एक चुकलेली वाट
भाग २
" निशू, काही झालंय का ग..? " अनिताने एकट्याच चाललेल्या निशाला हटकल. पाटील महाविद्यालयाच्या विस्तीर्ण आवारात मज्जा मस्ती करत हिंडणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या ग्रुपला टाळून एकटीच गेटच्या दिशेने जाणाऱ्या निशाला पाहून अनिता धावत तिच्या मागे आली. अनिताच्या चार पाच हाकांना काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने निशाच्या पाठीवर थोपटल. अचानक झालेल्या स्पर्शाने निशा दचकली. मागे अनिताच आहे हे बघून तिला जरा हायस वाटलं. मागचे दोन दिवस ती अशीच वागत होती. अचानक सगळ्यांमध्ये येणं जाणं बंद केलं होत तिने.
" काही नाही ग..जरा घाई आहे मला " तिला उत्तर द्यायचे टाळून निशा भराभर गेटमधून निघूनही गेली.
" काय झालंय हिला...?" मागून येऊन टपली मारत रोहनने विचारलं. रोहन निशा आणि अनिताचा बेस्ट फ्रेंड. एकमेकांपासून काहीच लपवून नाही ठेवायचे ते पण दोन दिवसांपासून का कोण जाणे निशा दोघानाही टाळत होती. ना समोर बोलत होती ना फोन उचलत होती ना मेसेजच उत्तर देत होती. तीच काहीतरी बिनसलं होत हे नक्की. पण काय ते समजणार कसं...?
" आता तूच जाऊन विचार बाबा.. तुझी गर्ल फ्रेंड आहे ती... तुलाच सांगेल.." अनिताने टोमणा मारला.
" शटअप अनु...." रोहन थोडासा लाजलाच. " गर्लफ्रेंड काय... अजुन हो कुठे बोललीय.."
" आणि हो बोलली तर...?"
" तर होणारी बायको म्हण "
" वाह... होणारी बायको... जरा होणाऱ्या बायकोला विचारशील की नाही काय झालंय ते. " अनु जरा चिडलीच.
" बापरे... तुला माहितेय ना तिचा राग. प्रपोज केल्यापासून तसपण नीट बोलत नाहीये ती माझ्याशी... बाय द वे त्याच्या मुळेच तर नसेल ना तिचा मूड ऑफ..? "
" हम्म... हो सकता है... लेकीन पूछना पडेगा.." त्याची टर खेचत अनु निघू लागली.
" यार अनु, मला सावरायचं सोडून कुठे पळतेय.." रोहनने तिचा हात पकडुन तिला खेचलं. अचानक अस खेचल्याने ती जवळ जवळ रोहनच्या अंगावर कोसळलीच.
" काय आहे रोहन.." आपली खांद्यावरून घसरलेली ओढणी नीट करत ती रोहनवर ओरडली.
" सॉरी सॉरी... अस काय करते यार... थांब ना जरा सोबत.." त्याने दोन्ही हात कोपरापासून जोडत विनवल. अनुला नाहीतरी रागच आला होता त्याचा पण त्याने अस सॉरी बोललं की तिचा राग लगेच पळून जाई. मागच्या दोन वर्षांपासून अनु आणि रोहन सोबत होते. रोहनच्या सगळ्या आवडी निवडी तिच्या तोंडपाठ होत्या. रोहनचही अनिताशिवाय पान हलत नसे. काहीही असुदे रोहन आणि अनिता एकत्र असणारच. सतत सोबत राहून मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. त्या दिवशी ती रोहनला प्रपोज करणारच होती... पण तेव्हाच रोहनने बॉम्ब टाकला. सगळ्यांसमोर त्याने निशाला प्रपोज केलं. हे कधी झालं... निशा... रोहन..तिला कळलंच नाही... तिच्या डोळ्यातील स्वप्न अश्रू बनून डोळ्यांच्या कडांना गोळा झालेले. पण रोहनच्या आनंदासाठी तिने ते तसेच पुसून टाकले.
" प्रेम करायचं तिच्यावर आणि प्रॉब्लेम्स असले की आम्ही आठवतो." ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. परंतु तीच पुटपुटण त्याच्या कानांपर्यंत गेलंच नाही. त्याला काही बोलायला ती वळणार इतक्यात तिला तशीच घाईघाईने निशा गेट मधून पुन्हा आत येताना दिसली.
" काय विचित्र मुलगी आहे ही... कधी जाते कधी येते.. पण आम्हाला ' वॉचमनगिरी ' करावी लागणार..." अर्थात तीच हे बोलणही त्याच्या कानापर्यंत पोचणं शक्य नव्हतं कारण आता त्याच लक्ष त्याच्या निशुकडे होत. तिला पाहिल्यानंतर भाऊ नेहमीच हिप्नोटाईज होतात त्यामुळे कितीही बडबड करा.... उपयोग शून्य.
" रोन्या..." अनु किंचाळली. " आपली होणारी बायको घरी जायचं सोडून पुन्हा कॉलेजमध्ये का आलीय.... नेहमी तर बस चुकेल म्हणून घरी जायची घाई असते... आज अस का झालंय ते जाऊन विचारण्याची कृपा कराल का... का ते ही आम्हीच करावं...?"
" अं.. विचारू का तिला..?" रोहन अजूनही तंद्रितच होता.
" अबे जा ना..." तिने हाकललाच त्याला.
त्यांच्या बोलण्याच्या नादात निशा नक्की कुठे गेलीय हे काही समजेना त्याला. सगळे लेक्चर तर संपले, आपला ग्रुपही निघून गेलाय.. मग ही नक्की कुठे असेल. कॉलेजच ग्राउंड, हॉल, त्यांची क्लासरूम, लायब्ररी जिथे ती असण्याची शक्यता असेल ते सगळं चेक केलं त्याने. सगळीकडे पळून पळून धाप लागली होती त्याला. आता पाणी नाही मिळालं तर जीवच जाईल की काय अशी अवस्था झालेली त्याची. एक मोठा श्वास घेत तो कॉरिडॉरच्या शेवटी असलेल्या जिन्या जवळच्या वॉटर प्युरीफायर जवळ पोचला. वॉटर प्युरीफायरच्या मागच्या भिंतीआडून कसलीशी कुजबुज चालू होती. त्याने कान टवकारले. त्या भिंतीची उंची जेमतेमच होती. एका हातात पाण्याचा ग्लास सावरत आणि पायाखाली जिन्याच्या शेवटच्या पायरीचा आधार घेत तो हलकासा डोकावला.
तिथे चक्क निशा कोणाशीतरी बोलत उभी होती. ती मुलगी त्यांच्या वर्गातील तर नव्हती... ना ही त्याने कधी येतं जाता कॉलेजमध्ये तिला पाहिलं होतं. पण बोलण्यावरून त्या एकमेकाला चांगलं ओळखत असाव्यात अस वाटत होत. रोहनने उरला सुरला जीव कानात आणून त्या काय बोलतायत हे ऐकायचा प्रयत्न केला. पण इतकी खुसुरफुसुर चालू होती की ' खस खस ' व्यतिरिक्त त्याला काहीच समजल नाही. मात्र त्यांच्या खुसफुस आवाजावरून त्या नक्कीच कोणत्यातरी सिक्रेट बद्दल बोलत होत्या ह्याची त्याला खात्री पटली. एवढ्यात निशुचा फोन वाजला. रोहन अजून पाय उंच करत मागून तिच्या फोनमध्ये डोकावला. कोणातरी अनोळखी नंबरवरून कॉल होता.... अर्थात रोहनसाठी अनोळखी. तिच्या फक्त ' हॅलो ' वर समोरून काय बोलण झालं काय माहित पण ती लगबगीने तिथून निघाली. तिच्या सोबतची मुलगीही ही मग खालच्या दिशेने निघून गेली.
___________
" साहेब.." पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून पळापळ करून दमलेल्या परबांनी कशीतरी फॉर्म्यालीटी केली.
" परब एक चहा घ्या.... गरज आहे तुम्हाला.." अनिकेतने पटकन फोन उचलून सर्वांसाठी चहाची ऑर्डर देऊन टाकली.
" इथे आल्यापासून सगळ्या आसपासच्या पोलीस स्टेशनला कॉल करून सगळी माहिती गोळा केली. मागच्या महिनाभरात केवळ एकच कंप्लेंट आहे. ती ही आजच नोंदवली आहे... आपल्याच स्टेशनला.." परब घडाघड बोलून मोकळे झाले.
" फाईल दे.." मनातल्या मनात काहीतरी विचार करत अनिकेतने फाईल मागितली. एव्हाना गरमागरम वाफाळता चहाही आला होता. चला केसचा स्टडी करता करता चहाची सोबतही होईल.
सकाळपासूनचे सगळे घटनाक्रम तो डोळ्यासमोर रिवाइंड करत होता. समोर विचार करायला केवळ चारच गोष्टी होत्या... ते मांसाचे तुकडे, ओढणी आणि अंतर्वस्त्राचे तुकडे, रक्ताने माखलेली माती आणि एकाच जागी पडलेल्या दारूच्या बाटल्या.... घातपात होताच... अर्थात एका मुलीचाच घात झाला होता. मेडिकल रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल सगळं. पण... का आणि कोणी केलं असेल हे सगळं... अशा विचित्र जागी का कोणी मुलांसोबत एकटी येण्याची हिम्मत करेल....?
फोनच्या रिंगने अनिकेत विचारातून बाहेर आला. फोन उचलल्यावर त्याला साधं हॅलो बोलण्याची उसंतही न देता कोणीतरी बोलत होत. त्याचा चेहरा बघून कोणीही बोललं असत की पलीकडे बायको आहे. आणि आजच्या वाढदिवसाच्या बारगळलेल्या प्लॅनिंगचा रिव्यु चाललाय.
" बर बर... येतो अर्ध्या तासात.." कशीतरी स्वतःची सुटका करून घेत अनिकेतने फोन आटोपता घेत घरी धाव घेतली.
______________
नेहमीप्रमाणे आजही संध्याकाळी निशा तिच्या आवडत्या खिडकीतून रात्र न्याहाळत होती. तिची ही जुनीच सवय. दूरवर टीमटीमनाऱ्या ताऱ्यांना आपल्या छोट्याश्या डोळ्यात साठवायला तिला खूप आवडायचं. मागच्याच वर्षी तीच कुटुंब शहरातून ह्या गावात शिफ्ट झालं होत. ती नाराजच होती इतक्या दूर गावात राहायला. पण शहरातील पंख्याच्या गरम हवेपेक्षा इथे नदीवरून येणारा गार वारा तिला हवाहवासा वाटू लागला. सकाळच्या हॉर्नच्या कर्णकटू आवजापेक्षा इथली पक्षांची किलबिल तिला जागवू लागली. वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीतून फिरण्यापेक्षा इथल्या उंच उंच माडांच्या, पोफळीच्या बागेतून फिरताना ती जास्त खुलून येई.
पण आज तिचे डोळे चांदण्या शोधत नव्हते. त्या डोळ्यात काहीतरी होत. कसल्याश्या खोल विचारात गढलेल्या तिच्या डोळ्यात सकाळचा कॉल, त्या मुलीसोबतच संभाषण सगळं काही तरळत होतं.
" निशु चल जेवायला आता..." बहिणीच्या हाकेने ती भानावर आली. जेवायच... भूकच नव्हती तिला... पण जेवल पाहिजे नाहीतर आई बाबा पण उपाशी राहतील. डोळ्यात जमलेले अश्रू पुसत ती जेवण्यासाठी खाली निघाली.
_____________
थंडीतील सकाळही बरीच थंडगार होती. शिंदे आणि परब जरा हात शेकण्यासाठी बाहेरच्या कोवळ्या उन्हात उभे होते. अनिकेतची मात्र सकाळीच शाब्दिक चकमक झाल्याने डोकं थोड गरम होत. कालच्या केसचे विचार अजूनही डोक्यात रुंजी घालत होते. चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला होता पण अजूनही रिपोर्ट्स आले नव्हते. त्यामुळे नेमक काय आणि कशी सुरुवात करायची हे ठरवता येत नव्हतं.
" नमस्कार अनिकेत साहेब..." सकाळी सकाळी देसाईंच दर्शन.
" अहो देसाई आपण...." अनिकेत त्यांना पाहून दचकलाच. त्याला त्यांच्या येण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती. तो स्वतःच त्यांना कळवून संध्याकाळी त्यांच्या भेटीला जाणार होता.
" रिपोर्ट घेऊनच आलोय.." हातातले रिपोर्ट नाचवत देसाईंनी येण्याचं कारण स्पष्ट केलं.
" अहो पण तुम्ही का... म्हणजे...."
" अरे मी तिथे काहीतरी विचार करेन, तू इथे काहीतरी विचार करशील, मग फोन वर डिस्कस करू त्यापेक्षा म्हटलं एकत्रच बसून विचार करूया ना..." मोठ्याने हसत देसाईंनी स्पष्टीकरण दिलं. देसाईंच्या येण्याने आधीच घाबरलेल्या शिंदेंनी कसुनस हसत आपल्या सीटचा ताबा घेतला.
" रिपोर्ट्स काय आहेत ? " अनिकेतने मुद्द्याला हात घातला.
" आपला अंदाज बरोबर होता, ती बॉडी एका मुलीची आहे. साधारण चार दिवसांपूर्वी तिचा खून झालेला असावा. मुलीच वय बावीस ते पंचवीसच्या दरम्यान असाव. हे फक्त प्राथमिक रिपोर्ट्स आहेत. डी एन ए बाकी आहे अजुन. " देसाईंनी सगळे रिपोर्ट बोलून दाखवले.
" कालच एका मुलीची मिसिंग केस फाईल झालीय. " अनिकेत फाईल सरकवत बोलला.
" पण पक्का हीच मुलगी असेल का..?" देसाईंनी शंका.
" अहो देसाई, एवढस गाव आहे हे. पंचक्रोशीतीला माहिती गोळा केल्यावर केवळ एकच मिसींग केस मिळाली. सध्या आपल्यासमोर एकच ऑप्शन आहे ही मुलगी. आता तिच्या आई वडिलांना बोलावून घ्यावं लागेल व्हेरिफिकेशन साठी. मगच कळेल ना.." देसाईंची काम करता करता फिरकी घ्यायची सवय अनिकेत ऐकून होता. आणि आता इथे त्याच रोजच प्रात्यक्षिक होईल हे त्याला कळून चुकल.
" बर तो चहा एकदम मस्त होता... एक एक होऊन जाऊद्या पुन्हा. तोवर ह्या मुलीच्या घरच्यांना बोलावून घ्या, परब " हातातील सिगारेट नाचवत देसाईंनी पटापट ऑर्डर सोडल्या. तोवर अनिकेतने रिपोर्ट्स आणि फाईलचा ताबा घेत त्यात काहीतरी नोंदी करायला सुरुवात केली.
थंडीचे दिवस असले तरी दुपारचा उकाडा मी म्हणत होता. सगळे पंखे चालू असूनदेखील केवळ गरम वाफाच अंगावर येत होत्या. बाहेर जराही वाऱ्याची झुळूक नव्हती. रस्ताही अगदी अजगरासारखं सुस्त निजला होता. अचानक पडणारी एखादी वाळलेली काटकी नाहीतर पान त्याला गुदगुल्या करत होती. मधूनच एखाद्या वाहनाच्या चाहुलीने तो दचकून जागा होत फुत्कारे एवढंच.
" नमस्कार साहेब, आपण बोलावलं...." समोर एक पन्नाशीकडे झुकलेले गृहस्थ हात जोडून उभे होते. त्यांच्या सोबत साधारण त्यांच्यात वयाची स्त्री, जी त्यांची पत्नी असावी आणि दोन तरुण मुलं होती.
" नमस्कार, बसा ना..आपण ' सोनियाचे ' वडील... बरोबर..? " त्यांना बसायला देत अनिकेतने विचारले.
" हो... मी अर्जुन पाटील.. सोनियाचा वडील... काही पत्ता लागला का सोनियाचा...? " हजारो हरणांची व्याकुळता त्या बापाच्या डोळ्यात गोळा झाली होती. आपल्या पोटच्या गोळ्याची काहीच खबरबात न मिळाल्याने तुटक्या काळजाने तो बाप काहीतरी खुशाली मिळावी ह्या अपेक्षेने अनिकेतकडे पाहत होता.
" नाही अजून... पण त्यासाठीच काही चौकशी करायची आहे तुमच्याकडे..." परबांना इशारा करताच ते नोटबुक आणि पेन घेऊन तयारीत बसले.
" बर मी अनिकेत ह्या पोलीस स्टेशनचा इनचार्ज. हे माझे मित्र इनि. देसाई. हे परब, त्या दिवशी तुमची केस ह्यांनीच रजिस्टर करून घेतली होती... आता न घाबरता आणि न लपवता सगळी माहिती द्या.." अनिकेतची माणसं हाताळण्याची पद्धतच वेगळी होती. समोरच्याला दिलासा देऊन त्याच्या काळजाला हात घालणं कोणी अनिकेतकडून शिकावं.
" नक्की कधीपासून गायब आहे सोनिया.." देसाईंनी सरळच प्रश्न केला.
" सोनिया तालुक्याला तिच्या काकांकडे राहते. बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे. कॉलेज आणि तिचा शिवणक्लास आणि बसच्या ठरावीक वेळा ह्याच्यामुळे सगळ सांभाळत तिला आमच्या गावाहून ये जा करणं शक्य नव्हतं...." डोळ्यांतील अश्रू आवरत तिच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली.
" काका म्हणजे....? " अनिकेतने प्रश्न केला.
" माझे एक दूरचे भाऊ... दूरच्या आत्येचा मुलगा.. मोहन रावले... पाटील कॉलेजच्या बाजूलाच राहतात. त्यांच्याच जवळ राहते. तस आमच रोजच बोलणं होत पण.. दोन दिवसांपूर्वी.. सोमवारी तिच्याशी सकाळी बोलणं झालं तेवढंच... त्यानंतर तिचा फोन बंदच होता. दुसऱ्या दिवशी मी भावाच्या घरी गेलो तर त्यांनाही काही पत्ता नव्हता. बरीच शोधाशोध केली आम्ही. पण तरुण पोरगी गायब आहे म्हणजे कोणासोबत तरी पळून गेली असेल अशीच समज आहे इथे. त्यात काय येऊन तक्रार करणार. " अतीव दुःखाने त्यांना बोलणेच जमेना. मागच्या चार दिवसाची घुसमट अश्रूंवाटे त्यांच्या डोळ्यातून वाहत होती. अनिकेतने त्यांना पाणी देऊ केले.
" तिच्या कॉलेजमध्ये चौकशी केली का कोणी ?"
" हो... मी केली.. मी निशा... सोनियाची बहीण.. मी ही त्याच कॉलेजला आहे. दिदीचा काहीच संपर्क होत नव्हता म्हणून सगळेच काळजीत होते. मी तिच्या वर्गातील तिच्या फ्रेंड्सजवळ चौकशी केली. पण कोणालाच काही आयडिया नाहीये... शेवटी घाबरून सगळी लाज बाजूला सारून कंप्लेंट रजिस्टर केली."
" लाज कसली त्यात.."देसाई जरा तडकलेच. सगळीकडे लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे. कोणी गायब असेल तर चार दिवस स्वतः शोधत बसतील पण भीतीने आणि लोक काय म्हणतील म्हणून पोलिसात जात नाहीत.
" दीदी गायब झाल्यापासून ज्यांना समजलंय ते सगळे लोक टोमणे मारतायत. म्हणतायत पळून गेली असेल कोणासोबत... सारखं सारखं तेच बोलून जगणं हैराण केलंय आमचं.... बर तीच लग्न ठरलंय ते ही तिच्या मर्जीने...तर.. तर ती का कोणासोबत पळून जाईल..." मागच्या दोन दिवसांचा राग तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
" तीच लग्न ठरलंय...??" अनिकेत जरा अचंबित झाला.
" हो.. ह्यांच्याशी..." तिच्या वडिलांनी सोबतच्या तरुणाकडे बोट दाखवलं. " हे अमित राणे... आमच्याच नात्यातील आहे. दोघं आवडायचे एकमेकांना मग शेवटी आम्ही त्यांचं लग्न करायचं ठरवलं. परीक्षा झाली की मे महिन्यात लग्नाचा मुहूर्त आहे..." तिच्या वडिलांनी एका दमात सगळ सांगितलं.
" कॉलेज व्यतिरिक्त अजुन कोणी तिचे मित्र मैत्रीण होते का..?"
" त्याची शक्यता फार कमी आहे. ती जास्त कोणातच मिसळत नाही. ती, तीच काम, कॉलेज आणि शिवणकला ह्याच्यातच दिवस संपतो तिचा. तिचे कॉलेजमधील फ्रेंड्स माहित आहेत मला." निशानेच त्याच उत्तर दिलं.
" निशा... तुझ्याशी तरी काही बोलली होती का की कुठे जाणार आहे वगैरे.."
" नाही ना... नेहमी सगळ सांगते ती मला... पण सध्या का कोण जाणे कसल्यातरी टेंशनमध्ये असल्यासारखी वाटतं होती. मी विचारलं तिला... खूप खोदून विचारलं पण काहीच सांगितलं नाही तिने. सोमवारी तिला भेटून भांडणारच होती पण.... "
" पण काय निशा..?"
" सोमवारी मी भेटली तिला कॉलेजमध्ये. तिला काही विचारणार एवढ्यात समोरून माझ्या कल्चरल कमिटीचा हेड मीटिंगसाठी बोलवायला आला आणि बोलणंच खुंटल. संध्याकाळी फोन करायचं प्रॉमिस करून मी निघाली तिथून.. पण संध्याकाळी फोनच लागला नाही." निशाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला.
" अमित..." अनिकेतने आपला मोर्चा अमितकडे वळवला. " तुमचं शेवटचं बोलणं किंवा भेटणं कधी झालं होत सोनियाशी..?"
" अं... सोमवारी..सोमवारी फक्त बोलणं झालं होत फोन वर" अमित बोलला.
" सोमवारी म्हणजे नक्की कधी.. म्हणजे किती वाजता..?"
" साधारण बाराच्या आसपास असेल." अमितला नक्की टाईम आठवेना.
" तेव्हा ती काही बोलली होती का... की कुठे जाते अथवा कोणासोबत आहे...अस काही." अनिकेतला सगळ्या शक्यता पडताळायच्या होत्या.
" नाही. नेहमीसारखीच घरी चालली होती. थोडेफार बोललो आणि फोन ठेवला. पण वेगळं अस काहीच नव्हतं त्यात..." अमितने बराच ताण दिला मेंदूला.
शेवटी तिच्या वडिलांकडे मोर्चा वळवत अनिकेत म्हणाला " बरं.. मला तुमच्या त्या भावाला भेटायचंय. त्यांचे डिटेल्स द्या... कदाचित ते लोक काही माहिती देतील....तुमचेही काही डिटेल्स लागतील. " पुढचे डिटेल्स परबांना नोट करायच्या सूचना देऊन अनिकेत आणि देसाई तिथून निघाले.
___________
ट्रिंग... ट्रिंग... बराच वेळ कोणाचा तरी फोन वाजत होता. त्या आवाजाने बारमध्ये बसलेल्या इतरांच्या नजरा त्या टेबलवर वळल्या. गावाच्या वेशीवरच्या त्या बार मध्ये नेहमीसारखीच गर्दी होती. पिणाऱ्यांचा शौक त्यांना आपोआपच बारच्या दिशेने घेऊन येत असे. दगड विटांच कच्च बांधकाम केलेल्या एका साधारण रुंदीच्या जागेत चार जुनी टेबल टाकून बार चालू केला होता. पिताना पिणाऱ्याला केवळ समोरची दारू आणि मनातल्या भावनांची गरज असते त्यामुळेच की काय कित्येक वर्ष त्या बारला रंगरंगोटी केली नव्हती. जुन्या काळच्या कधीतरी केलेला कळकट रंग मिरवत जेमतेम प्रकाशात तो बार संध्याकाळी रंगीत होऊन जाई.
" अरे ये भा@* उचल की तो फोन..." बारमालक खेकसला. धंद्याच्या टायमाला मोबाईलच्या पिरापिरिने तो वैतागला होता.
त्याच टेबलवर दारूच्या धुंदीत निपचित पडलेला तो भानावर येऊन का बारमालकाला घाबरून काय माहित पण टेबल चाचपडू लागला.
" ह.. हॅलो..." दारूने अडखळनाऱ्या जिभेने कशीतरी साथ दिली बोलायला.
" मला वाटतं की पोलिसांना सुगावा लागले " पलीकडून कोणीतरी घाबरत बोलत होता.
" कशाचा...." तो खेकसला. दारूची धुंदी अजूनही डोळ्यांवर कायम होती.
" तिच्या मृतदेहाचा.... पोलिसांची तपासणी चाललीय... कॉलेजमध्येही येऊन गेले.." समोरच्याने आपली भीती व्यक्त केली.
त्याच्यावर काय रिअॅक्शन द्यावी हे त्याला कळेना. पण त्या एका वाक्याने त्याची चढलेली दारू मात्र खाडकन उतरली.
______________
कालच्या सारखीच असह्य दुपार होती. आज अनिकेत एकटाच पोलीस स्टेशनला होता. शिंदे आणि परबांना काही ना काही काम दिल्यामुळे ते बाहेरच होते. इतक्या भर दुपारी कोणीतरी दारातून डोकावल्यामुळे डोळ्यांवर अनावर झालेली झोप झाडत अनिकेत सावरून बसला. ऍनीवर्सरीच्या भयानक भांडणानंतर घरी जे अनुराधाने बंड पुकारलय त्याचा बीमोड करता करता अनिकेतच्या तोंडच पाणी पळत होत.
" नमस्कार साहेब, मी मोहन रावले आणि ही माझी पत्नी सुरेखा..." पोलीस स्टेशनला आल्यावर का कोण जाणे सगळे आपोआपच घाबरतात.
" बर... सरळ मुद्द्यावर येतो. सोनिया पाटील तुमच्या घरी राहत होती..?" आळसावल्याने अनिकेतही विषय गोल गोल न फिरवता सरळ मुद्द्यावर आला.
" हो. तिचे वडील अर्जुन पाटील माझा दूरचा भाऊ... सोनियाच शेवटचं वर्ष आणि त्यात तिचे शिवणक्लास चालू होते. तिच्या गावावरून येणं जाणं करण्यात बराच वेळ वाया गेला असता म्हणून तिच्या वडिलांनीच तिला आमच्या घरी ठेवायचा निर्णय घेतला."
" ठीक आहे...परंतु सोनियाच एकंदरीत वागणं कसं होत..?"
" सोनिया मान खाली घालून चालणारी मुलगी. अगदी साधी आहे. कॉलेज, क्लास आणि घर ह्या पलीकडे काही नाही. आता जरा लग्न ठरल्यापासून होणाऱ्या नवऱ्याला थोडे फोन कॉल्स होतात.पण हे वयच आहे तीच. " काका थोडे हसत बोलले.
" सोमवारी कुठे जाते काही बोलली होती का..?"
" तस तर काही बोलली नव्हती.... पण गुपचूप प्लॅन झाला असेल तर काही माहित नाही.... " काकूंनी बोलायचा चान्स सोडला नाही.
" अग सुरेखा..." काकांचा रागवायचा एक अपयशी प्रयत्न.
" तुम्हाला नाही माहिती काही. पण मी घरी असते ना दिवसभर. रविवारी कोणाचा तरी फोन आलेला तिला. म्हणजे मी चोरूनच ऐकल तीच बोलणं पण... " काकू जरा बावरल्या.
" पण काय..." अनिकेतने उत्सुकतेने विचारलं.
" पलीकडे कोण होत माहित नाही पण ही मात्र ' उद्या नको भेटूया माझा क्लास आहे. पुढच्या वीकेंडला घरी भेटणारच आहोत ना ' अस बोलत होती. हळू हळू बोलत ती घराच्या मागच्या बाजूला गेली. ह्या आधी ती कधीच इतकं लपत छपत बोलली नव्हती. म्हणून मी तिला विचारलच की कोण आहे फोनवर. तर तिने सांगितलं की मीनाक्षी आहे.."
" मीनाक्षी कोण??"
" तिची कॉलेजमधील खास मैत्रीण आहे. आमच्या घरीही येते कधी कधी. पण त्या दिवशी तिच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही बसला. संध्याकाळी तर मीनाक्षीच घरी आली होती. नेहमी खळखळ करणाऱ्या दोघी बराच वेळ काहीतरी कुजबुजत होत्या. काहीतरी असेल त्यांचं सिक्रेट म्हणून मी ही तो विषय सोडून दिला." काकूंनी अगदी महत्त्वाची बातमी दिली होती.
आता अनिकेतला हुरूप आला. सोनियाची बरीचशी माहिती रावले काकीच देवू शकत होत्या. एकंदरीत त्यांचं सोनियाशी फारस सख्य जाणवत नसलं तरीही वैरही प्रतीत होत नव्हतं. म्हणूनच त्या एक महत्त्वाचा दुवा होत्या.
" कोणता ड्रेस घालून निघाली होती सोनिया काही आठवतंय का...?" अनिकेतने सर्वात महत्वाचा प्रश्न केला.
हा प्रश्न अपेक्षित असल्यासारखा काकूंनी एक फोटो पुढे केला. " हा ड्रेस होता. " फोटोवर बोट ठेवत काकूंनी माहिती पुरवली. " दसऱ्याचा फोटो आहे हा. तुमच्या माहितीसाठी फोटोच घेऊन आली. "
" हे बर केलात काकू... खरंच मदत होईल ह्याची.." निरखून बघत अनिकेतने तो फोटो ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. " अजुन काही संशयास्पद वागणूक किंवा काही...? "
" नाही. रोजच्याप्रमाणेच ती कॉलेजला निघाली. त्यात वावग वाटावं अस काहीच नव्हतं... थोडी उशिरा येऊन म्हणाली होती आणि त्यानंतर आलीच नाही..." काकूंनी डोळ्यांना पदर लावला.
" तुम्ही जाऊ शकता. पण पुढील तपासणीसाठी तुम्हाला यावं लागेल." अनिकेतने चौकशी आटोपती घेतली. रावले दाम्पत्यही निघून गेले. वरवरच्या चौकशीतही बरीच माहिती मिळाली होती.
एव्हाना परब आणि शिंदे दोघेही परतले होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात केलेली पायपीट त्यांच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर दिसून येत होती. घामाने सार अंग भिजून गेलं होत.
" एक एक चहा चालेल का...?" दोघांचाही थकवा दूर करणार एकच औषध होत ते म्हणजे चहा. चहासाठी कधीही कुठेही जाणारे अवलिये. चहा बोलताच तरतरीत झाले.
चहा येताच चार्ज होऊन तिघेही आतापर्यंत जमा झालेल्या पुराव्यांवरून केसचा आढावा घेत होते. परब आणि शिंदे दोघांनीही गोळा केलेल्या माहितीवरून अनिकेतने नजर फिरवली. समोरचे कागद बरीचशी अपेक्षित व अनपेक्षित माहित दर्शवत होते.
" उद्या त्या मीनाक्षीची जबानी घ्यायचीय... ती काय बोलते ते महत्वाचं आहे." आपला डेस्क आवरत अनिकेत निघायची तयारी करू लागले.
क्रमशः