Shodh Chandrashekharcha - 5 in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | शोध चंद्रशेखरचा! - 5

Featured Books
Categories
Share

शोध चंद्रशेखरचा! - 5

शोध चंद्रशेखरचा!

५--

"सर, आज एक कॉन्फरन्स आहे. संध्याकाळी आणि डिनर सुद्धा. मी तुमच्या वतीने कन्सेंट कळवलाय. एक नवीन टेरिटोरी आपल्याला मिळू शकते." चैत्राली चंद्रशेखरला सांगत होती. चंद्रशेखरच्या कपाळावर आठ्या पडल्या. कालच तो दुबईहून आला होता. पुन्हा तो प्रवास त्याला नको होता. पण एक छानशी बिझिनेस ऑपॉर्च्युनिटी त्याला सोडवत नव्हती. शिवाय चैत्रालीची फोरसाईट वादातीत होती.

"ओके, फ्लाईट कधीची आहे?"

"सर, औरंगाबाद फ्लाईट्स अनियमित असतात. म्हणून बुकिंग केलं नाही. बाय रोड जावे लागेल. हार्डली सहा -सात तास लागतील. आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्हचा आनंदपण घेता येईल! तुम्हाला आवडते ना ड्राइव्ह करायला? पहा,नसता ड्राइव्हर अररेन्ज करता येईल म्हणा!"

"का? आपला ऑफिसचा सुलतान कोठे आहे?"

"आज सुलतान सुटीवर आहे!"

या काळ्या चैत्रालीत काही तरी आहे, त्या मुळे ती आपल्याला आवडते. मागून हि न मिळणारी, पाचफुट नऊ इंचाची उंची. शिसवी लाकडात कोरलेल्या शिल्पा सारखी देह घेऊन आली आहे. पण राहणी जुनाट! हातमागाच्या साड्या घालते. त्यावर पांढऱ्या फुलांचा गजरा. तो काळ्या जाड काड्यांचा चष्मा! निव्वळ ध्यान दिसत. मिटिंगला (आणि कुठं सिटिंगला सुद्धा) न्यायच्या लायकीची नाही. तिच्या नजरेत एक प्रकारचा धाक आहे. समोरच्याला चार हात दूर ठेवणारा! आपल्या सारख्या पैशेवाल्या रसिकाला भीक न घालणारी! पण कामात परफेक्ट! त्याने एका आफ्रिकन कॉन्टॅक्टच्या रेफ्रन्समुळे त्याने हिला नौकरी दिली होती.

लॉंग ड्राइव्ह हा चंद्रशेखरचा 'बाई' इतकाच वीक पाईंट होता. त्याने घड्याळावर नजर टाकली. दुपारचा एक वाजून गेला होता.

"चैत्राली, लंच अररेन्ज कर. जेवून दोनच्या आसपास निघतो. काही माहिती लागली तर फोन करीन."

"सर!"

चैत्रालीने केबिनच्या एका कोपऱ्यात असलेल्या मिनी टेबलवर झटपट त्याचे लंच लावले. जेवणाच्या डिश शेजारी वीतभर उंचीचा, ऍपल जुसच ग्लास पण भरून ठेवला होता! या पोरीला आपली आवड, कस्तुरी पेक्षाही ज्यास्त माहिती आहे! आणि तसाही हल्ली कस्तुरीत पूर्वीचा स्पार्क राहिला नाही! चंद्रशेखरच्या मनात येऊन गेले.

चंद्रशेखरने लंच आटोपले.

"चैत्राली, मी निघतो. महिंद्रा न्यावी म्हणतोय. लॉंग ड्राइव्हला मजबूत आहे." तो कोट खांद्यावर टाकत म्हणाला.

"सॉरी सर, महिंद्रा ग्यारेजला जातीयय. सर्विसिंगला. तुमच्या साठी BMW रेडी ठेवली आहे! पेट्रोल वगैरे फुल आहे! हवे ए नाईस ड्राईव्ह! अजून एक रिक्वेस्ट, जपून जा." स्वीट स्माईल देत चैत्राली म्हणाली. मर जावा! असे स्माईल कस्तुरीकडे असायला पाहिजे होते! चैतू एक दिवस तुला -----

सहाव्या मजल्याचा ऑफिस विंडोतून चैत्राली, चंद्रशेखरची काळीकुळकुळीत BMW कंपाउंड बाहेर जाताना पहात होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिने मोबाईल काढला.

"तो निघालाय!" हे एक वाक्य बोलून तिने फोन कट केला. हमरस्त्याला लागलेल्या चंद्रशेखरच्या गाडीवरची नजर न हलवता ती टक लावून पहात होती. तिला अपेक्षित असलेली पांढरी स्विफ्ट त्याच्या गाडी मागून, ठराविक अंतर ठेवून पाठलाग करताना पाहून, तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. खिडकीतून दूर होत तिने दुसरा नंबर फिरवला.

"हॅलो सुलतान, तुला त्या मल्होत्रा साहेबांच्या ऑफिस बाहेर थांबण्याची आता गरज नाही. तू परत ऑफिसला ये!"

०००

माथ्यावर रखरखते ऊन, घश्याला पडलेली कोरड, त्यात क्षितिजापर्यंत पसरलेले वाळवंट! कोठूनतरी चमच्याभर पाण्याचा तरी घश्याला ओलावा हवा, हि त्याची भावना शिगेला पोहंचली होती. तो जिवाच्या आकांताने पाय ओढत होता. एकदम त्याचा तोल गेला आणि तो धाडकन एका खड्यात पडला! तेथे थोडा गारवा होता. पण त्या पडण्यामुळे विकीला जाग आली. त्याने सावकाश डोळे उघडले. डोळे रात्रीच्या जागरणाने चुरचुरीत होते. तो झोपला होता, त्या पलंगावरून खाली पडला होता. कॉट जवळच्या खिडकीतून दुपारचे ऊन घरभर पसरले होते. त्यामुळेच ते वाळवंटी स्वप्न पडले असणार. घड्याळ साडेअकरा वाजल्याचे सांगत होते. आधी त्याने दोनग्लास पाणी घश्याखाली घातले. साली, कसली तहान लागलीयय?

दोन्ही हात वर करून आळस दिला आणि बेसिनजवळ जाऊन नळाच्या गारपाण्याखाली डोके धरले. थोडी हुशारी वाटल्यावर, डोके पुसून तो खुर्चीत बसला. इलेक्ट्रिक किटलीतले गरम पाणी कपात भरून घेतले. त्यात दोन चमचे साखर आणि एक टी बॅग घातली. समोरच्या पाकिटातून सिगारेट काढून ती ओठात अडकवली. काडीपेटी घेण्यासाठी तो खुर्चीतून उठला, आणि त्याला ते पुन्हा जाणवले. त्याची पाठ दुखत होती. मघाशी बेसिन कडे जाताना पण चमक निघाली होती. काहीतरी जड वस्तू उचलल्यावर लचक भरते, तसे दुखत होते. किचन मधून काडी पेटी आणून त्याने, तोंडात धरलेली सिगारेट पेटवली. काही तरी महत्वाचे करायचे आहे, तातडीने कोठेतरी जायचे आहे, असे त्याचे मन त्याला सुचवत होते. गेल्या वर्षीपासून हे असच चालू झालाय. काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत! आता हेच पहा ना. पाठ का दुखतीयय? रात्री जागरण कश्याने झाले? डोळे असे लाल का झालेत? काही तरी करायचंय, पण काय करायचंय? कोठे जायचंय? या क्षणी काहीच आठवत नाही. पण काही वेळाने येईल ध्यानात. नेहमी प्रमाणे. या विसराळूपणा बद्दल डॉक्टरांना विचारले होते. पण साले, सगळे डॉक्टर बदमाश आहेत. सिंडिकेट असते म्हणे त्यांची. आमचा आयुर्वेदिक डॉक्टर, अलोपॅथीची ट्रीटमेंट देतो, अन मला तर त्याने वेड्याच्या डॉक्टरकडे रेफर केलं. का? तर म्हणे मला विस्मरणाचा मानसिक 'रोग' झालाय! म्हटलं बघावं जाऊन या मानसरोगतज्ञाकडे. दहा दिवसांनी डॉ. रेड्डीची वेळ मिळाली. त्यानं तर पार घाबरून सोडलं. विसरण्याचे धोके सांगत होता. 'तुमचं नुकसान होईल, अडचणीत याल. ट्रीटमेंट गरजेची आहे. टाळू नका!' काय, काय सांगितलं. काही नाही! पैशे काढायचे धंदे. पुन्हा विकी त्या डॉ. रेड्डी कडे गेला नाही.

पण अजूनही कस काही आठवत नाही! काय गडबड झालीयय माहित नाही.

खुर्चीत बसल्यापासून बुडाला काही तरी टोचत होते. त्याने उठून बसायची जागा बघितली, काही नव्हतं. त्याने हिप पॉकेट चापचून पहिले. चापटी बाटली हाताला लागली. ती त्याने खसकन ओढून काढली. दारूची बाटली? कुठून आली? बरीचशी रिकामी आहे, म्हणजे आपण दारू पिली होती? मायला, काय तर झमेल आहे. त्याने पॅन्टच्या समोरच्या खिशात हात घातला. त्याचा हात एक महागडे, लेदरच्या पाकीट घेऊन खिश्या बाहेर आला! आता हे आणि काय? आणि कुणाचे पाकीट? अन आपल्या जवळ आलेच कसे? आजून खिशात काही तरी लागतंय! त्या दोन-दोन हजाराच्या आठ-दहा नोटा होत्या! त्याने पाकीट उलटे -पालटे करून पहिले. मागच्या बाजूला पाकिटावर बारीक हिरव्या अक्षरात -अफगान लेदर्स, दुबई.- एम्बॉस केले होते. पाकिटावर बोटाचा एक रक्ताळेला ठसा पण होता! कोठून आलं हे रक्त? आता मात्र विकी शहारला. डॉ. रेड्डीने दिलेली धोक्याची सूचना खरी ठरणार कि काय?

हातात ते पाकीट खेळवत असताना, खाड्कन त्याला रात्रीचे नाट्य आठवले. स्पष्ट! सगळे रिकलेक्ट झाले!

सारे संदर्भ डोक्यात गोळा झाले होते. त्या चंद्रुच्या चुचुन्द्रीला फोन करून पैसे घ्यायचे होते. हेच ते महत्वाचे काम मघापासून आठवत नव्हते! आता पैसे आले कि, पहिले झूट त्या टकलू डॉ. रेड्डीकडे, या विसराळूपणाचा इलाज करून घ्यायचा. त्या चुचुन्द्रीचा नंबर त्याच्या लक्षात आला होता. त्याने तो पटकन समोरच्या भिंतीवर लिहून घेतला. पुन्हा विसरलतर पंचाईत. हाता- तोंडाशी आलेला पैसा निसटून जायचा. पण हि आता शेवटची रिस्क! नेहमी प्रमाणे, त्याने स्वतःला बजावले. पण पैशे उकळायची संधी समोर आली कि, तो स्वतःला थांबवू शकायचा नाही. एक प्रकारची त्याला ती नशाच होती. याला पण उपाय असेल का? असला तर पुढील भेटीत डॉ. रेड्डीला विचारायला पाहिजे. पण त्या आधी तो पाचलाखचा फोन!

त्याने आपल्या मोबाईलला हात घातला. आणि झटक्यात मागे घेतला. हा मोबाइलला सेफ नव्हता. लोकेशन सहज ट्रेस होईल. साले पाच लाख मिळणार आहेत, असले शेकडो फोन त्यात येतील कि! त्याने मोबाईल ऑन करून नंबर लावणार, तेव्हड्यात इनकमिंगची रिंग वाजली. रहीम चाचा!

"हा, बोल चाचा!"

"अबे, कुछ शरम वरम है क्या? ब्बीस पच्चीस कहां है? अभि ओ ग्राईक बॉम्बड्या मारते आयेगा!" चाचा गाडीच्या रेडिएटर सारखा तापला होता!

"हा, अभि घंटेभारमे ला रहा हू! क्लीनिंग मारके झटकेसे निकलाईचं!" आता मात्र घाई केलीच पाहिजे. कालची गाडी, बाहेरून कालच्या पावसाने आणि आतून रक्ताने माखली होती! ती डिलेव्हरी पूर्वी साफ करायला हवी! अन फोन? आधी सफाई, मग फोन!

रक्ताचे डाग इतके चिवट असतील असे त्याला वाटले नव्हते. ते त्याला हातानेच घासून पुसून काढावे लागले. बाकी बाहेरून त्याने, गाडी कार वाशिंग पॉईंट वर चकाचक करून घेतली. हे सगळे सोपस्कार उरकून तो चाचाच्या ग्यारेजला पोहोचला, तेव्हा कारमालकाची चाचा समजूत काढत होता.

"सॉरी सर, क्लीनिक को थोडा देर हो गया." कारची की मालकाच्या हातात देत विकी नम्रपणे म्हणाला.

चमकणाऱ्या गाडीकडे पाहून त्याचा पारा थोडा खाली आला होता.

"बाकी सब ठीक है ना?"

"हा सर, गाडी बिलकुल ओके है. वल्ड टूर पे ले जावं! सिर्फ----"

"सिर्फ क्या?"

" स्पीडोमीटर गलत रिडींग दिखा ले ला है! नेक्स्ट टाइम मीटर नया डालेंगे." विकीने स्पीडोमीटरची वायर तोडून टाकली होती!

गाडीची डिलेव्हरी घेऊन गाडी तो मालक निघून गेला.

"चाचा, सरदर्द है. मै घर जाता." विकी, टायरशी झटापट करणाऱ्या चाचाला म्हणाला आणि मागे वळूनही न पहाता तडक घराकडे निघाला. लगेच त्याला हवी ती बेस्ट बस मिळाली. खाडीच्या बस स्टॉपला उतरून, चालत पुलाच्या मध्यावर पोहंचला. आणि मोबाईल कानाला लावला.

"ऐक झिपरे, पाचलाखची रक्कम एका लॅपटॉपच्या ब्याकसॅक मध्ये भर आणि कॅफे रुद्राक्षच्या बाहेर, ज्या रंगीत छत्र्या लावून बसायची सोया आहे, तेथे बरोबर रात्री आठ पंचावन्नला, चार नंबरच्या खुर्चीवर ठेव. आणि निघुन जा!" इतके सांगून त्याने फोन बंद करून टाकला! झटक्यात हातातला मोबाईल खाडीच्या पाण्यात फेकून दिला. घरी एक जुना नोकियाचा हँडसेट होता. त्यात नवीन सिम टाकता येणार होते. पण तरीही हा त्याचा गाढवपणाचं होता. ज्या नंबरवरून फोन आला त्या नंबरचा पर्चेसर कळू शकणार होता!

*****