ती एक शापिता!
(२४)
दुसऱ्या दिवशी सकाळी सुहासिनीने सुबोधसोबत रजा पाठवली. दुपारी नेहमीप्रमाणे पीयूष शीळ वाजवत घरात शिरला. सुहासिनीला दिवाणखान्यात पाहून तो गडबडला. बोबडी वळल्याप्रमाणे झालेल्या अवस्थेत त्याने विचारले,
"काकू, आज घरीच?"
"रजा घेतलीय. तुला तर माझी काही अडचण होणार नाही ना?" सुहासिनीने विचारले तसा पीयूष जास्तच गोंधळला. त्याने गडबडून विचारले,
"मला कशाची अडचण? उलट बरे झाले, दिवस कसा नुसता जात नाही. खोली कशी खायला..."
"का रे, माधवी असते ना?"
"असते. बोलते थोडेफार. पण किती वेळ? तिला तिचीच कामे संपत नाहीत..." असे म्हणत पीयूष खोलीत निघून गेला... सुहासिनीने अधिक खोलात जाऊ नये म्हणून. कारण सुहासिनीने अधिक चौकशी केली तर त्याच्या तोंडातून भलतेच काही तरी निघून जाईल म्हणून. खोलीत शिरताना त्याच्या मनात विचार आला,
'माधवीसोबत मी सध्या मी छान रमतो आहे. आमचे मस्त चाललेले असताना आता पुन्हा बाधा येते की काय? कारण काकू तर धडधाकट दिसत आहेत. त्यांनी रजा का घेतली असावी? त्यांना आमचा संशय तर आला नसावा? काल सायंकाळी जाताना माधवी हळूच म्हणाली होती की, काल दुपारी आम्ही शरीरसंबंधातून एकत्र आलो असताना काकू आल्या होत्या. म्हणजे... त्यांनी आम्हाला... बाप रे, बाप! काकूंना आमच्याबद्दल, आम्ही एकत्र येत असल्याचे समजले असेल तर? माधवीच्या प्रेमामुळे आणि तिच्यासोबत असलेल्या शारीरिक संबंधातून माझी प्रकृती झपाट्याने सुधारत असताना आता पुन्हा त्यासाठी तळमळावे लागणार की काय? काकूंची रजा किती दिवस आहे हेही माहिती नाही. एक-दोन दिवसांची रजा असेल तर हरकत नाही परंतु त्यापेक्षा जास्त दिवसांची सुट्टी असेल तर? डॉक्टर अजूनही मला कामावर जायची परवानगी देत नाहीत. माधवीमुळे तरी या घरात दिवस जात होते, आता तर.. बरे, ऊसने, चोरटे सुख तरी किती दिवस मिळेल? त्या मीताचे मी काय घोडे मारले ठाऊक नाही. ती मला अर्ध्यावर सोडून गेली. तिच्यानंतर माधवी संपर्कात आली परंतु ती माधवी आनंदाने मला भरभरून सुख देत असताना, त्या संबंधात वारंवार अडथळे का येत आहेत? शेवटी त्या सुखासाठी तळमळणेच माझ्या नशिबात आहे काय? माधवीसोबत पळून जावे काय? परंतु त्यासाठी माधवी तयार होईल काय? डॉ. पाटील यांच्या उदार अंतःकरणामुळे आता कुठे आपल्या आवडत्या क्षेत्रात जम बसतोय. माधवीसह हे शहर सोडताना जिव्हाळाही सोडावा लागणार. पुढे काय? परक्या शहरात आश्रय कोण देणार? दोघांचे पोट कसे भरणार? या घरात तर आता निश्चितपणे ते पाऊल टाकता येणार नाही. कामावर हजर झालो तर बाहेर कुठेही लॉजवर, खोलीवर एकत्र येता येईल पण किती दिवस? शेवटी चोरी ती चोरीच! ती कशाचीही असली तरी किती दिवस लपणार आहे? माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता माधवीसोबत संबंध ठेवताना विशेष काळजी, दक्षता घ्यावी लागणार आहे. काय करावे नि कसे करावे? असा तिढा निर्माण होईल असे कधी वाटलेच नाही. असे काही होईल अशी पुसटशीही कल्पना आली असती तर माधवीसोबत संपर्क वाढवलाच नसता. माझी शारीरिक भूक मिटवण्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारला असता, कदाचित ती गरज विकत घेऊन भागवली असती. परंतु आता आम्ही फार पुढे गेलो आहोत. माधवीच्या संगतीने, तिच्या शरीराने वेड लावले आहे. आता परतणे शक्य नाही. आता हातपाय गाळून बसणेही अशक्य आहे. काही तरी मार्ग काढावाच लागेल...'
त्याच सायंकाळी सुबोध, अशोक, पीयूष सारे जेवायला बसले होते. पीयूष अचानक म्हणाला,
"काका, मी उद्यापासून कामावर जावे म्हणतो."
"का रे? अजून डॉक्टरांनी..."
"आरामच सांगितला आहे. परंतु आता खूप झाले. हळूहळू काम केले तर नंतर एकदम जड जाणार नाही..."
"बरोबर आहे पण अजून अशक्तपणा आहे. कामावर गेले म्हणजे साऱ्या जबाबदाऱ्या अंगावर पडणार. त्यापेक्षा असे कर, आणखी आठ दिवस आराम कर. नंतर बघू. वाटल्यास मी उद्या डॉक्टरांशी बोलतो." सुबोध म्हणाला.
"बरे.." असे म्हणत पीयूषने माधवीकडे बघितले. त्यावेळी ती स्वतःच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकली नाही.
ठरल्याप्रमाणे सुहासिनी दीर्घ रजेवर होती. पुढे चालून स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तिची आणि सुबोधची इच्छा होती. परंतु तिच्या घरी राहण्यामुळे पीयूष-माधवीची स्थिती विचित्र झाली होती. ती असताना त्यांना शारीरिक लगट तर दूर राहिली परंतु हसणे-खेळणेही दुरापास्त झाले होते. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा रिमझिम बरसावे त्याप्रमाणे त्यांचं वागणं हळूहळू बदललं. हसत-बोलत ते पुन्हा एकमेकांशी लगट करू लागले.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे माधवी तिच्या खोलीतल्या पलंगावर बसली होती. अशोक बैठकीतल्या पलंगावर लोळत असताना अचानक उठून आत गेला. त्याला पाहताच माधवी सावरून बसली. तिच्याकडे बघत खोलीच्या खिडकीजवळ जाऊन अशोक म्हणाला,
"माधवी, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे..." ते ऐकताच माधवी अंतर्बाह्य शहारली. भीतीची एक जाणीव तिच्या सर्वांगात शिरली. तिला विचार वाटले अशोक तिच्या आणि पीयूषच्याबद्दल बोलतोय. ती काही बोलण्यापूर्वीच अशोक पुढे म्हणाला,
"कदाचित अशी संधी पुन्हा मिळणार नाही. परंतु मला हेही ठाऊक आहे की, तुझ्यात आणि पीयूषमध्ये जे नवीन नाते निर्माण झाले आहे, ते आईबाबांना समजले आहे. त्यांना ते आवडलेले दिसत नाही त्यामुळे ते नाना प्रयत्न करून ..."
"अशोक.. अशोक.."
"थांब. माझे भविष्य मला स्पष्ट दिसत आहे. म्हणून तुला एक सांगून ठेवतो, मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हा दोघांना कुणाचीच अगदी आईबाबा, समाज, नातेवाईक कुणाचीही काळजी करण्याची गरज नाही परंतु उद्या माझ्या जीवाचे..."
"अशोक.. हे काय.." का कोण जाणे पण अशोकची ती भाषा ऐकून माधवी ओरडली.
"थांब. तुझ्या कपाळावर असलेल्या टिकलीचे भविष्य मला स्पष्टपणे दिसून येत आहे. ती टिकली जास्त दिवस टिकणार नाही. त्यावेळी समाज आणि कदाचित माझे आईबाबा आडकाठी आणतील. पण काहीही झाले तरी माझ्यानंतर तू पीयूषसोबत लग्न कर.."
"हे काय आरंभलं आहेस?"
"तुला अगोदरच सांगितलंय... आजची वेळ पुन्हा येणार नाही. तेव्हा मी तुला सांगतो, पुनर्जन्म किंवा आत्म्याचे भटकणे मला मान्य नाही परंतु समजा त्यात काही सत्य, तथ्यांश असला तर माझा आत्मा भटकू नये म्हणून... माझ्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुला पीयूषसोबत लग्न करावेच लागेल... माझी शपथ आहे..." असे म्हणत अशोक बाहेर पडला. माधवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती...
पीयूषसोबतच्या संबंधाला अशोककडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर पीयूष-माधवी यांचे प्रेमाचे अश्व भरधाव उधळत सुटले. कुणाचाही निर्बंध नसला तरी सुहासिनी घरी असल्यामुळे त्यांना इच्छित ते काही करता येत नव्हते. डॉक्टरांनी पीयूषला कामावर जायची परवानगी दिली आणि दोघेही जिव्हाळा कार्यालयात जात होते. एक-दोन वेळेस कार्यालयातून परतताना ते पीयूषच्या खोलीवर एकरूप झाले होते. परंतु तसे वारंवार करणे सामाजिक दृष्टीने योग्य नव्हते. पीयूषच्या खोलीवर काही क्षण मस्ती करून आलेल्या माधवीच्या उशिरा येण्याची कुणी दखलही घेतली नाही परंतु सुहासिनीला ती गोष्ट खटकली.
पीयूषने हळूहळू जिव्हाळा दैनिकाचे सारे काम पूर्ववत हातात घेतले. त्याच्यावर झालेल्या हल्लीचा परिणाम आणि जखमाही बऱ्याच प्रमाणात भरल्या होत्या. जिव्हाळा पुन्हा नव्या जोमाने, विश्वासाने तळपू लागला. माधवीही कार्यालयात जाऊ लागली परंतु त्या सुखाची तळमळ, अगतिकता वाढत होती. कारण एका दृष्टीने त्यांचे संबंध अनैतिक होते, समाजाला अमान्य असणाऱ्या नात्यातून ते फुलत होते. शिवाय ज्या नात्यामुळे पीयूषवर हल्ला झाला होता ते नाते पुन्हा अनैतिक मार्गाने निर्माण करणे धोक्याचे होते.
त्या दुपारी माधवी नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी तयार होत असतानाच पीयूषचा आवाज आला. पाठोपाठ खोलीत शिरलेल्या पीयूषने विचारले,
"हे काय तू अजून तयार झाली नाही? काकू कुठे गेल्या आहेत?"
"त्या.. त्या बाहेर गेल्या..." माधवीचे अडखळणे आणि त्यामागची अवस्था पीयूषला समजायला वेळ लागला नाही. तो पटकन पुढे झेपावला आणि त्याने माधवीला मिठीत घेतले. अनेक दिवसानंतर मिळालेल्या संधीचा ते मनमोकळेपणाने, आक्रमकपणाने आनंद लुटू लागले. नेहमीप्रमाणे कुणी अडसर ठरणारे नव्हते, मनावर कोणतेही दडपण नव्हते म्हणून मिळणारे सुख ते अक्षरशः ओरबाडून घेऊ लागले. ते करताना होणाऱ्या नाद-प्रतिनादाचेही त्यांना भान नव्हते. त्यांचा तो उन्मुक्तपणे चाललेल्या श्रुंगाराच्या आड सुहासिनीच्या रुपाने दुर्दैव आले. बाहेर गेलेली सुहासिनी लवकर परतली आणि तिला ते दृश्य पाहायला मिळाले. ती संतापाने बेभान झाली. ती काय करतेय, काय बोलतेय, एकूण सारी परिस्थिती, अशोकची तब्येत सारे काही ती विसरली आणि रागाने ओरडली,
"काय तमाशा चाललाय हा?"
तिचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच दचकलेला पीयूष कपडे सावरत घाबरून घराबाहेर पडला. तोवर माधवीही कपडे ठिकठाक करत असताना सुहासिनी कडाडली,
"बेशरम! लाज नाही वाटत भरदुपारी नवऱ्याच्या मित्रासोबत..."
"आ...ई..."
"ओरडू नकोस. एवढीच इच्छा आहे तर मग भररस्त्यावर दुकान का नाही मांडत? घरी कुणी नाही हे पाहून हे असले धंदे करतेस?.."
"आई, खबरदार! आगाऊ बोलाल तर?" माधवीही धीटपणे म्हणाली.
"काय करशील गं? चोरच्या चोर आणि वर शिरजोर..."
"कोण चोर? कोण शिरजोर? मोठं सती-सावित्रीचं नाटक करता? मला का माहिती नाही तुम्ही भर तारुण्यात काय केले ते? तुमच्या पोटच्या पोरीनं काय केलं ते? सौ चुहे खाकर.."
"मा..ध..वी.."
"ओरडायचं काम नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवताना अगोदर स्वतःकडे पाहावे. ज्या सुखासाठी तुम्ही जो मार्ग अवलंबला होता त्याच रस्त्याने मी जातेय तर माझे काय चुकले?आजपर्यंत तुमच्या मुलाकडून मला एकदाही ते सुख मिळाले नाही..."
"पण त्यासाठी त्याचा विश्वासघात..."
"कशाचा विश्वासघात? कुणाचा विश्वासघात? त्याला सारे माहिती आहे." माधवी एखादा मोठा गौप्यस्फोट करावा तशी म्हणाली.
"का..य? अशोकला हे..हे..सारे.."
"होय! तुम्ही स्त्री असून .... त्या सुखासाठी तुम्हाला तळमळावे लागले असताना... तुमच्याप्रमाणे मी उपाशी, अतृप्त असताना आणि.. आणि.. नवऱ्याच्या संमतीने तुम्ही ते सुख इतरत्र लुटलेलं असतानाही तुम्ही माझ्या सुखाआड यायला नको होते. आमचे संबंध जुळू नयेत म्हणून, मला ते समाधान मिळू नये म्हणून तुम्हाला काहीही रोग झालेला नसताना तुम्ही मुद्दाम रजा घेऊन माझ्यावर पाळत ठेवली ते तुम्हाला शोभलं? इतर कुणाचे सोडा पण तुम्ही तरी माझ्या भावना ओळखायला हव्या होत्या परंतु..."
"तू तुझ्या चुकीचा दोष माझ्या माथी..."
"नाही! मी कोणतीही चूक केलीच नाही. खबरदार! पीयूषसोबतच्या माझ्या संबंधाबद्दल पुन्हा काही बोलाल तर? या घरात आम्हाला एकत्र येण्यासाठी कुणी बंदी घातली, कुणी मध्ये आलं तर मी बाहेर जाऊन कुठेही त्याच्याकडून ते समाधान मिळवीन. पण त्याचबरोबर या घराण्यातील अर्धवट पुरुषांचा आणि तुमच्यासह आशाचा इतिहास जगजाहीर करीन. त्या काळात तुम्ही शोधलेला, निवडलेला...."
"मला धमकी देतेस?"
"धमकी नाही देत. खरे तेच सांगतेय. लग्नानंतर अनेक वर्षांनंतर त्या सुखाचा झरा मला सापडलाय. ते सुख मी भरभरुन भोगणार आहे. मला आता कुणीही अडवू शकणार नाही..."
"मोठी आलीय. थांब आता. अशोकला सांगून तुझी ती नोकरी आणि तुझा सुखाचा मार्गही बंद करते का नाही ते तू बघच..." असे बडबडत सुहासिनी खोलीच्या बाहेर पलंगावर अशोक शांतपणे लोळत असल्याचे पाहून तिचे पित्त अजून खवळले. ती कडाडली,
"अशोक, तू केव्हा आलास?"
"जेव्हा पीयूष घरातून बाहेर पडला त्याचवेळी आलो."
"याचा अर्थ ते सारे ऐकले आहेस तर..."
"होय! मी सारे ऐकले आहे."
"तरीही तू चूप राहिलास?"
"होय. चूप राहिलो."
"लाज नाही वाटली तुला? तुझी बायको तुझ्याच पलंगावर तुझ्याच मित्राच्या मिठीत जात असताना तू तिच्या थोबाडीत नाही मारलीस? तिचा कामज्वर उतरावासा वाटला नाही?"
"नाही वाटला." अशोक थंडपणे म्हणाला.
"अशोक, तुला कळतेय का? माधवी आणि पीयूष दोघे मिळून काय गोंधळ घालतात ते?"
"मला सारे कळतेय. पीयूषसोबत तिचे तसे संबंध असले तर तिचे काय चुकले? जे सुख तिला माझ्याकडून मिळत नाही ते तिने इतरत्र कुठून मिळविले तर तिचे काय चुकले? ज्या सुखासाठी तू तळमळत होतीस... त्याच सुखासाठी माधवीसुद्धा तळमळते. तशा परिस्थितीत तू जे..."
"अशोक, अरे, तुम्ही सारे मलाच त्या..."
"खोटे आहे का ते? बरे, तुझे जाऊ देत. मला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही. परंतु शरीरसुख ही सर्वांची गरज असताना मला तिची दररोज होणारी तगमग नाही पाहवत म्हणून.."
"म्हणजे ती जे करतेय ते तुला..."
"माहिती आहेत, मान्य आहेत. त्या दोघांना ते सुख मिळावे म्हणून मी स्वतः त्यांना तशी संधी उपलब्ध करुन दिली. मी या पलंगावर असताना..."
"का..य..? तू इथे असताना ते आतल्या बाजूला..."
"होय! आणि मला त्या गोष्टीचे समाधान आहे. ती तळमळत असताना मला जी अपराधीपणाची बोचणी होती. ती.. ती बोचणी, शल्य, तो सल त्यांच्या संबंधामुळे दूर पळाला. सध्या माझी प्रकृती ठणठणीत आहे, त्यामागे त्यांचे फुललेले, बहरलेले संबंध आहेत. आई, तू स्वतः ते दुःख आणि नंतर ते सुख अनुभवले आहेस तेव्हा तिच्या सुखाच्या मार्गातील धोंडा बनू नकोस. हेच कशाला मी.. मी.. होय, मीच त्यांच्या लग्नाला परवानगी देणार आहे. वकिलाचा सल्ला मी घेतलाय. माधवीला घटस्फोट देऊन मी स्वतः त्या दोघांवर मंगलाक्षता टाकणार आहे... अंतरपाट धरणार आहे. आई, आता माझ्या जीवनात बाकी आहेच काय? आधीच अर्धवट... वर पुन्हा आजार! केव्हा ना केव्हा मला अकालीच या दुनियेचा निरोप घ्यावा लागणार आहे. तेव्हा तसे जाताना मनात एक समाधान तर असेल... माझ्या पश्चात त्या सुखासाठी माधवीने तळमळत राहणे, आजन्म विधवा राहणे मला आवडणार नाही. काही दिवसांपूर्वीच मी माधवीकडून तसं वचन घेतले आहे. परंतु आता मी माझ्या मरणाची वाट पाहणार नाही... काही दिवसातच मी त्यांच्या लग्नाची व्यवस्था लावणार आहे. आई.. आई..." असे म्हणणाऱ्या अशोकच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी आली. स्वतःच्या छातीला एका हाताने चोळत चोळत तो खाली कोसळत असताना घरात प्रवेश करणाऱ्या सुबोधने अशोकला सावरले...
*****