Prakashmay Zali Diwali.. in Marathi Short Stories by geeta kedare books and stories PDF | प्रकाशमय झाली दिवाळी...

Featured Books
Categories
Share

प्रकाशमय झाली दिवाळी...

.प्रकाशमय झाली दिवाळी....

आज त्याला तिची प्रकर्षाने आठवण येत होती. तो बसला होता एका अंधारलेल्या खोलीत खिडकीतून बाहेर बघत आपल्याच अश्रूंना वाट मोकळी करून देत... ती होती आजूबाजूला... दिवाळीच्या दिव्यांचे तेजोवलय त्याच्या डोळ्यांना खटकत होते... तो कोसत होता मनाला का हा दिव्यांचा सण लोकं साजरा करतात? ... या दिव्यांनी तर माझं अस्तित्व माझ्यापासून हिरावून घेतलं... माझा जीव.. माझं काळीज... माझ्यापासून दूर नेलं... नका लावू रे दिवाळीला दिवे... तो मनातल्या मनात आक्रोश करत होता... जळत होता आतल्या आत दिव्यातल्या वातीसारखा..
तेवढ्यात अचानक मयुरी त्याच्यासमोर आली व म्हणाली, "अरे समीर, काय हे... ऐन दिवाळीत तू असा काळोख का बरं करून बसला आहेस?आणि हे काय.. सणासुदीला तुझ्या डोळ्यात पाणी.. हे तुझं वागणं मला बिलकुल पटलेलं नाही बरं...
मयुरीला बघताच समीर भानावर आला. तो मयुरीला म्हणाला," आलीस का तू.. तूझीच वाट पहात होतो मी. तूच माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस मयुरी.. बघ, आता तू आलीस ना तर पहा माझा चेहरा ही तेजाळला आहे.. माझ्या जीवनात तुझी कायम साथ मला हवी आहे." मयुरी हसतच म्हणाली, "कित्ती वेडा आहेस रे तू.. मी आहे ना तुझ्या सोबतच... तूला आपली पहिली भेट आठवते का रे? असे म्हणून खुदकन गालात हसली.
आता समीरचा चेहरा खूपच खुलला होता. तो मयुरीला म्हणाला, "हो तर, सगळ्या आठवणी कशा अजूनही मनात ताजातवान्या आहेत. माझा मित्र अशोक, त्याच्या लग्नात तू नवरीची कलवरी म्हणून मिरवत होती. व तूला पाहताच मी क्षणभरातच तूझ्या प्रेमात पडलो होतो. तू ही अधूनमधून चोरुन चोरुन माझ्याकडे पहात होती. तूला बघताच असे वाटले होते की हीच आपली "जीवनसंगिनी"... पण माझ्या भावना मी तेव्हा व्यक्त करु शकलो नाही. लग्नाचा दिवस गेला व दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला मी अशोकच्या घरी आलो होतो. तिथे तूला पाहून माझे मन माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला रोखू शकले नाही व मी तूला तिथेच विचारले, "माझ्याबरोबर सत्यनारायणाच्या पूजेला बसायला तूला आवडेल का?" तू लाजतच जे "इश्श्श्य्" बोललीस ना ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तूझ्या त्या लाजण्यातच मला माझ्या प्रेमाचा होकार मिळाला होता... माझं आयुष्य तुझ्या येण्यामुळे खूपच सुंदर वाटत होतं... तुझ्याबरोबर भावविश्वात रमताना मी माझं अस्तित्व ही विसरलं होतं... आणि जेव्हा तुझ्या आईबाबांनी आपल्या लग्नासाठी होकार दिला तेव्हा तर माझ्या आनंदाला पारावारच उरला नव्हता.. तो दिवस, त्या आठवणी अजूनही मी काळजाच्या कोंदणात जपून ठेवल्या आहेत.
"माझ्या आयुष्यात मला जी सहचारिणी हवी होती ती मला अगदी सहजपणे मिळाली होती. लोकांना आपलं प्रेम मिळवण्यासाठी खूप काही "पापड बेलने पडते हैं" असे मी ऐकले होते गं मयुरी.. पण मला तसं काही करावं लागलं नाही. आणि हो तूझं प्रेम मिळवण्यासाठी मी पापड ही लाटले असते हां मयुरी".. असे समीर बोलल्यावर मयुरी ही खळखळून हसली होती... मयुरी म्हणाली," अरे, तूझी व माझी गाठ ही सातजन्माची.. म्हणून तर आपली भेट झाली" ...
" हो गं, लग्नमंडपात नवरीच्या वेशातील तू.. काय सांगू तुला मी.. माझं काळीज तिथेच खल्लास झालं होतं... तुझ्याकडेच बघत रहावंसं वाटत होतं.. तूला मंगळसूत्र घालताना मी स्वतःलाच भाग्यवान समजत होतो. त्या मंगळसूत्राने तर तुझ्या रुपात आणखीनच भर घातली. भर लग्नमंडपात तुझी नजर काढून टाकावी अशी इच्छा ही मला झाली. ते रुप अजूनही मी माझ्या नजरेत साठवून ठेवले आहे मी... समीर बोलत होता बेधुंद होऊन व मयुरी ऐकत होती त्याच्या नजरेत नजर मिळवून...
"लग्नानंतरचा आपला राजाराणीचा संसार... दृष्ट लागावी असा संसार फुलला आपला... आपल्या संसारात आपल्या सोबतीला आली आपली परीराणी... आपल्या परीराणीच्या आगमनाने तर मला आकाश ठेंगणे वाटायला लागले... मी बाबा झालो व तू आई... हे पितृत्व मला तुझ्यामुळे मिळाले मयुरी... आज जी काही माझी व्यवसायात भरभराट आहे तसेच जे काही आयुष्यात सुखाचे दिवस आले ते तुझ्यामुळे प्रिये"...
मयुरी हे सारं सारं एकचित्ताने ऐकत होती.. समीरने त्याचं मन तिच्यापुढे खोलून ठेवलं होतं.. मयुरी म्हणाली," समीर, या संसारसुखात तू ही मला तितकीच महत्वाची साथ दिलीस. आपल्या दोघांच्या सहयोगाने हे सारं शक्य झाले आहे. आता फक्त परीराणीला चांगलं शिकवायचं व चांगल्या संस्कारांनी वाढवायचं बरं हं...आपल्या मुलीवर सर्व संस्कार तूलाच करायचे आहेत... आता हेच पहा ना.. दिवाळी सारख्या सणाला तूम्ही दिव्यांची आरास ही केली नाहीत.. दारापुढे रांगोळी देखील नाही... मला हे बिल्कुल आवडलेलं नाही. "
तसा लगेच समीर आक्रोश करीत म्हणाला," नको ती दिव्यांची आरास व नको ती रांगोळी... ज्या दिव्यांनी माझं सर्वस्व हिरावून नेलं त्या दिव्यांपासून मी माझ्या मुलीला लांबच ठेवणार. त्यादिवशी लक्ष्मीपूजनाच्या रात्री रांगोळी काढत असताना मागच्या बाजूला असलेल्या दिव्यामुळे तुझ्या पदराने पेट घेतला. त्या आगीच्या ज्वालांपासून तू स्वतःला आरडाओरडा करून वाचवत होतीस.. तूझा गोरा देह आगीच्या लपटांनी काळाकुट्ट भाजून टाकला होता.. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझी लक्ष्मी माझ्यापासून हिरावून नेली होती त्या काळरात्रीने... मी त्यावेळी घरात असतो तर मी तूला वाचवू तरी शकलो असतो.. तुझी अवस्था बघून माझ्या हातापायातील प्राण निघून गेले होते मयुरी.. नको ते दिवे व नकोच ती रांगोळी पून्हा या घरात. "... समीर ढसाढसा रडत होता....मयुरीने त्याला सावरलं व समजावून सांगितले," समीर, माझं आयुष्य तेवढंच होतं रे.. निमित्तमात्र ठरले ते दिवे. त्यात त्या दिव्यांचा काही दोष नाही. आज अंधारलेल्या वाटा प्रकाशमय करतात रे दिवे... चूक माझीच होती की रांगोळी काढायला बसताना मला साडीचा पदर आवरुन बसायला पाहिजे होते. आता या माझ्या चूकीसाठी आपल्या मुलीला दिवे व रांगोळीपासून दूर ठेवू नकोस. तिला तू योग्य मार्गदर्शन दे.. माझ्याकडून जी चूक झाली त्याची जाणीव तिला करून दे. तिचं आयुष्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळू दे. रांगोळीच्या रंगांनी तिचे आयुष्य रंगबिरंगी होऊ दे समीर... ऐकशील ना समीर माझं इतकंच. आपली मुलगी हीच आपली लक्ष्मी आहे. तिच्यातच तू मला पहा व तिचं योग्य संगोपन कर.. करशील ना समीर माझ्यासाठी इतकं? "
" होय मयुरी, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करीन. तू नेहमी माझ्याबरोबरच रहा मयुरी. मी काही चुकलो तर मला सांगत जा.. "
पहाटेची सोनसळी किरणं खिडकीतून समीरच्या अंगावर पडली होती. पक्ष्यांच्या चिवचिवाटाने समीरला जाग आली. त्याने पूर्ण घरभर जाऊन मयुरीला शोधलं. मयुरी त्याला कुठेच दिसली नाही. आज लक्ष्मीपूजनाची पहाट.. आज मयुरीला जाऊन पाच वर्षे झाली होती तरीही मयुरी प्रत्येक दिवाळीला समीरला येऊन भेटायची व गप्पा मारायची..
समीरने परीराणीला उठवले. तिला उटणे लावून अभ्यंगस्नान घातले. स्वतःही तयार झाला. नवीन कपडे घातले. अंगणात सडामार्जन करून परीराणीच्या चिमुकल्या हाताने दिवे लावून प्रकाशाने घर व आंगण उजळून टाकले... समीरने परीराणीचा हात हातात घेऊन तिच्या इवल्याशा हाताने दारापुढे रांगोळी काढली. अगदी प्रसन्न घर व आंगण वाटायला लागले. व प्रसन्न मुद्रेने हे सारं काही अदृश्य स्वरूपात पाहत होती मयुरी...
आज मयुरीला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली होती व आज तिनेही पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली होती....
... © सौ. गीता विश्वास केदारे...
मुंबई