Disha Navjivanachi in Marathi Short Stories by geeta kedare books and stories PDF | दिशा नवजीवनाची ...

Featured Books
Categories
Share

दिशा नवजीवनाची ...

.... दिशा नवजीवनाची ......
तशी तिची व त्याची भेट हल्ली दीड महिन्यांपासून रोज बसस्थानकावर व्हायची. कामावर जाताना तो तिला नेहमीच बसस्थानकावर हे पाहायचा. बसस्थानकात पोहोचली की तिची नजर पहिली मनगटी-घड्याळावर जायची व उशीर झाल्याची तिच्या मनातील तगमग तिच्या चेहऱ्यावर दिसू लागायची. बस येईपर्यंत मोबाईल काढून ती थोडावेळ मोबाईल मध्ये टाईमपास करायची मध्येच मोबाईल मधून नजर हटवून बस येण्याच्या मार्गावर नजर रोखायची व बस न आल्यामुळे नाराजीची वलये चेहऱ्यावर उमटायची. तिचे सर्व हावभाव त्याला खूपच आवडायचे. तो अधूनमधून चोरुन तिला पाहत असे व ती आपल्यातच मग्न असायची.

रीमा बसची वाट पाहून आज पुरतीच वैतागली होती. तसाच राजेशला ही आॅफिसमध्ये जायला उशीर होतच होता. दोघेही रोजचेच एकाच बसने प्रवास करणारे प्रवासी होते पण दोघांची कधीही एका शब्दाने ही बातचीत झाली नव्हती. फक्त दोघेही एकमेकांना, चेहऱ्यानेच ओळखायचे. रीमाला ही उशीर होत आहे हे तिच्या अंगविक्षेपांवरुन राजेशच्या लक्षात आले व त्याने रीमाला खूपच हिंमत करून विचारले "आपणांस ही आॅफिसमध्ये जायला उशीर होत आहे का?" रीमाने राजेशकडे पाहिले व म्हणाली "हो...... का?" राजेश म्हणाला " मी टॅक्सी करत आहे. जर आपणास काही संकोच नसेल तर आपणांस मी टॅक्सीने आपल्या आॅफिसपर्यंत सोडू शकतो." रीमा तशी बसस्थानकात रोजच राजेशला पाहायची.

गोरागोमटा व घारे डोळे असणारा राजेश तसा तिचा रोजच्या परिचयाचा होता पण बोलणे प्रथमतःच....याला होकार द्यावा कि नकार या विवंचनेत असतानाच पून्हा राजेश तिला म्हणाला" पहा बरं, जबरदस्ती नाही. तुमची इच्छा असेल तरच तुम्ही येऊ शकता. बराच वेळ झाला आहे बस नाही व दोघांचेही मार्ग एकच आहेत म्हणून मी ही विचारण्याची हिम्मत केली आहे. नाही म्हणत असाल तर मी एकटाच जाईल टॅक्सीने." रीमा म्हणाली, "नाही हो, तसे काहीच नाही. पण तुम्हाला टॅक्सीचे भाडे निम्मे घ्यावे लागेल. कबुल असेल तर येते मी टॅक्सीने येते. " टॅक्सीभाडे अर्धे घेण्याच्या अटीवर रीमा व राजेशने टॅक्सीने जायचे ठरवले. राजेशने एका टॅक्सीला हात दाखवून टॅक्सी थांबवली व तो पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला व रीमा पाठीमागे. राजेशने ड्रायव्हरला शेअर मार्केट बिल्डिंग सांगितले.

राजेश शेअर मार्केट बिल्डिंगच्या बाजूला असणाऱ्या एका सरकारी बँकेत कामाला होता व रीमा शेअर मार्केटमध्ये लिपिक या पदावर काम करीत होती. त्यामुळे दोघांचा ही प्रवास एकाच बसने असायचा. दोघेही एकत्रितपणे टॅक्सीतून आपापल्या आॅफिसमध्ये त्यादिवशी वेळेवर पोहोचले पण राजेश पूर्णपणे रीमाच्या हालचाली आठवून मनोमनी हसत होता. आज बँकेत त्याचे काही मनच लागत नव्हते. मध्येच त्याला चुटपुट लागली की... छे! आपण तिचा मोबाईल नंबर ही घेतला नाही व तिला नाव ही विचारलं नाही... किती हा वेंधळेपणा!!... पण कधी विचारणार... ती तर पूर्णपणे मोबाईल मध्ये गुंग होती व टॅक्सी थांबल्यानंतर निम्मे पैसे हातावर देऊन गायब ही झाली. मी मात्र समोरच्या आरशात तिच्या हालचाली न्याहाळत होतो , मध्येच तिचं गाण्यावर गुणगुणणं ऐकत होतो... तिच्या बरोबरच्या प्रवासात सुखावून गेलो होतो. मी पैसे घेत नसतानाही हातावर जबरदस्तीने पैसे ठेवून ती गेली होती पण तिच्याबरोबर बोलण्याचा माझ्याकडे अजून एक बहाणा होता तो म्हणजे तिने दिलेल्या पैशातून उरलेले पैसे न घेताच ती गेली होती. म्हणजे तिचे उरलेले पैसे तिला वापस करण्यासाठी तिला भेटण्याचा योग होताच.

दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच बसस्थानकावर हजर झाला व तिची वाट पाहू लागला. आज ती आली की तिला नक्कीच नाव विचारणार... तिची माहिती नक्कीच जाणून घेणार ... या विचारातच तो होता. पण वेळ टळून गेली तरी आज रीमा काही आली नाही. राजेश खूपच उदास झाला. त्याचा पूर्णपणे हिरमोड झाला. त्याने आज त्याची नेहमीची बस ही सोडून दिली व तिला यायला कदाचित उशीर झाला असेल म्हणून तो बसस्थानकावर तिची वाट बघत बसला. पण एक तास उलटून गेला पण रीमा काही आली नाही म्हणून राजेश नाराज झाला. आज त्याचीही बँकेत जाण्याची इच्छा होईना. त्यानेही बँकेत फोन करून आज तो येत नसल्याचे कळविले व तो घरी परतला.

घरी गेल्यावर आईने त्याला विचारले की, "काय रे, परत का आलास? तूला बरं वाटत नाही का? तुझा चेहरा का असा उतरला आहे?" राजेश आईला मध्येच थांबवत बोलला, "आई, किती गं प्रश्न? अगं, आज जरा मूड लागेना बँकेत जायला म्हणून बसस्थानकावरुनच परतलो." आईला त्याच्या बोलण्याचा काही संदर्भ लागत नव्हता कारण जाताना राजेशचा चेहरा खूपच प्रफुल्लित होता. मग असं काय घडलं याचा मूड बिघडायला ती आपली मनाशीच तर्क लावत बसली व इथे राजेश त्याच्याच विचारात गढून गेलेला. त्याच्या नजरेसमोर फक्त कानात हेडफोन लावलेली, ओठांवर हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टीक, मानेवर रुळणारे यू कटमधील कुरळे केस, बोलके डोळे व लाल रंगाचा चुडीदार परिधान केलेली ती नजरेसमोर फिरकत होती. हे मला काय होत आहे... का मला सारखी तिची आठवण येत आहे.... तिचं तर नाव ही माहिती नाही... मग का हे सदोदित तिचेच विचार? कदाचित मी तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना? राजेशचा स्वतःच्याच मनाशी प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
तितक्यात आईने राजेशला आवाज दिला व म्हणाली, "राजेश, आज तू घरी आहेस तर आपण माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊ या. कालच रात्री मला कळाले की ती घरात पाय घसरुन पडली आहे. पाय मुरगळला आहे वाटतं तिचा . माझी व तिची नेहमी भाजीमार्केट मध्ये भेट होते. खूपच गोड आहे रे स्वभावाने. चल, तिला तरी भेटून येऊ या. राजेश त्याच्या तंद्रीतून बाहेर आला व आढेवेढे घेऊ लागला. पण आई त्याला जबरदस्तीने बरोबर घेऊन गेली.
दोघेही मैत्रिणीच्या घरी पोहोचले. राजेशने दरवाजाची कडी वाजवली. दरवाजा उघडल्यावर समोर पाहतो तर काय तीच मुलगी जी त्याला रोज बसस्थानकावर भेटायची तिनेच दरवाजा उघडला होता . रीमा म्हणाली, "तुम्ही? तुम्ही इथे ही पोहोचलात?" तितक्यात आतून रीमाच्या आईने आवाज दिला, "रीमा, कोण आहे गं?" तेव्हा राजेशची आई पुढे येऊन म्हणाली, "अगं मी सावित्री. काल समजलं की तू घरात पडलीस म्हणून म्हटलं की तूला भेटून यावं." "अगं, ये... ये सावित्री. हा कोण? रीमाच्या आईने विचारले.
"अगं मी तूला म्हणाले होते ना माझा मुलगा बँकेत आहे कामाला... तोच हा राजेश." राजेशची आई म्हणाली.
" अगं सावित्री, ही माझी मुलगी रीमा. ती ही शेअर मार्केटमध्ये कामाला आहे. आज गेली नाही कामाला. माझ्यासाठी तिने रजा काढली आहे चार दिवस."
"काय रे राजेश, तुम्ही ओळखता का एकमेकांना?... राजेशच्या आईने राजेशला विचारले.
"होय आई, बसस्थानकातली ओळख. पण नावं माहिती नव्हती ती आज माहित झाली." राजेश आईला म्हणाला.
राजेशच्या चेहऱ्यातील फरक आईने ओळखला. त्याचा चेहरा आनंदी दिसू लागला होता. राजेशच्या आईने रीमाच्या आईची चौकशी केली. गप्पागोष्टी चहापान झाला व रीमाच्या आईला काळजी घ्यायला सांगून निरोप घेऊ लागली. राजेशने आपल्या खिशातून रीमाचे उरलेले पैसे काढून दिले व आज त्याने बसस्थानकावर रिमाची वाट पाहिली हे ही सांगितलं. राजेशच्या आईने ते ऐकले व आपल्या मुलाचा मूड आज का बिघडला होता हे तिच्या लक्षात आले.

घरी आल्यावर राजेशचा मूड छानच झाला होता. सकाळपासून अस्वस्थ असलेल्या राजेशला रीमाची भेट झाल्यामुळे तो नेहमीप्रमाणे पूर्ववत झाला होता व आईला म्हणाला की, "आई, मस्त चटपटीत खायला बनव बरं. मला खूपच भूक लागली आहे." आई गालातल्या गालात हसली व म्हणाली, "काय रे, सकाळपासून भूक कुणीकडे गेली होती लबाडा?" जशी रीमा तूला आवडली आहे तशी मला ही आवडली आहे बरं का!! "

आईचे बोलणे ऐकून राजेश खूश झाला. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण त्याचा त्याच्या कानांवर विश्वासच बसेना म्हणून त्याने आईला परत विचारले , "खरंच आई? तूला खरंच रीमा आवडली का गं? मलाही ती खूपच आवडली आहे. " मायलेकरांनी एकमेकांकडे चमकून पाहिले व घरात एकच हशा पिकला व आनंदमय वातावरण झाले. रीमाच्या आईला बरं वाटलं की मी रीमाच्या आईबरोबर तुझ्याबद्दल बोलून घेते असे राजेशची आई राजेशला म्हणाली.

चार दिवसांच्या रजेनंतर रीमा राजेशला बसस्थानकावर भेटली. राजेशने रीमाकडे आईच्या तब्येतीबद्दल चौकशी केली."आता आई बरी आहे, " असं रीमाने राजेशला सांगितले. रीमा फारशी राजेशबरोबर खुलून बोलत नसायची. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. व पूर्वीसारखी अनोळखी असल्यासारखीच वागायची. एकप्रकारची उदासी कायम तिच्या चेहऱ्यावर असायची. इथे राजेशला वाटायचे की रीमा बरोबर खूप खूप गप्पा माराव्यात पण रीमा खूपच शांत व आपल्यातच गुरफटलेली असायची.

रीमाची आई बरी झाली होती. व भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जायला लागली होती. दोघी मैत्रिणींची बाजारात भेट झाली व राजेशच्या आईने रीमाच्या आईकडे रीमाला मागणी घालण्यासाठी आम्ही कधी यावं म्हणून विचारले. माझ्या मुलाला राजेशला व मला तुझी रीमा खूपच आवडली आहे असे सांगितले. हे ऐकल्यावर रीमाची आई रडायलाच लागली. क्षणभर तिला काय झालं असावं हेच सावित्रीला समजेनाच.,
सावित्री म्हणाली, "अगं वासंती, रडायला काय झालं आहे? माझा मुलगा पसंत नसेल तर तसे सांगून टाक गं, मला काही ही वाईट वाटणार नाही."

वासंती म्हणाली, "नाही गं सावित्री. तुझा मुलगा लाखात एक आहे पण माझी रीमा विधवा आहे गं. खूपच लहान वयात माझं लेकरु विधवा झालं आहे. लग्न झाल्यावर तीन महिन्यांतच तिच्या नवर्‍याचे एका अपघातात निधन झाले. तिच्या सासूने ती पांढऱ्या पायाची अवलक्षणी आहे असे दोषारोप लावून घरातून हाकलून दिले."

सावित्रीने वासंतीला शांत केले. व रीमाचा नवरा अपघातात कसा निधन पावला हे विचारले. वासंतीने सांगितले की मित्रमंडळींबरोबर गोव्याला फिरायला गेला होता व मद्यपान करून गाडी चालवताना अपघात झाला व जागीच ठार झाला.

मग सावित्री वासंतीला म्हणाली," मद्यपान करुन गाडी चालवणे हा त्याचा दोष होता व तो त्याच्या कर्मामुळे मेला आहे. यात रीमाचा काहीही दोष नाही. मी या गोष्टी मुळीच मानत नाही. आज त्या मुलाच्या चुकीमुळे रीमाने आपले पूर्ण आयुष्य दोषारोप सहन करीत घालवायचे का? मला तुझी रीमा पसंत आहे व माझा राजेश ही तुझ्या रीमाचा नक्कीच स्वीकार करेन ही मला पूर्ण खात्री आहे. मी राजेशला सर्व गोष्टींची माहिती देते. तू आता शांत हो व घरी जा.

संध्याकाळी राजेश घरी आल्यावर राजेशच्या आईने रीमाची सर्व हकिकत सांगितली. तेव्हा रीमाच्या शांत असण्याचे कारण त्याला कळले व रीमा विधवा असली तरी मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे असे त्याने सांगितले. सावित्रीला आपल्या मुलाचा खूपच अभिमान वाटला. भले जगाला अथवा नातेवाईकांना या गोष्टी पटणार नाहीत व मला समाज काय म्हणेल किंवा कोणी काय बोलेल याची पर्वा मुळीच नाही. मी लग्न करेन तर रीमाशीच असे राजेशने आईला सांगितलं.
"आई, तूझ्या मनात रीमा बद्दल काही शंका नाही ना?" राजेशने आईला विचारले.
राजेशची आई म्हणाली, "नाही रे बाळा, मी हे अवलक्षणी, पांढऱ्या पायाची वगैरे काही ही मानत नाही हां. मी एक स्त्री आहे व दुसऱ्या स्त्रीचा आदर करणे हाच स्त्री धर्म आहे हेच मानते व मला अभिमान वाटतो आहे तुझ्या निर्णयाबद्दल. असे अजून अनेक राजेश जर जन्माला आले तर या जगात अगदी लहान वयात विधवा बनून कोणतीही रीमा राहणार नाही. मी आज तूला जन्म देऊन धन्य झाले आहे. रीमा बरोबर लग्न होऊन माझ्या मुलाचीही गत रीमाच्या पहिल्या नवऱ्यासारखी होईल का हा विचार ही माझ्या मनाला शिवत नाही. मुळात हे विचारच मला पटत नाही. "

" आई, तू खूपच महान आहेस!" असे बोलून राजेश आईच्या कुशीत विसावला.
नंतर एक महिन्याच्या आतच रीमा व राजेशचे थाटामाटात लग्न झाले व आज सात वर्षे झाली आहेत सावित्री तिच्या दोन नातवंडांबरोबर, राजेश व रीमा बरोबर गुण्यागोविंदाने राहत आहे.

.... ©सौ. गीता विश्वास केदारे....
मुंबई