Ti Ek Shaapita - 17 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 17

Featured Books
Categories
Share

ती एक शापिता! - 17

ती एक शापिता!

(१७)

"ये बस! अशोक, आत्ताच पालकमंत्र्यांकडून आलोय. उद्या सारी छपाईची यंत्रे येत आहेत. येत्या पंधरा दिवसात पहिला अंक बाहेर पडणार आहे. मीता, चहा कर ना." पीयूष आनंदी आवाजात म्हणाला.

"हो. करते..." असे म्हणत मीता आत गेली.

"काय म्हणाले पालकमंत्री?" अशोकने विचारले.

"काही विशेष नाही. सध्या तरी सारे अधिकार, वर्तमानपत्राची सारी सुत्रं माझ्याकडेच सोपविली आहेत."

"व्वा! छान! एकंदरीत तुझ्या मनासारखे होतंय तर. आता तुला तुझे विचार हवे तसे मांडता येतील."

"बरोबर आहे. आता तू बघ. असे एकेकाचे पितळ उघडे पाडतो ना बघच तू. राजकारणी, अधिकारी यांची भ्रष्टाचाराची पाळंमुळं उघडी पाडून यांना नाही खडी फोडायला पाठवले तर..."

"त्यांना खडी फोडायला लावा नि स्वतः मात्र कफल्लक बना." चहाचे कप घेऊन आलेली मीता म्हणाली.

"कफल्लक का? ही माझी संपत्ती! हा गठ्ठा बघितलास... वाचकांनी पत्रांतून स्तुतीसुमनांचा वर्षाव केलाय वर्षाव!"

"पण पीयूषजी, स्तुतीसुमनांनी पोट नाही भरत हो. जरा वास्तवात येऊन बघा. कालपरवा पत्रकार झालेलं पोरगं मोटारसायकलवर फिरतंय..."

"असेल ना, फिरत असेल. मला तसे कुणाचे पाय चाटणे किंवा माझ्या व्यवसायाशी बेईमानी करणं जमणार नाही. पत्रकार हा लोकशाहीचा आधार असतो. जिथं कुठं सूर्यकिरणे पोहोचणार नाहीत अशा ठिकाणी पत्रकारांनी पोहोचले पाहिजे. तिथे चालणारे काळेधंदे सरकारपुढे, जनतेसमोर आणलेच पाहिजेत. पत्रकारिता ही समाजसेवा आहे, तो धंदा नाही की व्यवसाय नाही..." पीयूष अजून बरेच काही बोलत होता परंतु अशोक त्याचा निरोप घेऊन निघाला खरा पण त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हते. त्याला वाटले,

'पीयूष-मीतामध्ये बहुतेक मतभेदाची ठिणगी पडली आहे. पीयूष जसा चतुरास्त्र आहे तसाच तो ध्येयवेडाही आहे. कदाचित त्याचा हाच गुण मीताला आवडत नसावा. खरे तर आजच्या समाजात जेव्हा सर्वत्र नुसता अंधारच दिसतोय अशा काळात पीयूषसारखी ध्येयवेडी माणसेच आशेचा किरण ठरतात. परंतु मीताचे काय? तिच्याही काही भावना असतील. तिलाही इतरांप्रमाणे साऱ्या सुविधा असाव्यात असे वाटत असेल तर तशावेळी स्वकमाईचे सोडा पण पीयूष तिच्याच कमाईवर जगत असेल, तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारत असेल तर ती त्रागा करणार, चिडणारच...' अशा विचारात तो घरी पोहोचला आणि त्याला स्वतःच्या संसाराची आठवण झाली. त्याच्याही घरी अनबेलच होते ना. अशोक- माधवीच्या किंवा त्याच्या आईवडिलांमध्ये वितुष्ट होतेच ना? सासू-सुनेमध्ये कुठे सुसंवाद होता? दोघींमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे वितंडवाद होत होता. तो घरी पोहोचला त्यावेळी त्या दोघींमध्ये भांडण सुरू होते. सुबोध घरी नव्हता. अशोकने कुणाची बाजू घ्यावी? कुणाला बोलावे? जन्मदात्या आईला की पत्नीला? तो मुळातच एकलकोंडा, घुमा होता. स्वभावाप्रमाणे कुणालाही न बोलता तो खोलीत गेला...

त्याच रात्री जेवणानंतर माधवी खोलीत आली. नेहमीप्रमाणे ती शेजारी झोपताच अशोकने तिला मिठीत घेतले... काही क्षणातण सवयीप्रमाणे तिच्या शरीराचे निरीक्षण करत असताना अगोदर सासूसोबत झालेल्या वादामुळे चिडलेली माधवी कडाडली,

"असे किती दिवस तुम्ही माझ्या भावनांशी खेळणार आहात?"

"म्हणजे?"

"आता तेही मीच सांगू? असे पाहण्याच्या पलीकडेही काही असते... या शरीराला दुसरीही गरज असते. ती भागवावी लागते तीही नवऱ्याला... तुम्हाला! ती सुद्धा याच वयात! तुम्ही नुसती बघ्याची भूमिका घेतली तर दिवस जायला वेळ लागणार नाही. म्हातारपण येईल..."

"अग पण..."

"खूप वेळा तीच तीच टेप ऐकून कान बधीर झाले आहेत. एकदा डॉक्टरांना दाखवून तर पहा..."

"अग, पण त्यासाठी खूप पैसा लागेल..."

"म्हणजे? तुला तुझा दोष माहिती आहे तर?"

"होय. मला एकच किडनी आहे. मागे एकदा एका डॉक्टरला विचारले होते तर त्याने एक किडनी असणारा पुरुष स्त्रीला सुखी करू शकत नाही असे म्हणाला."

"काही औषधी नाही सांगितली?"

"आहे. पण ती औषधी परदेशातून मागवावी लागते असे म्हणाला तो आपल्या गल्लीतला..."

"त्या गल्लीतल्या डॉक्टरवर विश्वास ठेवलास? चांगल्या एखाद्या डॉक्टरांना दाखवावे..."

"काय दाखवू? त्यांनी तेच सांगितले म्हणजे? उगीच अपमान.."

"तुला तुझा अपमान नको आहे. पण मला रोजच अपमानित व्हावे लागते त्याचे काय? तू मला लग्नाच्या अगोदर का नाही सांगितले?"

"मला कुणी बोलू दिलं? लग्नाला का नाही म्हणतो याचे कारण विचारले? तू नाटक करून आईबाबांना स्वतःच्या बाजूने वळवलेस. तुझ्या मनासारखे झाले. आता भोग.."

"तरीही तू मला किंवा बाबांना..."

"काय सांगणार? सांगून काय झालं असतं? तू लग्नाला नकार दिला असता?"

"कदाचित दिला असता. समोर धगधगणारं अग्निकुंड दिसत असताना का कुणी त्यात उडी घेईल?"

"अग पण तुझे प्रेम होते ना?"

"प्रेम असले म्हणून काय झाले? प्रेमाची दुसरी... विधिवत लग्न झाल्यानंतरची बाजू म्हणजे शारीरिक भूक, शरीरसुख असते..."

"म्हणजे तुझं ते प्रेम नव्हतं तर ती वासना होती?"

"नाही ती वासना नव्हती. ती वासना असती तर तू अनेकदा घरी एकटाच असायचास त्यावेळी तुला गाठून मी माझी .... माझ्या पवित्र प्रेमाला वासनेचे नाव देऊन तू प्रेमाचा अपमान करू नकोस."

"नाही. माधवी, नाही. प्रेम म्हणजे शरीरसुख नाही."

"वैवाहिक जीवनातील समाधान हे दोघांनाही समसमान मिळायला हवं. एक जण त्या सुखासाठी तळमळत असताना जर ते पाहून जोडीदार समाधानी होत असेल तर ते प्रेम नसतं."

"प्रेम! प्रेम!! प्रेम म्हणजे काय? प्रेमाचा अर्थ तू वासना, शरीरसंबंधाशी का लावतेस? शरीरसुखाची तुला एवढी हाव आहे, तू शरीरसंबंधाच्या, वासनेच्या एवढी आहारी गेली असलीस तर मग तू.. तू.. दुकान का नाही मांडत?"

"नि..ले..श...काय बोलतोस तू हे? पत्नीला शरीरविक्रयाचा सल्ला देताना तुला काहीच कसं वाटत नाही रे?"

"मग काय करु? मला शक्य आहे, जमेल तसे सुख देण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा जास्त सुख तुला हवं असेल तर तेवढा एकच पर्याय..."

"तेवढी हपापलेली मी नाही आणि वेश्या जे मिळवते ते शरीरसुख नसते तर ती 'ते' सुख विकून पैसा मिळविते. मला पैसा नकोय, हक्क हवाय. हक्काचे सुख मिळविणे हा माझा अधिकार आहे. क्षण- दोन क्षणाचा सहवासही मी माझे नशीब म्हणून स्वीकारेल पण ते क्षण पोकळ नसावेत, शाश्वत असावेत. काही गोष्टी 'कॅश' करायची एक वेळ असते. त्यावेळी त्या नुसत्याच 'विश' करून चालत नाहीत. तुला त्याचे काय म्हणा कारण तुझ्या घराण्यालाच अपूर्णत्वाचा, स्त्रियांना तळमळत ठेवण्याचा आणि पत्नीला मित्राच्या..."

"काय बोलतेस तू? शुद्धीवर आहेस का? कुणाबद्दल बोलतेस?"

"मी पूर्ण शुद्धीवर आहे. तुझे बाबाही तुझ्यासारखेच..."

"काय.. काय.. बोलतेस हे?"

"खरे तेच बोलतेय. वाच हे..." असे म्हणत माधवीने तणतणत पलंगावरची गादी एका बाजूने उचलली. त्याखाली ठेवलेली एक डायरी तिने अशोकला दिली. ती सुबोधची डायरी होती. त्याला डायरी लिहिण्याची सवय होती. सुबोधचे जीवन म्हणजे अनैसर्गिक, वेगवेगळ्या घटनांचे भांडार! त्या दैनंदिनीमध्ये सुबोधने स्वतःचे दौर्बल्य, अपूर्णत्व, त्याची तळमळ आणि त्याने सुहासिनी- निलेशला एकत्र आणण्यासाठी जे स्वैर विचार केले होते ते सारे त्याने दैनंदिनीमध्ये टिपून ठेवले होते. ऑडिट प्रकरणानंतर बदली करून घेण्यामागची भूमिकाही प्रांजळपणे स्पष्ट केली होती. त्याचबरोबर सुहासिनी, निलेश यांना पत्र लिहून दिलेल्या एक प्रकारच्या परवानगीचाही उल्लेख केला होता. त्या दैनंदिनीवर सरासरी दृष्टी टाकणाऱ्या अशोकच्या डोळ्यासमोर सुबोध- सुहासिनी- निलेश हा त्रिकोणात्मक चलचित्रपट उभा राहिला. भर चौकात कुणी तरी विवस्त्र केल्याप्रमाणे अशोकने ती दैनंदिनी फेकून दिली आणि तो पलंगावर बसला. परंतु त्याचवेळी वीज कडाडावी तशी माधवी ओरडली,

"आता का दातखिळी बसली? तुझ्या आईबाबांच्या प्रेमाला तू कोणतं नाव देशील? तुझ्या आईने बाबांच्या पश्चात जे सुख लुटलं त्याला काय म्हणणार? मित्राला, माझ्या पत्नीला मिठीत घे असा सल्ला देणाऱ्या तुझ्या पिताश्रीला..."

"मा..ध..वी.."

"ओरडू नकोस. मलाही ओरडता येतं..." असे म्हणत पलंगावरची गादी खाली टाकत माधवी त्यावर तिने स्वतःला झोकून दिले आणि लग्नानंतर ती प्रथमच वेगळी झोपू लागली...

*****