आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(19)
पुन्हा ही मैत्रीण तुला या जगात कधीच दिसणार नाही. मी हादरून गेलो आणि पटकन् ठरविलं रविवारी भेटायला जाण्याचं कारण जीवाचं काही बरं वाईट करून घेईल म्हणूनच.
परीक्षा जवळ येत होती. मनाची धास्ती वाढत होती. यात हे समोर उभं असलेलं संकट, किती वेडी मुलगी असेल ही. प्रेमात वेडी झालेली. इतकं काय आहे माझ्यात? हुशारी म्हणूनच ना. पण गरीबीनं गांजलेला मी काय देऊ शकणार हाय? खरंच प्रेम आंधळं असतं म्हणतात ही गोष्ट खरी आहे. पण त्याच प्रेमाचं वास्तवतेचं चटके खूप कठोर आणि खडतर असतात. आईबापाच्या सुखात, समृद्धीत वाढलेली ही मुलगी या बाहेरच्या कठोर जगाची ना माहिती आहे, ना इतभर पोटासाठी करावी लागणारी वणवण आणि धडपड या मुलीने अनुभवली आहे. भावनेच्या भरात आणि शरीरसुखाच्या ओढीनं काही तरुण-तरुणींची मनं आतुरतात आणि निर्णयाप्रत येऊन पोहचतात. संसाराची घडी बसते न बसते तोच विस्कटूनही जाते. हा दोष कुणाचा? भावनेच्या भरात घेतलेला निर्णय म्हणायचा? मोठा प्रश्नच आहे. माणसानं आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय विचाराने आणि काळजीपूर्वक घ्यावा. नंतर कुणालाही दोष देत बसणं अयोग्य आहे. असं माझं वैयक्तिक मत. ह्या मुलीच्या बाबतीत तसच घडत असावं.तिला पटवून सांगावं असं मी मनाशी ठरविलं आणि रविवारी मी तिलाभेटायला गेलो. मला जायला वेळ झाला होता. मी सव्वासातच्या दरम्यान पोहोचलो होतो. बेल वाजविली.
‘‘कोण आहे?’’आतून सुमैयाचा आवाज आला.
“मी आहे.”
तिनं माझा आवाज ओळखला.
“कोण प्रशांत?”
“हो.”
ती धावत आतुरतेने दार उघडण्यास आली.
‘‘काय हे, प्रशांत इतका वेळ किती वाट पाहायची
तुझी?’’
‘‘सॉरी, माफ कर थोडी अडचण होती म्हणून वेळ झाला.’’
‘‘अरे अडचण मग मला नाही सांगायचं का? मी पटकन दूर केली असती.” ती हसत म्हणाली.
‘‘बरं पुरे आता ते तुझं कायमचं वाक्य. कीव आलीय मला त्या वाक्याची.’’
‘‘अरे, असं काय बोलतोयस तू?’’
‘‘तुझे मम्मी-पप्पा कुठे आहेत?’’
‘‘गावी गेलेत.’’
‘‘मग घरात कोण आहे?’’
‘‘हे काय मी आहे ना?’
“तू एकटीच?”
“हो एकटीच. त्यात काय?”
‘‘का एवढी विचारपूस करतोयस?’’
‘‘पण आता सांगायचं कुणाला?’’
‘‘काय सांगायचं ते मला सांग. मी आहे ना!’’
‘‘हो तुला तर सांगायचं आहेच.’’
‘‘अहं हे बघ वगैरे हे नंतर. आपणाला बोलायला अजून खूप वेळ आहे.
पहिली मी कॉफी आणते. नाष्टा कर आणि मग आपण बोलत बसू.’’
सुमैयाला मी पहिल्यांदाच गाऊनवरती पाहत होतो. थोडंसं मनाची चलबिचल झाल्यासारखी झाली पण लगेच सावरलो. तिचं ते बेदरकारपणे असं परपुरुषासमोर वावरणं मला थोडं आज खटकत होतं. आमच्या खेड्यातल्या मुली कशा साडी वगैरे नेसून आपलं चारित्र्य महत्त्वाचं मानतात. आपली अब्रू जीवाप्रमाणे जपतात पण या शहरातल्या मुली कशा बेदरकारपणे बेधडकपणे वावरतात याचं ज्वलंत उदाहरण मी माझ्यासमोर पाहत होतो. सुमैयाच्या स्वभावात वेगळंपण, बोलण्यात खूप फरक झाला होता. ती पूर्वीसारखी राहिली नव्हती. माझ्याबद्दलच्या एकतर्फी प्रेमाने ती वेडी झाली होती. म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
‘‘काय विचार करतोस प्रशांत?’’
‘‘काय नाही.’’
‘‘मग असा चेहरा गंभीर का?’’
‘‘बरं ते जाऊ दे. तू पहिला नाष्टा कर. मी कॉफी घेऊनच येते.’’
पटकन नाष्टा, कॉफी घ्यायची, चार गोष्टी शहाणपणाच्या तिला सांगायच्या आणि आपला मार्ग धरायचा. मला यात पडायचं नाही, मला माझं ध्येय महत्त्वाचं आहे असं सांगून तिच्या मनाची समजून घालायची, आज ठरविलं होतं. सुमैया कॉफी घेऊन आली. मी पटकन कॉफी पिऊन संपवली. तिचं कॉफी पिणे चालूच होतं.
‘हे बघ सुमैया मला जायचं आहे.’’
‘‘अहं, आज मी तुला तसंच नाही जाऊ देणार.’’
‘‘तसंच म्हणजे?’’
‘‘अरे तसं म्हणजे जेवल्याशिवाय.’’
‘‘नाही. सुमैया जेवण वगैरे काही नको. तुझ्याशी मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत.”
‘‘ठीक आहे! चल माझ्या खोलीत. बसू बोलत.’’
संध्याकाळचे साडेआठ वाजले होते.
‘‘सुमैया मला माझं ध्येय महत्त्वाचं आहे. मला यामध्ये पडायचं नाही.
माझ्याबद्दलचा तुझ्या मनात असलेला विचार काढून टाक. आपलं मैत्रीचं नातं हे असचं राहू दे.
“नाही प्रशांत, माझा अंत पाहू नको. मी जीवाला बरंवाईट काहीतरी करून घेईन. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’’ ‘‘आय लव्ह यू प्रशांत! आय लव्ह यू प्रशांत...’’असं म्हणून सुमैयानं मला गच्च मिठी मारली.
त्या रात्री जे घडलं, ते कल्पनेपलीकडलं होतं. त्या रात्रीची घटना माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. मी तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. वेडी होती ती प्रेमाची. तिनेही मला वेडं केलं होतं प्रेमानं, तिच्या प्रेमात, तिच्या बाहुपाशात पूर्णपणे बुडालो होतो. ना भान होतं परिस्थितीचं ना कशाचंच. फक्त तीच दिसत होती. मला तिच्याशिवाय एक क्षणही राहवत नव्हतं अशी जादू तिनं केली होती. मी माझी परिस्थिती विसरून ती जिद्द, ती इच्छा ते ध्येय सारं काही विसरून तिच्यात सामावून गेलो होतो. खरंच, एखाद्या स्त्रीमध्ये काय जादू असते, होत्याचं नव्हतं करते. हे मी त्यावेळी ओळखलं होतं. दररोजच तिला भेटणं-बोलणं, गप्पा मारणं वाढलं होतं. ना तिला माझ्याशिवाय राहवत होतं, ना मला तिच्याशिवाय राहवत होतं. वेड लावून टाकणारं तिचं ते हसणं-बोलणं मनाला भुरळ घालत होतं. तिच्या नाजूक स्पर्शानं माझं मन मोहरून जात होतं. एक नवं सुख, नवा अनुभव हव्याहव्याशा सहवासात हवाहवासा ओलवा मन भिजवून टाकत होता.
एक नवी धुंदी आली होती. बेधुंद होऊन ती मला नाचवत होती. डोळयात नशा होती. बोलण्यात नशा होती. ती दुसरी तिसरी नशा नव्हती. प्रेमाची नशा होती.
पुस्तक तर माझ्यापासून कधीच दूर गेलं होतं. पुस्तकाऐवजी मी तिला जवळ केलं होतं. जीवन समृद्ध करण्यासाठी की संपवण्यासाठी याचं उत्तर मात्र माझ्याजवळ नव्हतं. दर्दभरी गाणी म्हणणं, बिनधास्त वावरणं, पूर्वीसारखी साधी राहणी बदलून पॉशमध्ये राहणं, चैन करणे, तिचा दुरावा सहन होत नव्हता. तिच्या विरहाच्या दु:खाने मी दारूसुद्धा प्यायला लागलो होतो. बेधडकपणे वावरणं, बेदरकारपणे वागणं तसेच अभ्यासातील प्रगती खालवणं यामुळे सगळयांनाच माझ्याबद्दल संशय येणं साहजिकच होतं.
सुरेश, अनिल आणि संदिपला हे समजलं होतं. त्यांनी मला सल्ला देण्याचंअथवा माझी चौकशी करण्याचं बंदच केलं होतं. सुरेशने एक दिवस मला एकटं भेटण्यासाठी कॉलेज सुटल्यावर यायला सांगितलं. मी गेलो.
‘‘प्रशांत का रे पुन्हा असं वागायला लागलायसं वेड्यासारखं? सोडून दे रे हे सारं अजूनही वेळ गेलेली नाही. का तिच्या नादाला लागून आयुष्याचं वाटोळ करतोयस? प्रशांत मी तुझा वर्गमित्र जरी असलो, तरी मी अनुभवाने तुझ्यापेक्षा परिपूर्ण आहे. तुला खुप दिवस मी ही गोष्ट बोलली नव्हती पण आता सांगतो. माझ्याही जीवनात एक मुलगी आली होती. मीही एका मुलीच्या नादात वेडावून गेलो होतो पण त्या मुलीनं माझा विश्वासघात केला. माझं शैक्षणिक नुकसानही झालं. तेव्हापासून ठरविलं या असल्या प्रेमात वगैरे काही पडायचे नाही. आणि पडलंच तर आपली पेलण्याची पात्रता असावी, परिस्थिती चांगली असावी. तुझी तरी परिस्थिती ही अशी. तिच्या नादी लागून उलट तुझं नुकसानच होणार आहे. ती आज आहे तर उद्या नाही. तिचा भरवसा ना तू देऊ शकतोस ना मी देऊ शकतोय, मला माहीत आहे, कुठल्या मुली कशा असतात ते मी त्या मुलींचं वागणं, बोलणं पाहूनच कुठली मुलगी काय पात्रतेची आहे हे मी ओळखू शकतो.
म्हणूनच सुमैयाबाबतचा माझा अंदाज तुला पत्राद्वारे कळविलेला, उशिरा का असेना खरा ठरला. इथून पुढे येणाऱ्या परिणामांना तुझं तू सामोरे जा. तुला मी पुन्हा काही सांगणार नाही, की तुझ्या मदतीला आम्ही येऊ शकणार नाही.’’
‘‘सुरेश हे सगळं तुझं मला पटतंय रे. पण काय करू तिनं मला पूर्णपणे वेडावून सोडलंय रे. एक दिवस असा जात नाही की तीची आठवण येत नाही अशी.’’
*****