Ek hota raja - 10 in Marathi Love Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | एक होता राजा…. (भाग १०)

Featured Books
Categories
Share

एक होता राजा…. (भाग १०)

बोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या.
"चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… नशीब आठवण तरी ठेवलीस आमची… ",
"हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…",
"बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…",
"actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.",
"आणि इकडे नाही येणार का… ",
" may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… ",
"ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून जा… कारण आता फक्त या २ चाळी शिल्लक आहेत… त्या पाडल्या तर कूठे जाऊ ते माहित नाही आम्हाला… बघ , जमलं तर… " म्हणत मंगेश निघून गेला. निलम तशीच उभी होती विचार करत.


पुढच्या २ दिवसात निलमचं मुंबईतलं काम संपलं. अजून २ दिवसांनी परतीचा प्रवास सुरु होणार होता तिचा. पुन्हा एकदा निलम त्या रस्त्याने आली. चाळीसमोर कार थांबवली आणि बघत बसली चाळीकडे. काय मनात आलं तिच्या. उतरली गाडीतून आणि आली चाळीत… जुने दिवस आठवले… पुढच्या महिन्यात गणपती आहेत बहुतेक… चाळीत मंडपाची तयारी चालू होती, त्यावरून तिने ओळखलं. त्या सार्वजनिक आरत्या आठवल्या तिला.… मस्त मज्जा करायचो. रात्रभर जागायचो, मग कॉलेजला lecture ला झोप यायची. निलमला हसायला आलं. राजाची आठवण झाली पुन्हा तिला. चाळीकडे मोर्चा वळवला तिने. तिसरा मजला ना… हो, तिथून ५वी खोली… असेल का राजेश घरात… ८ वाजले होते रात्रीचे… निलम पोहोचली राजेशच्या खोली जवळ.… या बाल्कनीत किती वेळा गप्पा मारत उभे असायचो आम्ही…. तासनतास गप्पा चालायच्या तिघांच्या… मंगेशचं घर शेजारी… त्या खोलीला कुलूप होतं… बाहेर गेला असेल मंगेश कदाचित… राजेशच्या खोलीचं दार बंद, पण कुलूप नाही… म्हणजे आतून बंद असेल… आत असेल कोणीतरी… राजेश may be… निलमने दरवाजा ठोठावला.


"कोण पाहिजे तुम्हाला ? ",एका लहान मुलीने दरवाजा उघडला.
"राजा… ",
"राजा… कोण राजा… ?",
"sorry, sorry…. राजेश… इकडेच राहतो ना… ",
"बाबा… बाबा पाहिजे का तुम्हाला… बाबा आला नाही अजून",
"मग कोण आहे का घरात … ",
"आज्जी आहे ना… थांबा हा जरा… " म्हणत ती मुलगी धावत आत गेली. राजाची मुलगी वाटते… छान आहे, मंगेश बोलला होता ना छान family आहे त्याची… निलम मनातल्या मनात बोलली.
" हि बघा आज्जी… "त्या लहान मुलीने राजेशच्या आईचा हात धरून बाहेर आणलं.
" कोण आहे ग बबडी… ?" राजेशची आई म्हणाली. निलमला पाहिलं आणि थक्क झाली. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. " रा… राणी ना तू… ",हो आई… " आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तश्याच रडत होत्या दोघी. खूप वेळानंतर दोघी शांत झाल्या. " ये … आत ये. " म्हणत राजेशच्या आईने तिला घरात आणलं."बस हा… पाणी आणते." आई लगबग करत गेली. निलम ती खोली बघू लागली. तशीच अगदी. काहीच फरक नाही. जशी शेवटची पाहिली होती तशीच. आई सुद्धा तश्याच आहेत, फक्त केस पांढरे झाले आहेत… आणि घरात ३ लहान मुलं… सगळी कुतूहलाने निलमकडे बघत होती. " हे घे पाणी… " निलमने ग्लास घेतला.


आई निलमच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती, डोक्यावरून हात फिरवत होती. आनंद तर चेहऱ्यावर दिसत होता तिच्या.
" कशी आहेस ग राणी… ",
"कशी वाटते तुम्हाला?",
" अगदी आहेस तशीस आहेस, जरा बारीक झाली आहेस…जेवत नाहीस का ?", निलम हसली त्यावर.
"जेवते आई… काम जास्त असते ना म्हणून… ",
"जरा स्वतःकडे पण लक्ष देयाचे ना… ",
"हो आई… नक्की देईन. "छान वाटतं होतं निलमला… तिलाही किती आनंद झाला होता.
" मग, कधी जाणार आहेस दिल्लीला राहायला ? ",त्यावर मात्र निलम चाट पडली.
" आई !!! तू… तुम्हाला कसं माहित ?",
"मंगेश… ज्यादिवशी तुमची भेट झाली ना, त्याचरात्री मला सांगितलं सगळं त्याने. ", निलमला मंगेशचा राग आला. आईंना कळलं ते.
" मंगेश पण माझाच मुलगा आहे ना… तू मुलगीच आहेस ना माझी, त्याला खूप वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल… सांगावसं वाटलं म्हणून सांगून टाकलं त्याने." ,
" आणि राजाला…. " ,
"घाबरू नकोस, त्याला माहित नाही हे आणि सांगणार सुद्धा नाही त्याला…. ", निलमला हायसं वाटलं.
" आई… मला सांगायचे नव्हते कोणाला, मंगेश विचारू लागला म्हणून सांगितलं त्याला.",
"म्हणजे तू राजेशला ओळखलं नाहीस… " ,
"त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याच्यासमोर आली नाही कधी. " निलम ते बोलून शांत बसली.


"कसा आहे राजा… ?",
"राजा ना… बघ आता येईल थोड्यावेळात… ",
"ऑफिसला गेला आहे का ? ",
"नाही गं, पुढच्या महिन्यात गणपती आहेत ना, तो खालीच आहे मंडपाजवळ… तुला दिसला नाही वाटते तो… " ,
" नाही…. पण मला भेटायचे आहे त्याला… " तेवढ्यात राजेश दारात हजर… निलम उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. राजेशचं लक्ष तिच्यावर गेलं, तोही तिच्याकडे बघू लागला. " बाबा !!! …. " म्हणत तिन्ही मुलं राजेशला जाऊन बिलगली तेव्हा राजेश भानावर आला. "बाबा… खाऊ काऊ आणला… " एका मुलाने विचारलं. " नाही रे… उद्या आणीन हा नक्की. " तशी तिन्ही मुलं जाऊन पुन्हा अभ्यासात गुंतली.

राजेश घरात आला. आईने पाणी आणून दिलं. राजेश निलमकडे पाहत नव्हता आता. पण निलम त्याच्याकडेच बघत होती अजूनही. निरखून अगदी. राजा खूप बदलला होता आता. अर्थात मंगेश बोलला तसा. त्याची हेअर स्टाईल खूप आवडायची निलमला. आता सुद्धा तशीच होती, फक्त काही पांढरे केस बऱ्यापैकी काळ्या केसांतून डोकावत होते… पहिलं एकदम क्लीन शेव असायचा, आता दाढीही पांढरी होती बहुतेक.… पहिला बारीक म्हणजे ठीकठाक होता शरीरयष्टीने… आता त्याने घातलेल्या त्या ढगळ शर्टातून वाढलेलं पोट दिसत होतं. पहिला नेहमी उत्साही असणारा राजा, आता थकलेला वाटत होता.

"कशी आहेस ?", राजेशच्या त्या प्रश्नाने निलम भानावर आली.
" हं… हा , छान आहे मी… तू कसा आहेस… ",
" मी…. कसा वाटतो तुला… " ,
" छान वाटतोस. ",
"छान… ??" राजेश हसला.
" का रे हसलास… ",
"कुठल्या angel नी मी तुला छान वाटतो…" पुन्हा हसला राजेश… हा, ते एक होतं… त्याचं हसू …. अगदी लहान गोंडस बाळासारखा हसायचा तो. ते तसंच होतं अजून. हसू आवरत राजेश बोलला.
" कधी आलीस मुंबईला",
"कालच आली आणि तुला भेटायला आली." खोटं बोलली निलम.
" अजून किती दिवस मग… आणि मिस्टर असतील ना सोबत… ",
"काम होतं ना मुंबईला, म्हणून एकटीच आली आहे, त्याला वेळ नाही ना भेटत, नाहीतर आला असता तोही. ",
"हा… काम असतील ना खूप… बरोबर मग. " निलमला वाईट वाटत होतं.आपण जास्त काही थांबू शकत नाही राजासमोर म्हणून ती उठली. "चल मग… निघते मी, घरी काम आहे थोडं… नंतर भेटू कधीतरी… ","ठीक आहे." म्हणत राजेश सुद्धा उठला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: