्या अनेक बायकांसारखी ती ही शूर. वाघरूही यायचं अधी मधी पण शूर सीताक्का त्यालाही विळ्याच्या धाकानं पळवून लावी. पण आता नजर जरा वयानुसार कमी झाली होती.त्यामुळे ती जपून राही.

सोबतीला असं कुणीच नाही आता. वरच्या अंगाच्या घरात तिचा एकुडा अविवाहित दीर राही. तो गावात पोस्टमन होता.निसर्गाच्या आवडीपायी इथेच राहिला. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी भावंडांबरोबर मुंबईत नेला पण हा रमला नाही. गावाच्या ओढीने परत आला आणि एकटाच राहिला. म्हणायला त्याच्या सोबतीला पूर्वीपासूनचा गडी होता. रात्री दोघे अंगणात चांदण्या मोजीत गप्पा मारत बसत." या साली आंबा फळला नाही दादा. पुढल्या खेपेस अस्सा लगडंल की काय विचारता सोय नाही".

या घरांना निसर्गाने वरदान दिलं होतं हे मात्र खरं! हिरडा,बेहडा,बाभूळ,साग,अर्जुन नुसती रेलचेल होती. बकुळीच्या सड्याने मोसमात परस दरवळून जाई.
या घराला देवीच्या पालखीचा शेवटचा मान होता. हे घरंही खोताचंच! त्यामुळे सगळ्या गावाला भेटून देवळात परत जाताना देवी या घरी येई आणि इथूनच मंदिरात जाई.
पण आता नांदती घर हळूहळू बंद होत होती. पैशाच्या ओढीने शहराकडे धावत होती. मग अशी पिकली पानं रहाटानं पाणी काढता काढता डोळ्यातल्या पाण्यालाही झरू देत. वरच्या अंगाला विठ्ठलाचं मंदिर. तिथेही एक गडी असाच एकटा राही.त्याचंही गणगोत मुंबईलाच. वर्षाकाठी आंबे खायला सारी जमत. आठ दिवस राहून माघारी जात.
काळ सरला... वर्ष लोटली...महिने सरले..
कुणी कुणी काळाच्या आड गेले. घर पडली. जमीनदोस्त झाली. कुठे आठवणीचा एखादा खांब,देवघरातले देव मागे सोडून गेली.
आता अंगण परसात रान माजलं. वाडीतली लोक येऊन लाकडूफाटा, आंबे,काजू, फणस येऊन नेऊ लागली.कुणाचंच नियंत्रण उरलं नाही. पुढच्या पिढीला श्वास घ्यायला उसंत नाही तर गावातल्या घराकडे फिरकणार कोण?



सानिका म्हणजे सीताक्काची नात म्हणजे मुलीची मुलगी. तिला निसर्गाची खूप आवड. लहानपणी यायची गावी आजोळी. पण तेव्हा ती खूपच लहान होती तीन चार वर्षांची.आजी गेल्यावर तेही संपलं.पण सानिका मुळातच झाडात, पक्ष्यात, फुलात रमणारी. तिने शिक्षणही वेगळंच घेतलं. पर्यावरणशास्राचा अभ्यास केला. दापोलीला राहून वानिकी शिकली. तिथे अभ्यासासाठी फिरताना तिला आजोळ मात्र आठवे अगदी लहानपणी मनावर कोरलं गेलेलं!
एकदा तिने वडिलांंना सुट्टीत दापोलीला बोलावून घेतलं. तिथून तिचं आजोळ पाच तासांवर." बाबा मला आजीच्या गावी जायचय. आपलं म्हणजे तुमच्या आई वडिलांचं गाव असं नाहीच. मी जे शिकते आहे ते वापरण्यासाठी मला निसर्गाच्या सान्निध्यातच रहायचं आहे. आणि नव्याने काही शोधण्यापेक्षा त्या मोडकळीला आलेल्या घराचं,मातीचं नंदनवन करेन मी".
बाबांना ते जरा गैरसौयीचं वाटत होतं."सानू तू शहरात वाढलेली.तिथल्या सुविधांची तुला सवय आहे. तू तिथे कशी राहणार?"
" मी एकटी कुठे राहणार आहे? आणि नेहमी नाही काही. आपण जाऊन येउन करायचं."
सानूची आई,बाबा आणि मामा मामी यांना तिने एकत्रच केलं एक दिवस आपल्या घरी आणि कल्पना सांगितली.
" हे बघ सानू, तुझ्या हौसेसाठी इतके पैसे खर्च करायचं मला कठीण वाटतय.आधीच शहरात खर्च कमी आहेत का?" मामा म्हणाला.
" मामा तू परदेशात हिंडतोस. त्यांनी आपली घरं,संस्कृती जपली आहे असं सांगत!आम्हाला फोटो दाखवतोस आणि आपल्याच घराबद्दल असा विचार करतोस?"
" सानू, अग मामाला असं बोलतेस? लाडका असला तरी मोठा आहे तो तुझ्यापेक्षा". आईने तिला तोडलं.
"ताई, मलाही वाटतय की तुमची सानू आणि आमचा प्रह्लाद. दोघांनाही गाव नाही म्हणजे असूनही आता तिथे कुणी नाही..माझं माहेरही कोकणातलंच की. मी यांना कितीदा म्हटलं, पण यांना आवड नाही त्यामुळे ते काही उत्साह दाखवणार नाहीत. सुदैवाने सातबाराही तुम्हा बहीण भावांच्याच नावे आहे. कुणी तिसरा हक्कदार नाही. मग करा ना कायापालट. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. थोडं हाताशी आहे ते खर्च करण्याची शक्यताही आहे. मग मागे का जाता?" अर्थातच मामी.
" मला वाटतय की आपण या घराचा जमिनीचा विचार करावा. तिने त्यातलं शिक्षण घेतलं आहे आणि रुळलेल्या वाटेने न जाता ती वेगळं करु पाहते आहे." बाबा म्हणाले.
सानूच्या मामानेही अखेर या प्रस्तावाला होकार दिला केवळ सानूवरच्या प्रेमाखातर! शंका तर होतीच पण तिच्या उत्साही मनाला आवर घालणं कठीण होतं.
पण मामा म्हणाला," सानू मी आत्ता थोडीच रक्कम घालतो. तुमचं कितपत आणि कसं पुढे जातंय त्यावर पुढे ठरवेन. नाहीतर तुमच्या पोरखेळात पैशांची नासाडी व्हायची".
पण बाबा मात्र सानूच्या पाठीशी उभे राहिले आणि मामीही पाठिंबा देत राहिली सर्वतोपरी. कधी मामाच्या नकळतही!

आशिष, सुखदा, मयुरेश आणि सानिका अशी चौकडी नेहमी सोबत असे.ती इथेही सोबत राहिली. सानिकाचे बाबा त्यांना गावी घेऊन आले. देवीहसोळ नावाचं ते गाव ... निसर्गाचा वरदहस्तच!
या चौकडीने मग चंगच बांधला. त्यांच्या जोडीला वास्तुस्थापत्य शिकणारे अजून दोन मित्र आले.
"थोडा खर्च करावा लागेल पण ही वास्तु पुन्हा उभी करू शकतो आपण.. पण निसर्गपूरकच करू. माती, बांबू वापरून."उन्मेष आणि आतिश म्हणाले.
अंतिम वर्षाचा प्रकल्प म्हणून चौकडीने या वास्तूचं आणि निसर्गाचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं.
गावात दोन खोल्या भाड्याने घेतल्या. स्वयंपाकाला मावशी शोधल्या. आणि आई वडिलांनी दिलेल्या पैशातून कमीतकमी खर्चात त्यांनी वास्तू स्वतः बांधून पुन्हा उभी केली. तीनच मोजक्या खोल्या. पण सुरेख रेखल्या.शेतातलीच माती, गावातल्या जुन्या घराचं साहित्य असं वापरून उन्मेष आणि आतिशनं घर रेखून दिलं.त्यांचाही तो अभ्यासाचा प्रकल्पच होऊन गेला.
"सीताक्काच्या नातीने घराला नवं दिस दाखवलं पहा जनु." गाव बोलू लागलं.
जमीन नांगरण्यापासून, वाढलेलं जंगल कापण्यापासून सगळं मुलांनी केलं. गावातले हातही लागले कामाला.
हळूहळू वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली. युवा समाज माध्यमांवर मुलाखत झाली. गावात येऊन चित्रीकरणही झालं.
महाविद्यालयाचे शिक्षकही पहायला आले आणि म्हणाले," चार भिंतीच्या आतलं ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष अभ्यासून पहात आहात. जगून पहात आहात. तुम्ही इथली वृक्षगणना केली.दुर्मिळ वनस्पती, झाडं नोंदवली. आधुनिक काळातही निसर्गपूरक पद्धत वापरून कमी खर्चात घर पुन्हा उभारलंत. तुमची वेगळी परीक्षा घ्यायलाच नको आहे. खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याने असं करून पहायला हवं! पण तुला ते सुचलं हे तुझं आणि तुझ्या मित्र मैत्रीणींचं कौतुक हो सानिका।".

सानिकाच्या मित्र -मैत्रिणींचे आई वडीलही शनिवार रविवार येऊ लागले. लाडू,चिवडे, केक, बिस्कीटे असा खाऊ डबे भरभरून येऊ लागला. कुणाची आई आली की मुलांची मज्जाच असे.बाबा मंडळीही उत्साहाने घराच्या शेताच्या कामात सहभाग घेत.भाड्याने घेतलेल्या दोन खोल्या मग रहायला कमी पडत पण आनंदाने भरुन जात".
"छानच चाललय हो.आणखी काही लागलं तर सांगा. माझा एक मित्र आर्किटेक्ट आहे. माझी मैत्रीण एका वनस्पतीवर संशोधन करते आहे परदेशात." असं कुणी सांगितलं की मुलांचा हुरूप वाढे.एकदा तर चक्क सानिकाचा मामा आला स्वतःच! नुकताच परदेश वारी करुन आला होता. भरपूर चाॅकलेटस् त्याने मुलांसमोर ओतली. एरवी सुटाबूटात वावरणारा मामाही आपल्या मूळ घराची जमिनीची बदलती रूपं पाहून इथल्या मातीच्या रंगात रंगून गेला! आई वडिलांच्या आणि बालपणीच्या आठवणीत रमला. जुन्या मित्रांना भेटला.त्यांच्यातलाच होऊन गप्पा मारू लागला. हे घर त्याला आपलंच असूनही परकं वाटत होतं ते पुन्हा आपलंच वाटू लागलं. सानिकाच्या गालावर आपल्या मातीभरल्या हातांनीच त्याने कौतुकाची बोटं रेखली तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी सानिकानेही क्षणात टिपलं! सीताक्काचं घर आता असं सर्वांचंच झालं होतं!


घर बांधून झालं होतंच. समोर जमीन स्वच्छ करुन मुलांनीच सारवली होती गावातनं शेण आणून! समोर छोटी बाग लावली होती. घर आता नांदतं झालं होतं आणि मुलांंना परतीचे वेध लागले होते. मामा आणि आईने आता इथे गडी ठेवायचं सहमतीने ठरवल. त्यामुळे घर
सांभाळलं जाईल आणि मुलं येतील तेव्हा त्यांना मदत पण होईल.सानिकाला आता इथे सेंद्रिय शेती करून पहायचं मनात होतं.. आपल्यासाठी.. आपल्या आनंदासाठी...

घराच्या खोलीत खणताना हे बघ काय सापडलय सानू. एक मोत्याची बुगडी आणि एक नीराजन. कुठे होत हे?"
"अग सापडलेलं असं छोटं मोठं मी एकत्र करून ठेवलं होतं. म्हटलं सगळं झाल्यावर तुला दाखवू निवांत."उन्मेष म्हणाला.
सानूने आईला फोटो पाठवलयावर तिने लगेच ओळखलं. सानू ही तर सीताक्काची बुगडी! आणि तुळशीपुढचं नीराजन"!
मुलांनी दुसर्‍या दिवशी लगेच मातीचा चौथरा केला. त्यावर कुंडीचा आकार देऊन ती रोवली.शेजारच्या वाडीतून तुळस आणवली आणि लावली. सानूने निराजन घासलं. दुकानातून तूप, वात आणली आणि तुळशीपुढे तेच नीराजन लावलं! उद्या परत निघायचं होतं. दोन महिने इथे राहिल्यावर आता अंतिम परीक्षेची तयारी आणि या प्रकल्पाचं सादरीकरण या सहाजणांना आपापल्या ठिकाणी करायचं होतं.
रात्री झोपेत तिला क्षणभर भास झाला.. दोन आजोबा आणि एक आजी या नव्या घराच्या अंगणात बसून चांदण्या मोजत गप्पा मारत आहेत.