क्रमशः-
४.
तो पुढे बोलायच्या आतच मी बोललो, " हा बोल विठ्ठल."
तो- " कोण विठ्ठल ? आरे मित्रा, मी सतीश बोलतोय ! सतीश कांबळे ! ओळखलं का ? २०११ ला आपण पुण्यात एकाच कंपनीत काम करत होतो आणि मी तुझा रुमपार्टनर होतो."
मी - " हा, बोल ना सतीश. किती दिवसांनी फोन केलायस जवळजवळ आठ नऊ वर्षे होऊन गेली. इतक्या दिवसांनी कशी काय आठवण काढलीस ?"
सतीश- " आरे, खूप जुन्या डायरीतून तुझा फोन नंबर शोधून काढला. फोन लागतोय का न्हाय याची धाकधूक होती, पण लागला. कुठं आहेस ? तब्येत पाणी ठिक आहे ना ?"
मी- " पुण्यातच आहे. आज २० दिवस झाले रूमवरच पडून आहे. ना कुठं बाहेर फिरता येतंय की ना काय खरेदी करायला घराबाहेर पडता येतंय. नुसता कोंडवाडा झालाय इथं."
सतीश- " म्हणजे खुरूड्यातल्या खुडूक कोंबडीसारखी तुझी आवस्था झालीया म्हण की. पण कमाल हाय बाबा तुझी. आजून पुण्यातच आहेस. म्हणजे मी पुण्यातून गावी येऊन नऊ वर्षे झाली, तरीही तु तिथंच आहेस. पगार बिगार वाढला का न्हाय."
मी - " त्यावेळच्या परिस्थिती पेक्षा खूप मस्त चाललंय माझं."
सतीश - " आठवतंय, आपल्या जवळ पैसे नसायचे, म्हणून दुपारी कॅन्टीनमध्ये जेवण करायचो आणि रात्रीच्या जेवणाची सोय व्हावी, म्हणून जबरदस्तीनं ओव्हर टाईमला रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत थांबायचो. संध्याकाळच्या ओव्हर टाईमच्या बदल्यात रात्रीचं जेवण मिळायचं. दोन्ही वेळेला कंपनीतच जेवण करायचो. आपण लय हालाखीत दिवस काढलं ना?"
मी- " तुला दम निघाला नाही. लगेच गावाला पळालास. इथं थांबला असतास, तर तुझंही चांगलं झालं असतं. बर जाऊ दे. तुझं कसं काय चाललंय ? सगळं ठिकठाक आहे ना? "
सतीश- " आरे, काय सांगू तुला. कितीही हालापेष्टा सहन करून ऱ्हायलो असतो, पण त्या टायमाला मी लग्न केले. तुला तर माहीतच आहे, कंपनीत पगार किती कमी मिळत होता. माझी बायको तशाही परिस्थितीत तडजोड करून कसं बसं घर चालवत होती. पण काही दिवसांत ती गरोदर राहिली. आपलं काय, आपण कसंही राहू शकतो.उपाशी तर उपाशी काम करू शकतो, पण आपल्यामुळं दोन जीवांच्या बायकोची खाण्यापिण्याची, दवापाण्याची हेळसांड होत होती. ती माझ्याच्यानं बघवली न्हाय. तेव्हा म्हंटलं आता घर जवळ केल्यालं बरं. पुणं सोडून गावी आलो. मला शेती नाही. इथं जवळच पेट्रोल पंपावर काम शोधून काढलं. आजून पेट्रोल पंपावरच काम करतोय. घरचं दोन टाईमचं पोटभरून जेवण मिळतंय. घरी कशाचीही कमतरता नाही. बाकी खाऊन पिऊन मस्त चाललंय माझं. आपल्याला आजून काय पाहिजे. बाकी तुझं सांग. कसा आहेस ? तु राहतोयस त्या भागात व्हायरसमुळं भितीचं वातावरण नाही ना ?"
मी- " मी रुममधून बाहेरच पडत नाही. भाजीपाला कधीतरीच मिळतो. तोही मिळाला तर मिळाला. नाही तर कडधान्ये, डाळी, भात याच्यावरच रोजचा दिवस काढायचा."
सतीश- " बर ठीक आहे. काळजी घे. बाहेर पडू नकोस आणि गावी आल्यावर आवर्जून माझ्या गावी ये. आरे किती वर्षे झाली आपली गाठभेट नाही."
मी- " बर, बघू."
सतीश- " बघू बिगू काय चालणार नाही. माझ्या गावी यायलाच पाहिजे."
मी - ठिक आहे. वेळ मिळाला तर नक्की येईन." असे म्हणून मी फोन ठेवला.
या दोन दिवसांत कुणीतरी कोणतीही अपेक्षा न ठेवता फोन केला. याचा मला आनंद झाला. आजपर्यंत वाटत होतं, की फक्त स्वार्थी लोकच आपलं काम साध्य करण्यासाठी फोन करतात. पण तसं नाही, काही लोक आपूलकीनंही फोन करून चौकशी करतात याची जाणीव झाली.
तो दिवस गेला. दुस-या दिवशी, का कोण जाणे, पण दिवसभर मन उदास होतं. सायंकाळी गावाकडची खूप जास्त आठवण येऊ लागली. मनाशी ठरवले रात्रीचं जेवण लवकर उरकायचं आणि गावी आई-वडिलांना फोन करायचा आणि भरभरून बोलायचं अगदी मन भरेपर्यंत बोलायचं. रात्रीचे नऊ वाजले असतील. जेवण चालू असताना फोन आला. गावाकडून दादांचा फोन होता. मी वडीलांना दादा म्हणतो. तिकडून दादांचा आवाज ऐकण्याआधीच मी बोलू लागलो, " हा बोला दादा ! मी तुम्हाला थोड्या वेळानं फोन करणारच होतो. तितक्यात तुमचा फोन आला. "
" आरं मी बोलतोय !" आवाजावरून दादांच्या फोनवरून मोठा भाऊ बोलत आहे. हे मी ओळखले.
क्रमशः