१८
हळदीचा दिवस..
दुसरा दिवस उगवला तोच मुळी उत्साहात. म्हणजे मी ठरवून टाकले. आता कात टाकायलाच हवी. काहीतरी छान बोलायलाच हवे. वै ला काल रात्री आला तसा राग जन्मभरात कधी म्हणून येऊ द्यायचा नाही.. मी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. म्हटले दिवसाची सुरुवातच अशी करावी ना त्याने पुढचा मूडच बदलून जावा. आज संध्याकाळी हळद. तर सकाळी सगळे तसे मोकळे असणार. त्यात काही संधी मिळते का ते पाहिले पाहिजे. जमले तर कालची चूक सुधारली पाहिजे. बोलण्यात तसा मी हुशार. आई तर म्हणते, नुसता बोलण्यातच हुशार .. अर्थात याबरोबर ती 'अगदी बापासारखा' हे म्हणून आपले कर्तव्य पार पाडते.. तर ही वै समोर आली की काय बोलावे हेच उमगत नाही. एकतर मी तिचे बोलणे ऐकत बसतो, नाहीतर तिच्याकडे पाहात बसतो.. आणि डे ड्रीमिंग करत बसतो. त्या भानगडीत बोलायचे काय ते सुचत नाही. वर तिचा गैरसमज.. तिला वाटते मीच बोलणे टाळतोय तिच्याशी. पण आता हे असे नाही चालणार. काहीतरी करायलाच हवे. खरेतर नुसते माझ्यासाठी नाॅर्मल म्हणावे असे काहीही बोललो तरी निम्मा कार्यभाग साधला जाईल. एका दृढ निर्धाराने उठलो मी आज. 'होंगे कामयाब' हीच आजची थीम आणि तेच आजचे उद्दिष्ट.
त्याचा एक भाग म्हणून सकाळसकाळी उठून बागेत गेलो. त्याच ठिकाणी म्हणजे वै च्या खिडकी खाली. आणि व्यायाम सुरू केला. मुद्दाम छानसा टी शर्ट आणि शॉर्टस. स्पोर्ट्स शूज आणले होते याचा मला आनंद झाला. 'मेरी जान मेरी जान आना विंडो में' म्हणत पोहोचलो खाली.. आणि वै चुकून तरी खिडकीत यावी एवढी एकच इच्छा मनी धरून व्यायामाचा घाट घातला. मधूनमधून व्यायामाच्या प्रकारात तिच्या खिडकीकडे नजर टाकणे ही सुरू ठेवले. मला तशी व्यायामाची आवड होती असे नाही.. त्यामुळे त्यात कष्ट पडले .. ते ठीक.. पण वै ची वाट पाहाण्याचे कष्ट मात्र जरा जास्तच जाणवत होते.
.. आणि चमत्कार व्हावा तशी ती खिडकीत आली. नुकतीच उठली असावी. पण गोड दिसत होती. तिनेच हाक मारली .. “हाय मोदक.."
आणि खिडकीतून तिने हातही केला..
मेंदी मस्त रंगलेली मला खालूनही दिसत होती. आणि ड चा द झालेला एका रात्रीत.. म्हणजे मी 'मोडका'चा 'मोदक'ही ही झालो होतो. म्हणजे कष्टाने ही रात्रभर माझ्या नावाचा सराव करत होती की काय? नसेल.. नाहीतर उचक्या नसत्या लागल्या मला? नाहीतर कृत्तिकाने प्रत्यक्ष कृती करत शिकवले असावे तिला. म्हणजे माझ्या मागे ही ती माझा विचार करत असणार?
“हाय.. वै.. देही.. ये ना खाली..”
मी तिला बोलावले.. आणि चक्क तिला ते कळले देखील..
“या.. येटे.. कमिंग.. इन फाइव्ह मिनिट्स.. जस्ट वेट..”
आता हिच्यासाठी पाच मिनिट काय मी जन्मभरही थांबायला तयार होतो हे मी तिला कधी सांगू शकणार होतो?
पाचेक मिनिटात ती आलीच. टी शर्ट आणि जीन्स मध्येही ती छानच दिसत होती. मला ते सुभाषित आठवले.. 'जातीच्या सुंदरास काहीही सुंदरच दिसते'.. तितक्यात कालचा तो सुभाषित फियास्को आठवला आणि मी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला.. नो मोअर बिलिव्हिंग सुभाषित्स.. काहीही होवो.. सुभाषिते आऊट!
“पाहू मेंदी .. वॉव!”
मी तिच्या हातांकडे पाहात उत्स्फूर्तपणे म्हटल्यासारखा म्हणालो. म्हणजे हे म्हणायचे मी काल रात्रीच ठरवले होते.
माझ्या बोलण्याने तिची कळी खुलली.
“इव्हन आय लव्हड इट..”
हिच्या इंग्लिशमध्ये 'इट' च्या ऐवजी 'यू' असा बदल केला तर.. एका सर्वनामा ऐवजी दुसरे! पण जे झाले तेही नसे थोडके!
ती बाजूलाच बसली. आता मी व्यायाम सुरू ठेवणे बरोबर की हिच्याशी गप्पा मारणे बरोबर? मला कळेना. अशा रियल लाइफ समस्यांबद्दल कुठेच कुणी का शिकवत नाही? मी व्यायाम थांबवून तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या बाजूला जाऊन बसलो. ती हसली. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. आजचा दिवस माझा! खूश होत मी संभाषण स्वतःच सुरू केले..
“यू नो हळदी टुडे..”
“या हर्ड अबाऊट द्याट.. एनी आयडिया व्हॉटस दॅट?”
“या ऑफकोर्स.. धिस इज अ पार्ट ऑफ मॅरेज.. टर्मेरिक सेरेमनी..”
“टर्मेरिक सेरेमनी? व्हॉट्स दॅट?”
“सी.. यू नो.. लग्नाआधी आपल्या इथे ही पद्धत आहे.. नववधूला..”
“हू इज दॅट वडू?”
“वडू नाही.. अगं वधू.. नवरी. नववधू म्हणजे नवीन नवरी..”
“म्हणजे.. आय विल गेस.. ब्राईड..”
“ब्राईड .. व्हेरी.. ब्राईट.. तर ती जी नववधू असते ना तिला अंगाला हळद लावतात..”
“हडळ?”
“बाप रे! मीनिंगचा अनमिनींग.. आय मीन अर्थाचा अनर्थ.. ह.. ळ.. द.. दॅट इज टर्मेरिक..”
“ओह.. यू मीन ऑल स्पायसेस म्हंजे मसाल्याचे पदार्त लावतात.. तिखट.. मिरची.. गरम मसाला.. ओ गॉड..”
“गॉड कशाला पाहिजे इथे?”
“सो.. मसाला झोंबणार नाही?”
“अगं तो थोडीच लावायचा.. ओन्ली टर्मेरिक.. द्याट डझन्ट झोंब.. तर तू संध्याकाळी पाहशील.. सेरेमनी.. टर्मरिक.. हळदीचा समारंभ..”
“वॉव.. दॅटस कुल..”
“हो ना.. हळद लावून कुल वाटते नवरीला..”
“हाऊ डू यू नो? तू कधी नवरी होता?”
“दॅट्स गुड वन.. अगं हळद लावली की नवरीच्या अंगावर तेज येते..”
“स्टेज? ऑर समथिंग लाइक दॅट..”
“तेज.. म्हणजे ग्लो..”
“म्हणजे नवरी ग्लोज लाइक अ लाइट?”
“अगं नाही..”
“ओके.. आय अंडरस्टूड.. नव्री चमकते.. राईट?”
“ॲब्सोल्यूटली.. यू आर सो क्लेव्हर..”
“आय नो.. इंडियन ब्रेन अब्रॉड..”
"या.. अँड अ ब्राईट वन दॅट टू.."
"रियली.. खरेच?" ती हसत म्हणाली.
"आॅफकोर्स यार. यू आर टू ब्रेनी.."
"यू टू.. डिअर पॅथाॅलाॅजिस्ट.."
खरे सांगतो, डाॅक्टरच्या डोक्यातून त्याची किंवा तिची डाॅक्टरकी कधीच जात नाही. अगदी झोपेतून उठवल्यावरही. त्यामुळे वै ला माझे पॅथालाॅजिस्ट असणे याही वेळी आठवले तर नवल नव्हते.