ती एक शापिता!
(१५)
पीयूष चालवत असलेल्या 'गवाक्ष' सदराने, लेखमालेने खूप छान प्रतिसाद मिळवला. त्याच्या गवाक्षमुळे सुजनतामत या दैनिकाचा खप दिवसेंदिवस वाढत होता. लोक सुजनतामत आणि गवाक्षची प्रतिक्षा करायचे. एकदा का अंक हातात पडला की, गवाक्ष सदर असलेले पान अगोदर हातात पडावं म्हणून घरातील स्त्री-पुरुष सारे टपलेले असायचे. एवढे ते सदर लोकप्रिय झाले होते. कारण ते सदर विनोदी तर होतेच शिवाय कुणाचा ना कुणाचा पर्दाफाश करणारे असे. मार्मिक भाषेसोबतच विनोदाची, खुसखुशीत शब्दांची झालर अनेकांना आवडायची. पीयूषकडे रोज प्रशंसा करणारी अनेक पत्रं यायची. साहजिकच लोकप्रियता वाढल्यामुळे पीयूषचा उत्साह वाढला तसाच अंकाचा खप वाढल्यामुळे मालकही पीयूषवर खुश होते. दर महिन्याला पगारासोबत पीयूषला बक्षीस म्हणून बरीच रक्कमही मिळायची.
पीयूषची वाट पाहणाऱ्या अशोकला दूरवर पीयूष येताना दिसला. येत असलेला पीयूष असला तरीही चाल नेहमीची नव्हती, जणू काही तरी हरवल्यागत् तो येत होता. पावलात नेहमीचा आत्मविश्वास नव्हता. चेहऱ्यावरचा टवटवीतपणा लोप पावला होता. काही तरी बिनसलंय असा अंदाज अशोकला येत होता. तो घराजवळ येताच अशोक उठला. पायात चपला अडकवून तो निघाला. शेजारी घर असलेल्या माधवीचा आणि त्याचा सामना झाला. दोघांची नजरानजर होताच अशोकने नजर वळवली.
पीयूष-अशोक दोघेही नेहमीच्या रस्त्याने निघाले. परंतु नेहमीप्रमाणे पीयूष हसत-खिदळत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचे नैराश्य ठळकपणे दिसत होते. त्याचा मूड पाहून अशोकही शांत होता. नाही तरी ते दोघे सोबत असले म्हणजे अशोक बऱ्याचवेळा शांत असायचा तर पीयूषची सारखी बडबड चालत असे. न राहवून शेवटी अशोकने विचारले,
"पीयू, काय झाले?"
"चल. सांगतो. दूरवर कुठेतरी जाऊन बसू."
"का रे, आज सुट्टी आहे का?"
"होय. सुजनतामतला आता कायमची सुट्टी आहे."
"का..य? पण का? काय झाले आहे?"
"गवाक्षमध्ये आलेले प्रकरण भोवलं."
"कोणतं? सुनेच्या तंदुरीचे?"
"होय तेच. काल ते प्रकरण टाकले. काल मालक दुसऱ्या शहरात होते. ते प्रकरण वाचताच ते धावत आले. आल्याबरोबर मला बोलावून चांगली कानउघाडणी केली."
"अरे, पण का?"
"अरे, सुनेच्या शरीराची खांड विकणारा तो महाभाग मालकाचा खास मित्र होता. मित्राचे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यामुळे त्या मित्रासोबत मालकाच्याही अंगाची लाहीलाही झाली. परिणाम माझी हकालपट्टी!" पीयूष अत्यंत निराशपणे म्हणताना थोडे हसला खरा परंतु त्या हसण्यातले हास्यच जणू हरवले होते. अशोकला त्याची ती अवस्था पाहून एक दिवसापूर्वीचा प्रसंग आठवला...
त्यादिवशी सकाळी अशोक उठला तोच मुळी पीयूषच्या आवाजाने. अशोकने डोळे उघडायचा अवकाश पीयूष ओरडला,
"आशक्या, उठ बे. बघ, आजचे गवाक्ष..."
नेहमीपेक्षा काही तरी खास, वेगळं आणि खुसखुशीत असणार हे अशोकने ओळखले कारण तसेच विशेष असेल म्हणून पीयूष हर्षोल्लासाने त्याला उठवत होता. पीयूषचे सदर प्रकाशित होण्यापूर्वी तो लेख तो कुणालाही अगदी अशोकलाही दाखवत नसे. संपादकाशिवाय तो कुणाजवळ चर्चाही करीत नसे.
"हे बघ. हा शहरातील बडा हॉटेल मालक आहे. अनेक दिवसांपासून मला याचा संशय..."
"तो कशाचा?"
"हा काही तरी काळे धंदे करतो याचा मला संशय होता म्हणून मी त्याच्या पाळतीवर होतो. रोज काही नाही काही निमित्ताने मी त्या हॉटेलमध्ये जायचो. कधी बाहेर थांबून निरीक्षण करीत असे. हालचाली संशयास्पद वाटायच्या परंतु हाती काही लागत नव्हते. परंतु परवा.. परवा.."
"काय झाले?"
"परवा हॉटेल बंद होते. तरीही मी तिकडे पोहोचलो. खूप वेळ थांबून काही हाती लागते का हे पाहिले परंतु काही सापडत नव्हते म्हणून शेवटी कंटाळून निघालो तितक्यात एक कार तिथे येऊन थांबली. त्यामुळे माझी शंका बळावली. मी मागच्या बाजूने हॉटेलमध्ये शिरलो..."
"मागच्या बाजूने का?" अशोकने विचारले.
"अरे, समोरून गेलो असतो तर सुट्टी आहे म्हणून त्यांनी मला हाकलले असते. मी गुपचूप आत शिरलो आणि भीतीने माझी दातखिळी बसल्याप्रमाणे अवस्था झाली रे."
"का? असे काय पाहिले तू?"
"अरे, कारमधून त्यांनी एक पोते आणले होते. त्यामध्ये एका स्त्रीचे प्रेत होते. त्यांनी त्या शरीराचे बारीक बारीक तुकडे करुन ते भट्टीवर ठेवलेल्या एका मोठ्या हंड्यात टाकले आणि भट्टी पेटवली."
"ते कशासाठी?"
"त्यांची दबक्या आवाजातील चर्चा मी ऐकली. रात्रभर ते तुकडे शिजवायचे आणि दुसरे दिवशी गिऱ्हाईकांना खाऊ घालायचे..."
"बाप रे बाप! काय अघोरी प्रकार आहे? ऐकतानाच अंगावर काटा येतोय, मळमळतंय."
"मी ते सारे या डोळ्याने बघितलं आणि माझ्या कॅमेऱ्यात बंद केले. सुदैवाने मी जिथे उभा होतो तिथून त्यांचे चेहरे, त्या मृत स्त्रीचा चेहराही सुरुवातीला स्पष्ट दिसत होता म्हणून मी पटापट फोटो काढले आणि वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन वर्तमानपत्राचे जुने गठ्ठे काढले."
"ते कशासाठी?"
"जुन्या वर्तमानपत्रात मला हवा तो..तो फोटो सापडला. तो त्याच स्त्रीच्या लग्नातला फोटो होता."
"केवढा भयानक प्रकार म्हणावा.."
"भयानक? तो तर पुढेच आहे. माहिती आहे, ती स्त्री कोण होती?"
"कोण होती?"
"ती स्त्री त्या पुढाऱ्याची सून होती.."
"का...य? प्रत्यक्ष सुनेची हत्या?"
"नुसती हत्याच नाही अशोक तर तिच्या शरीराच्या तुकड्यांची खिरापत वाढली. त्यापेक्षाही किळसवाणा प्रकार तुला ऐकवेल? ती सून गर्भवती होती."
"बाप रे! या जगात असेही क्रुर लोक आहेत?"
"आहेत! अशोकराव, आहेत! प्रत्यक्ष पुरावाच पहा. हा तो पुढारी - सासरा, ही मृत सून आणि हा..हा त्या दुर्दैवी महिलेचा पती.."
"म्हणजे दोघांनी मिळून.."
"होय! बापाने आणि मुलाने मिळून, संगनमताने तिचा खून केला. नंतर एखाद्या सराईत खाटकाप्रमाणे तिचे तुकडे-तुकडे केले आणि काल अनेकांनी ते मिटक्या मारत खाल्लेही असणार! त्यांनी सुनेच्या आणि वंशाच्या रक्ताची किंमतही वसूल केली."
"मग?"
"मग काय? मला तो आमच्या साहेबांचा मित्र आहे हे माहिती होते. मालक नसताना आणि संपादक सुट्टीवर असताना उप- संपादकांना भांडून मी तो लेख गवाक्षमध्ये छापून आणला."
"तुझे मालक रागावणार नाहीत?"
"नाही. मला पूर्ण विश्वास आहे. वर्तमानपत्रावर,प्रामाणिकतेवर निष्ठा असलेले सुजनतामतचे माझे मालक माझ्यावर रागावणार नाहीत उलट मला घसघशीत बक्षीस देतील. चल तर बघूया. शहरात कशी धमाल उडाली असेल ते..."
"बस..." पीयूषच्या आवाजाने अशोक भानावर आला. दोघेही निःशब्दपणे शहराबाहेर आले. जवळच्या पुलावर दोघे बसताच अशोक म्हणाला,
"पण तू तर काल म्हणालास की, तुझे मालक..."
"होय रे. पण माझा भ्रम होता रे तो. मालकाने आजवर फक्त माझा उपयोगच करून घेतला रे."
"तो कसा रे?"
"तो एका-एका पुढाऱ्याकडे बोट दाखवत गेला आणि मी त्या पुढाऱ्यांवर भुंकत गेलो. त्यांच्या पाठीशी लागून त्यांचे काळे धंदे उजेडात आणत गेलो. परंतु काल समजले की, मी ज्यांना जनतेसमोर नागडं केलं ते मालकाचे विरोधक होते. मालकाने माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांना नामोहरम केलं. परंतु काल प्रथमच मी त्यांनी बोट न दाखविलेल्या आणि त्यांना अंधारात ठेवून हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं तो त्यांचा जवळचा मित्रच निघाला. त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. आज सकाळीच त्यांनी मला बोलावून घेतले आणि.. आणि.."
"ते जाऊ दे. झाले ते वाईटच झाले परंतु आता तुझी प्रामाणिक पत्रकारितेचे भूत..."
"नाही. छट् मी अशा हरामखोरांना भीक नाही घालणार. यांच्या छाताडावर पाय ठेवून नाही माझं 'काकदृष्टी' गगनाला भिडवलं तर नाव नाही सांगणार. समजतात काय स्वतःला? चेहऱ्यावर मुखवटा घालून माझ्याशी खेळता काय? एका एका गिधाडाला शोधून नाही जनतेसमोर..."
"अरे, ते बरोबर आहे. पण त्यासाठी काकदृष्टी हे आपलं वर्तमानपत्र तर सुरू करावे लागेल ना?"
"करणारच आहे. काय झाले माझ्या कर्जाचं? तुझे साहेब आज निर्णय देणार होते ना?"
"हो देणार होते. त्यांनी निर्णय दिलाय."
"कधी मिळेल रे कर्ज?" पीयूषने घाईघाईने विचारले.
"मिळणार नाही."
"का..य? पण का नाही मिळणार?"
"साहेबांनी त्यावर सकारात्मकता दर्शवली होती. पण तेवढ्यात त्यांना कुणाचा तरी फोन आला..."
"आणि त्यांनी नकार दिला. तो फोन नक्की माझ्या मालकाचाच असणार. त्याच गाढवाने डाव साधलाय..नक्कीच! थांबा. वेळ लागेल. दुसरी बँक शोधेल. बँकेची का कमी आहे? अनेक सहकारी बँका आहेत."
"बरे ते जाऊ देत. मीता काय म्हणते?" प्रसंगतील ताण कमी व्हावा आणि पीयूष मोकळा व्हावा म्हणून अशोकने विचारले.
"ती काय म्हणणार? ती तर कपाळावर जणू मुंडावळ बांधून बसलीय. मी तिला मंगळसूत्र कधी घालतोय ती वाट पाहत."
"मग कशाची वाट पाहतोस? तुला या परिस्थितीत तशाच एखाद्या प्रेमाच्या माणसाची गरज आहे.
आता वेळ घालवू नकोस. मीताला घरात आण. तिच्या आगमनाने तुला धीर येईल. गमावू पाहणारा आत्मविश्वास..."
"ते झाले रे. पण आईला सांगायला हवे. ती ऐकेल..."
"आपण माझ्या बाबांच्या मार्फत सांगू. बाबांचा शब्द काकू टाळणार नाहीत."
"सांग काकांना पण माझी एक अट आहे."
"अरे बाबा, मी तुझा मित्र आहे. अटी घालायला सासरा नव्हे."
"तू माधवीशी लग्न करणार आहेस?"
"माझं तुझ्यासारखं नाही. आमचं तसं काही नाही आणि मला आत्ताच लग्न करायचे नाही."
"अरे, पण का? चांगली बँकेत नोकरी आहे. माझ्यासारखा बेकार नाहीस. थांब. मी याविषयावर काकांशीच चर्चा करतो."
"बरे. बघू. चल.." अशोक म्हणाला. घरी परतताना ताण बराच कमी झाला होता. पीयूष पूर्वीप्रमाणे खिदळत नसला तरी बराच मोकळा झाला होता. बोलत बोलत दोघे अशोकच्या घरी पोहोचले. त्यांना पाहताच सुबोधने विचारले,
"का रे, पीयूष? सुट्टी आहे का?"
"नाही काका. नोकरी गेली."
"गेली? पण का?"
"बाबा, ते नंतर सांगतो मला तुम्हाला एक सांगायचे आहे. इथल्या न्यायालयात एक मुलगी आहे. तिचे आणि आपल्या पीयूषचे एकमेकांवर प्रेम आहे."
"अरे,वा! खुपच प्रगती केलीस की." सुबोध हसत म्हणाला.
"बाबा, तुम्ही काकूंना सांगायचे आहे आणि यांचा बँड वाजवायचा आहे."
"एवढंच? आज सायंकाळी बोलतो. मग झाले? पीयूष, जरा तुझ्या मित्रासाठीही बघ."
"बाबा.." असे म्हणत अशोक चक्क लाजला
"काका, अशोकचेही जमतयच की."
"म्हणजे? याचंही कुठे मेतकुट जमलंय की काय?"
"बाबा, तसे काही नाही हो."
"काका, तुमच्या शेजारी राहणारी..." पीयूषचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच सुबोधने विचारले,
"कोण? माधवी?"
"बाबा, नाही हं. मला सध्याच लग्न करायचे नाही. बँकेची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं आहे."
"ते काही नाही रे. आता मलाही होत नाही. घरात सून आलीच पाहिजे." स्वयंपाक घरातून बाहेर येत सुहासिनी म्हणाली.
"मी सांगितले ना, नाही म्हणून.." असे म्हणत अशोक बाहेरच्या दारात आला. समोर तिच्या घराच्या दारात उभ्या असलेल्या माधवीने मधाळ हसून त्याचे स्वागत केले परंतु अशोकने नेहमीप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष केले...
त्याच सायंकाळी सुबोध, सुहासिनी आणि अशोक जेवायला बसले असताना सुहासिनीने पुन्हा तो विषय छेडला. ती म्हणाली,
"खरेच. माधवी सून म्हणून आली तर किती छान होईल."
"अग, आधी पूर्ण विचार कर."
"का... का.. माधवी सुंदर आहे की, पाहण्यातली आहे."
"ते आहे ग, पण जरा फटकळ आहे. उगीच तुमच्या दोघींमध्ये भांडणे व्हायला नको."
"भांडणे होणार नाहीत आणि काही नाही. फटकळ आहे पण अवखळही आहे. संसाराचा भार पडला की सारं विसरेल."
"माझा कुणी विचार करणार आहे का? मला आत्ताच लग्न करायचे नाही." असे कुरकुरत अशोक ताटावरून उठून गेला...
खोलीत बसलेल्या अशोकच्या मनात आले, 'हे सारे का माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत? ती माधवीही तशीच. जाता-येता समोर काय येते? माझ्याकडे पाहून हसते काय? कुणी समोर नसताना बोलण्याचा काय प्रयत्न करते? काही तरी निमित्त काढून घरी काय येते? कुणी पाहत नाही किंवा समोर कुणी नाही हे पाहून वाकुल्या काय दाखविते? काय करावे? तशी माधवी खूप सुंदर आहे म्हणा. पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे किंवा सिनेमातील हिरॉइनप्रमाणे आहे. आजपर्यंत मी कधीच तिच्याकडे त्या दृष्टीने पाहिले नाही...' असा विचार करणाऱ्या अशोकने घरी आणलेली बँकेची एक फाईल काढली...
अशोक पंचवीस वर्षाचा एक युवक! एम.कॉम. करून एका चांगल्या बँकेत नोकरीला लागला होता. घरीही सारी सुखे होती. कशाची कमी नव्हती. पण का कोण जाणे तारुण्यात पाऊल टाकलेल्या अशोकची स्थिती काही वेगळीच होती. तारूण्याची चाहूल लागताच शरीरात धावणारी चंचलता जणू त्याच्याकडे फिरकलीच नाही. तारूण्याची शारीरिक लक्षणे दिसत असली तरीही त्याचं वागणं कसं निराळंच होतं. तशी त्याची शरीरयष्टी लहानपणापासूनच किडमिडीत होती. विशेषतः किडनीच्या आजारानंतर त्याचे शरीर म्हणावे तसे भरलेच नाही. तो कृशच राहिला.घरातील वातावरण त्याच्या एकलकोंडा या वृत्तीला साजेसे आणि पूरक ठरत गेले. तो कुणाशी विशेष बोलायचा नाही, कुणाशी मिळून मिसळून राहायचा नाही. तो जे काही मोकळेपणाने बोलायचा तो पीयूषशी. त्यातच बायका, मुली समोर आल्या की, त्याचं लाजाळूचं झाड होत असे. लाजाळूचे झाड स्पर्शाने अंग आकसून घेते.परंतु अशोक स्त्रीच्या चाहूलीने अंग आकसून घेत असे, अबोल होत असे. तारुण्यात पाऊल टाकलेल्या तरुणाचे प्रमुख लक्षण म्हणजे समोर येणाऱ्या महिलेचे आणि त्यातही तरुणीचे निरीक्षण करणे, तिच्या शरीरावर नजर फिरवणे. परंतु अशोकचे उलटे असे. समोर तरुणी आली की, तो दुसरीकडे लक्ष वळवायचा. कामच पडले तर तिथून निघून जायचा...
बँकेची फाईल घेऊन बसलेल्या अशोकचे लक्ष कामात लागत नव्हतं. राहून राहून त्या फाईलमध्ये माधवीचे चित्र सजीव होत असे. त्यामुळे कधी नव्हे ते कामात अशोकच्या चुका होऊ लागल्या. शेवटी कंटाळून त्याने फाईल बंद केली आणि त्याच्या मनात विचार आला,
'खरेच माधवीशी लग्न झाले तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. माधवीसारखे सौंदर्य मला विनासायास मिळेल का? बाबांनी मनावर घेतले तर मिळेलही पण तिने नकार दिला तर? पण ती नकार का देईल? शिक्षकाची मुलगी आहे. परिस्थिती जेमतेम आहे. तशा गृहस्थाला बँकेत काम करणारा जावई मिळत असेल तर ते का नकार देतील? पण माधवीचं काय? तिचं माझ्यावर प्रेम असेल का? तिच्या स्वप्नातला राजकुमार दुसरा कुणी असला तर? पण तिचे इशारे, तिचं वागणं? तो तिच्या वागण्यातला सहजपणा असू शकेल. ती त्या दृष्टीने माझ्याकडे पाहतही नसेल. माझ्यासारखा धष्टपुष्ट नसलेला, कमावलेला शरीर नसलेला तरुण तिच्या मुसमुसलेल्या शरीराचे समाधान करु शकेल? तिचे समाधान करु शकेल?...' तशा विचारात गुरफटलेल्या अशोकला काही महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग आठवला...
पीयूषचे गवाक्ष सदर सुरू झाले होते. सुजनतामतमध्ये त्या लेखमालेने विशेष लोकप्रियता मिळवली होती. वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः भेटी देऊन पीयूष माहिती गोळा करायचा. बातम्यांसाठी तो वणवण फिरायचा. बातमी येण्याची वाट न पाहता तो बातमीकडे धाऊन जात असे. त्यामुळे गवाक्षमधील लेखांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा असायचा. एका सायंकाळी पीयूष म्हणाला,
"आशक्या, एक बातमी द्यायची आहे रे."
"मग दे की. त्यात विचार काय करतोस?"
"पण त्या बातमीसाठी मला बाहेर जावं लागेल."
"मग जा की. भटकंतीची तुला हौसच आहे."
"हौस आहे रे. पण ही बातमी थोडी नाजूक आणि वेगळी आहे."
"अरे, अशी कोणती बातमी आहे?"
"त्यासाठी वेश्यालयात जावे लागेल."
"का..य? अशी बातमी द्यायची काही आवश्यकता आहे का?"
"तसे नाही रे. पण ही एक वेगळी बातमी ठरेल. आजपर्यंत कुणी दिली नसेल अशा स्वरूपात मी लिहिणार आहे. त्यासाठी आपल्याला तिथे जावे लागेल."
"का..य? आपल्याला? म्हणजे मला? छे! छे! नको रे बाबा! मला काही अनुभव नाही. तशा ठिकाणी जाताना कुणी पाहिले म्हणजे?"
"अरे, तिथे जायचे म्हणजे काही 'ते' करायचे नाही." पीयूष म्हणाला.
"मग?"
"फक्त माझ्यासोबत राहायचं. मला आधार म्हणून.."
"नाही रे बाबा, नाही. मला.."
"जमेल. का नाही जमणार?"
"मी नाही येणार.." अशोक ठामपणे म्हणाला.
"तुला यावेच लागेल.. माझ्यासाठी." पीयूषही निर्धाराने म्हणाला.
शेवटी सायंकाळी ते दोघेही त्या वस्तीत शिरले. वातावरण कसे वेगळेच होते. सायंकाळ होत आली होती. परंतु दिव्यांचा झगमगाट नव्हता तर एक वेगळाच अंधुकसा प्रकाश वातावरणात पसरला होता. एका आगळ्यावेगळ्या घमघमाटाने त्यांचं स्वागत केलं. रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणी निरनिराळे चाळे करीत त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होत्या. येणारांची वर्दळ हळूहळू वाढत होती. येणारा प्रत्येक जण स्वतःला स्वतः पासून लपवत कुठेतरी गडप होत होता. पीयूष आणि अशोक दोघे त्या वस्तीत फिरत होते. पीयूष तरूणींचे, दलालांचे बारकाईने निरीक्षण करीत होता, कुणाशी चर्चाही करीत होता तर अशोकला त्या वातावरणात गुदमरून गेल्याची भावना जाणवत होती. त्या वस्तीतून कधी एकदा बाहेर पडावे अशी त्याची स्थिती झाली होती. परंतु पीयूष मात्र भरपूर काही माहिती मिळवत होता. शेवटी पीयूष अशोकला घेऊन एका खोलीत शिरत असताना अशोकने विचारले,
"पीयूष, हे काय?"
"थांब. आता फायनल शॉट! एका मुलीची मुलाखत घेऊया..." तितक्यात एक मुलगी त्यांच्याजवळ आली. तिच्याकडे पाहण्याचे धाडस अशोकजवळ नव्हते. पीयूष म्हणाला,
"अशोक, बस. मी आलोच." असे म्हणत पीयूष त्या मुलीसोबत शेजारच्या खोलीत गेला. अशोक जणू घुटमळणारा जीव हातात घेऊन बसलेला असताना आवाज आला,
"ऐ..ऐ.. शू..शू..." अशोकने आवाजाच्या दिशेने पाहिले. अत्यंत तोकड्या कपड्यातील एक तरुणी त्याच्याकडे पाहून इशारे करीत होती. ती त्याच्या दिशेने निघाली. परंतु सर्वांगात भीतीची चाहूल शिरताच अशोक पटकन उठला आणि धावत सुटला...
घड्याळात दहाचे सुमधुर संगीत कानावर पडले आणि अशोक भानावर आला. परंतु विचारांनी त्याची पाठ सोडली नाही. त्याला वाटले, ' वेश्यालयातील त्या तरुणीला पाहताच तो का पळत निघाला? का का नाही तिच्या मिठीत शिरलो? माझ्यामध्ये काही कमतरता तर नाही ना? त्या वस्तीतल्या मुलींचे हावभाव, त्यांचे इशारे पाहून आणि महत्त्वाचे म्हणजे ती मुलगी अनायासे जवळ येत असतानाही माझ्या भावना उद्दिपीत का झाल्या नाहीत? मी त्याबाबतीत अधू तर नाही? उद्या माधवीसोबत लग्न झाले आणि मी तिला ते समाधान, तो आनंद देऊ शकलो नाही तर? माधवी उपाशी राहताना तळमळू लागली तर? कंटाळून, त्रासून, शारीरिक भुकेने व्याकूळ झालेल्या माधवीने वेगळे पाऊल उचलले तर? तिने स्वतःच्या सुखाचा मार्ग इतरत्र शोधला तर? नको त्या बदनामीच्या जाळ्यात आजीवन गरगरत राहण्यापेक्षा लग्नच केले नाही तर झाकली मुठ झाकलीच राहील. माझा दोष जगजाहीर तर होणार नाही?...' अशा विचारात अडकलेल्या अशोकला रात्री उशिरा झोप लागली....
काही दिवसांनंतर सारे जण सकाळी चहा घेत बसले असताना सुबोधने विचारले,
"अशोक, लग्नाच्या संदर्भात काय विचार केलास तू?"
"बाबा, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, मला आत्ताच लग्न करायचे नाही."
"अरे, पण का?"
"आई, मी एकदा सांगितले ना..."असे म्हणत तणतणत अशोक आतल्या खोलीत निघून गेला. कुणी काही बोलणार तितक्यात माधवी रडतरडत तिथे आली. तिची तशी अवस्था पाहून सुहासिनीने घाबरत विचारले,
"माधवी, काय झाले? तू अशी का रडतेस?"
"का..का..काकू, मला वाचवा."
"पण झाले तरी काय?"
"क..क..काकू, कसं सांगू?"
"तू सांगितले नाही तर काही समजणार आहे का?"
"माझे.. माझे.. अशोकवर प्रेम आहे..."
"खरे सांगतेस? पण त्याचेसुद्धा तुझ्यावर प्रेम आहे का?" सुहासिनीने विचारले.
"कारण तो तर लग्नच करीत नाही म्हणतोय." सुबोध म्हणाला.
"पण काकू...काका, त्याला जबाबदारी टाळता येणार नाही."
"म्हणजे?"
"कसे सांगू काकू तुम्हाला? अहो, अशोकपासून मला.. मला दिवस.."
"मा..ध..वी.." सुहासिनी तिच्यावर ओरडली. तशी माधवी म्हणाली,
"खरेच हो काकू. शपथ घेऊन सांगते. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि त्याच भावनेच्या भरात आम्ही एक दिवस वाहवलो आणि..."
"अशोक.. अशोक.." सुबोधने आवाज दिला आणि अशोक बाहेर आला. त्याला पाहताच सुबोध जोरात म्हणाला,
"आम्हाला लग्नच करायचे नाही म्हणतोस आणि माधवीसोबत..."
"पण बाबा..."
"खबरदार! एक शब्द बोलू नकोस. माधवी बाळा, तू तुझ्या घरी..."
"नाही. काका, कुणालाच सांगितले नाही."
"छान केलंस. आताही कुणाला सांगू नको. पुढले मी बघतो. काही दिवसातच पीयूषचे लग्न आहे. त्याचदिवशी तुमच्याही लग्नाचा धुमधडाक्यात बार उडवू. आता खुश ना." सुबोध म्हणाला तशी माधवी सुबोध-सुहासिनीला नमस्कार करून निघाली. गोंधळलेल्या अशोकला काहीच बोध होत नव्हता. तो जात असलेल्या माधवीकडे पाहत असत कुणाचे लक्ष नाही हे पाहून माधवीने गर्रकन मान वळवून अशोकला अंगठा दाखवताना जीभ दाखवून वेडावले...
*****