Aaghat - Ek Pramkatha - 15 in Marathi Love Stories by parashuram mali books and stories PDF | आघात - एक प्रेम कथा - 15

Featured Books
Categories
Share

आघात - एक प्रेम कथा - 15

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(15)

थोडंस वाटून गेलं की आपल्याला ही असं का बोलतेय. याचाच तर आपण शोध घेतोय, पण खरंच शोध घेता घेता ती आपल्याला आपलं करून घेतेय की काय! तिच्या बोलण्यातलं प्रेम , आपुलकी, तळमळ कोड्यात टाकत होती. परत फिरण्याची वेळ झाली, तसं जाता जाता सुमैया म्हणाली,

‘‘प्रशांत, मला एक दिवस खूप खूप बोलायचं आहे. तुझ्याशी बोलले की मगच माझं मन मोकळे होईन. तोपर्यंत मी अस्वस्थच असेन.’’

जाता जाता पुन्हा कोड्यात बोलावं तसं बोलून गेली. मी आज हॉस्टेलवर वेळाने आल्याचं बघून तिघेही चिडले. त्यात सुरेशचा पारा चढला.

‘‘प्रशांत, पुरे आता मैत्रीचे नाते. तुझ्यामुळे आम्हाला बोलून घ्यावं लागतं कांबळेसरांचं. अरे! एकदा तरी वेळेवर येत जा. ती मैत्रीण काय तुझ्या आयुष्याला पुरणार आहे?’’

सुरेश सांगत असताना अनिलने सांगायला सुरुवात केली.

‘‘होय प्रशांत, अजूनही वेळ गेलेली नाही जागा हो. एस.वाय.ची परीक्षा महिन्याभरात येऊन ठेपली आहे. ठीक आहे! तू हुशार आहेस. तुला सांगायला नको, पण मन राहत नाही. तू दुसरीकडे कुठे वाहत जावू नयेस म्हणून आम्ही बोलतो.”

‘‘अरे! पण ठीक आहे! आता पुरे करा! तुम्ही सांगताय ते मला पटतंय पण मला नाइलाजाने थांबावं लागलं. हवं तर मला माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही.’’

मी कुठंतरी चुकतोय याची मला जाणीव होत होती. माफी मागण्याशिवाय पर्यायच राहत नव्हता माझ्याकडे. कारण माझ्यामुळे त्यांना बोलून घ्यावं लागत होतं. मी वारंवार माझी चूक टाळण्याचा प्रयत्न करायचो.

परीक्षेचं वातावरण तयार झाले होते. जो तो अभ्यासात गुंतला होता. त्याच दरम्यान कॉलेजमार्फत देण्यात येणारा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ मला जाहीर झाला, पण पुरस्कार जाहीर झाल्याचं कळताच मनाला वाटून गेलं की खरंच पूर्ण १००% आपण या पुरस्काराला पात्र आहोत का? नुसतं परीक्षेत गुणवत्ता पाहून हा पुरस्कार मिळतोय. माणूस म्हटल्यावर १००% स्वयंपूर्ण असू शकत नाही. आजी-आजोबा खूप आनंदित झाले. मागे घडलेल्या प्रकरणाची संकटं आणि दु:खाची जी छाया त्यांच्या मनावर पडलेली होती ती ही बातमी ऐकताच दूर झाली. तो कटू क्षण क्षणात विसरून ते माझ्या आनंदात सहभागी झाले होते. सगळयांच्याकडून कौतुकाची थाप, अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण या कौतुकानं आणि अभिनंदनानं मला वाहत जायचं नव्हतं हे मी लक्षात ठेवून होतो. आता मात्र मला या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली होती.

अखेरीस एस.वाय.बी.ए.ची वार्षिक परीक्षा झाली. अभ्यासाचं नेहमीप्रमाणे जे नियोजन होतं त्यात खंड पडू दिला नव्हता. म्हणूनच हे पेपर अगदी मनासारखे गेले होते. आता फक्त विचार होता, कॉलेज जीवनातल्या शेवटच्या वर्षातला. कॉलेज जीवन संपायला एका वर्षाचं अंतर राहिलं होतं. या कॉलेजनं खूप काही शिकविलं, दिलं-घेतलं. जीवनाच्या वाटेवरती नेटाने उभं केलं. आणि जगण्याचं बळ दिलं, असं हे कॉलेज. या कॉलेजचा आणि माझा घट्ट ऋणानुबंध होता.

कॉलेजला सुट्टी पडली. पुन्हा गावाकडे जाणं, शेतमजूरी करून चार पैसे मिळवणे. त्या पैशातून शिक्षणाचा खर्च भागविणे हा नित्यक्रम ठरलेलाच पण आजी-आजोबांच्याकडे जाणं, त्यांना भेटणं, त्यांना बघण्याची आतुरता एक वेगळीच असते. सुट्टी पडली की खूप आनंद व्हायचा. पण आमच्या वाट्याला सुट्टीची मौजमजा, फिरणं, आनंद लुटणं कुठलं आलंय. दररोजचा खडतर प्रवास ठरलेला. जणू परमेश्वरानं आम्हाला एक प्रकारचं कुंपणच घालून दिल्यासारखं. जाऊ देत का उगीचच मनाचं खच्चीकरण करायचं.

घरी जाताच आजीचा प्रश्नार्थक चेहरा पाहून मी थोडंस गडबडून गेलो.

‘‘आजी, असे काय बघतेस उदास होऊन?’’

‘‘काय नाही रं लेकरा, तुझ्याबद्दल जे घडलं ते ऐकून मला धक्काच बसला रे, बाळां पण आम्हाला विश्वास होता. आमचं पोरं आस वागणार नाही.

खऱ्याचंच केव्हाही खरंच होतंय कुणीही खोटेपणा केला तरी.’’ आजी मला जवळ घेऊन डोळयात पाणी आणून कुरवाळत बोलत होती. एवढ्यात आजोबा आले.

‘‘काय घडलं पोरा, आम्हाला जरा निवांतपणे जगू देतोस काय नाही?’’

‘‘आहो, काय नाही. गप्प बसा. लेकरू आल्या आल्या आसं काय बोलताय?’’

‘‘तर काय करू, आता किती ताप सोसायचा. बारका हाय व्हंय ह्यो आता कशाला कुणाच्या नादाला लागायचं ह्यानं.’’

‘‘आहो त्याचा काय दोष! गुन्हा काय त्याचा?’’

‘‘नव्हता दोष ही गोष्ट खरी हायं पण कुणाच्यातरी मनाविरुद्ध वागल्यामुळेच अशा गोष्टी विनाकारण अंगलट चालून येतात. पण पोरानं आसं कुणाचं वाईट केलं हुतं? व्हयं रं पोरा कुणाला वावडं बोलला हुतासं का?”

‘‘नाही आजी पण!’’

‘‘पण काय रं लेकरा.’’

‘‘मी वर्गात हुशार असल्यामुळं सगळया शिक्षकांचे माझ्यावर जास्त प्रेम आहे. माझे मित्रही भरपूर आहेत. पण तेथील जवळच्या आसपासच्या गुंडप्रवृत्तीच्या मुलांच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तेच मुद्दामहून असे माझ्याशी वागतात. पण मी ठरविलंय इथुन पुढं कुणाचंही वाईटपण घ्यायचं नाही.’’

आजोबा माझ्यावर खूप नाराज आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. इथुन पुढं त्या दोघांनाही दु:खी करायचं नाही असं ठरविलं. माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचं मी ठरविलं होतं. काम मिळालं होतं, पैसेही खूप जमले होते. नवीन कपडे घ्यायचं ठरविलं. कपडेही घेतले. आजी-आजोबाही खूष होते माझ्या कामावर. एक दिवस संध्याकाळी कामावरून आलो. आजी-आजोबा आतल्या खोलीत काहीतरी बोलत होते.

मला बघून पटकन आजोबा बाहेर आले.

‘‘हे बघ पोरा आता ह्यो कामधंदा बंद कर. खूप झालं आता. शेवटचं वर्ष हाय! मन लावून अभ्यास कर, काम काय आयुष्यभर करायचंच हाय पण, ही वेळ गेली की पुन्हा येणार नाय. काय कमी जास्त पैसा पडला शिक्षणाला तर उसनवार घेऊन देता येतील. पण आता पहिला अभ्यासाला लाग.”

आजोबांचं बोलणं मला पटलं. सुट्टीला येताना दोन-तीन पुस्तकं आणली होती. कॉलेज सुरु व्हायला १० ते १५ दिवस शिल्लक होते, तोपर्यंत वाचून काढायचं ठरविलं.

बघता बघता उरलेसुरले १५ दिवस कधी संपले ते मला कळलचं नाही. दरवर्षीपेक्षा आजी-आजोबा यावेळी मी कोल्हापूरला येताना खूपच भावूक झाले होते. मी त्यांना धीर देत होतो.

‘‘माझी काळजी करू नका. तुम्हाला त्रास होईल असं पुन्हा वागणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर कुठे ना कुठे तरी मला काम मिळेलच. त्यावेळी बघा कसं सुखात ठेवेन तुम्हाला!’’

‘‘अरं, पोरा आम्हाला कसलं आलंय सुख आणि दु:ख. तू तुझ्या आयुष्याला शाना हो एवढीच इच्छा हाय आमची. तुझ्याशिवाय कुणाचा आधार हायं आम्हांला पोरा? पोरंबाळं असूनदेखील आम्ही निराधार हाय. त्यानं आमच्या काळजावर घाव घातलाय. पण तू तसं वागणार नाहीस पोरा यावर आमचा इश्वास हाय. तू आमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीस इवढा इश्वास हाय पोरा आम्हाला.”

आजोबा भावुक होऊन बोलत होते. त्यावर मी आजोबांना म्हणालो,

‘‘आजोबा तु च्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. माझं एवढं शिक्षण पूर्ण होऊ दे, काम मिळू दे. बघा सगळं गाव कौतुक करायला पाहिजे, असं तुम्हाला सुखात ठेवतो.

आजोबांचं आणि माझं बोलणं चालू होतं.आजी मात्र एका खोलीच्या कोपऱ्यात रडत बसली होती.मी आजीजवळ गेलो.

‘‘आजी रडू नको. मी तुम्हाला असंच उघड्यावर सोडणार नाही. मला माहीत हाय, तु च्या हातून आता होत नाही. मला आता काहीच नको. तुमच्या प्रेमाशिवाय. माझी तुमच्याकडून कायच अपेक्षा नाही.’’

‘‘आरं पोरा आसं बोलू नगोस. आमच्या जीवात जीव हाय तोवर तुला आमच्याकडून आमच्या परीनं जे शक्य हाय ते आम्ही देणारंच हाय रं.’’

‘‘पोरा, आदि-मादि सणवाराचं येत जा, पोटाला खाईत जा, काळजी करू नकोस, कुणाला दुखवू नकोस, शहराच्या ठिकाणी शिस्तीनं रहा.”

नेहमी मी जाताना आजीच्या मला द्यायच्या सूचना काही चुकायच्या नाहीत. आजीला मी म्हणालो,

‘‘आजी आता मी काही लहान नाही, आता चांगल-वाईट कळतंय मला!’’

‘‘ते बरोबर हाय रं पोरा पण आमच्या नजरेत तू आजून बारकाचं हायसं रे!”

आजी-आजोबांची माया, प्रेम यामुळे मी भारावून जात होतो. मला त्यांच्याशिवाय कुणाचा आधार होता ना त्यांना माझ्याशिवाय कुणाचा आधार होता.

*****