Mehendichya Panaver - 5 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | मेहंदीच्या पानावर (भाग-५)

Featured Books
Categories
Share

मेहंदीच्या पानावर (भाग-५)

२८ फेब्रुवारी
आजचा शेवटचा दिवस. आम्ही एकत्र असलो तरी शक्यतो एक-मेकांपासुन दुर रहाण्याचाच प्रयत्न करत होतो. का? कश्यासाठी?

आज त्याचा आणि माझा एकमेकांना फारसा असा स्पर्श झालाच नाही, मला अगदी हवा-हवासा
वाटत होता आणि त्याच्या डोळ्यात बघुन मी खात्रीने सांगु शकते की त्यालाही.. पण तो
स्वतःला प्रयत्नपुर्वक माझ्यापासुन लांब ठेवु पहात होता. असो, आम्ही गप्पा मात्र खुप मारल्या. राज सतत काही तरी माझ्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होता.. आणि कदाचीत नकळत मी सुध्दा.

दुपारचं जेवण आम्ही एकत्रच घेतलं, म्हणजे तसं एकत्रच जेवतो, पण सर्व जण इतके राजच्या आजु-बाजुला असतात की तो माझ्या समोर असुनही माझा नसतो. आज मात्र आम्ही जरा वेगळे होऊनच जेवलो. अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्याच्या तलावात पाय बुडवुन जेवताना खुप मजा आली. खरं तर जेवणं कसले ते जे मिळेल ते पोटात ढकलणे. तिथला मेनु बघुन राजने स्वतःसाठी काहीच घेतले नव्हते. खरं तर नंतर मला ही असंच वाटलं की मला भुकच नाहीये.

काही मिनीटांमध्येच सिमल्याकडे परतीचा प्रवास सुरु.


२ मार्च
मागचा पुर्ण आठवडा मी माझी राहीलेच नव्हते. राज सोडला तर माझं कुठल्याही गोष्टींत लक्ष लागत नव्हतं. माझ्या अनुपस्थीतीत गोपाळकाकांच्या रिसॉर्टमधली अनेक कामं खोळंबली होती, पण कश्यालाही हातं लावायचा मला प्रचंड कंटाळा आला होता.

राज कालच रात्री परत गेला. जाताना म्हणाला, ‘तु ये परत, स्टुडीओ तुझी वाट पहात आहे, सगळ्यांना तु परत हवी आहेस’ त्यानंतर बराच वेळ विचार करुन नं बोलताच गेला. त्याला कदाचीत असं तर म्हणायचं नव्हतं .. ‘आणि कदाचीत मलाही..!!!!!’

त्याच्या जाण्याने एक फार मोठ्ठी पोकळी निर्माण झाली आहे. छातीवर उगाचच दडपण आल्यासारखे वाटते आहे. अस्वस्थता काहीच करुन देत नाही. सतत मनामध्ये कसलातरी विचार चालु आहे. आता इथे जास्त दिवस रहाणं खरंच शक्य नाही. परत जायलाच पाहीजे, माझ्यासाठी? राजसाठी?? की माझ्या राजसाठी???


३ मार्च
गोपाळकाकांना सांगणं अवघडं वाटलं होतं, पण त्यांनी समजुतीने घेतले. परत जाण्याचे शेवटी आज नक्की झाले. चार दिवसांत मी पुन्हा राजच्या समोर असेन. कसा असेल तो? मला बघुन त्याला आनंद होईल? का परत गेल्यावर निधीमध्ये पुन्हा गुंफुन गेला असेल? मला विसरला तर नसेल?

नाही, नक्कीच नाही. तो फक्त माझाच आहे.
राज, मी येतेय….मी परत येतेय


८ मार्च
लेह-लडाखचा तो आठवडा खुप्पच छान होता, खुप म्हणजे खुप्पच छान. अजुनही मला वाटते की ते क्षणं खरंच होते का? का ते एक स्वप्न होतं? मुख्यतः ते शेवटचे दोन दिवस! राजच्या मनात खरंच माझ्याबद्दल काही असेल का? आणि असेल तरी आता अजुनही त्याला तस्सेच वाटत असेल का? का त्याने त्याचा विचार परत बदलला असेल?

कित्ती आनंद झाला सगळ्यांना मी परत आले आहे हे बघुन! आणि मला? खरंच मलाही खुप आनंद झाला सगळ्यांना भेटुन!

आशु आणि मॅंडी इतक्या खुश झाल्या होत्या, त्यांचा विश्वासच बसत नव्हता की मी खरंच परत आले आहे. बाहेरच्या कॉरीडॉअर मध्ये आमच्या तिघींची नुसती चपड-चपड चालु होती आणि त्याचवेळेस मला राज-निधी बरोबर येताना दिसला. मला पाहील्यावर त्याच्या डोळ्यात आलेली एक चमक.. मी पाहीली. एक क्षण वाटले तो धावत येऊन भेटेल मला, पण निधी बरोबर असल्याने तो निघुन गेला. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले ते नाजुकसे हास्य मी टिपले होतेच पण ते आशु आणि मॅडीच्या नजरेतुनही सुटले नाही.

त्याच्या त्या एका हास्याने मनाला खुपच उभारी मिळाली. कदाचीत आम्ही दोघं एकत्र आहोत. तो दिसेनासा होईपर्यंत माझी नजर त्याच्यावरच खिळली होती आणि जेंव्हा मी परत आशु आणि मॅंडीकडे पाहीले तेंव्हा दोघीही भुवया उंचावुन माझ्याकडेच बघत होत्या.


१० मार्च
राज अधुन मधुन मला दिसतो स्टुडीओ मध्ये. पण आम्ही अजुनही एकमेकांशी बोललो नाही. एक चोरटी छोटी स्माईल सोडली तर आमच्या दोघांच्यात असं अजुन काहीच घडलं नाही आणि खरं सांगायचे तर मला त्याची फारच चिंता वाटत आहे. असं वाटतं की अजुनही तो कुठल्यातरी गोष्टीवरुन गोंधळला आहे. कदाचीत ‘मी ‘ की ‘निधी’? मी जितकी त्याला बघुन आनंदी आहे, खरं सांगु तो एवढा आनंदी अजुन तरी मला नाही वाटला.

आशु आणि मॅन्डीला मी अजुनही राजबद्दल काही सांगीतले नाहीये. पण आमची नजरानजर त्यांच्या नजरेतुन सुटलेली नाही हे नक्की. त्यांच्या चेहऱ्यावर असणारे प्रश्न मला आज नाही तर उद्या सोडवावे लागणार आहेत. उलट आता असं वाटतंय की स्वतःहुन सांगीतले तर कदाचीत मला त्यांची मदतच होईल

शेवटी त्यांना उद्या संध्याकाळी घरी बोलावले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर फारसे आश्चर्य उमटलेले मला दिसले नाही. कदाचीत मला वाटते त्यांना माहीती आहे, का?


११ मार्च
संध्याकाळी येताना मॅंडी ‘चायनीज चॉप्सि आणी ग्रेव्ही मंचुरीयन’ घेउन आली. आशुने सर्वांचे प्रचंड आवडते ‘ऍप्पल ऍपी’ आणले तर मी घरीच ‘लेमन राइस’ बनवला होता. इतक्या दिवसांनंतर चे ते तिघींनी घेतलेले जेवण म्हणजे एक अनमोल क्षण होते.

जेवणानंतर तिघींसाठी गरमा-गरम नेस-कॅफे बनवली आणि आम्ही तिघीही व्हरांड्यात खुर्चा टाकुन बसलो. दोघींच्या चेहऱ्यावर मला अजुनही प्रश्न चिन्ह दिसत होते. शेवटी मी बोलायला सुरुवात केली आणि पुढचे ३ तास मीच बडबडत होते आणि दोघीही ऐकत होत्या. उत्सुकता, आनंद, चिंता अश्या निरनिराळ्या भावनांचे पडसाद दोघींच्याही चेहऱ्यावर उमटत होते.

‘मग’ मधील कॉफी केंव्हाच संपली होती. शेवटी मी च उठले आणि परत कॉफी बनवुन आणली. दोन घोट घेतल्यावर शेवटी दोघींना विचारले, ‘काय वाटते तुम्हाला? मी काय करायला हवे?’ आणि दोघीही एकदमच म्हणाल्या, ‘हा काय प्रश्न झाला?’ राज आणि निधी कध्धीच एकमेकांना अनुरुप वाटत नाहित. राजला पहिल्यापासुनच तु आपलं मानलं आहेस आणि तो तुझाच झाला पाहिजे, आणि त्यासाठी तुला लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत.’

खुप बरं वाटलं त्यांच बोलणं ऐकुन, ‘सच्ची’ मैत्री यालाच म्हणतात, नाही का?

१२ मार्च
कालची संध्याकाळ मनावरचे खुप मोठ्ठे ओझे उतरवुन गेली. निदान माझ्या मनात मला बोचत असलेली अपराधीपणाची भावना तरी कमी झाली. मी जे करते आहे, जे करणार आहे, ते अगदीच काही चुकीचे नाही ही जाणीवच माझ्यासाठी खुप आहे.राजला ‘पटवण्याच्या’ प्रयत्नात मदतीला माझ्याबरोबर माझ्या दोन जिवाभावाच्या मैत्रीणीसुध्दा आहेत.

मला माझ्या भावना राजपर्यंत पोहोचवायला हव्यात. पण कधी? कसं? राज एकटा असा कध्धीच सापडत नाही. एक तर त्याचे फॅन्स नाही तर ती निधी. सारखं कोण ना कोणीतरी त्याच्या अवतीभोवती असतेच.

काय करता येईल की निधीपासुन राज काही क्षणांसाठी वेगळा असेल?

विचार करता करताच डोक्यात एक कल्पना आली.. ‘फॅन्स..’, स्तुती.. निधी जाम वेडी आहे असल्या गोष्टींमध्ये. कसेही करुन जर आशु आणी मॅन्डीने निधीला बोलण्यात गुंतवुन ठेवले..

मला जरी निदान राजशी दोन मिनीटं बोलायला मिळाली तरी निदान त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे याचा अंदाज बांधता येईल.

१३ मार्च
हा हा हा… अजुनही हसु येतेय मला. आशु ग्रेट आहे, खरंच!! काय मस्त गुंगवुन ठेवले तिने निधीला. ‘निधीजी तुमची गाणी अशी आहेत..’, ‘निधीजी तुमचा आवाज म्हणजे ना..’, ‘निधीजी असं, निधीजी तस्स.. ’काय पकडलं होतं तिला आज स्टुडीओ मध्ये. आणि मी? मी आतुतरतेने ’त्या’ क्षणाची वाट बघत होते. आशुने मला हळुच खुण केली आणि मी अगदी सहजच राजच्या इथे गेले.

खरं तर खुप गोंधळल्यासारखे झाले होते मला त्याच्या समोर. मनाची खुप घालमेल झाली. एकदा वाटलं, वळुन पळुन जावं परत, कुठंही न बघता. पण मोठ्या मुश्कीलीने हिम्मत गोळा केली होती.

‘राज, मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचं आहे, शक्य असेल तर प्लिज मला या नंबरवर फोन कर’ असं म्हणुन घाई-घाईतच माझा फोन नंबर लिहीलेला कागद त्याच्या हातात कोंबला आणि तेथुन निघुन गेले.

त्याची प्रश्नार्थक नजर माझ्यावर रोखलेली मला जाणवले होते, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तो मला नक्की फोन करेल. त्याने फोन नाही केला तर… तर माझे उत्तर मला मिळालेच नाही का?

… पण करेल.. राज नक्की फोन करेल. मी ‘माझ्या’ राजला चांगले ओळखते.

[क्रमशः]