यशस्वी होणं म्हणजे नक्की काय?? आपल्याला हवं ते मिळवणं, आपलं ध्येय गाठणं, आणि एकदा तिथे पोहोचलं की सुखी आयुष्य जगणं... हेच का ते यशस्वी होणं? म्हणजे बहूतेक लोकांची 'यशाची' वाख्या हीच असावी...असेल तर हरकत नाही...पण खरंच हे 'यशस्वी' होण्याची प्रक्रिया एका विशिष्ट जागेवर येऊन थांबते का?? मला नाही वाटत...किंवा यश मोजता येत का ? नाही...नक्किच नाही...यशाचा मार्गच मुळात अनंत असतो, त्यात गंतव्य हे काही ठरवलेलं नसतं... आणि ज्याला हे कळाल, त्याचे पाय नेहमी जमिनीवरच राहतात, त्याला मिळवलेल्या गोष्टींचा गर्व कधीच निर्माण होत नाही...आणि ज्याने छोट्याश्या मिळवलेल्या गोष्टीतही मग्रुरी बाळगली त्याला आयुष्य एक दिवस नक्कीच जमिनीवरच आणून ठेवते....आपले ध्येय गाठत असताना हा विचार नक्कीच करायला पाहिजे की जेंव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेंव्हा त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही एकटे नसायला पाहिजे..त्या उत्सवात तुमच्या घरचे, आप्तेष्ट, मित्र ही त्यात तुमच्या सोबत असले पाहीजे, आणि जर या सगळ्यांना दुखवून तुम्ही ते यश प्राप्त केल असेल तर तुमच्या इतकं अयशस्वी कोणीच नाही...ज्याला आपल्या लोकांचं मन राखून यश मिळवता आलं त्याला जगात कोणीच हरवू शकत नाही...पण खरच लोक आपली ही भावना समजून घेतात का??? माझ्यासोबत जे काही झालं त्यावरून तरी हेच उत्तर देईल की या 'मटेरिअलिस्टिक' जगात तुमच्या भावनांना तुडवून तुम्हाला काय वाटत याचा विचार कोणी करत नाही, तुम्हाला काय वाटत यापेक्षा तुम्ही काय करता याला जास्त महत्त्व दिल्या जात...त्यामुळे या सगळ्या गोष्टी अंगवळणी पाडता पाडता माझ्याच भावनांना मला तिलांजली द्यावी लागली आणि आता त्या जागृत झाल्या तरी भीती वाटायला लागते....मी नैना..एकेकाळी माझ्या जवळ सगळं काही होत घर, परिवार, मित्र...सगळंच, मग काय नव्हतं?? नव्हती ती यशस्वी आयुष्य जगण्याची जिद्द...कशी असणार होती? कधी स्वतःच विचार केला असता तर कळाल असत ना माझं ध्येय काय आहे आणि मला काय मिळवायचय...आणि जेंव्हा कळाल तेंव्हा परिस्थिती अशी होती की बंडखोरी केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता त्यामुळे साहजिकच आता ज्या यश्याच्या शिखरावर मी पोहोचली आहे तिथून जर बघितलं तर खाली कोणीच दिसत नाही...दिसत फक्त माझं प्रतिबिंब , आणि त्यात दिसतात मला मिळालेल्या वेदना फक्त...माझ्या आयुष्याची कहाणी अशीही असेल ह्याचा विचार कुठे केला होता मी.....
---------------------------------------------------------------
मिल रॉबिन्स म्हणतात, आयुष्यतल्या प्रत्येक टप्प्यात तुम्हाला तुमच्यातील वेगळेपण शोधून काढावा लागतो आणि हाच वेगळपणा एक दिवस तुम्हाला तुम्ही नेमके काय आहात याची जाणीव करून देतो...हाच वेगळेपणा शोधत शोधत मी "लाल बहादुर शास्त्री नेशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन, मसुरी" येथे येऊन पोहोचली....आईएएस (IAS) ची फेज-1 ची ट्रेनिंग पूर्ण करून आज तीन वर्षांनंतर मी दिल्लीहून नागपूरला जायला निघाली आहे... तस तिथे कोणी माझी वाट पाहत असेल असं नाही पण काय माहीत जावस वाटलं...
दिल्ली हजरत निजामुद्दीन स्टेशन वरून माझी ट्रेन होती, एवढया गजबजलेल्या स्टेशन वरही माझ्या एकांताने माझी साथ सोडली नव्हती, सगळं जग भरलेलं असून सुद्धा माझी दुनिया मात्र रिकामी होती....मी जस तस माझं जड असलेलं सामान घेऊन रात्रीच्या 10 वाजता एकटीच प्रवासाला निघाली होती....एक वेळ अशी होती की कॉलेज मधून घरापर्यंत एक किलोमीटर अंतर कापायला ही मला भीती वाटायची आणि आता मात्र एकटीच भारत भ्रमण करू शकते...आयुष्यात आलेली प्रत्येक वेळ (खराब वेळ) खूप काही शिकवून जाते...आज एवढं काही मिळवून ही सगळ रिकामच असल्या सारख वाटतं.... त्यामुळेच कदाचित केविन विल्सन म्हणत असावे की जेंव्हा आपल्याला वाटत की आपल्या गरजा परिपूर्ण झाल्या आहेत तेंव्हाच अचानक खूप काही नसलेल्या गोष्टींची उणीव, त्या अपूर्णतेची जाणीव करून देते..आज असच काही होत असेल का माझ्यासोबत....
स्टेशन वर दिसलेले काही दृष्य कदाचित मला माझ्या आयुष्यात असलेल रिकामपण भासवून देत असतील..माझं लक्ष एका मुलीकडे गेलं, साधारण चौदा पंधरा वर्ष वय असेल तीच...नुकतीच पौडांगवस्थेत पदार्पण करत असताना मात्र तिच्यातला अल्लडपणा काही गेला नव्हता, तिच्या घरचे मात्र सतत तिला कस बसायचं कस राहायचं याच्या सूचना देत होत्या...मला माझे दिवस आठवले. आपल्याकडे मुलींसाठी सूचनांची एक तालिकाच तयार असते, काय करायचं काय नाही, कस वागायच कस नाही...या सगळ्यांची दिवसरात्र तालीम दिली जाते...मला जेंव्हा माझी आई अस काहीं सुचना द्यायची तेंव्हा मी चिडून म्हणायची," मला बांधू नको ग आई , मला उडायचं आहे, भरारी घ्यायची आहे..."
आणि आईच मात्र ठरलेलं उत्तर, " मुलींनी जास्त उडू नये, सगळं हातातून सुटत जात..मुलींमध्ये बांधायची ताकत असली पाहिजे, तेंव्हाच घर जागेवर राहूं शकत..." आणि हे सगळ बोलून बोलून मुलींना इतकं बंदिस्त करून टाकतात की तिला मात्र ती कैदच खूप मोकळी वाटू लागते...
हा विचार झटकायचा म्हणून मी दुसरीकडे नजर वळवली तर माझं लक्ष एका जोडप्या कडे गेलं...कदाचित नवविवाहित असावं, किमान त्या स्त्रीकडे बघून तरी वाटत होतं...तो पुरुष त्याला वाटेल त्या गतीने पुढे पुढे धावत होता तर ही स्त्री मात्र स्वतःची साडी, डोक्यावरचा पदर आणि हातात असलेलं सामान सांभाळत तिच्या नवऱ्याच्या गतीला येण्याचा अतोनात प्रयत्न करत होती आणि तो मात्र एकदाही मागे वळून पाहत नव्हता..असच असतं, पुरुष त्यांना वाटेल त्या वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यात त्याची संगिनी सोबत आहे की नाही हे मात्र बघायला विसरतात....आणि स्त्रियांच काय?? त्यांच्या आयुष्याचा प्रवास मात्र एका पिंजऱ्यातुन दुसऱ्या पिंजऱ्यात होतो....लग्नाआधी माहेरचा पिंजरा, नंतर नवऱ्याचा आणि कालांतराने मुलांचा...आपल्याला या पिंजऱ्यांची इतकी सवय होऊन जाते की याबाहेरही काही जग आहे जिथे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो हे विसरून जातो..त्या जोडप्याला बघून मला आठवलं माझं 'ते' घर ज्याला मी बांधून ठेऊ शकली नाही... किंवा अस म्हणावं, त्या बांधलेल्या जागेत मी राहू शकली नाही....आणि हे काय, ज्या गोष्टी मी भूतकाळात सोडून आली होती त्या आज का उफाळून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.....अनंत बंधनात बांधलेल्या, मला माझ्यातली ती 'बंदिनि' आज जागृत होऊ द्यायची नव्हती...त्यामुळे मी मोबाईलला हेडफोन लावून ते कानात घातल्याचा पर्याय स्वीकारला, मला पुन्हा माझ्या त्याच आयुष्यात जाण्याची जराही ईच्छा नव्हती...जेंव्हा आयुष्यात तुम्ही एक जागेवर येऊन थांबून जाता तेंव्हा त्या परिस्थितीतुन कस बाहेर पडायच हे मोठं आव्हान असत आणि मी ते आव्हान पेलून, त्यात जिंकून आज इथपर्यंत पोहोचली होती त्यामुळे मला माझ्या भूतकाळात अजिबात परतायचं नव्हतं...
पण एक व्यक्ती जो आजही माझ्यासोबत माझ्या मनात राहून मला प्रेरित करायचा त्याला मात्र मी विसरू शकली नाही...साधारण वर्षभर झालं असेल त्यांना भेटून, आणि तीन महिन्याआधी शेवटचं बोलणं झालं होतं फोन वर त्यांच्याशी... लक्षात असेल का त्यांना माझी फेज-1 ची ट्रेनिंग झाली असेन ते...का लक्षात नसेल, नक्कीच असेल, शेवटी आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच....माझ्या मनात हा द्वंद सुरू असताना, मला जाणवलं की माझा फोन वाजत आहे आणि माझ्या मोबाईल च्या स्क्रिन वर नाव झळकल..."अभय सर कॉलिंग..."
--------------------- -----------------------------------------
क्रमश: