Aaghat - Ek Pramkatha - 21 in Marathi Love Stories by parashuram mali books and stories PDF | आघात - एक प्रेम कथा - 21

Featured Books
Categories
Share

आघात - एक प्रेम कथा - 21

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(21)

‘‘बघ प्रशांत, अजून विचार कर. चॅलेंज देते तुला. एक ना एक दिवस तू माझ्या पाठीमागून आल्याशिवाय राहणार नाहीस. सगळयांचा विरोध झुगारून येशील, कारण माझा विरह तुला सहन होणार नाही.’’

‘‘विरहाच्या गोष्टी बोलू नको. मी तुझ्या प्रेमात पडलोय म्हणून! मी तुझ्यासारखा प्रेमात आंधळा झालोय असे समजू नको. तुलाच वाट पहावी लागेल माझी.’’

‘‘बघूया कोणाला कुणाची वाट पाहावी लागते, येणारा काळच ठरवेल.’’

मी रागाने तिथून निघून आलो. सुमैया पूर्वीसारखी राहिली नव्हती. माझी आता तिला गरज वाटत नव्हती. बरं झालं तिचं दुसऱ्यांदा खरं रूप मला समजलं. आता इथून पुढं मात्र तिचा नाद न केलेलाच बरं. परीक्षा जवळ आली आहे. शेवटचं वर्ष संपत आलेलं आहे. मला जागे व्हायला हवं. अभ्यासाला लागायला हवं. मनाशी पक्का निश्चय केला.

पूर्वपरीक्षा महिनाभरात आली होती. पूर्वीसारखं आता महाविद्यालयातील शिक्षकांचं आपुलकीचं बोलणं नव्हतं. प्रत्येकजण संशयी नजरेने पाहत होते. माझ्याबद्दलचा जिव्हाळा त्यांच्यातला संपलेला पाहून मला खूप वाईट वाटलं. इतके वर्षे सगळयांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. पण शेवटच्या या तीन-चार महिन्यातच होत्याचं नव्हतं झालं. चांगली गोष्ट घडायला खूप दिवस जातात, खूप कष्ट घ्यावे लागतात, माणसं जोडायला खूप वेळ लागतो, पण तोडायला क्षणाचाही विलंब लागत नाही.

खूप जीव होता सगळया प्राध्यापकांचा माझ्यावर. सगळयांना मी दुखवलं होतं. याचं मुख्य कारण सुमैयाचं आणि माझं प्रेमप्रकरण होतं. कॉलेजचे प्राचार्य पाटील सर यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. मी सरांना भेटण्यासाठी गेलो. मला संशय होताच, सर माझ्या आणि सुमैयाच्या संबंधाबाबत बोलणार, विचारणार आणि खडसावणार.

मनात खूप भीती होती. ऑफिसबाहेर थांबलो होतो. सर, आता कोणाशी तरी चर्चा करीत होते. १० ते १५ मिनिटात ती व्यक्ती बाहेर आली आणि मग मला सरांनी आत बोलवलं. मी सरांसमोर अपराध्यासारखा जाऊन उभा राहिलो.

‘‘हे बघ, प्रशांत तुझं सततचं गैरहजर राहणं आणि बेशिस्त वर्तन आम्हाला आढळून आलेलं आहे. तसेच अभ्यासातील अधोगती यामळे वर्गप्रतिनिधी म्हणून तुझ्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याची निवड केलेली आहे. दुसरी सूचना म्हणजे तुझ्या वर्तनात सुधारणा व्हायला हवी. अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल. अभ्यासातही सुधारणा व्हावी. बाकीच्या फालतू गोष्टी टाळून अभ्यासाला लाग. तुम्ही गरीब माजोर असता म्हणून तु च्यावर दया दाखवून काही उपयोग नाही. शेवटी एक ना एक दिवस तुम्ही तुमची खरी रूपं दाखवतात. तुझं काळ तोंड करून इथून जा. तुझ्यासारख्या विद्यार्थ्याची मला जरा देखील दया येणार नाही. “विश्वासघातकी आहेस तू विश्वासघातकी.”

सरांनी बोललेलं खूप मनाला लागलं होतं. हॉस्टेलवर येऊन खूप रडलो. सुरेश, संदिप, अनिल ते काही माझ्याशी बोलतच नव्हते. चौकशीही करीत नव्हते. त्यात पूर्वीसारखं अभ्यासाचं कारण सांगून स्पेशल खोली घेऊन त्यांच्यापासून अलिप्त राहिलो होतो. पण अभ्यासाचा काही पत्ताच नव्हता. माझ्याकडून सगळयांचा विश्वासघात झाला होता. माझं मन मला खात होतं. पण करणार तर होतो काय? त्यात सुमैयापासून दूर राहायचं, तिच्याशी संबंध तोडायचं असं ठरवून टाकलच होतं. तिच्यापासून वेगळं राहून १० ते १२ दिवस झाले होते. माझ्यामध्ये मी थोडाफार बदलही घडवून आणला होता. पण मला कोणी सुधारला, बदललाय म्हणत नव्हतं. जो तो नाकारत होता, बोलण्याचे टाळत होता. त्यात तिघा मित्रांचाही सुमैयाच्या नादी लागून आधार तुटला होता. बाकी सगळे मित्र लांब लांब राहत होते. मला वगळण्यात येत होते. एकेकदा वाटायचं सुमैयाशी प्रेम केलं म्हणजे मी फार मोठा गुन्हा केला की काय? गाववाला रूम पार्टनर आणि क्लासमेट असलेला अनिल बोलत नव्हता, तरीही त्याला एकटं भेटून एक दिवस विचारलं,

‘‘अनिल, मी सुमैयाशी प्रेम केलं हा फार मोठा गुन्हा झाला काय रे? कोण करीत नाही काय या जगात कुणावर प्रेम?’’

‘‘करतात प्रशांत, नाही असं नाही.’’

‘‘मग मलाच का एवढं सारेजण नाकारतात, तिरस्कार करतात, मला दोष का देतात?’’

‘‘प्रशांत तुझी परिस्थिती गरीबीची. तू एक हुशार आदर्श विद्यार्थी एक वर्गप्रतिनिधी तुझ्याकडून अशी गोष्ट घडायला नको होती असं साऱ्यांना वाटतं.’’

‘‘मग गरीबानं प्रेम नाही करायचं?’’

‘‘प्रेम करावं, गरीब-श्रीमंत सगळयांनी प्रेम करावं पण ते पेलण्याची पात्रता अंगी असली तरच करावं. नुसतं शरीरसुख पाहू नये, भावनेच्या आहारी जावू नये.”

‘‘मग तुला काय वाटत, माझी पेलण्याची क्षमता नाही?’’

‘‘अरे काय पेलणार तू, तुझी तुलाच पेलण्याची क्षमता आहे काय? अरे घर ना दार, ना आई ना बाप. परिस्थितीनं मेलेला माणूस तू. तुला तुझं लक्ष अजून गाठायचं आहे. तुला खूप संघर्ष करावा लागणार आहे. तु अजून शून्य आहेस. तुला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. मोठ्या प्रेमाच्या गोष्टी करतोस. काय वचन दिलयंस आजी-आजोबांना सुखात ठेवण्याचं, त्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण करण्याचं. तू त्या पूर्ण करू शकणार आहेस? त्या पोरीच्या नादी लागून आणि मौजमजा करून उलट तुझीच अधोगती होणार. तुझ्याकडून हे अपेक्षित नाही. सारे शिक्षण झाल्यानंतर स्वत:च्या पायावर उभं राहिल्यानंतर लग्न, संसार आहेच, पण हे शिकायचं वय आहे, या वयात मुलामुलींमध्ये आकर्षण निर्माण होणं साहजिकच आहे पण मनावर जो नियंत्रण ठेवतो तोचयातून सहीसलामत बाहेर पडतो. एकमेकांबद्दल ओढही असते. खाचखळगे हे या वयात येत असतात त्यातून कोणी मनावर नियंत्रण ठेवेल, परिस्थितीची जाणीव ठेवून जो सावरेल तोच भावी आयुष्यात यशस्वी होईल पण तुझा पाय खड्‌ड्यात अडकलेला आहे. तू तुला सावरू शकलेला नाहीस, तूच तुझ्यावर नियंत्रण ठेवू शकलेला नाहीस याचा परिणाम तुला पुढे-मागे एक ना एक दिवस भोगावा लागेल. प्रेम करणे हा गुन्हा नाही. तू या साऱ्यांपासून दूर असावं अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती, याचं कारण तुझी परिस्थिती, अनेकांच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाहीस.” ‘‘पण अनिल मी तिच्याशी संबंध तोडलेला आहे. तिला भेटलो नाही अगर तिच्याशी बोललो नाही.’’

‘‘अरे, ते ठीक आहे रे तू बदलला आहेस पण तुझ्या अभ्यासातील प्रगती बदलली आहे काय? पूर्वीसारखा अभ्यास होतो काय तुझा?”

‘‘होय अनिल तू म्हणतोस ते ठीक आहे. पुस्तक तर समोर असतं पणमनात विचार तर तिचाच असतो. काय करायचं, काही कळतच नाही अनिल. तूच सांग मी काय करू आता?’’

‘‘मी काहीच सांगू शकत नाही आणि सल्लाही देऊ शकत नाही.” खरं तर तुझ्याशी माझी बोलण्याचीच इच्छा नव्हती पण मला राहवलं नाही म्हणून बोललो तेही तू पडलेला चेहरा करून विनवण्या करीत आलास म्हणून.’’

अनिल पुढे काहीच न बोलता तिथून निघून गेला.

आता जे ठरवायचं होतं ते माझं मलाच ठरवायचं होतं. काय करायचं? आणि काय नाही? समोर मोठा प्रश्न होता. अभ्यास काही होत नव्हता. अस्वस्थता वाढत होती. त्यात मित्र दुरावले होते. बरेवाईट विचारणारे, वरचेवर अभ्यासाची चौकशी करणारे, सारे प्राध्यापक दुरावले होते. मनाला खूप असुरक्षित आणि एकटं एकटं वाटायचं. फार मोठा गुन्हा केल्यासारखं वाटायचं. आजी-आजोबांना ही गोष्ट समजली तरी काय होईल? या प्रश्नांनी मनात काहून माजवलं होतं. पण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तरी धीर होताच. पुन्हा तिचा विचार मनाला छेदून गेला.

एकदा कॉटवर वाचत बसलो होतो. पुस्तक आपोआप कधी बाजूला झालं कळलंच नाही. मी आडवा झालो. आणि पुन्हा प्रेमभऱ्या दुनियेत रममाण होऊन गेलो. पुन्हा तिचा चेहरा डोळयासमोर नाचू लागला. तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिचा तो स्पर्शाचा भास होऊन अंगावर शहारे येऊन गेले. तिच्या बोलण्यातला गोडवा आणखीनच मधुर वाटू लागला. तिच्या सहवासाचा, सुखाचा भास होऊ लागला. तिचा चेहरा डोळयात साठवून तिच्यात सामावून गेलो. कधी डोळा लागला कळलंच नाही पण त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अचानक मनात आलं, नाही आपण सुमैयाशिवाय जगू शकत नाही असं वाटू लागलं. जी बदनामी व्हायची ती झालीच आहे, ज्यांनी मला दोष द्यायचा तो दिलाच आहे.

*****