Kavle in Marathi Philosophy by Pravin Ingle books and stories PDF | कावळे...

Featured Books
Categories
Share

कावळे...

मित्रांनो आपण जर खेड्यात किंवा छोट्या गावात राहत असाल तर जनावरांवर बसणारे कावळे आपण नक्कीच पाहिले असतील. ते गायी, म्हशींच्या अंगावरील गोचीड आणि बारीक किडे खात असतात. आपली जनावरं पण त्यांना मित्र समजून आपल्या पाठीवर बसू देतात.
कावळ्यांना जर जनावरांच्या पाठीवर गोचीड किंवा किडे खायला मिळाले नाही, तर ते जनावरांचं मांस खायचा पण प्रयत्न करतात. त्यांना आपला मित्र समजणारी भोळी जनावरं त्यांच्या मासाचे लचके तोडल्याने त्यांच्या अंगाची आग होते तेव्हा ते आपल्या टोकदार शिंगांनी त्यांना हूडकावून लावतात.
आपण सुद्धा आपल्याला खूपच चांगले मित्र आहोत असं भासवून, वेळ पडल्यास स्वतःच्या स्वार्थपायी आपली काडीची ही पर्वा न करणारे, आपला जीव धोक्यात टाकून स्वतःचा फायदा पाहणारे, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडणारे कावळे ओळखणं शिकलं पाहिजे आणि आपल्या सोबत कुठलाही धोका होण्याआधी त्यांना ओळखून धुडकावून लावलं पाहिजे.
खरोखर वाईट होणं जरुरी नाही पण आपली खुप चांगली वागणूक पहुन लोकं आपला फायदा घ्यायला धजावतात. अन आपण गाफिल राहिलो तर त्यांच्या छोट्या फायद्यासाठी देखील ते तुमचं मोठं नुकसान करायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. असे लोकं इतके स्वार्थी असतात की त्यांना कावळ्यांशिवाय दुसरं नाव देता येणार नाही.
सर्वच सारखे नसतात हे खरं, पण बरेच नेते मंडळी वेगवेगळ्या प्रकारची आमिषं देऊन साध्या भोळ्या तरुण मुलांना आपल्याकडे आकर्षित करतात, त्यानंतर त्यांच्या प्रचार कार्यासाठीच नव्हे तर गुंडगिरी करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करतात. वेळ पडल्यास दंगलीत मरण्या -मारण्यासाठी पण तयार करतात. साहेब पाठीशी आहेत असं म्हटल्यावर पोरं कुठलाही विचार न करता मागे पुढे काही न पाहता साहेबांसाठी वाटेल ते करायला तयार होतात. ताकद आणि पैसा पाहून या मुलांचा माज वाढून केव्हा तरी एखादा गुन्हा त्याच्या हातून घडतो आणि हे पोरं नेत्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले बनतात.
अशा नेते लोकांची छोटी मोठी कामं करण्यापासून पुढे मोठे गुन्हे करणं ह्यांच्या आयुष्याचा भाग होऊन जातो. हे पोरं जेव्हा कुठल्या तरी केस मधे फसतात. तेव्हा मात्र कायद्याच्या कचाट्यातुन सोडवायला आईवडिलांना च धावून यावं लागतं, ज्यांचा काडीचा विचार या पोरांनी कधी केलेला नसतो आणि फक्त आपल्या मजेसाठी ते जगत असतात. जबाबदारीची जाणीव तर सोडूनच द्या घरातील कुणी खुप आजारी पडलं तरी ह्या लोकांना त्यांच्या पार्ट्यांपासून फुरसत नसते.
स्वतः साठी कुठल्याही काळ्या बेऱ्या मार्गानं भरमसाठ पैसा हे भ्रष्टाचारी नेते कमावून घेतात, आधी सत्ता मिळवण्यासाठी आणि नंतर ती टिकवण्यासाठी वाट्टेल ते ह्या भरकटलेल्या तरुणांकडून करवून घेतात, स्वतः च्या मुलांसाठी भविष्याची संपत्ती गोळा करतात आणि ह्यांना व्यसनाधीन करून सोडतात अन कामं संपली की त्यांना अधांतरित सोडून मोकळे होतात.
अशा गद्दार लोकांपासून सावध करून कुठल्याही आमिषाला बळी न पडू देता आपल्या मुलांना वेळेवर सावध करणं, त्यांना थोडा वेळ देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं त्यांना आपल्या पायावर उभं होईपर्यंत सहारा देणं आणि दुरून दुरून त्यांच्या हालचालीवर, त्यांच्या संगतीवर, आणि कमावलेला पैसा कुठे खर्च करीत आहेत, घरात गरज असो किंवा नसो पण त्यांना त्यांच्या जबाबदारी ची जाणीव करून देणे, घरातील खर्चात त्यांना मदत करण्याची सवय लावणं, त्यांना कुठल्या सवयी जडत आहेत का ह्यावर लक्ष ठेवणं आणि घरातील वातावरण मोकळं ठेवणं जरुरी आहे ज्याचा फायदा असं होईल की मुलं त्यांच्याशी सहज संवाद साधतील.आपल्या मुलांना समजून घेणं प्रत्येक आई वडिलांचं सुद्धा कर्तव्य आहे.
मुलांनी पण आपल्या अडचणी खुलेपणाने आपल्या पालकांना सांगाव्या, आपल्या भविष्याबद्दल तरतुदी त्यांना सांगाव्या त्यांच्या अनुभवांचा आपल्या आयुष्यात उपयोग करावा. आपल्या आई वडिलांवर श्रद्धा ठेवावी, अन घरातील कुठलीही जबाबदारी अंगावर घेण्यात मागे सरकू नये. शक्य झाल्यास चांगल्या सामाजिक कार्यात हातभार लावावा. आपल्याला ज्या अपेक्षा समाजाकडून आहेत, तशाच इतरांना सुद्धा असतात आपल्याला हवा तसा समाज घडवण्याची सुद्धा जबाबदारी आपल्यावर आहे ही गोष्ट विसरू नये.
समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपलं सहकार्य दिलं तर परिवार, समाज, गाव, राज्य आणि देश बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही.
आणि हो, कावळ्यांपासून सुरक्षित राहा !
धन्यवाद....