madhuchandrachi ratr ashihi in Marathi Love Stories by Vrushali books and stories PDF | मधुचंद्राची रात्र - अशीही

Featured Books
Categories
Share

मधुचंद्राची रात्र - अशीही


माणसाच्या आयुष्यात अशी एक रात्र येतेच कि ज्याची तो अर्ध आयुष्य वाट बघत असतो आणि जेव्हा ती रात्र प्रत्यक्षात उगवते तेव्हा खूप म्हणजे खूप फाटते.माझीपण अशीच फाटलेली.... आज आमची मधुचंद्राची रात्र आहे. चार दिवसाआधी माझं आणि मधुचं लग्न झालं. मधु म्हणजे मधुरा जोशी आणि लग्नानंतरची मधुरा भिडे.लग्न अगदी अरेंज पद्धतीने,घरच्यांच्या मर्जीने,पत्रिका वगैरे जुळवून झालं. वडिलांच्याच मित्राची मुलगी.इतकी गोड कि बघताच क्षणी काळजात शिरली.मग काय काळजातून घरात आणेपर्यंत जीवाची जी तगमग होती ना....
मधुरा....नावाप्रमाणेच मधुर,सुंदरतेच्या आजवरच्या,त्यावर रुळणारे भुवई पर्यंत कापलेले केस,अगदी मोजून मापून आखल्यासारख्या भुवया,किंचित तपकिरी आणि खूप निरागस असे डोळे,टोकदार नाक आणि सतत बडबड करणारे ओठ.इतक्यांदा भेटलोय ह्या पोरीला पण तिचे ओठ मिटलेले नाही बघितले.लग्नामध्येपण हळूच बडबड चालू होती तिची.ती बडबडताना मला कधी मध्ये बोलताच नाही येत.एक तर तिची गाडी नॉनस्टॉप असते आणि दुसरं म्हणजे मी तिच्याकडे बघण्यात इतका गुंग असतो कि मती गुंग होते माझी. लग्नात फोटोग्राफरने कंटाळून शेवटी त्याचाच अँगल बदलला होता.आणि हि अगदी घोडीसारखी खिंकाळून हसली होती.
असो !!! तर आज आम्ही आलोत लोणावळ्याला, मधुचंद्र सेलेब्रेट करायला. यायच्या आधी झाडून सगळ्या मित्रांनी टिप्स दिल्या.पण कसंय मीच आता थोडा घाबरलो होतो.असं काय???...पहिलाच हनिमून आहे माझा.हि मधू पण किती तास बाथरूम मध्ये होती.च्यायला बाहेरच येत नव्हती.तिची वाट बघून मी जवळपास पेंगायलाच लागलेलो पण मधूनच पोटात गोळा येत होता.
मी विचार करतोच होतो कि साक्षात हि मेनका समोर अवतरलीच. बापरे!!! काळजाची धडधड जाणवेनाशी झाली.हृदय बंद पडणं म्हणजे काय आता समजलं.रोजची बडबडी मधू, नववधूच्या वेशातील सजलेली मधू, पूजेच्या वेळी हाताला हात लावताना मुद्दाम चिमटे काढणारी मधू आणि हि समोर असलेली लाजून गुलाबी झालेली माझी मधू .किती किती रूप आहेत हिची.डोळ्यात साठवण अशक्यच .त्या गुलाबी बेबीडॉल गाउन मध्ये कशी गुलाबी बाहुली दिसत होती. तो मागचा अर्धा तास (जेव्हा माझा जीव जायला आलेला) कर्ली केलेले मऊ केस वाऱ्यावर बेधुंद उडत होते.थोडासाच मेकअप केलेला तिचा चेहरा असला गोड दिसत होता म्हणून सांगू .गोल्डनपिंक आयशॅडोने चमकणाऱ्या तिच्या पापण्या नर्तिकेसारखी मोहक हालचाल करत होत्या.तिच्या मंद परफ्युम आजूबाजूच्या वातावरणात मिसळून रूम मधील वातावरण भलतच रोमँटिक बनलेलं.छे!!!रात्रभर तिला असाच बघत राहिलो ना तरी मन भरल नसत.
" अमु " तिचा मधाळ आवाज कानावर पडला आणि मी तंद्रीतून बाहेर आलो.बापरे ! किती वेळ मी असा तिच्याकडे पुतळा बनून बघत होतो?? 'अम्या....कसला मंद आहे रे तू ???' तीपण बिचारी बावचळून एकाच जागी उभी आहे. "यार काहीतरी रोमँटिक वाग रे बावळटा" माझ्या आतला 'अम्या 'बेंबीच्या देठापासून बोंबलत होता पण माझ्या कानात शिरेल तेव्हा....माहित नाही पण त्या वातावरणाचा अंमल धीरे धीरे से माझ्यावर चढत होता.आजपर्यंत पोरींशी बोलायला घाबरणारा मी धीटपणे तिच्याकडे चालत गेलो.तिने मान खाली घातली."लाजता पण येत वाटत एका माणसाला..." मी तिच्या एकदम जवळ जात बोललो.ती आपला ओठ दाताखाली दाबून अजूनच लाजत मागे सरकली.तिच्या परफ्यूमच्या मंद सुगंधासोबत आता तिच्या फिकट गुलाबी लिपस्टिकचा पण सुगंध मला वेड लावत होता.तिने लाजून डोळे बंद केले आणि चेहरा आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये लपवला.
" आयुष्यभर माझी प्रेयसी बनून राहशील??" तिने अनपेक्षितपणे डोळे उघडले.मी तिच्यासमोर गुढग्यावर बसून विचारत होतो."आं..." तिची अजूनही अनपेक्षित प्रतिक्रिया.ती गोंधळल्या नजरेने माझ्याकडे बघत राहिली."वेडू, बायको तर झालीस ग.पण बायको ह्या नात्यासोबत अजून खूप नाती येतात.मला तू जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबली गेलेली खूप शहाणी झालेली बायको म्हणून नकोय.आजपासून तुझी सगळी दुःख,सगळा त्रास माझा.बायकोच्या कर्तव्यापेक्षा तू प्रेयसीचा हक्क आयुष्यभर गाजवलेला आवडेल मला.जशी लग्नाआधी होतीस तशीच थोडी येडी थोडी शहाणी खरीखुरी मधू." मी बोलता बोलता तिचा चेहरा न्याहाळण्याचा प्रयत्न करत होतो.तिच्या हसऱ्या डोळ्यात पाणी तरळले.क्षणभर मलाच गलबलून आलं.माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी...." मधू...अग..." मी पुढे काही बोलायच्या आतच ती खाली वाकली. तिचे मऊ गुलाबी ओठ तिने माझ्या गालावर अलगद टेकले. बास्स्स.....पुढे काही बोलायचे भानच नाही राहिले.माझ्या आयुष्यातला पहिला वहिला किस. न बोलता भावना इतक्या गोड पद्धतीने वक्त करता येतात ह्याचा आजच शोध लागला.कोण म्हणत पुरुषांना लाजता नाही येत?माझे गाल बिना मेकअपचे लाल झालेले.कसला भन्नाट अनुभव असतो लाजण्याचा पण. "अजून पण एका माणसाला लाजता येत...ते पण खूप गोड".आता माझे डोळे बंद होते आणि हात तिच्या हातात. लाजून तिच्या कुशीत शिरावस वाटत होत. हे असं काहीतरी मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.अंगावर एक रोमांच होता. आणि डोळ्यात प्रेमाची एक नशा.पोटातून हळूच भीतीचा गोळा उठत होता आणि तिच्या नजरेत बघताना छातीत कळा उमटत होत्या.तिच्या टपोऱ्या डोळ्यात मी पुरता संमोहित होऊन गेलो होतो.
तिच्या मागे चालत मी बेडवर बसलो. बाहेर सगळीकडे चांदण्यांचा फिकट शुभ्र प्रकाश पसरला होता. चांदण्याच्या प्रकाशाचे काही अवखळ कवडसे खिडकीच्या पडद्यांना न जुमानता आत शिरत होते.रूममधल्या कँडल लाईटचा थोडा मंद प्रकाश आणि त्यात मधेच चमकणारी चुकार चंद्रकिरण मला स्वर्गाचा भास करून देत होती.तिने माझा हात आपल्या हातात घेतला.तिच्या मऊ हाताचा तो स्पर्श..मी हळूच पाहिलं तिच्याकडे.अप्सरा अशाच असतील का ?? तिने पुन्हा पापण्या झुकवल्या. आज ती फक्त डोळ्यानेच व्यक्त होणार होती कदाचित.काही मिनिटांपूर्वी मित्रांचे सल्ले आठवणारा मी परीक्षेत कॉपी विसरलेल्या मुलासारखा मठ्ठपणे बघत होतो.आणि ती सगळ्यात हुशार मुलासारखी बिन्दास्त होती.काय बोलू हे पण समजत नव्हतं म्हणून मक्खपणे कधी तिचा चेहरा तर कधी पडद्यातून डोकावणाऱ्या किरणांकडे पाहत होतो.
"अमु काय झालय?तू शांत का आहेस ?" तिने माझ्या छातीवर डोकं ठेवत प्रश्न केला. क्षणभरासाठी माझी धडधड वाढली."तू पण घाबरलायस का ?" तिने धडधड ऐकली वाटत. मला नाही म्हणायचं होत पण मान मात्र होकारार्थी हलली." मधू ...मला भीती वाटतेय...म्हणजे मी.....कसंय कि मी फारसा कधी कोणत्या मुलींसोबत बोलायचो नाही त्यामुळे कधी कोणी मैत्रीण नव्हती.जे काही मी बोललो असेल भेटलो असेन ते फक्त तुझ्याशीच.....मलापण वाटतंय कि.....तुझ्यासोबत हि रात्र जगावी.....पण मला पटकन असं जवळ येणं नाही जमत आहे......." तिने माझ्या ओठावर बोट ठेवलं ती मोठ्याने हसून पुन्हा जोराने बिलगली."वेडू रे..." ती. यार!!!तिच्या ह्या वेडू रे बोलण्यानेच जास्त वेड लावले होते आणि आता तर चक्क कत्ल करणार आहे माझा."असा काही नियम नाहीये ना अमु,कि बाकीचे लोक जसे करतात तसच आपण वागावं.आणि लग्नानंतरच्या पहिल्या रात्री शरीरानेच एक व्हावं असाही काही नाहीये ना.जस मी घाबरू शकते तस तुलाही तर वाटू शकत ना. जेवढं मी तुला ओळखते त्यावरून खात्रीने सांगते कि तू बाकीच्या खूप मुलांपेक्षा वेगळा आहेस.सप्तपदीवेळी पण तुझ्या हाताच्या स्पर्शात किती काळजी होती. मला माहितेय तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे.आता प्रेम आहे म्हणून लग्न झालय तर लगेच शारीरिक जवळीक झाली पाहिजे असं काही नसत ना.त्या जवळिकीत पण दृढ विश्वास,काळजी,भावना आणि मिलनाची आतुरता हवी ना.त्याच्यासाठी वेळ तर लागेलच ना बाळा. मग आपण योग्य वेळेची वाट बघायला काय हरकत आहे..??.....जगातला सगळ्यात प्रेमळ आणि काळजी करणारा नवरा मिळालाय मला." खरं तर नशीबवान मी आहे कि मधुसारखी अशी समजून घेणारी मुलगी बायको म्हणून मिळाली माझ्या मनाची घालमेल किती पटकन समजून घेतली नाहीतर एव्हाना दुसरी एखादी असती तर न जाणो काय काय विचार करून मोकळी झाली असती.
खूप मोठा भार माझ्या डोक्यावरून उतरला.खूप मोकळ मोकळं वाटायला लागलं.माझ्या हातांची पकड तिच्याभोवती अजून मजबूत झाली आणि मी तिला घट्ट मिठीत घेतली. आता स्वर्ग माझ्या मिठीत होता.स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात ते हेच. तिचे श्वास माझ्या छातीला गुदगुल्या करत होते.तिच्या केसांचा,परफ्युमचा आणि लिपस्टिकचा सुगंध एकत्रितपणे माझ्या नाकात शिरत होता.मी तो अजूनच माझ्या श्वासात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होतो.तिच्या शरीराची नाजुकशी थरथर माझ्या मनात चेतना जागवत होती.मला हा क्षण न क्षण अनुभवायचा होता.
कित्येक वेळ माहित नाही....माझे डोळे बंद होते.कुठून तरी दूरवरून पक्षांची किलबिल ऐकू येत होती.तिच्या गंधामध्ये फुलांचा गंध मिसळून गेला होता.सुटलेला गार वारा अंगाला बोचत होता.आणि त्या सरशी ती अजूनच बिलगत होती.आता आमच्यात अंतर उरले नव्हते.अनोळखीपणा नव्हता.मनाला मनाची ओळख पटत होती.मी माझा राहिलो नव्हतो वाऱ्याच्या झुळकी बरोबर हळू हळू तिच्यात विरघळून जात होतो.
काही वेळापूर्वी तिच्या जवळ घ्यायला घाबरणारा मी कसा तिच्यात विरघळून गेलो मलाच नाही कळलं. माझी मधू आता माझ्या कुशीत शांतपणे झोपलीय.आमच्या मिठीत आता भीती नसून फक्त आपलेपणा आहे. नेहमी कृष्णच झालं पाहिजे असं काही नाही कधी कधी राधा होऊन जगण्यात पण असीम आनंद असतो.

समाप्त