Dominant - 6 in Marathi Thriller by Nilesh Desai books and stories PDF | डॉमिनंट - 6

Featured Books
Categories
Share

डॉमिनंट - 6

डॉमिनंट

भाग सहा

डॉमिनंट भाग पाचपासून पुढे....

'किती कमी वेळात मंदारबाबतचे गैरसमज दूर झाले आणि किती पटकन त्या नाजूक क्षणापर्यंत आपण त्याच्यासोबत गेलो.. त्याची पर्सनॅलिटी बाकी आपल्याला साजेशी अशीच आहे.. उंच, मजबूत बांध्याचा.. बिनधास्त.. कसल्याही प्रसंगाला न घाबरणारा.. निडर.. असाच तर जोडीदार हवा होता मला.. छ्या.. माझ्यात मुळी टिपीकल बायकांसारखे लटकेझटके नाहीत.. बाईलचाळे करत मला तर धड लाजताही येत नाही.. नाहीतर त्याला आजच माझ्या प्रेमात वेडं केलं असतं..' मनू आपल्याच मनाशी संवाद साधत होती.

मुळात धाकडशाहीसारखा स्वभाव असल्याने तिनं कधी असल्या गोष्टींवर फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आज त्याच्यातल्या पुरूषानं तिच्यातल्या बाईला जागं केलं होतं. जीवनात अशी वेळ एकदातरी येतेच जेव्हा मनावरचा संयम सुटतो आणि आपण स्वतःवर बाहेरून कितीही कसलेही पांघरून घेतले तरी आपल्यातल्या मुळ इच्छेला न्याय द्यावा लागतो.

मंदारच्या विचारांत हरवलेल्या मनूच्या डोळ्यांसमोर अचानक मौसमचा चेहरा आला आणि तिला सद्यपरिस्थितीचे आकलन झाले.

'अह.. शिट्ऽऽ कसले मूर्ख होते मी.. नशीब पण त्याला फोन आला आणि मी भावनांच्या भरात सारं काही विसरता विसरता राहीले. कितीही काहीही झाले तरी पहीले मला त्या खुनी नराधमाला शोधले पाहीजे.' मंदारचा विचार झटकून मनूने पुन्हा आपले मन मूळ मुद्द्याकडे डायव्हर्ट केले.

मंदार आणि आरीफ दोघांमुळे आपल्याला लवकरात लवकर मौसमचा खुनी सापडण्यास तरी मदत होईल अशी खात्री मनूला झाली होती.

मंदार निघून गेल्यावर काहीश्या अस्वस्थ असलेल्या मनूच्या मनात चलबिचल सुरू होती. तिला राहून राहून कसलीतरी शंका येत होती. म्हणूनच की काय तिने आरीफला पुन्हा एकदा तिथली परीस्थिती जाणून घेण्यासाठी फोन करायला घेतला. पण त्याचा नंबर डायल करण्यापूर्वीच तिला समोरून 'मेहजबीन' नावाच्या व्यक्तीचा फोन आला.

"हॅल्लो... " मनू ऊत्सुकतेने म्हणाली.

"मौसम आखरी दिन जिन लोगों के साथ थी, वो लोग अभी अभी यहा आये है.. तुम कहो तो मै सबको बुलाकर उन ह*** को पकड के रख दूं..?" समोरून मेहजबीन म्हणाली.

मनूने अगोदरच मौसम सोबत काम करणार्या सर्वांना काही खबर मिळाली तर कळवण्यास सांगितले होते. त्यातूनच या मेहजबीन नामक व्यक्तीने तिला ताबडतोब माहीती दिली होती. मेहजबीन तीच होती जिने लैला बारजवळ चंदूशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. खरंतर तिने त्या चौघांना ओळखले होते आणि मौसमच्या हत्येचा सुड घेण्यात तिलाही आपले योगदान द्यायचे होते. म्हणूनच ते चौघे शिडी चढून वर जाताच तिने मनूला फोन केला होता.

"नहीं दिदी.. वहा पहलेसे ही अपने दो आदमी गये है.. और उन चारों को बिना आगाह किये हमे तलाश करनी है.. अपने लोग ये काम कर देंगे.." मनू मेहजबीनला समजावत म्हणाली.

"हा पर वो तो चार लोग है.. और लगते तो पक्के गुंडे टाईपके.. मुझे लगता है शायद वो लोग भारी पड सकते है.. इसलिये हमें रिस्क नहीं लेना चाहीये.." मेहजबीन मनूला संभाव्य धोक्याची शक्यता सांगू लागली.

मनू तिच्याशी बोलता बोलता थोडा विचार करत मनाशी बॅकअप प्लॅन पक्का करू लागली. जर तिथे डाव उलटला तर... या सर्व गडबडीत तिने अथवा मंदार किंवा आरीफने बॅकअपचा विचारच केला नव्हता.

"ठिक है दिदी.. मैं आती हुं वहा.. तब तक आप उन चारों को अलग करने की कोशिश करना.. बस उन्हे शक नहीं होना चाहीये.." मनूने घाईतच निघत तिला सुचना दिल्या.

चौघांशी एकदम भिडण्यापेक्षा त्यांना वेगवेगळे करून पकडणे जास्त सोईस्कर होते. शिवाय तिथे इतरही मवाल्यांचीही वर्दळ असणारच. म्हणूनच काम चोख होण्यासाठी त्यांच्यातला कुणी मेहजबीनसोबत तिथुन वेगळा झाला तर त्याच्याशी मी माझ्या पद्धतीने निपटू शकते. मनूने धडाधड सर्व निश्चित केले.

"मैं तो अपना काम शुरू भी कर चुकी हुं.. उनमें से एक तो मेरा दिवाना भी हो गया है.. मैं कैसै भी करके उसे अलग कहीं लेके जाते हुं.. जगह और रूम नंबर मेसेज कर दुंगी.." मेहजबीन हलकीशी स्माईल करत म्हणाली.

"ठिक है.. अपना खयाल रखना.. मैं बस पहुंच ही रही हुं.." मनू एव्हाना बाहेर पडली होती.

समोरून मिळालेली माहीती मनूसाठी महत्त्वाची अशीच होती आणि मग कसलाही पुढचामागचा विचार न करता मनूने आपल्या बाईकला किक मारली. हेल्मेट डोक्यात चढवून तिनं गिअर टाकला आणि सुसाट बाईक मुख्य रस्त्यावर काढू लागली..

अचानक रस्त्यात आलेल्या माणसाला प्रसंगावधान राखत तिने चुकवले.. अगदी थोडक्यातच वाचला तो मनूच्या बाईकपासून...

"ओय् अंकल् बाईक से कुछ नहीं होगाऽऽ.. ट्रक ढुंड ले मरने के लियेऽऽ..."

तो माणूस फक्त आ वासून मनूचे शब्द ऐकत मागे वळून पाहत राहीला आणि मनू वार्याच्या वेगात कल्याणच्या दिशेने 'छु' झाली.

*********

मदन आणि डिग्री दोघेही श्वास रोखून बाहेरील व्यक्तीचा अंदाज घेत होते. पण बाहेरील व्यक्ती बहुधा हुशार असावी तिने दरवाजा उघडून आत जाण्यापेक्षा दरवाजा झटकन हाताने ढकलून चार पाऊले मागे जाणे पसंद केले.

दरवाजा एकदम उघडल्याने डिग्री थोडा चाचपडला. खरंतर डिग्रीच्या मनात एकाचवेळी बाहेरील शत्रू आणि आत असलेला मदन दोघांचा विचार सुरू होता. मदनसंबंधी डिग्रीचे मन साशंक होते. काही झाले तरी त्याने नसीर सोबत टॉयलेट रूममध्ये मदनलाच पाहीले होते. म्हणून तो नसीरप्रमाणेच आपल्यावरही हल्ला करतो की काय अशी भीती डिग्रीच्या मनात आता घर करू पाहत होती.

दरवाजा पूर्णपणे उघडला गेला तसा मदन थोडा पुढे सरकला. डिग्री आणि मदन दोघांचाही जीव समोर आरीफला पाहून भांड्यात पडला.

"तु यहा क्या कर रहा है.." मदनने आवाजात जरब दाखवत म्हटले. साहजिकच तो आरीफला तिथं पाहून नाखुश होता.

"मैं क्या करूँगा ना भाय.. अपन तो यही पडा रहता है हमेशा.." आरीफ थोडं घाबरत असल्यासारखं दाखवलं.

"एक मिनिट.." डिग्री भडकतच पुढे आला आणि आरीफची कॉलर गच्च पकडत त्याला भिंतीवर दाबत विचारू लागला.

"अभी बाहर मुझे तु ही टकराया था ना चु**.."

"भाय....भाय.. हा मै ईच था वो.. पर क्या हुवा..?" आरीफने नरमाईची भुमिका घेतली होती.

"आ... आ इधर भो***..." डिग्रीने त्याला आत नसीरच्या बॉडीपशी नेलं. नसीरला त्या अवस्थेत पाहताच आरीफ साफ हादरला.

"या अल्लाह्.... ये क्या हो गया..." आरीफ विस्फारलेल्या डोळ्यांनी ते पाहत उद्गारला.

"चौकने की ॲक्टींग मत कर श्याने.. या तो तूने कुछ देखा है या ये कारनामा तूनेही किया है.." डिग्री त्याला सज्जड दम देण्याच्या आवेशात म्हणाला.

"नहीं भाईजान.. खुदा कसम ना मैंने कुछ देखा ना इससे मेरा कोई वास्ता.. मै तो बाथरूम आ रहा था.. अचानक आप पीछेसे भागते हुये आते दिखे और मैं रूक गया..." आरीफ गयावया करत स्पष्टीकरण देत होता.

"तो फिर तेरे मरनेसे हमारा कोई नुकसान नहीं होगा.. " असे म्हणत मदन पुढे सरसावला आणि आरीफला बकोटीला घेऊन त्याच्या मानेवर जोर देण्याच्या प्रयत्न करू लागला.

डिग्रीने मदनला तत्क्षणी अडवले आणि आरीफला मदनच्या तावडीतून सोडवले. ज्याप्रमाणे मदन आरीफचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता त्यावरून डिग्रीचं मन मदनबाबत अधिकच साशंक होत होतं.

"रूक जा मदन.. मंदार के बारें में इससे बेहतर हमें कौन खबरी मिलेगा..." डिग्री म्हणाला.

त्यामागे दोन कारणे होती एकतर आरीफ सुरूवातीपासून अप्रत्यक्षरित्या या प्रकरणात गुंतलाच होता आणि मंदारला पहील्यांदा त्यानेच स्टेशनवरून पिक करून आणले होते. म्हणून आरीफसारखा खबरी यापुढेही कामी आला असता. वरून मदनवर डायरेक्ट आरोप करण्यापेक्षा त्याचा तपास करायला थोडा अधिक वेळ डिग्रीला मिळाला असता. शिवाय आता आरीफला त्याच्यापासून वाचवून आपण पुढे मदनचाच या खुनामध्ये काही संबंध आहे का हे ही आरीफला शोधायला सांगू शकतो.

"नहीं.. वो बहोतही चलाक है.. इतनी आसानीसे हमारे हाथ नहीं आ सकता..(नसीरच्या मृत शरीराकडे पाहत) और जिस तरह से उसने नसीर को मारा है, वो ताकद से काबू नहीं आयेगा.. हमें उसके लिये अलग जाल बिछाना होगा.. अगर नसीर आज मारा गया है इसका मतलब अगली बार हम में से किसको मारने वो जरूर आयेगा.." मदन एकाचवेळी आवाजात जरब आणि भिती ठेवून बोलत होता.

त्याने तसा अंदाज वर्तवल्यामुळे डिग्री अजूनच सावध होऊ लागला. त्याला आता मदनवर पूर्ण संशय येऊ लागला होता, कारण तिथे मंदारच्या उपस्थितीच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या.

"आप लोगों को ऐसा क्यों लग रहा है के ये सब मंदारनेही किया है.." आरीफ तिकडून वेगळा तर्क लावून त्यांना कन्फूज करू पाहत होता. तसं म्हणायला गेलं तर त्यालाही नेमकं माहीत नव्हतं की नसीरचा खुन कोणी केला आहे.

"और कौन हो सकता है... हालात यही बयान कर रहे हैं... क्युं डिग्री..?" मदनने डिग्रीकडे पाहत विचारले.

खरंतर डिग्रीच्या ओठांपर्यंत मदनचं नाव आलंच होतं. पण त्याच्यासमोर तसं काही बोलण्याचं धैर्य सध्यातरी डिग्रीमध्ये नव्हतं. म्हणून त्यानं फक्त मान हलवत सहमती दर्शवली.

"आरीफ.. जितनी जल्दी हो सके उसका पता लगा.. उसे अपने अड्डे पे कैसे लाना है ये बाद में सोचेंगे.." डिग्रीने मदनच्या समाधानासाठी आरीफला सुचित केले.

आरीफही मनाच्या द्विधा अवस्थेत होता. मंदार की मदन कोणी केलं असावं हे... मंदारबाबत तसे वाटत नव्हते कारण तो क्रिमिनल वाटत नव्हता.. आणि मदन जरी क्रिमिनल असला तरी त्याच्यात एखाद्याची हाडं तोडण्याइतपत कौशल्य नसावं. शिवाय इथं पोहोचल्यावर मंदारने आपल्याला फोन करून कळवलं तरी असतं. असं अचानक आत येऊन तो डायरेक्ट खुन करणार नाही.. आरीफच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला होता.

"हम तीनों को अब साथ में ही रहना होगा.." मदन एवढं बोलून दरवाज्यापर्यंत गेला.. आणि पटकन मागे वळून डिग्रीला ओरडून विचारू लागला..

"चंदू कहां हैऽऽऽऽ..."

"वो तो बाहर टेबलपर बैठाऽऽऽ...." डिग्री उत्तरादाखल म्हणाला आणि तोंडातलं वाक्य संपण्याआधीच त्याने चमकून मदनकडे पाहीले. त्याचक्षणी त्याच्या मनात विचार शिवून गेला..

'जर मंदार खुनी असेल तर...? चंदू तिकडे एकटाच बसला आहे...'

बहुधा मदनच्याही मनात तसंच काहीतरी चाललं असावं.. त्याने डिग्रीच्या चेहर्यावरचे भाव वाचले..
एकाचवेळी दोघांच्याही मनात आलेल्या त्या शक्यतेने क्षणाचाही विलंब न करता त्यांनी चंदूकडे धाव घेतली.

नसीरच्या खुनानंतर वॉशरूममध्ये अनुक्रमे मदन, डिग्री आणि आरीफ या तिघांनी प्रवेश केला होता. तिघेही घडलेल्या आकस्मिक प्रसंगात एवढे गुंग झाले होते की एवढ्या वेळात त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली नव्हती. नसीर ज्या टॉयलेट रूम मध्ये पडला होता त्याच्या बाजूला आणखीही दोन टॉयलेट रूम होत्या. पैकी एका टॉयलेट रूमचे डोअर अर्धवट उघडे होते. पण दुसरा रूमचा डोअर... ओह.. नो.. तो तर आतून लॉक होता.. कुणीतरी आतच होते.. त्या बंद दरवाज्याच्या मागे.. पुढील संधीची वाट पाहत..

************

चंदू एकटाच टेबलवर बसून आसपासच्या नजार्यांना पाहत नयनसुखाचा आनंद घेत होता. मनात चाललेल्या उत्तेजक विचारांच्या प्रवाहात तो मस्तपैकी निष्णात असल्यासारखं पोहत होता. अचानक त्या प्रवाहात कुठूनतरी खडकावर आपटावं तसं त्याला मदन आणि त्याने मारलेला पंच आठवला. जरी त्यावेळी तो प्रसंग निव्वळ हसण्यावारी गेला असला तरी त्याला मदनचा प्रचंड राग आला होता. सरळसरळ त्याच्यातल्या पुरूषत्वावर केलेला तो हल्ला होता. म्हणूनच मदनला धडा शिकवणे त्याला आवश्यक वाटत होते.

काही क्षण त्या प्रसंगात रेंगाळल्यावर चंदू पुन्हा सभोवताली नजर फिरवण्यासाठी म्हणून इकडेतिकडे पाहू लागला. यावेळी त्याला ती दिसली. समोर उभी राहून त्याच्याकडेच पाहत गालातल्या गालात मंद हसत होती. फिकट गुलाबी रंगाचा पदर छेडतानाची तीची बोटे खरेतर चंदूमधल्या आसुसलेल्या पुरूषाला छेडत होती. आणि तो त्या नजाकतींवर फिदा होत मिश्किलपणे हसत होता.

तिनं खुणावून त्याला तिच्या मागे येण्यास सांगितले. चंदू झटकन जाण्यासाठी उठला पण एक क्षण घुटमळत थांबला. डिग्रीला सांगून जावं का..? नको जाऊ दे.. ते लोकं उगाचच पुन्हा काही फालतूचे टोमणे मारतील.. त्यापेक्षा सुमडीत जाऊन काम फत्तेच करून येऊ.. आणि मग मदनला पण दाखवून देऊ आपण काही कमी नाही म्हणून..

चंदू निघाला तिच्या मागून..

बारच्या मागच्या बाजूला असलेला लॉज मधल्या कॉरीडॉरने जोडला होता. ती त्या कॉरीडॉर पर्यंत पोहोचली होती. मागून चंदूही येत होता. साधारण पाचसहा पाऊलांच्या अंतरावरून ते चालत होते. तिच्या पाठमोर्या शरीरावून नजर फिरवत त्याने तिच्या जवळ जात विचारले..

"नाम क्या है तेरा...?"

"मेहजबीन..." तिनं एकदा त्याच्या डोळ्यांत पाहून नजर फिरवत सांगितले. तिच्या चेहर्यावर अजूनही मघाचेच मंद हास्य कायम होते.

"आह्.. नाम भी कमाल का है.. वैसे हम कहा जा रहें है.." त्याने विचारले.

"जहां जाने का आपको बेसब्रीसे इंतजार हैं..." तिचं हास्य आता थोडं अजून खुललं होतं.

"यहीं पीछे रूम मिल जायेगा.." पुढे हात दाखवत तिने सांगितले.

त्यानंही आवेषात येत तिच्यासोबत जाणं पसंद केलं होतं.

साधारण दहा मीटरच अंतर कापल्यावर मुख्य दालनात त्यांनी प्रवेश केला. मेहजबीनने इशार्याने समोरच्या काऊंटरवर बसलेल्या माणसाकडे चंदूचं लक्ष वेधलं. पुढे जाऊन चंदूने तिथं पैसै वगैरे भरून किल्ली घेतली आणि त्या माणसानं सांगितलेल्या दिशेने चंदू आणि मेहजबीन गेले.

मुख्य दालनापासून आडबाजूला आणि काऊंटरपासून दिसनार नाही अश्या ब्लॉकमध्ये त्यांना रूम मिळाली होती. आतमध्ये प्रवेश करताना मेहजबीनने दारावरच्या रूम नंबरवरून नजर फिरवली. आत खोलीतला माहौल काहीसा भडक असा होता. डार्क अंधारल्या सारखा लाईट्सचा उजेड म्हणजे एकप्रकारची विसंगतीच होती. दहा बाय दहाची अशी ती लहानशी खोली सुरू होऊन एक बेड आणि त्या बेडला सभोवतालून एकावेळी एका माणसाला राऊंड मारता यावा इतपतच काय ते अस्तित्व होतं. समोरची भिंत संपावी तिथं मोठी काचेची खिडकी होती. बेडच्या पायाकडच्या दिशेला एका बाजूला टॉयलेट आणि दुसर्या बाजूला वॉशरूम होते.

मेहजबीनला मनू येईपर्यंत त्याला त्या रूममध्येच थोपवून ठेवायचं होतं. त्यासाठीच ती नॉर्मल कस्टमरसारखेच त्याच्याशी वागत होती. आत येताच चंदूने डोअर आतून लॉक केला आणि त्याने मेहजबीनला बाहुपाशात ओढले. तिने प्रेमाने त्याला सबूरीने घेऊन फ्रेश होऊन यायला सांगितले. पण चंदू तिला सोडून जायला तयार होत नव्हता. थोडावेळ त्याच्याशी गोड गुजगोष्टी करत मेहजबीनने कसेबसे त्याला आत फ्रेश होण्यासाठी पाठवले.

चंदूने वॉशरूममध्ये जाऊन शॉवर चालू केला. आणि जसा वॉशरूमचा डोअर लॉक केल्याचा हलकासा आवाज मेहजबीनने टिपला तसे तिने लगोलग हालचाली करायला सुरूवात केली. सर्वप्रथम तर तिने स्वतःचा फोन काढत त्या जागेची डिटेल्स् मनूला शॉर्टमॅसेज करत पाठवून दिली. नंतर तिने मुख्य दरवाज्याजवळ जात चंदूला कळून येणार नाही अश्या पद्धतीने लॉक उघडून दरवाजा वरचेवर बंद केला. नको असलेल्या हवेच्या झोताबरोबर मनू येण्याच्या आधीच दरवाजा उघडू नये यासाठी तिने बाजूच्या खाचेच्या फटीमध्ये जवळ पडलेल्या न्यूजपेपरचा छोटा तुकडा आवश्यक तितका फोल्ड करत घुसवला.

आता बाहेरून कुणीतरी धक्का दिल्याशिवाय तो दरवाजा उघडला नसता. राहता राहीलेले एक मुख्य कार्य करण्यासाठी ती मागे फिरली आणि चंदूच्या मोबाईलकडे ती पोहोचलीच होती की तेवढ्यात वॉशरूमचा डोअर उघडल्याचा आवाज आला.

'शीट्..ऽऽ.. त्याचा फोन बंद करणं राहूनच गेलं... मनू येण्याअगोदर मध्येच त्याला कुणाचा फोन आला तर..'

काहीसा असाच विचार मेहजबीनच्या मनात आला. आपले काम अर्धवट राहण्याची शक्यता तिला वाटत होती. कसेही करून चंदूला भरकटवणे आवश्यक झाले होते.

बाहेर येत तिच्याकडे पाहत चंदू गालांत हसत होता. साहजिकच मनातल्या इच्छापूर्तीचा क्षण जवळ आल्याच्या जाणिवेने तो खुश होता. तिला निरखत निरखत तो जवळ आला आणि पुढ्यात पडलेला मोबाईल उचलून कुणाचा कॉल-मॅसेज आलेय का ते पाहू लागला.

मेहजबीन त्याच्या बाजूलाच उभी होती. तिच्या सर्वांगावरून काटा फिरत असल्यासारखे तिला भासत होते.

'हुश्श... बच गई.. फोन पहले हि बंद किया होता तो ये आदमी मुझपे शक करता और अब तक की मेहनत भी चौपट हो जाती... क्या करू अब.. फोन बंद करूँ या नहीं...? इसके दोस्त अगर टेबलपर लौट गये तो इसे वहा ना पाकर कॉल तो जरूर करेंगे.. बंद तो करना ही होगा.. और करू तो भी कैसे..' मेहजबीन मनात स्वतःशीच बोलत होती.

तिच्याकडे पाहत चंदूने फोन खाली ठेवला.. तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. त्यानं ते ओळखले.

"क्या हुआ.. ध्यान कहा है.. कुछ टेन्शन..?"

"अऽ अह्... कुछ भी तो नहीं..." ती चटकन सावरत म्हणाली.

तो मागे दरवाज्याकडे जाऊ लागला तिच्या काळजात 'धस्स' झाले.. नकळत उजवा हात छातीजवळ आला.. हा आता दरवाजा निरखून पाहतोय की काय.. एक क्षण तिला वाटले की चंदू दिसतो तितका 'चू' नक्कीच नव्हता. आता थोडीफार तरी का होईना पण मेहजबीन आतून घाबरली होती तरीही येणार्या प्रसंगाला जमेल तसं सामोरे जाण्यास ती सज्ज झाली.

त्याची चाल दरवाज्याजवळ जाऊन मंदावली आणि बाजूलाच असलेल्या लाईटस् चे स्विच बंद करून तो पुन्हा तिच्याकडे येऊ लागला.

तिनं पुढे काय होईल या काळजीने घेतलेला छातीवरचा हात हळूहळू खाली केला. तिच्या चेहर्यावरच्या चिंतेची जागा पुन्हा एकदा स्मितहास्याने घेतली.

'हा अगदी चू च आहे..' तीने त्याला बरोबरच हेरले होते.

तो तिच्याजवळ पोहोचला होता. तिला जवळ जाऊन स्पर्श करनार तोच त्याचे लक्ष खिडकीकडे गेले. समोरच्या खिडकीची काच जरा उघडी असल्यामुळे तिथून थोडाफार प्रकाश आत येत होता. त्याने खिडकीकडे पाहून तोंड वाकडे केले आणि अत्यंत नाखुशीनेच तो खिडकी बंद करण्यासाठी वळला. तितकासा अवकाश होता की मेहजबीनने बेडवर तिच्याजवळ पडलेला त्याचा फोन बंद करण्याच्या उद्देशाने उचलला.

अरे बापरे.... त्याचा फोन तर लॉक होता.. चंदू खिडकी बंद करेपर्यंत डायरेक्ट फोनची बॅटरी काढणे शक्यच नव्हते.. ती एअरफोन मोड ऑन करायला गेली पण तेही लॉक उघडल्याशिवाय शक्य नव्हतं. एव्हाना चंदू मागे वळणारच होता, त्या एका क्षणात मेहजबीनला जे शक्य वाटलं तेच केलं. तिने त्याच्या फोनची स्क्रिन ऑफ करत पुन्हा होता तसाच फोन बेडवर ठेवला. तोपर्यंत चंदू मागे वळला आणि मेहजबीन आपल्या पहील्याच पोजमध्ये उभी राहीली.

चंदू हलकेहलके पाऊले टाकत तिच्याजवळ गेला. तिला बाहुपाशात ओढून तो मनातल्या तीव्र इच्छेची पूर्तता करण्यासाठी तिच्यासोबत बेडवर झुकला. तिचे हात हातात घेऊन तो लाडीक भावात गुजगोष्टी करू लागला. चंदूसारख्या गुन्हेगार व्यक्तीकडून मेहजबीनला असे काही अपेक्षित नव्हते. तिला वाटले होते इतर कस्टमरसारखे तो अधाश्यासारखा आपला भोग घेण्यास सुरूवात करेल पण सुरूवात तरी तशी काही झाली नाही.

'असो जे काही होतेय त्यामुळे थोडा अवधी तरी मिळत आहे, मनू कधीही इथे पोहचू शकते. बास्स्..ऽऽ तेवढ्या वेळात याचा फोन नाही वाजला म्हणजे मिळवले..' मेहजबीन त्याच्या संवादाला प्रत्युत्तरत तर होती पण तिच्या मनात मात्र पुढे काय होईल याचंच टेन्शन होतं.

तिकडे बारमध्ये टेबलजवळ धावत आलेल्या डिग्री आणि मदनला चंदूच्या अनुपस्थितीने आणखीनच चिंतेत टाकलं होतं. कुठे गेला असेल तो..? की मंदारनेच तर काही केले नसेल ना..? अश्या नानाविध प्रश्नांनी त्या दोघांच्या डोक्यात भडीमार केला होता.

चंदूला फोन करण्यासाठी डिग्रीने त्याचा नंबर डायल केला...

'The number you have dial is currently not reachable....'

पलीकडून आय् वी आर् वरच्या बाईनं कळवलं.

असं वाटत होतं की नियतीही मेहजबीनच्या खटाटोपींना साथ देत होती. आपल्या मैत्रीणीच्या खुन्याला शोधण्यासाठीचे तिचे जेन्यूयन प्रयत्नांना दैव वाया जाऊन देत नव्हते. हा निव्वळ एक योगायोग असावा की गुन्हेगार चंदूचं स्वतःच्या कर्मांनी कमावलेलं दुर्दैव.. कुणास ठाऊक.

डिग्रीने पुन्हा एकदा ट्राय केलं पुन्हा तेच ऐकू आलं. आय् वी आर् वरचा आवाज थोडा मोठा होता म्हणून मदनपर्यंत तो पोचू शकला.

"साला कोणत्या भो** जाऊन बसलाय कुणास ठावूक.." चिडलेल्या मदनच्या तोंडून निघाले.

डिग्री वरवर शांत वाटत असला तरी त्याच्या मनात असंख्य विचारांच्या लाटा एकमेकांवर आदळत होत्या. नेमके काय घडतेय.. कसे घडतेय.. आणि नक्की कोण करतेय.. कश्याचाच माग लागत नव्हता. अक्षरशः बधीर झाल्यासारखा डिग्री भांबावून गेला होता.

इकडे लॉजमधल्या रूम मध्ये चंदू बोलता बोलता मेहजबीनसोबत रंगात आलाच होता. आणि त्याच्या मनातल्या प्रणयाच्या आतुरलेल्या क्षणांना सुरूवात होणार होती की....

'धाड्डड्ऽऽ.... थऽ..ड्थाऽड्...' जोराचा आवाज झाला आणि दरवाजा उघडला गेला.

आणि चंदू आणि मेहजबीन दोघेही डोळे विस्फारून दरवाज्याकडे पाहू लागले. चंदूने गडबडून उठून सावध पवित्रा घेतला. मेहजबीने खाली आलेला पदर सावरत वर घेतला. तिने पाहीले.. दरवाज्यात मनू नव्हतीच. मग हे कोण आलेय आता इथे..? तिच्या मनात प्रश्न पडला. अगदी चंदूच्याही डोक्यात दरवाज्याजवळच्या व्यक्तीविषयी तोच प्रश्न होता.

दरवाज्यात साधारण पाच फूट आठ इंच उंचीची व्यक्ती उभी होती. अंगातल्या सुटबुटांवरून ती व्यक्ती श्रीमंत घराण्यातील अशी वाटत होती. आतल्या व्हाईट शर्टच्यावरचा काळा ब्लेझर त्यानं थोडा मागे केला. त्याच्या मानेवरच्या दाट आणि बोल्ड वळणदार इंग्रजी 'V' शेपमुळे त्याचं नाव तसलंच काही असण्याची दाट शक्यता होती.

पण तो कश्यासाठी आला असावा..? माझ्याशी याचं काय वाकडं..? का या मेहजबीनचा कुणी यार वगैरे आहे का..? चंदूने अविश्वासाने तिच्याकडे पाहीलं पण त्याला जाणवलं की तीही समोरच्या व्यक्तीला पाहून त्याच्याइतकीच गोंधळून गेली होती. काही क्षण फक्त त्या व्यक्तीला निरखुन पाहण्यातच गेले आणि निरीक्षण करता करता त्याच्या हातातली पिस्तूल पाहून चंदूचं अवसानच गळालं...

मनूच्या अगोदर तिथं कोण पोहोचलं असावं.. ? चंदू कुठे आहे हे फक्त मेहजबीन आणि मनूला माहीत होतं.. मग दरवाज्यावर आलेला तो इसम कोण असावा..? मनूनेच तर त्याला पाठवलं नसावं ना..? की चंदूवर अगोदरपासूनच कुणी पाळत ठेवून होतं..? आणि मुख्य म्हणजे मंदार अजूनपर्यंत कुठे होता..? तो निघाल्यापासून त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता की बंद टॉयलेट रूममध्ये तोच दबा धदून बसला होता.... नसीरचा खुन.. चंदूचं ट्रॅपमध्ये अडकणं.. ही सर्व कुणाची प्लॅनिंग असावी..?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटूया पुढील भागात...

क्रमशः