Coffee in Marathi Short Stories by shabd_premi म श्री books and stories PDF | कॉफी

Featured Books
Categories
Share

कॉफी

कॉफी
दुपारचे पाच वाजले होते, दादासाहेबांना वरहंड्यातील आराम खुर्चीवर बसुन पुस्तक वाचता वाचता झोप लागली होती, अंगणातल्या मोठं मोठ्या झाडांच्या सावलीत ते पहुडले होते.. वेलींच्या त्या गर्दीतून सुर्यदेवाची नजर एखादेच वेळी त्यांच्या आराम खुर्चीपर्यंत पोहचत असे. नाहीतर मंद वारा हा अंगणभर फिरत असे.
तेवढ्यात त्यांची कॉफी घेऊन हरी तिथे आला, त्यांना दादा म्हणून हाक मारताच दादा तंद्रीतून जागे झाले, त्यांची झोप मोड झाली, पण हल्ली त्यांचं दुपारचं अस झोपणं वाढलं होतं. म्हणून त्यांनी हरीला नित्याने दुपारच्या पाच वाजता कॉफी घेऊन यायला सांगितलं होत. त्यांचं आयुष्य आता फक्त पुस्तकं, अधून मधून दिवसभरातून फेरफटका एखादा मारलाच तर तो, आणि हरी एवढ्यातच राहिलं होतं, ते एकटे होते. हरीच्या वहिणीसाहेब अवेळीच दादांची साथ सोडून गेल्या, दादासाहेबांना माधवी नावाची एक मुलगी होती. शहराहुन गावाकडे येऊन त्यांना सहा वर्ष झाली होती आणि हरीची त्यांना सुरुवाती पासून साथ होती.
दादांनी टेबलावर ठेवलेला कप हाती घेतला आणि कॉफीचा एक एक घोट घेत बाहेर कुठेतरी नजर फिरवत ते विचारात मग्न झाले. कॉफी संपत आली होती, आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष हरीवर गेलं, त्यांनी हरीला विचारलं "अरे हरी, तू इथेच उभा आहेस काय झालं, काही बोलायचं आहे का," त्यावर हरी म्हणाला "हो मला जरा सांगायचं होतं तुम्हाला, मुलाला तिकडं शहरात कुठं तरी काम मिळालं तर त्याच्याकडे जायचं म्हणत होतो" दादा म्हणाले "अरे तर मग जाऊन ये त्यात काय एवढं, हरी म्हणाला " अहो दादा तस नव्ह मी त्याच्याकडं कायमच जायचं म्हणतोय, माझी लक्ष्मीबी लय दिवसांपासून चालायचं म्हणतीया" दादांच्या कपाळावरच्या आठ्या दाट होत चालल्या होत्या. खुर्चीवरून उठत, हरीच्या खांद्यावर हात थोपटत पुढे निघून, कापऱ्या आवाजात हरीला म्हणाले, "अरे राजा अस काय करतोस तुला माहितीये माझं नाही आता कुणी या जगात, की ज्याला मी बोलवू शकेल रे, आणि असतं तरी कुणी आलं असतं का, सांग बर." हरी म्हणाला" दादा मला ते समदं ठाव हाय पण म्या आता काय करू, मला बी तिकडं जाणं जरुरी हाय नाहीतर माझी लक्ष्मी अजून बोलायची नाही माझ्याशी. पोराला बी दोन तीन वर्ष झाली पाहून, त्याची काही भेट नाही काही अजून.
दादा परत आरामखुर्चीत पहुडले, दादांना एकदम स्वरूपाचे स्मरण झाले, मोठा सुस्कारा सोडत ते हरीला म्हणाले, बरं असं म्हणतोस तर ठीक आहे जा, पण केव्हा निघतोयस" हरी म्हणाला "उद्या सकाळच्याला निघायचं म्हणतोय तशी तयारी करून ठेवली हाय तिनं.."
दादासाहेबांचा निरोप घेऊन हरी निघून गेला, हरीच्या हातची कॉफी शेवटची ठरेल ह्याचा थोडाही अंदाज दादासाहेबांना आला नव्हता. हरीच्या निमुळत्या होत चाललेल्या पाठमोऱ्या मूर्तीकडे दादासाहेब कित्येक वेळ तसेच पाहत बसले..
दादासाहेबांकडे आता फक्त जुन्या आठवणींमध्ये गुंतून बसण्याशिवाय कुठलंच पर्याय उरला नव्हता, जाता जाता हरीने सगळं घर नीटनेटकं करून ठेवलं होत. ते पाहून दादांना थोडं बर वाटत होत. मनीच ते विचार करत होते हा सुद्धा जाता जाता आठवणी देऊन गेलाच. दादासाहेबांना माणसांपेक्षाही जास्त भीती त्यांच्या भूतकाळातल्या काही आठवणींची वाटत असे. दादासाहेब आरामखुर्चीत पहुडले.
स्वरूपाच्या जाण्याचा प्रसंग अलगद त्यांच्या समोर उभा राहिला. अचानक ते स्वरूपा म्हणत जोरात किंचाळले. त्यांची झोप मोड झाली. ते उठले आणि अंगणात येर झऱ्या मारू लागले. त्यांना कळलं की रात्रीचे फक्त साडे आठ झालेत आताशी. आत वेळ निघावा म्हणून सोबत बोलायला हरी सुद्धा नव्हता. ते एकाकीच पडलेले. समोर उभी असलेली लांब लांब नारळाची झाडं जणू त्यांना आभाळापर्यंत टेकलेली वाटायची. आरामखुर्चीत बसून झोप येईपर्यंत त्यांना आता भूतकाळात डोकावून पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यांच्या समोर माधवीच्या लग्नाचा प्रसंग उभा राहिला. लाडागुणाची मुलगी लग्न होऊन आपल्या पासून कशी दूर होतेय, हे पाहताना दादासाहेबांचे मन चांगलेच आक्रंदु पाहत होते. तिच्या साठीचं स्थळ परत जाऊ नये म्हणून दादासाहेबांनी सगळं काही विकायला काढलं होतं, आपल्यासाठी ठेवलं ते फक्त खेड्यावरचं पडकं घर. तेच घर आता त्यांच्यासाठी आधार म्हणून उभं आहे.. हळू हळू बापावर असलेलं प्रेमही आटायला लागलं. आणि मुलीचे साधे फोन येणेही बंद झाले. तेवढ्यात दादासाहेबांना आपल्या लग्नात भेट मिळालेल्या जुन्या रेडिओची आठवण झाली. ते खुर्चीतून उठले आणि खोलीत जाऊन तो त्यांनी शोधून काढला. त्याला बाहेर आणलं आणि समोरच्या टेबलवर ठेऊन त्याच गोल बटन फिरवून एका ठिकाणी स्थिर केलं. आणि पहिलंच गाणं लागलं ते, "जाने कहा गये वो दिन, कैसे तुम्हे भूल पायेंगे" प्रत्येक शब्दाची जादूच झाली त्यांच्यावर जणू. आणि स्वरूपाचा चेहराच त्यांच्या समोर राहिला.. हळू हळू ते माधवीकडून स्वरूपा कडे वळले.. स्वरूपाचं अकाली जाणं त्यांना आवडलं नव्हतं. त्यांना जणू पृथ्वीची चंद्राने साथ सोडून जाण्यासारखं त्यांना वाटत होतं.
रात्रीचे ११ झाले होते तरीही दादांना अजूनही झोप लागत नव्हती..आणि काही आठवणींचं त्यांना छळणंही काही थांबत नव्हतं. दादांनी आपल्या लग्नाचा अलबम काढून आणला. आणि एक एक फोटो वरून हात फिरवत ते फोटो पाहत होते. एक शेवटचा फोटो तिला हृदयविकाराचा झटका येण्याच्या फक्त एक दिवस आधीचा होता. नातवाच्या वाढदिवशी काढलेले फोटो होते ते, दादा तिथेच थांबले. हॉस्पिटलमध्ये तीने जवळपास महिनाभर झुंज दिली पण शेवटी तिचा श्वास थांबला तो थांबलाच.
दादांनी रेडिओ बंद केला आणि अलबम टेबलवर ठेवत त्यांना खुर्चीवरच झोप लागली. सगळ्या गोड, कडू आठवणींना एकदा आठवून त्यांना शांत झोप लागली. ती कायमचीच.
सकाळी दूध घेऊन आलेल्या सखारामाला दादांना आवाज देऊनही दादा खुर्चीवरून उठले नाहीत हे दिसले तेव्हा त्यांने दादांना जवळ जाऊन थोडं हलवून बघितलं, तेव्हा ते गेल्याच त्याला कळलं. नंतर दादांच्या मुलीलाही कळवण्यात आलं. ती ही कशी बशी पाच मिनिटांकरिता आली आणि निघून गेली.