Safe Online Shopping in Marathi Short Stories by Raman Karanjkar books and stories PDF | सुरक्षित ऑनलाईन शॉपींग

Featured Books
Categories
Share

सुरक्षित ऑनलाईन शॉपींग

शॉपींग म्हणजे सगळ्यांचाच अत्यंत आवडीचा विषय. आणि त्यासाठी प्रत्येकाला कितीही फिरावे लागले तरी त्याबद्दल त्यांची काहीच कुरकुर नसते. आणि जर हेच शॉपींग ऑनलाईन होणार असेल तर मग काय, आनंदी आनंदच. कुठेही न फिरता घरात बसून अनेक वेबस्टोअर्सना भेटी देत, हवी ती मनपसंत वस्तू शोधून खरेदी करण्याचा आनंद काही औरच. मात्र असे ऑनलाईन शॉपींग काही गोष्टींची दक्षता घेऊनच करायला पाहिजे, तरच ते आनंददायक ठरु शकते, अन्यथा या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता असते. ऑनलाईन शॉपींग करण्याआधी ऑनलाईन शॉपींगचे कोणते फायदे आहेत हे आपण पहाणार आहोत. आणि त्यानंतर ऑनलाईन शॉपींग करताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

ऑनलाईन शॉपींगचे फायदे

ऑनलाईन शॉपींग करण्याचे काही फायदे नक्कीच आहेत. ऑनलाईन शॉपींगचा सर्वात पहिला फायदा असा की, बाजारपेठेत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष न फिरता, सेल्समनचा त्रासिक चेहरा न पहाता, किंवा त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या न बघता एका जागेवर बसून शॉपींग करता येते. प्रत्यक्ष कुठेही न फिरता शॉपींग करता येते याचा अर्थ एकाच वेबस्टोअर वरुन खरेदी करावी लागते असा नाही. तर अनेक वेबस्टोअर्सना भेटी देऊन आपल्या पसंतीने शॉपींग करता येते.

ऑनलाईन शॉपींगचा दुसरा फायदा असा आहे की, हवी असलेलीच वस्तू शोधता येते आणि खरेदी करता येते. काही प्रसंगी स्थानिक बाजारपेठेत आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू मिळत नाही, त्यामुळे नाईलाजाने तेथे उपलब्ध असलेली त्याच प्रकारची दुसरी पर्यायी वस्तू खरेदी करण्याची वेळ येते. अशी वेळ ऑनलाईन शॉपींग करताना येत नाही. तर हवी तीच वस्तू खरेदी करता येते.

ऑनलाईन शॉपींगचा तिसरा फायदा हा आहे की, एखाद्या वस्तूचे विविध नमुने पहायला मिळतात. त्यामुळे निवडीला भरपूर वाव मिळतो. आणि म्हणूनच नाईलाज या शब्दाला येथे शिरकाव नाही. थोडक्यात म्हणजे भरपूर व्हरायटी पाहून खरेदी करण्याची संधी मिळते.

पण यासारख्या काही फायद्यासोबतच ऑनलाईन शॉपींगमध्ये एक तोटाही आहे, तो म्हणजे नो बार्गेनिंग. त्यामुळे ज्यांना किंमतीमध्ये घासाघीस करण्याची सवय आहे, त्यांची ऑनलाईन शॉपींगमध्ये गैरसोय होते. ऑनलाईन शॉपींगमध्ये किंमतीत घासाघीस करता येत नाही. पण वेळोवेळी सुरु असणाऱ्या विविध ऑफर्सचा लाभ मात्र नक्कीच घेता येतो.

ऑनलाईन शॉपींग करण्यामध्ये असलेले काही फायदे आपण पाहिले. आता ऑनलाईन शॉपींग करताना कोणती दक्षता घ्यावी या विषयी काही महत्वाची माहिती बघू.

गरज असणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करा

ऑनलाईन शॉपींग करताना प्रत्येक वेबस्टोअरवर अतिशय आकर्षक अशा एचडी (High Definition) प्रकारच्या ईमेजेस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेल्या असतात. ज्या प्रकारे मोठ्या शोरुम्समध्ये प्रदर्शित केलेल्या वस्तू ग्राहकांची नजर खेचून घेण्याचे काम करत असतात. नेमके तेच काम या ईमेजेस वेबस्टोअरवर करत असतात. त्या ईमेजेस पाहून हे खरेदी करु की ते खरेदी करु असा मोह झाल्याशिवाय रहात नाही. पण येथे मनावर थोडासा संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तूंचीच खरेदी करावी. गरज नसतानाही एखादी वस्तू केवळ फोटोमध्ये चांगली दिसली म्हणून, किंवा सवलतीत मिळत आहे म्हणून खरेदी करण्याचा मोह टाळावा.

कोणत्या वस्तूंचे ऑनलाईन शॉपींग करणे टाळावे?

ऑनलाईन शॉपींग करणारे हा प्रश्न हमखास विचारतात. फ्रीज, टीव्ही, वॉशींग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनीक्स वस्तू विक्रीपश्चात सेवा मिळण्याचे दृष्टीने स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केल्यास अधिक सोईस्कर ठरतात. पण त्यातूनही हवे असणारे एखादे विशिष्ट मॉडेल स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध नसेल, तर ते ऑनलाईन खरेदी करायला हरकत नाही. मात्र खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूसाठी विक्रीपश्चात सेवा स्थानिक पातळीवर मिळण्यात काही अडचण तर येणार नाही ना? याची आधी चौकशी करावी आणि मगच ती वस्तू ऑनलाईन खरेदी करावी.

समजा एक गॅस स्टोव्ह (गॅस शेगडी) ऑनलाईन खरेदी केला, आणि तो काही काळानंतर बिघडला किंवा त्यासाठी विक्रीपश्चात सेवेची गरज पडली तर, तो आमच्याकडून घेतला नाही या कारणास्तव स्थानिक विक्रेता जर त्यासाठी अधिक सेवा शुल्क आकारणार असेल तर अशी वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यात अर्थ नाही. याबाबतचा विचार ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वीच करणे गरजेचे आहे.

ज्या वस्तू घेतल्यानंतर काही वेळेस त्या बदलून घेण्याचा प्रसंग येतो अशा वस्तू ऑनलाईन खरेदी करु नयेत. उदाहरणार्थ कपडे, पादत्राणे यासारख्या वस्तूंची मापे कमी किंवा अधिक झाल्यास ते बदलून घेण्याचा प्रसंग येऊ शकतो.

समजा एखाद्याने एम (Medium) साईजचा टीशर्ट नेहमी व्यवस्थित बसतो म्हणून त्या साईजचा टीशर्ट ऑनलाईन खरेदी केला. तरीही तो टीशर्ट त्याला नेहमीप्रमाणे बसेलच असे नाही. टीशर्टवर लेबल जरी एम साईजचे असले तरी, वेगवेगळ्या निर्मात्यानुसार साईजमध्ये फरक येऊ शकतो. आणि त्यामुळे अर्थातच फिटींगमध्ये सुध्दा फरक पडतो. त्याचप्रमाणे जीन्स पँट व इतर कपड्यांच्या बाबतीत सुध्दा प्रत्यक्ष फिटींग बघून स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करणेच अधिक सोईस्कर ठरते.

स्थानिक बाजारपेठेतून जर अशी वस्तू खरेदी केलेली असेल तर, ती स्थानिक दुकानदाराकडून बदलून घेण्यात काहीच अडचण येत नाही. पण जर ऑनलाईन खरेदी केलेली असेल तर, बदलून मिळण्यासाठी ती वस्तू पुन्हा कुरियरने त्या विक्रेत्याकडे परत पॅक करुन पाठविणे, व पुन्हा दुसरी मागविणे ही बाब त्रासदायक व खर्चिकही ठरते. क्वचित प्रसंगी बचत होण्याऐवजी जास्त किंमतसुध्दा चुकवावी लागू शकते. त्यामुळे अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करणे केव्हाही उत्तम.

त्याचबरोबर ज्या वस्तू प्रत्यक्ष पाहून आणि हाताळून खरेदी करणे गरजेच्या असतात, अशा वस्तूंची ऑनलाईन शॉपींग करु नये. यासाठी उदाहरण वस्त्रप्रावरणांचे घेता येईल. कापडाचा दर्जा (Quality), पोत (Texture), रंग (Colour), कपड्याला स्पर्श केल्यानंतर येणारी अनुभूती (Feeling) यासाठी वस्त्रप्रावरणे हा प्रकार प्रत्यक्ष हाताळून पहाण्याची गरज असते.

वेबस्टोअरवर पाहिलेल्या आकर्षक फोटोवरुन या प्रकारच्या वस्तूंची ऑनलाईन शॉपींग करणे काही प्रसंगी मनस्तापदायक सुध्दा ठरु शकते. कारण फोटोवरुन दर्जा, पोत, रंग आणि फिलींगचा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे फोटोत पाहिलेली वस्तू प्रत्यक्ष मिळाली तरी, त्याचा रंग, दर्जा, पोत हा तपशीलात वर्णन केल्याप्रमाणेच किंवा फोटोत दिसल्याप्रमाणेच असेल असे नाही.

ऑनलाईन शॉपींगमध्ये फसवणूक होते का?

या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही प्रकारे देता येईल. ऑनलाईन शॉपींगमध्ये खात्री आणि फसवणूक या एकच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. ऑनलाईन शॉपींगमध्ये फसवणूक होतच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आपणांस माहित असेलच की, आपण ज्या नामवंत कंपनीच्या वेबस्टोअरवरुन ऑनलाईन शॉपींग करत असतो, ती कंपनी स्वतः वस्तू विक्री करत नाही, तर त्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरुन अनेक विक्रेते आपला माल विक्री करत असतात. ग्राहक आणि विक्रेते यांना एकत्रित आणण्यासाठी कंपनीच्या ब्रँडनेमचा प्लॅटफॉर्म म्हणून उपयोग केला जातो.

उडदामाजी काळेगोरे या म्हणीप्रमाणे, येथे असणाऱ्या अनेक प्रकारच्या विक्रेत्यामधील, काही अप्रामाणिक व नितीमत्तेची चाड नसणाऱ्या काही विक्रेत्यांच्याकडून वेळप्रसंगी हलक्या दर्जाच्या वस्तूंची विक्री, फोटोत व तपशीलात दाखविल्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळ्याच वस्तूंची विक्री असे फसवणूकीचे प्रकार घडतच असतात.

ते यापूर्वीही घडले आहेत आणि पुढेही घडत रहातील. संबंधित वेबस्टोअर अशा विक्रेत्यांवर काही कारवाई करत असेल किंवा नसेल हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण खरेदीदाराला प्रत्यक्ष माल बदलून मिळेपर्यंत किंवा त्याची नुकसान भरपाई मिळेपर्यंत मनस्ताप सहन करावा लागतो हे मात्र खरे.

यासाठी ऑनलाईन शॉपींग करताना ती, घाईगडबडीने न करता थोडीशी जागरुकतेने करण्याची गरज आहे. जी वस्तू आपण पसंत केलेली आहे, त्या वस्तूच्या विक्रेत्याच्या नावाची लिंक, त्या वस्तूच्या वेबपेजवर दिलेली असते. त्यावर क्लिक केल्यास संबंधित विक्रेत्याच्या पेजवर जाता येते. तेथे तो किती कालावधीपासून या स्टोअरवर विक्रेता आहे, कुठल्या शहरांतील आहे, त्याने आजपर्यंत येथे किती विक्रीचे व्यवहार केलेले आहेत याबद्दल माहिती मिळते.

तसेच ज्या ग्राहकांनी त्या विक्रेत्याकडून खरेदी केलेली आहे, त्या ग्राहकांनी त्याला दिलेले मानांकन (Rating) आणि त्यांच्या प्रतिक्रियाही उपलब्ध असतात. ऑर्डर प्लेस करण्यापूर्वी हे सगळे काळजीपूर्वक पहावे. यावरुन त्या विक्रेत्याच्या विश्वासार्हतेची कल्पना यायला मदत होते. जर त्या विक्रेत्याबद्दलचे जास्त फिडबॅक निगेटीव्ह स्वरुपाचे असतील तर त्या विक्रेत्याकडून ती वस्तू खरेदी न केलेली बरी. त्याऐवजी ती वस्तू दुसऱ्या विक्रेत्याकडे शोधण्याचा प्रयत्न करावा.

ऑनलाईन खरेदी करत असलेल्या वस्तूबद्दल वेबस्टोअर काही हमी देत आहे का तेही पहावे. उदाहरणार्थ अमेझॉनवर ज्या वस्तूपुढे अमेझॉन कंपनीचे aFulfilled असे चिन्ह दिसेल त्या वस्तू अमेझॉन Fulfilment Centers मार्फत स्टोअर, पॅक आणि डिस्पॅच केल्या जातात, आणि अमेझॉनकडून डिलीव्हरी, कस्टमर सर्व्हिस व रिटर्नस बाबतचे व्यवहार हाताळले जातात असा त्या चिन्हाचा अर्थ होतो.

याचप्रमाणे फ्लिपकार्टवर fAssurd, ईबेवर EBayGuarantee, स्नॅपडीलवर SnapdealGuarantee अशी वस्तूपुढे दिसणारी चिन्हे थोड्याफार फरकाने त्या वस्तूची विक्री, डिलीव्हरी, कस्टमर सर्व्हिस, रिटर्नस् याबाबत वेबस्टोअर हमी घेत असल्याचे दर्शवितात. त्यामुळे असे वेबस्टोअरचे पाठबळ असणाऱ्या वस्तू निवडण्याचा शक्यतो प्रयत्न करावा.

ऑनलाईन शॉपींग करताना याकडे लक्ष द्या

· ऑनलाईन शॉपींगसाठी बऱ्याचदा काही ऑफर्स ईमेलद्वारे मिळत असतात. त्यापैकी काही ईमेल त्या कंपनीच्या नावाशी साधर्म्य साधणारे असतात. पण लक्षपूर्वक पाहिल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाईटचा पत्ता व याप्रकारच्या फिशिंग मेलमध्ये असलेला पत्ता वेगवेगळा आहे हे लक्षात येते.अशा अनधिकृत ईमेलच्या माध्यमातून आकर्षक ऑफर्स देत असल्याचे भासवून, त्यामध्ये दुसरीकडे रिडायरेक्ट होणाऱ्या काही लिंक्स दिलेल्या असतात. त्यावर कधीही क्लिक करु नका. अशा लिंक्स असुरक्षित असतात, व त्यामुळे तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकींगचे युजर आयडी, पासर्वड यासारखी गोपनीय माहिती धोक्यात येऊ शकते.

· अशा प्रकारचा धोका टाळण्यासाठी वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये पाहिजे त्या ऑनलाईन शॉपींग वेबस्टोअरचा पत्ता टाईप करुन त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे हा सुरक्षित मार्ग आहे.

· ऑनलाईन शॉपींग करताना ज्यावेळेस ऑनलाईन पेमेंट करण्याचा टप्पा येतो, तेव्हा त्यावेळी वेब ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये सरुवातीस कुलूपाचे चिन्ह (Padlock) आणि त्यापुढे https:// दिसत असल्याची खात्री करा. आणि मगच पेमेंटची प्रक्रिया पुढे सुरु करा. https आणि पॅडलॉक चिन्ह म्हणजे वेबपेज सुरक्षित असल्याचे निदर्शक आहे.

· आपल्या स्मार्टफोनवर आणि संगणकावर नेहमी एक चांगले अपडेटेड अँटीव्हायरस कार्यान्वित असू द्या. आपले बँक खाते क्रमांक, डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक, एटीएम कार्डचा पिन क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, बँक खात्यांचे युजर आयडी, पासवर्ड यासारखा संवेदनाशील व गोपनीय डाटा संगणकावर व मोबाईलमध्ये कधीच स्टोअर करुन ठेऊ नका, आणि इतरांनाही सांगू नका.

· ऑनलाईन शॉपींग करतेवेळी वस्तूचे शिपींग चार्जेसही काळजीपूर्वक बघा. नाहीतर एकीकडे वस्तूची कमी किंमत दाखवून शिपींग चार्जेस अधिक आकारले जातात. त्यामुळे मग त्या वस्तूची किंमत आधी महाग वाटलेल्या दुसऱ्या विक्रेत्या इतकीच किंवा काहीवेळा त्यापेक्षा अधिकही पडण्याची शक्यता असते.

· ऑनलाईन वस्तू खरेदी करताना शिपींग चार्जेस सोबत, वस्तूची विक्रीपश्चात सेवा, वस्तू बदलून मिळणे, पसंत न पडल्यास परत घेतली जाणे यासंदर्भातील नियम व अटी काळजीपूर्वक वाचूनच खरेदी करा.

· काही वस्तूवर सवलत जाहीर केलेली असते, ती जाहीर केलेली सवलत खरी आहे का, याची खात्री करुन घ्या. कारण बऱ्याच वेळेस एखाद्या वस्तूची किंमत ही मूळ किंमतीपेक्षा अधिक फुगवून नंतर ती सवलतीमध्ये कमी केली आहे, असे भासवले जाते. यासाठी स्थानिक बाजारपेठेत आणि इंटरनेटवर इतर कंपन्यांच्या वेबस्टोअरवर जाऊन त्या वस्तूच्या मूळ किंमती बद्दल खात्री करा.

· त्यासाठी एखादी वस्तू वेगवेगळ्या संकेतस्थळांवर कोणकोणत्या किंमतीत उपलब्ध आहे, हे दाखविणारी काही संकेतस्थळे आहेत. त्यांचाही तुलना करण्यासाठी उपयोग करा.

· शक्य असेल त्याठिकाणी C.O.D. म्हणजेच कॅश ऑन डिलेव्हरी पेमेंटचा पर्याय निवडा.

· आपले पासवर्ड ठराविक कालावधीनंतर आणि नियमितपणे बदलत रहा.

· ऑनलाईन शॉपींग करताना अपरिचित व असुरक्षित आणि सार्वजनिक वायफायचा वापर टाळा.

· सायबर कॅफे सारख्या सार्वजनिक ठिकाणच्या संगणकांचा वापर ऑनलाईन शॉपींगसाठी करणे टाळा.

· वस्तूची डिलेव्हरी मिळताना त्याचे पॅकींग सुस्थितीत आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

सर्वात शेवटी एक महत्वाची गोष्ट

ऑनलाईन शॉपींग केल्यानंतर आपणांकडे आलेले वस्तूचे पॅकींग उघडणे, त्यातील मुख्य वस्तू व सोबत आलेल्या इतर वस्तू बाहेर काढून त्या तपासून बघण्याच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईलमध्ये कॅमेरा असतोच, त्यावरुन सुध्दा असे चित्रण सहज करता येणे शक्य आहे.

चित्रणाची सुरुवात करताना पॅकींगवरील पाठविणाऱ्या कंपनीचे नाव, आपले नाव व पत्ता, तसेच सर्व बाजूने पॅकींग उत्तम स्थितीत आहे ते कॅमेऱ्यासमोर दाखवून करावी. नंतर ते पॅकींग उघडून त्यातील मुख्य व इतर वस्तूंची प्रत्यक्ष स्थिती चित्रीत करावी.

समजा आपण एखादा मोबाईल खरेदी केला असेल तर, त्या पॅकींगमधील मुख्य वस्तू म्हणजे हँडसेट व त्यासोबतच्या इतर वस्तू म्हणजे चार्जर, केबल, हेडफोन, बॅटरी इत्यादी अक्सेसरीज. याचे चित्रण केल्यानंतर हँडसेटमध्ये बॅटरी बसवून तो ऑन करुन योग्य प्रकारे चालतो की नाही? हे दाखविण्यापर्यंत तपशीलवार चित्रण करावे.

ही सर्व दक्षता घेण्याचे कारण असे की, कदाचित पॅकींगच्या आतील वस्तू खराब, तूटफूट झालेली, किंवा नादुरुस्त अवस्थेत आलेली असल्यास, ती तशी मिळाली हे सिध्द करण्यासाठी पुरावा म्हणून या रेकॉर्डिंगचा उपयोग होऊ शकेल.

ऑनलाईन शॉपींग करताना अशाप्रकारे योग्य ती दक्षता घेऊन चौकसपणे खरेदी केल्यास ऑनलाईन शॉपींगचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

...