१७
मौनं सर्वार्थ?
दोघांचा ससेमिरा टळावा म्हणून मग गुपचुप मग गच्चीवरच्या झोपाळ्यावर जाऊन बसलो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. टिपूर चांदणे पडलेले. दुपारच्या झोपेनंतर आता कसली झोप येतेय. दिवसभरात आज हार्डली काही वेळ भेटली वै. सगळ्या दिवसाचा हिशेब.. त्यापेक्षा गेल्या दोन दिवसांचा हिशेब लावत लोळून राहिलो. नशिब कोणी नवीन पाहुणे मंडळीपैकी वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठोपाठ आली नाहीत. बहुधा उद्या विचारतील.. आज ही काही ओळी सुचल्या. मेंदीवरून..
हातावर तुझ्या नक्षी गं मेंदीची
तू सखी माझ्या खास गं प्रीतीची..
माझ्या मनीची प्रीत तू गं लाजरी
माझ्याच मनी तू दिसशील गं साजरी..
वाटते अर्थहीन आणिक गं उदास
तुजविण सखये सारे गं जग नव्हे आभास..
विचारात तुझ्या मी असला गं गुंगलो
कुंतलात तुझिया असला गं गुंतलो..
येशील तू झडकरी पाश सारे गं सोडूनी
मेंदीची शपथ तुला हृदय दिले मी गं तोडूनी..फ
शेवटच्या ओळीवर माझे मलाच हसू फुटले. आधीच्या काही कवितांपेक्षा ही बरी होती, शब्द पण तसे नाजूक होते. कवितेत शोभण्यासारखे. पण ह्रदय म्हणजे काय झाडावरचा आंबा आहे तोडून द्यायला? तरीही मला आवडली माझीच कविता. छान.. मनात म्हणेतोवर जिन्यावरून पावलांचा आवाज यायला लागला. कुणीतरी येतेय.. कुणी काका वा मामा असतील तर? परत ते कन्सल्टेशन? नकोच.
मी लगेच डोळे मिटून घेतले. कुणी नको असलेले असले तर झोपलोय म्हणून समजून परत जाईल..
“झोपलाय वाटते..”
“हाऊ मच डझ ही स्लीप..”
बाप रे! ही तर कृत्तिका आणि वै ची जोडी. मी डोळे सताड उघडून उठून बसलो..
“झोपलो नाही काही.. जस्ट लुकिंग ॲट स्टार्स..”
पुढे म्हणणार होतो.. नाऊ द्याट यू हॅव कम.. मला चंद्राकडे बघण्याची काय गरज.. पण कृत्तिका तिथे होती.. आणि नसती तरी मी तसे बोलण्याची शक्यता नव्हतीच.
“ओ हो! तर डॉक्टर इथे स्वतःच्याच छातीचे ठोके मोजत बसलेत..”
कृत्तिका म्हणाली.. तिला खात्री असावी.. दोन गोष्टींची.. एक मला वैदू आवडलीय आणि वैदूला मराठी विशेष कळत नाही याची.
कृत्तिका नि वै हात नि पायावरील मेंदी सांभाळत बसल्या.
कृत्तिका अजून फॉर्मात येत म्हणाली, “तर मेहंदी रंग लायेगी ना?”
“व्हॉड्डुयू से? मेहंदी..”
“वैदू.. इट इज सेड द्याट युवर मेहंदी विल बीकम डार्कर इफ युवर हजबंड लव्हस यू अ लॉट..”
“ओह.. माय.. बट व्हॉट अबाउट मी देन.. माजे काय?"
“डोन्ट वरी.. इफ इट गेट्स डार्कर.. मीन्स युवर फ्युचर हजबंड इज थिंकिंग अबाऊट यू..”
कृत्तिका बिनधास्त माझ्याकडे पाहात बोलत होती. मी वै कडे पाहात होतो. चंद्राच्या प्रकाशात ती अजून सुंदर दिसत होती. आमचे संभाषण थोड्या नाजूक वळणावर येतेय असे वाटत होते मला. म्हणजे त्यातून वै ला काही सूचना मिळाली तर चांगलेच होते पण तिचा काही गैरसमज झाला तर?
कृत्तिका मग इकड तिकडचे बोलत बसली. वै पण त्यात भर घालत होती. माझे काय? मी बोलत होतोही आणि नव्हतो ही. म्हणजे मला सुचायचे छान पण बोलताना शब्द हवे तसे बाहेर येतील तर ना. थोड्या वेळाने काही आठवल्यासारखे करीत कृत्तिका गेली. मी आणि वै दोघेच उरलो. माझ्या हृदयाची धडधड तर तिला ऐकायला जाणार नाही ना.. मला भीती वाटली..
"सो लाइकिंग धिस.. मेहंदी अँड आॅल?"
"आॅफकोर्स. इट्स सो कलरफुल हियर इन इंडिया."
"हुं.."
"यू नो आज खूप मजा आली. नाइस फन.. विथ फ्रेंडस. रागिणीच्या मैत्रीणी.. आणि कृत्तिका. वुई लाफ्ड सो मच.."
"हुं.."
“कृत्ती सेड यू आर सो टॉकेटिव्ह.. बट आय हार्डली हिअर यू टॉक..”
“हुं.. नथिंग लाइक दॅट.”
“यू नो आय ॲम सो एक्सायटेड विथ धिस मॅरेज.. इंडिया इज टू गुड.. बोअर्ड ऑफ अमेरिकन लाइफ..”
“आय नो.. कृत्तिका वॉज टेलिंग मी..”
ही तिची हिंट समजावी का? आणि ते समजून मी पुढे काही बोलावे का? आणि तिला नाही पटले नि रागावली तर? मी 'मौनं सर्वार्थ साधनं' असे काही गीर्वाण भाषेत वाचले होते. संस्कृतात सुभाषितांचा खच पडला असतो म्हणे त्यातील हे एक. आणि मला हेच येत असावे? पुढे हे अति धोकादायक आहे हे मला कळले.. म्हणजे नंतर .. पुढच्या भागात कळेलच ते तुम्हाला.. कृत्तिकानेच सांगितले मला की मी न बोलण्याचा वै ने काढलेला अर्थ मला इंटरेस्ट नसल्याचा होता म्हणे! नशीब मला जास्त काही सुभाषिते येत नाहीत. अर्थात ही पुढची गोष्ट. आता माझ्यासमोर स्वप्नसुंदरी बसलीय. आजूबाजूला कोणी नाही.. टिपूर चांदणे पडलेय. आकाशात एक आणि माझ्याबाजूला एक असे दोन चंद्र आहेत बरोबर.. याहून रोमॅंटिक सेटिंग काय मिळणार होते? बाकी काही नाही तर किमान काही इंटरेस्टिंग तर बोलावे.. पण माझी जीभ रेटेना पुढे.
वै काहीबाही बोलत होती आणि मी या प्रसंगाला माझ्या मनात साठवून नि गोठवून ठेवण्याच्या भानगडीत हुं.. हां.. शिवाय काहीच बोलत नव्हतो.
शेवटी ती वैतागली की काय कुणास ठाऊक.. म्हणाली, “से समथिंग.. आय वॉंन्ना हियर यू टॉकिंग..”
तिचा हा निर्वाणीचा इशारा असावा.
मी सकाळी तिच्याशी बोलण्यासाठी शोधून काढलेले विषय आठवले.. कितीतरी होते. पण त्यातला एकच आठवला मला.. रेडिऑलॉजी! तिचाच विषय! आणि ती त्यातली टॉपर होती म्हणे..
म्हणून मी तोच विषय निवडला..
“आय वॉंटेड टू आस्क यू समथिंग..”
“या.. गो अहेड..”
‘यू नो वुई युझ बकी फिल्मस.. इज देअर डिफरन्स इन रेडियेशन एक्सपोझर बिटवीन नॉर्मल ॲंड धिस फिल्मस? यू नो वॉट आय मीन?”
माझ्या प्रश्नाने तिला काय वाटले कुणास ठाऊक..
“आय विल टेल यू समटाइम्स..”
म्हणत ती उठली आणि तरातरा निघून गेली. मी गोंधळलो. ती बोलत होती तेव्हा मी गप्प होतो. तिच्या आग्रहाखातर बोललो तर ही निघून जावी? ती रागावून गेली असा मला संशय आलाच होता. पुढे मला ती रागावूनच निघून गेलेली ते तिनेच सांगितले. म्हणजे माझ्या आयुष्यातला तिचा हा पहिला फणकारा! मी पण काय ग्रेट होतो.. चांदनी रात है.. तू मेरे साथ है.. आणि साथमें रेडिऑलॉजी की बात है? रागावणार नाही तर काय ती?
दिवस असा संपला. माझ्या शाब्दिक करंटेपणाचा करंट मला असा बसत होता.. आता यातून मार्ग काय? कदाचित तिला मी आवडत असावा अशी शंकाही मला येत होती.. घालवलेल्या संधी येतील का परत?
- संस्कृतातील सुभाषितांनी घातला गोंधळ आणि काय.. मानवी मन कसे असते नाही.. स्वतः सोडून दुसऱ्या कुणालाही दोष द्यायला सदैव तयार..