आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(20)
‘‘अरे पण तू तर तिला मैत्रीण मानत होतास. तिच्याबरोबरच्या प्रेमाला तुझा विरोध होता, तिच्याबाबत वाईट बोललं तरी तुला राग यायचा. तिची मैत्री शुद्ध आहे. तिच्या मनात एकतर्फी प्रेम नाही असं तूच म्हणत होतास पण असा अचानक कसा काय बदललास तू? अशी काय जादू केली तिनं तुझ्यावर? तू सारं विसरून जावी अशी!’’
‘‘याचं उत्तर देणं कठीण आहे सुरेश. पण तू माझा जिवाभावाचा मित्र आहेस म्हणून सांगतो. पण तू कुणाला सांगणार नाहीस असे वचन दे मला.”
“हो.सांग.”
‘‘सुरेश त्या रविवारच्या रात्री मला सुमैयाने भेटायला बोलविले होते. नाही आलास तर जीवाला काहीतरी करुन घेईन असं लिहिलं होतं. म्हणून मी घाबरुन तिला भेटायला गेलो. घरी कोणीच नव्हतं. मी तिला खूप समजावून सांगितले की माझे तुझ्यावर प्रेम नाही पण ती काही ऐकेना आणि बोलता बोलताच मला म्हणाली, माझ्या खोलीत जाऊन बोलत बसू. मी आणि ती खोलीत गेलो. संध्याकाळचे साडेआठ वाजले होते. मी सांगत असताना अचानक तिनं मला आपल्याजवळ ओढलं. मी एकदम गोंधळून गेलो. मीही माझ्या भावनेला आवर घालू शकलो नाही. जे घडायला नको होतं, ते घडलं सुरेश.’’
सुरेशच्या चेहऱ्यावर गंभीर छटा दिसत होत्या.
‘‘प्रशांत, खूप मोठी चूक केलीस. तू संपलास प्रशांत, संपलास तू. वेड्या काय करून बसलास तू.’’
‘‘पण प्लीज! सुरेश कोणाला सांगू नकोस.”
‘‘अरे माझ्यावर विश्वास ठेव. कुणाला नाही बोलणार.’’
‘‘पण तुझ्याबाबत सगळीकडं दुषित वातावरण निर्माण झालंय हे लक्षात ठेव. हॉस्टेलचे सर, कॉलेजचे प्राध्यापक तसेच आपले मित्रही तुझ्या या वागण्याबद्दल, राहणीमानाबद्दल शंका व्यक्त करू लागले आहेत. यातून सावरायचा प्रयत्न कर. आयुष्याचं नुकसान होईल, इतक्या दिवसाच्या कष्टावर पाणी फिरेल, आजी-आजोबांना ह्या यातना सहन होणार नाहीत हे लक्षात ठेव.’’
‘‘पण ती दिसली की मी हे सगळं विसरून जातोय.”
मला दुसरं काही आठवावयाचं नाही. सुचायचं नाही. तिच्यासमोर मला हे सगळं शुन्य वाटायचं. एक नवी लहर यायची अंगात. हवेत वावरल्यासारखे वावरायचो पूर्वी कधीही न पडणाऱ्या कॉलेजला वारंवार दांड्या पडत होत्या. फिरायला जाणं, सिनेमाला जाणं, प्रेमाच्या गोष्टीत रमून जाणं, भान विसरून गुजगोष्टी करत राहणं, तहानभूक विसरून दिवस दिवसभर प्रितीच्या दुनियेत सामावून जाणं, मी तोच काय पूर्वीचा, असा माझा मलाच प्रश्न पडत होता. कारण माझ्यात होणारा बदल मलाच खुणावत होता. खेड्यातून आलेल्या फाटक्या चपलातला आणि फाटक्या कपड्यातला. एक शिक्षणाची जिद्द, उमेद उराशी बाळगून आलेला, शिकण्याची धडपड असलेला मीच काय तो? या शहरी संस्कृतीचं आकर्षण, ओढ तर प्रत्येकाच्या मनात असतेच मग मला का असू नये त्या शहरी मुला-मुलींची. चैन, मौजमजा यासारखं जीवन आपल्याही वाट्याला यावं असं वाटायचं. त्यावेळी परिस्थितीची जाणीव व्हायची नाही तर पोटातली भूक साद घालायची याचा मी बळी ठरलो... पडलो.
मी काय करायला आलो आहे? आपणाकडून काय आशा, अपेक्षा आहेत? आपण काय करतो आहोत? ना परिस्थितीची जाण आहे ना भान. वारा ज्या बाजूने येतो त्या बाजूने केरकचरा उडून जातो, त्याप्रमाणे मी वाहत होतो. ना दिशा होती, ना लक्ष होतं. बेभान होऊन नुसतंच भटकत होतो. व्यसनी मुलाच्या नादी लागून एखाद्याचं आयुष्य बरबाद व्हावं, होत्याचं नव्हतं व्हावं तसं माझ्या त्या मुलीच्या नादी लागून झालं होतं. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी स्थिती माझी झाली होती.
काय दिलं मी माझ्या आजी-आजोबांना? दु:ख? यातना? याच्या पलीकडं मी काहीच देऊ शकलो नाही. हे सगळं मनाला पटतं होतं, समजत होतं. पण तिचा तो फास होता त्या फासातून मुक्त होणं अशक्य होतं. तिची भुरळ माझ्या मनावर मोठा प्रभाव पाडून गेली होती. कळतंय पण वळत नाही अशी स्थिती माझी होती.
एक दिवस आमचं हुतात्मा पार्कमध्ये भेटण्याचं ठरलं. ठरलेल्या वेळेत ती आणि मी हजर होतो.
‘‘प्रशांत मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तुझ्याशी.’’
‘‘बोल ना मग.’’
‘‘हे बघ, प्रशांत तुझ्यातलं खेडवळ आणि गावंढळपण काही अजून कमी झालेलं दिसत नाही. अजूनही तुला बोलण्यावागण्यात बदल घडवावा लागेल. कपडे जरा आणखी चांगले घालत जा.’’
सुमैयाच्या या सूचना आणि उपदेश ऐकून मला आश्चर्य वाटत होतं. आणि कुठंतरी आपला स्वाभिमान दुखावला जातोय याचीही जाणीव होत होती. पण आजपर्यंत ती माझ्या वैयक्तिक बाबतीत कधीच दोष-गुण काढीत नव्हती. मला तू असंच वागला पाहिजेस तसंच वागला पाहिजेस असे कधी तिचं बोलणं नसायचं पण आता सुमैयाच्या स्वभावात जो बदल दिसत होता, तो माझी मजबुरी पाहूनच असावा काय? असा प्रश्न मला पडला. मला माझा स्वाभिमान दुखवल्याचा राग आला. मी तिला म्हणालो,
‘‘सुमैया कसं वागायचं हे मी ठरवीन. तू माझ्या कपड्यावर प्रेम केलयंस की माझ्यावर याचं मला उत्तर दे.’’
‘‘अरे काय, असं बोलतोयस?’’
‘‘होय सुमैया, मी बोलतोय ते बरोबर आहे. ज्यावेळी माझ्यावर प्रेम करीत होतीस पहिल्यांदा त्यावेळी माझे कपडे, राहणीमान, बोलणंचालणं कसं असायचं? याचं मला उत्तर दे. माझ्याशी लग्न करायला तयार होतीस,त्यावेळी माझे कपडे, राहणीमान, बोलणंचालणं कसं असायचं? याचं मला उत्तर दे. याच्यापेक्षाही कमी दर्जाचे कपडे होते ना! मग त्यावेळी मी तुला भावलो, आवडलो, माझ्यासाठी सर्वस्व पणाला लावायला तू तयार होतीस पण आता असं अचानक काय झालं?
की तुला माझी लाज वाटातेय?’’
‘‘अरे, प्रशांत काय बोलतोस हे?’’
‘‘जे खरं आहे तेच बोलतोय मी.’’
‘‘बरं बाबा, माफ कर मला! पुन्हा अशी चूक होणार नाही. पण माझी एक इच्छा आहे.’’
‘‘कोणती?’’
‘‘तू हॉस्टेल सोडून आमच्या पूर्वीच्या जुन्या घरात रहायला यावंस. तिथं कोणी राहायला नसतं. तुझा जेवणाचा व इतर खर्च मी देईन.’’
‘‘पण सुमैया मी खूप वर्षापासून राहतोय हॉस्टेलवर. एवढे तीन-चार महिने मला तिथेच राहावे लागणार आहे. असे मध्येच येऊन चालणार नाही. अगोदरच सर माझ्यावर चिडलेले आहेत. प्रकरणामुळे आणखीन ते चिडायला नकोत.’’
‘‘अरे, चिडण्याचा काय संबंधच काय? त्यांच्या भितीखाली, दबावाखाली किती दिवस राहणार आहेस तू? एक ना एक दिवस तुला हॉस्टेल सोडावं लागणार आहेच ना?’’
‘‘हो.’’
‘‘मग आताच सोडलं तरी काय अडचण आहे? आज हॉस्टेलवर गेल्यानंतर पहिल्यांदा याच विषयावर हॉस्टेलच्या कांबळेसरांच्या बरोबरच चर्चा कर. त्यांना काहीतरी वेगळी अडचण सांग. त्यांना पटावी अशी. बघ प्रयत्न करून आणि काय होतं ते मला सांग, मग बघू काय करायचं ते?’’
‘‘पण सुमैया माझ्या आजी-आजोबांना ही गोष्ट समजली तरी ते दु:खी होतील. त्यांना सांगितल्याशिवाय मला निर्णय घेणं अवघड आहे.’’
‘‘अरे किती दिवस आजीआजोबांच्या मुठीत राहणार? आता तू लहान नाहीस. तुझ्या मनाला जे येईल, वाटेल ते तुला करायला हवं. किती दिवस तू त्यांच्यावर अवलंबून राहणार आहेस?’’
‘‘पण सुमैया आजी-आजोबांना कळाले तर?’’
‘‘जर, तरचा प्रश्न नंतर आहे. अरे तू काय अधांतरी असणार आहेस काय? मी असणार नाही काय? माझ्या घराच्या दोन खोल्या तुलाच आहेत ना! मग आता विचार काहीच करू नकोस. जा आणि सांग कांबळेसरांना आणि जर तुला हॉस्टेल सोडायचं नसेल, आजी-आजोबा, कांबळेसर यांना दुखवायचं नसेल, कॉलेजातल्या प्राध्यापकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसेल,तुला तुझी अब्रू, इज्जत प्यारी वाटत असेल तर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला म्हणून समज. पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस.’’
‘‘ठीक आहे! तुला जर वाटत असेल मी तुझ्या मर्जीप्रमाणे रहावं, वागावं तर मीही तुला सांगतो, मला हे जमणार नाही. तुला वाटत असेल की आता तुझ्याशिवाय माझं काहीच चालणार नाही. पण तुला जर माझी गरज नसेल तर मलाही तुझी गरज नाही.’’
*****