आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(16)
‘‘पोरा, मी जिता हाय तोपर्यंत तुझं चांगलं झाल्याचं मला या डोळ्यांनी बघायचं हायं! या गावाच्या तोंडून तुझं कौतुक झाल्याचं माझ्या कानांनी मला ऐकायचं हाय! तवाच माझ्या या आतम्याला शांती लाभलं. तुझा सांभाळ करताना मला अनेक लोक म्हणाले कशाला सांभाळतोस ह्या लेकीच्या पाराला. दे जा त्याच्या वडिलांच्या आई-बाबांकडं सोडून. काय उपयोग हाय ह्याला सांभाळून. स्वत:ची पोटं भरायची मुश्किल आणि याला काय घालणार पोटाला. पण त्या संकटाचा, वादळाचा, दु:खाचा सामना करून तुला मी पदरात घेतलं. तुझ्यासाठी सारं काही सोसलं. त्या लोकांना मला चोख उत्तर द्यायचं हाय. ह्योच माझा मी सांभाळलेला आणि आता मोठ्या पदावर काम करणारा नातू म्हणून सगळयांना ताठ मानेनं, अभिमानानं मला ह्या गावात सांगायचं हाय.ह्यो माझं सपान तू नक्कीच पूर्ण करशील. हजारो घाव सोसण्याचं सामर्थ्य मला परमेश्वरानं दिलंय आणि ते घाव मी सोसलेत. पण तुझा बसलेला घाव मला असह्य होऊन मी मरुन जाईन.’’
आजोबांना रडू आवरले नाही. ते खाली कोसळले. मी आजोबांना वर उचलून पाणी दिलं. आजीचं रडणं आणखीनंच वाढलं. मी दोघांनाही शांत केलं. आजोबांना मुलानं नाकारल्याचं दु:ख वाटत होतं, तर आजीला माझी आई मृत्यू पावल्याचं दु:ख मनात सलत होतं. त्यामुळे ते एकाकी झाले होते.माझ्या बाबतीत तसं काही घडू नये असं त्यांना वाटतं राहायचं. मी त्यांना धीर म्हणालो,
‘‘मी वचन देतो तुम्हाला, माझ्यापासून तु च्या ज्या इच्छाआकांक्षा आहेत त्या मी नक्कीच पूर्ण करीन, तु चं मन दुखावलं जाईल असं कधीच माझ्या हातून होणार नाही.’’
आजी-आजोबांना मी आश्वासन दिलं आणि त्यांचा निरोप घेतला. शेवटचं आणि महत्त्वाचं वर्ष असल्यानं थोडं जाणीवपूर्वक जबाबदारीने वागणे महत्त्वाचे होते.
एकदाचं कॉलेज सुरू झालं. सुरेश, संदिप आले होतेच. अनिल आणि मी एक दिवस अगोदरच गेलो होतो. कुणाला दु:खवायचं नाही अगर कुणाचं वाईटपण घ्यायचं नाही. शेवटचं वर्ष आनंदांन घालवायचं असं मनाशी ठरविलं होतं.
महाविद्यालयाची सहल आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील खूप मुलं-मुली जाणार होते. आमचा काही जाण्याचा संबंध येतच नव्हता. कारण २०० रुपये भरणे आमच्या दृष्टीनं अशक्य गोष्ट होती. सहल दोन दिवस जाणार म्हटल्यावर आम्हाला दोन दिवस सुट्टी मिळणार, अभ्यासाला वेळ मिळणार याचा आनंद तर होताच पण आमच्या नशीबातही कधीतरी सहलीला जाण्याचे भाग्य यावे असं वाटत होतं. सहलीच्या आदल्या दिवशी स्नेहल माझ्याकडे आली व म्हणाली,
‘‘प्रशांत, सहलीला जाणार आहेस?’’
‘‘नाही.’’
‘‘का? कसला प्रॉब्लेम आहे?’’
‘‘काही नाही. इच्छा नाही जायची.’’
‘‘खोटे सांगू नको हं, मला माहीत आहे तू का नाही म्हणतोस ते?”
“का?”
‘‘कारण पैशांचा प्रॉब्ले आहे म्हणूनच ना!’’
‘‘हा! तो तर आहेच पण मुळातच मला जायचीच इच्छा नाही.’’
‘‘तू जाणार आहेस?’’
‘‘होय, ए पण तू असल्याशिवाय आम्हाला मजा नाही येणार हं. आपले सगळे मित्र येणार आहेत हं!” सुमैया, शबाना, आकाश, सुरज वगैरे सगळे, तसेच रोहनही फक्त तुमच्या चौघांची उणीव जाणवणार आहे. आपला एक ग्रुपच जायला हवाय.’’
‘‘ठीक आहे! तुमची मर्जी पण आम्हांला तुमच्याशिवाय चांगला एन्जॉय करता येणार नाही.”
“बघ पुन्हा विचार कर. सहलीला येणार की नाही तो निर्णय मला सांग.मी येते.”
कॉलेजच्या मधल्या सुट्टीत स्नेहल गडबडीने आली. भरभर बोलली आणि निघूनही गेली. त्याच दिवशी संध्याकाळी हॉस्टेलवर सुरज बातमी घेऊन आला.
‘‘सुमैयाने तुझे सहलीचे पैसे भरले आहेत. उद्या सकाळी ठीक ८ वाजता कॉलेजवर यायला सांगितलंय.’’
तिघेही खोलीत बसले होते. मी सुरजला म्हणालो,
‘‘नाही सुरज मला येता येणार नाही. नाही म्हणून सांग, सुमैयाला.’’
‘‘अरे काय बोलतोयस तू प्रशांत. अरे शेवटी ती मैत्रीण आहे. मित्रत्वाच्या नात्याने आपुलकीने पैसे भरले असतील. असं नाकारू नको तू या संधीला.
आम्हाला अशी कधी संधी आली असती तर आम्ही नक्कीच गेलो असतो.’’
सुरेश हसत म्हणाला. मला थोडा राग आला. मी म्हणालो,
‘‘सुरेश चेष्टेवर घेऊ नकोस.’’
‘‘अरे चेष्टा नाही करत मी तुझी. तुला अगदी जी जिवलग मित्राप्रमाणे मानते. आमच्यापेक्षाही ती तुला जवळंच मानते. कारण तू हुशार आहेस म्हणून.’’
‘‘पण तूच तर म्हणत होतास की, तिचं माझ्यावर एकतर्फी प्रेम आहे म्हणून.’’
‘‘अरे! त्याचसाठी म्हणतोय जा सहलीला. तू सिद्ध करुन दाखवणार आहेस ना आम्हाला, जाणवेल तुला तिच्या मनात काय आहे ते?’’
‘‘अरे, सुरेश काय बोलतोयस तू. त्याला जायचं नसलं तर राहू दे ना उगीचंच कशाला बळजबरी करतोस त्याला तू.”
‘‘नाही अनिल यामध्ये माझा स्वार्थ नाही. एक दिवस याला खरं ते पटावं आणि याने सारं सोडून द्यावं, तिच्याशी कायमचं नातं तोडावं. याचा जो तिच्यावर गाढ विश्वास आहे तिच्या मित्रत्वावर अंध:विश्वास आहे तो नाहीसा व्हावा.”
‘‘हे बघ, सुरेश जसा तुमच्यावर माझा विश्वास आहे तसाच तिच्या मित्रत्वावरही माझा विश्वास आहे. जोपर्यंत मला माझ्या मनात तिच्याबाबतीत
तसा प्रत्यक्ष मला जाणवत नाही, तोपर्यंत मी तिला दोष देणं मला चुकीचं वाटतं.’’
‘‘सुरज, मी येईन म्हणून सांग.’’
तसा सुरज निघून गेला. जाता जाता त्याला सांगितलं, आता जे बोलणं झालं ते सुमैयाला बोलू नको. माझ्यावर विश्वास ठेवं असं म्हणाला आणि निघून गेला.पण माझं मलाच एक गोष्ट समजत नव्हती की, मला सुमैयाबाबत इतका मनामध्ये गोडवा का निर्माण व्हावा? तिच्यावर माझा इतका गाढ विश्वास का असावा? तिचं माझ्याशी आपुलकीचं बोलणं, संकटाक्षणी धावून येणं, आपलेपणानं चौकशी करणं का असावं इतकं माझ्याबद्दलच तिचं आपलेपण? हा प्रश्न माझ्या मनाला नेहमीच पडायचा. सुरेश, अनिल, संदिपचा तसा मला मोठा आधार वाटत होता, तसाच सुमैयाचाही मला आधार वाटायचा. शेवटी आस असते,ओढ असते. आतुरता असते ती आधाराचीच ना! तो आधार मला तिघा मित्रांनी आणि एका मैत्रिणीने दिला होता. भले जग काहीही म्हणो पण सुमैयावर माझा विश्वास होता. ती आपलं वाईट कधीच चिंतणार नाही. आपल्यापासून काहीच लपवून ठेवणार नाही. या तिच्यावर असलेल माझ्या विश्वासाने तिच्याबद्दलच्या ज्या ज्या वाईट गोष्टी माझ्या कानावर पडल्या होत्या. मग भले माझ्यावर असलेले तिचं एकतर्फी प्रेम , ती जाणूनबुजून माझ्याशी जवळीक करून मला मागे खेचण्याचा प्रयत्न करते आहे. तिच्या मनात माझ्याबद्दल वाईट भावना आहे या सर्व ऐकलेल्या गोष्टींवर तिच्यावर असलेल्या माझ्या अगाध विश्वासाने मात केली होती.
सहलीचा दिवस एकदाचा उजाडला.
‘‘प्रशांत तू आला नसतास ना तर या सहलीत जो आम्ही आनंद लुटतोय, मस्त मजा करतोय ते कदाचित आमच्या वाट्याला आलं नसतं. तुझ्याविना सारं सुनं सुनं वाटलं असतं बघ. काय रे वेड्या तुला किती वेळा सांगितलंय, तुला,काहीही अडचण आली तर मला सांगत जा म्हणून, तु का नाही सांगितलंस मला.’’
‘‘नाही. मला कुठे काही अडचणच नाही. तर सांगण्याचा प्रश्नच कुठे येतोस.’’
‘‘आहा! प्रश्नच कुठे येतो. मग मी जर पैसे भरले नसते तर तू सहलीला आला असतास काय?”
‘‘नाही.’’
‘‘मग पैशाची अडचण मला का नाही सांगितली तू?’’
‘‘नाही मला मुळीच यायचंच नव्हतं सहलीला. फक्त तुला नाराज करायचं नाही म्हणून मी आलो आहे. मला माहीत होतं तुच स्नेहलला मी सहलीला जाणार आहे किंवा नाही याची चौकशी करायला करायला पाठवलं होतसं.”
‘‘अरे बापरे! तु तर महा हुशार निघालास. मानलंच पाहिजे हं तुला. पण काहीही असो हं, तु सहलीला माझ्यासाठी आल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. तू असल्यामुळंच आम्ही सगळेजण खूपच आनंदी आणि मजेत राहू शकलो.’’
सहल झाली, मजेत गेली पण नंतर मला कळून चुकले की आपण सुरेश, अनिल, संदिप यांना एका शब्दानेही विचारले नाही, त्यांना विनंतीही केली नाही की, सहलीला तुम्हीही यावं म्हणून. मी मात्र त्यांच्यासमोर त्यांना विचारून यांच्या परवानगीने आलो.
*****