कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्याने गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं व एका बाजूला चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. चहा तयार होताच त्याने तो कपात ओतला व कप घेऊन तो थेट व्हरांड्यात आला. पण रावसाहेब तिथे नव्हते. इतक्या वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं. बाळू अंगणात गेला पण तिथेही रावसाहेब दिसत नव्हते. बाळू पुन्हा वाड्यात आला. तो थेट रावसाहेबांच्या खोलीपाशी आला. आतून घोरायचा आवाज येत होता. बाळूने हळूच खोलीचा दरवाजा सरकवला. आत बेडवर रावसाहेब गाढ झोपले होते. बाळूने दरवाजा पूर्ण उघडला व तो हळूच आत गेला. आज पहिल्यांदाच तो रावसाहेबांच्या खोलीत आला होता. समोरच्या भिंतीवर एक पेंटिंग लावलं होतं. ते एका नर्तकीचं पेंटिंग होतं. एवढी सुंदर बाई त्याने स्वप्नात देखील कधी पाहिली नव्हती. जवळून पाहण्यासाठी तो अजून पुढे गेला पण वाटेत ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याला त्याचा पाय लागला व तांब्या घरंगळत जाऊन समोरच्या भिंतीला टेकला. त्या आवाजाने रावसाहेब खडबडून जागे झाले. त्यांनी डोळे उघडताच समोर वेडा बाळू उभा. तो अजूनही त्या भिंतीवरील चित्राकडे पाहत होता. बाळूला आपल्या खोलीत आलेला पाहून रावसाहेब संतापले व बाळूवर ओरडले – “गाढवा, निघ इथून आणि माझा चहा आण.” रावसाहेबांचा ढगांच्या गडगडाटासारखा आवाज ऐकताच बाळू भानावर आला व तिथून पळाला.
काही क्षणातच तो चहाचा कप घेऊन आला व रावसाहेबांच्या खोलीच्या दारात आत पाहत उभा राहिला. दारात उभ्या बाळूकडे पाहून रावसाहेब नेहमीप्रमाणे खेकसले – “पाहतोस काय असा वेड्यासारखा. तो चहा टेबलावर ठेव अन निघ इथून.” एवढा ओरडा खाऊनसुद्धा बाळूच्या चेहऱ्यावरचं गबाळं हसू तसुभरदेखील कमी झालं नाही. त्याने चहाचा कप टेबलावर ठेवला व तिथून निसटला. काही क्षणातच रावसाहेबांनी त्याला बोलावलं व तो समोर दिसताच ते पुन्हा खेकसले – “बेअक्कल आहेस का? चहा गरम द्यायचा असतो एवढी सुद्धा अक्कल नाही का तुला?” पुढचं ऐकायला बाळू तिथे थांबलाच नाही. तो थेट स्वयंपाकघरात पळाला. थोड्याच वेळात तो हातात गरम चहाचा कप घेऊन आला व त्याने कप टेबलवर ठेवला. बाळू रावसाहेबांकडे पाहत वेड्यासारखं हसत उभा राहिला. रावसाहेबांनी चहाचा कप हातात घेतला व ते पुन्हा बाळूवर गरजले – “असा वेड्यासारखा काय बघतोयस? जा गोठ्यात जाऊन शेण गोळा करून आण.”
रावसाहेबांचं डोकं प्रचंड ठणकत होतं. चहाचा घोट पोटात गेल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. पण राहून राहून एकच विचार त्यांच्या मनात येत होता. ‘आपल्याला नेहेमीच्या वेळेला जाग कशी नाही आली?’ गेल्या दहा वर्षात कोंबडा अरवला आणि रावसाहेब झोपेतून उठले नाहीत असं कधीच झालं नव्हतं. आता आपलं वय झालय याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी चहा संपवला, प्रातर्विधी उरकुन गावात फेरफटका मारण्यासाठी ते वाडयाबाहेर आले.
रावसाहेब गावातलं भारदस्त व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या तापट, संतापी स्वभावामूळे गावातील लोक त्यांच्यापासून चार हात लांबच रहायचे. हा वाडा रावसाहेबांच्या आजोबांनी बांधला होता. ते गावाचे सरपंच होते. त्या काळी एखाद्या राजासारखा त्यांचा थाट होता. वडिलोपार्जित शेती होती. गोठ्यात गुराढोरांची रांगचरांग असायची. वाड्यात गाडीमाणसांचा राबता असायचा. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. त्यांची बायको फार लहानवयात वारली पण त्यांनी पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न केलं नाही. त्यांचा मुलगा मात्र अतिशय नालायक निघाला. त्यांच्या निधनानंतर घराण्याला उतरती कळा आली. त्यांच्या जुगारी आणि व्यसनी मुलाने सर्व काही घालवलं. खरंतर रावसाहेबांच्या मामाने त्यांच्या वडिलांना लुबाडले. रावसाहेब मात्र पहिल्यापासूनच अतिशय मेहनती आणि शिस्तप्रिय होते. त्यांचं आपल्या वडिलांशी कधी पटलंच नाही. आईचे मात्र ते फार लाडके होते. मिलीटरीत जाऊन देशसेवा करायची हे त्यांचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं व ते त्यांनी पूर्णही केलं. त्यांचं सारं शिक्षण गावातच झालं. त्यानंतर ते आर्मीत भरती झाले. त्यांच्या हुषारीमुळे व शिस्तप्रिय स्वभावामुळे खूप कमी वेळात त्यांना बढती मिळत गेली. शेवटी ब्रिगेडियर पदावर असताना ते निवृत्त झाले. निवृत्त होऊन आता त्यांना दहा वर्ष झाली होती. तेव्हापासून ते वाड्यावरच रहात होते.
वाड्यात रावसाहेब एकटेच रहात होते. अर्थात सोबतीला बाळू होताच. रावसाहेबांच्या तापट स्वभावामुळे कोणताच नोकर वाड्यावर फार काळ टिकत नसे. शेवटी त्यांचा एक मित्र बाळूला त्यांच्याकडे घेऊन आला. “थोडा वेडसर आहे पण सगळ्या प्रकारची कामे करतो. स्वयंपाक तर अतिशय सुंदर बनवतो. माझ्याकडे दोन वर्ष कामाला होता. पण आता मीच मुंबईला माझ्या मुलाकडे रहायला चाललोय. म्हणून याला तुमच्याकडे घेऊन आलो” एवढे बोलून बाळूला रावसाहेबांच्या ताब्यात देऊन मित्र गेला. बाळूचं गबाळं रूप पाहून, त्याच्या चेहेऱ्यावरचं ते वेडगळ हसू पाहून हा काही काम करू शकेल असं रावसाहेबांना बिलकुल वाटलं नव्हतं. पण काही दिवसातच बाळूने त्यांचा समज चुकीचा ठरवला. काहीवेळा सांगितलेलं काम विसरायचा पण त्याने कामचुकारपणा कधीच केला नाही आणि मुख्य म्हणजे रावसाहेबांच्या शिव्या गपगुमान ऐकून घ्यायचा आणि तेही अगदी हसतमुखाने. बाळूला वाड्यावर येऊन आता जवळपास सहा वर्ष झाली होती. बाळू जेव्हा पहिल्यांदा वाड्यात आला तेव्हा त्याने कुत्र्याचं एक पिल्लुही सोबत आणलं होतं. त्या पिल्लाला बाळूने “शेरु” असं नावही दिलं होतं. बाळू रोज चहा, जेवण बनवण्यापासून ते अगदी शेणाने अंगण सारवण्यापर्यंत सगळी कामं करायचा. कामं संपल्यावर जेव्हा त्याला मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तो शेरुशी खेळायचा. शेरु आता चांगलाच दांडगा झाला होता पण अजूनही “शशशश्शेरू….” अशी बाळूची हाक ऐकताच शेरु शेपटी हलवायचा. बाळू बोलताना फार अडखळायचा. बाळू जेव्हा गावात आला तेव्हा गावातल्या उनाड मुलांना एक नवीन विषय मिळाला होता. बाळूचं गबाळं रूप, त्याच्या चेहऱ्यावरचं वेडगळ हास्य, त्याचं अडखळत बोलणं हा या उनाड मुलांसाठी चेष्टेचा विषय होता. बाळू रस्त्यावरून जात असला की ही मुलं त्याच्या मागे “वेडा बाळू, वेडा बाळू” असं ओरडत फिरायची. मधूनच एखादं आगाऊ पोरगं बाळूवर दगड फेकायचं. दगड लागताच बाळू “आई ग……” असं म्हणून कळवळायचा. त्याचं हे कळवळणं पाहून ती मुलं फिदीफिदी हसायची. बाळूने मात्र कधी त्या वात्रट मुलांकडे लक्ष दिलं नाही. काहीही झालं तरी त्याच्या चेहेऱ्यावरचं वेडगळ हास्य कायम असायचं.
बाळूच्या भूतकाळाबद्दल आणि खासकरून बाळूचा वेडा बाळू कसा झाला याबद्दलच्या अनेक कथा गावात प्रचलित होत्या. कोणी म्हणत त्याच्या वडिलांनी तो लहान असताना दारुच्या नशेत त्याच्या डोक्यात काठी हाणली त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, कोणी म्हणे त्याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं त्या मुलीने नकार दिला त्यामुळे तो वेडा झाला, कोणी म्हणे बाळू शाळेत असताना फार हुशार होता पण त्याला अचानक जोराचा ताप आला व तापामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. अशा बऱ्याच कथा गावातील लोक सांगत पण नक्की खरं काय आहे ते कळायला मार्ग नव्हता कारण स्वतः बाळूला जर कोणी हा प्रश्न विचारला तर तो नेहमीप्रमाणे वेडगळ असत “म्म्ममाहित ननननाय…” हे एकच उत्तर देई.
रात्रीचं जेवण झाल्यावर रावसाहेब बाहेर शतपावली मारून आले व त्यांच्या खोलीत जाऊन अंथरुणावर आडवे झाले. त्यांचं लक्ष समोरच्या टेबलावरच्या चहाने भरलेल्या कपाकडे गेलं आणि ते कडाडले. त्यांचा आवाज ऐकताच बाळू धावत आला. सकाळी आणलेला चहाचा कप परत न्ह्यायला तो विसरला होता. रावसाहेब पुन्हा कडाडले – “हा कप काय तुझा बाप उचलणार का?” बाळूने झटपट कप उचलला व तो तिथून निघाला. बाळू जाताच रावसाहेबांचं लक्ष समोरच्या भिंतीवर लावलेल्या चित्राकडे गेलं आणि त्यांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
रावसाहेबांची आर्मीत भरती झाली आणि त्यांना काश्मीरला पोस्टिंग मिळालं. एक वर्ष ड्युटी केल्यावर त्यांना दोन महिन्यांची सुट्टी मिळाली आणि ते गावी परत आले. गावात येताच त्यांचं जोरदार स्वागत झालं. दुसऱ्याच दिवशी रावसाहेबांभोवती मित्रांचा गराडा पडला. रात्री सर्व मित्र वडाच्या झाडाखाली पारावर जमले. सर्वात मधोमध रावसाहेब बसले होते. ते मिलिटरीतले अनुभव अगदी रंगवून सांगत होते व त्यांचे मित्रदेखिल अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. अचानक रावसाहेब बोलायचे थांबले. समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींनी त्यांचं लक्ष वेधलं होतं. खासकरून पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या मुलीवरून तर त्यांची नजरच हटत नव्हती. ती मुलगीही रावसाहेबांकडे पाहून खट्याळ हसली. रावसाहेब बोलायचे थांबताच सगळे मागे वळून पाहू लागले आणि काय चालू आहे ते त्यांना समजलं. तसा एकजण मुद्दामच म्हणाला, “रावसाहेब तुम्ही काहीतरी सांगत होतात ना!” त्याच्या आवाजाने रावसाहेब भानावर आले आणि काही झालंच नाही अशा आवेशात ते पुन्हा बोलू लागले.
दुसऱ्या दिवशी रात्री रावसाहेबांचा एक मित्र वाड्यावर आला. त्याने आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे तेव्हा लवकर आवर असे रावसाहेबांना सांगितले. कुठे जायचय असं रावसाहेबांनी त्याला विचारलं पण तो सांगायला तयार नव्हता. सुरुवातीला “कुठे जायचय सांग त्याशिवाय मी येणार नाही” असं म्हणत रावसाहेब हटून बसले होते पण मित्राच्या आग्रहासमोर शेवटी त्यांनी हार मानली. ते दोघे वाड्यातून बाहेर पडले. रावसाहेब मित्राच्या मागून चालत होते. थोड्यावेळाने ते एका मोठ्या तंबूपाशी पोहोचले. तो तमाशाच्या फडाचा तंबू पाहून रावसाहेब चांगलेच संतापले. “तुला माहितीये ना असल्या फालतु गोष्टीत मला रस नाही. तरीही तू मला इथे घेऊन आलास!” मित्राचं रावसाहेबांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्याने ओढतच रावसाहेबांना तंबूत आणलं. त्यांची किरकिर अजूनही सुरूच होती. तंबूत चांगलीच गर्दी जमली होती. समोर लाकडाच्या फळ्या जोडून मंच बनवला होता. लोकांचा नुसता गोंधळ चालला होता. अगदी तरुण मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत अनेक माणसं तमाशा बघायला आली होती. चंदनबाई कधीएकदा मंचावर येतेय याची सगळे वाट पाहत होते. आता तुंतुण्याचे स्वर वाजू लागले तसे लोक शांत झाले. आता एकेक करत बायका मांचावर येऊ लागल्या. सगळ्यात शेवटी चंदनबाई मंचावर आली. तिने मंचावर येताच खाली वाकून मांचाला नमस्कार केला तसा सगळ्यांनी एकच गलका केला. रसिकांच्या शिट्टी आणि आरोळ्यांनी तंबू दणाणला. रावसाहेबांनी समोर पाहिलं. सर्वात मागे उभ्या असलेल्या एका तरुण मुलीकडे त्यांची नजर जाताच त्यांचा चेहेरा खुलला. काल रात्री जिच्याशी त्यांचा नजरेचा खेळ चालला होता तीच मुलगी समोर उभी होती. तिला पाहताच रावसाहेबांच्या मनातली नाराजी कुठल्याकुठे पळाली होती.
आता नाच-गाण्याला सुरुवात झाली होती. चंदनबाई स्वतःच गात होती. तिचा आवाज फारच मधाळ होता. तिचा कटाक्ष आपल्यावर एकदातरी पडावा या साठी लोकं धडपडत होती. रावसाहेबांची नजर मात्र अजूनही त्या मुलीवरच खिळली होती. ती बेभान होऊन नाचत होती. तिने जेव्हा रावसाहेबांना आपल्याकडे पाहताना पाहिलं तेव्हा ती चक्क लाजली. त्या दोघांच्या नजरेचा खेळ पुन्हा सुरू झाला.
एकदाचा तमाशा संपला. एकेक करत सर्व बायका, मुली मंचाच्या मागे गेल्या. लोकांची गर्दीही पांगली. रावसाहेब आणि त्यांचा मित्रही तिथून निघाले. ती मुलगी काहिकेल्या रावसाहेबांच्या नजरेसमोरून जात नव्हती. “काय रावसाहेब, काशी वाटली चंदनबाई? फटाका आहे ना?” मित्राने विचारलं. रावसाहेबांनी मित्राच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यालाच उलट प्रश्न विचारला, “गज्या, त्या लाल साडी नेसलेल्या मुलीचं नाव काय रे?” गज्याला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. तो म्हणाला, “निम्या बायांनी लाल साडी नेसली होती. तू नक्की कोणाबद्दल बोलतोयस?” “अरे ती रे, ती डाव्या बाजूच्या कोपऱ्यात उभी होती बघ?” रावसाहेब अगदी उत्साहात म्हणाले. “अच्छा, बकुळा होय! तुझ्या मनात भरली वाटतं!” गज्या मिश्कीलपणे हसत म्हणाला. “तसं काही नाही रे. पण फार छान नाचते.” रावसाहेब साळसूदपणाचा आव आणून म्हणाले. “तुला भेटायचं असेल तर सांग मला चांगली ओळखते ती.” हे ऐकताच रावसाहेबांच्या कपाळावर आट्या चढल्या. त्यांच्या मनातील शंका गज्याने ओळखली व तो म्हणाला, “ओळखते म्हणजे आमच्यात तसं काही नाही. ती काळजी तू करून नकोस.” “अरे तुमच्यात तसं काही असलं जरी तरी मला त्याचं काय. मला फक्त तिचा नाच आवडला आणि म्हणून तिला एकदा प्रत्यक्ष भेटून तिचं कौतुक करायचं आहे एवढंच.” रावसाहेब म्हणाले. रावसाहेब कितीही लपवायचा प्रयत्न करत असले तरीही त्यांचा चेहेराच सर्वकाही सांगत होता. त्यांच्या मनात काय चालू आहे ते गाज्याला समजलं तो “चल मग आत्ताच भेटुयात तिला” असे म्हणाला आणि दोघेही आलेल्या वाटेने परत फडाच्या दिशेने चालू लागले.
थोड्याच वेळात दोघे फडापाशी पोहोचले. तंबू आता पूर्ण रिकामा होता. तंबूच्या मागच्या बाजूला बरेच लहान तंबू होते. एका तंबूच्या दारात चंदनबाई हातात तंबाखू मळत उभी होती. दोघांना तिथे पाहताच तिने विचारलं, “हिकडं काय काम हाय आता. तमाशा कवाच संपला की!” “बकुळाला भेटायचं होतं.” गज्या धीटपणे म्हणाला. “बकुळाला? अन ते कशापायी?” चंदनबाईने थोडं रागातच विचारलं. “हा माझा मित्र रावसाहेब. ह्याचं बकुळाकडे जरा काम आहे.” चंदनबाईने रावसाहेबांकडे पाहिलं व ती म्हणाली, “तुम्ही ते मिल्ट्रीवाले ना?” रावसाहेबांनी होय म्हणताच तिने बकुळाला हाक दिली. तशी बकुळा तंबूतून बाहेर आली. “खास तुला भेटाया आल्यात. बघ काय म्हनत्यात.” एवढं बोलून चंदनबाई तिच्या तंबूत गेली. “बोला की?” बकुळा रावसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय धीटपणे म्हणाली. रावसाहेबांना सुरुवात कुठून करावी तेच कळत नव्हतं. ते काहीच बोलेनात हे पाहून शेवटी गज्या म्हणाला, “हा माझा मित्र रावसाहेब. आज आम्ही तुमचा तमाशा बघितला. याला तुझा नाच खूप आवडला ते सांगायला तो इथे आला आहे.” हे ऐकून बकुळा म्हणाली, “हे तू कशापायी सांगतूस. तुझ्या मित्राला बोलाय तोंड नाय का? अन काय हो रावसाहेब तुमास्नी फकस्त माझा डॅन्स आवडला, मी न्हाई आवडले व्हय.” हे ऐकून गज्या आणि रावसाहेब दोघेही एकदम हबकले. स्वतःला कसंबसं सावरून रावसाहेब म्हणाले, “तसं काही नाही. तुम्ही दिसता पण खूप छान.” रावसाहेब एवढं बोलले खरे पण आपण हे कसं काय बोललो हे त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. गज्या तर नुसता आश्चर्यचकित होऊन पाहत होता. रावसाहेब असं काहीतरी बोलतील याची त्यालाही कल्पना नव्हती. खरा धक्का तर बकुळाने दिला. ती म्हणाली, “मी तुमास्नी कालच्या रातीला जवा बघितलं तवाच तुमी मला आवडला हुता.” या मुलीला कसली भिडभाडच नव्हती. एवढं बोलून ती तंबूत पळाली. परतीच्या वाटेवर दोघही शांतपणे चालले होते. कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. रावसाहेबांचं मन पूर्णपणे बकुळामय झालं होतं. एवढी धाडशी आणि स्पष्ट बोलणारी मुलगी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. तिच्यातली एक गोष्ट त्यांना सर्वात जास्त भावली होती. तिच्या बोलण्या वागण्यात एक प्रकारचा निरागसपणा होता.
रावसाहेब आणि बकुळा यांच्या भेटीगाठी आता वाढल्या होत्या. त्यांच्यातल्या प्रेमाने परिसीमा गाठली होती. त्यांच्या संबंधाची चर्चा आता गावभर झाली होती. पाहता पाहता दोन महिने संपले. रावसाहेबांनी बकुळाची शेवटची भेट घेतली आणि ते परत काश्मीरला जायला निघाले. काश्मीरला पोहोचताच रावसाहेबांची ड्युटी पुन्हा सुरू झाली. पण अजूनही बकुळा काहिकेल्या त्यांच्या डोक्यातून जात नव्हती. आता त्या दोघांमध्ये पत्रांद्वारे संवाद सरु झाला होता. बकुळाला लिहिता वाचता येत नव्हतं त्यामुळे गज्या तिला रावसाहेबांची पत्र वाचून दाखवी. तसेच ती तिच्या मनातील भावना गज्याला सांगायची व गज्या त्या पत्रात लिहून पत्र रावसाहेबांना पाठवायचा. हे असं कित्येक महिने चालू होतं. एकदाची ड्युटी संपली आणि रावसाहेब गावी आले. त्यांनी गज्याकडे बकुळाची चौकशी केली तेव्हा तमाशाचा फड आता जवळच्याच एका गावात हालल्याचं गज्याने त्यांना सांगितलं. एक दिवस रावसाहेब बकुळाला भेटायसाठी त्या गावात गेले. गज्याही त्यांच्या सोबत होता. ते दोघे फडापाशी पोहोचले. रावसाहेबांनी तिथल्याच एका बाईकडे बकुळाची चौकशी केली तेव्हा तिने बकुळा कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात ते नदीपाशी पोहोचले. समोर बकुळाला पाहताच रावसाहेब धावतच तिच्यापाशी गेले. दोघांची नजरानजर झाली आणि काही बोलायच्या आतच रावसाहेबांनी बकुळाला मिठीत घेतलं. गज्या समोर उभा आहे याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं.
रावसाहेब आणि बकुळाच्या गाठी भेटी पुन्हा सुरू झाल्या. गावात पुन्हा चर्चा सुरू झाली. ही चर्चा रावसाहेबांच्या आई-वडिलांच्या कानावर गेली होती. एक दिवस रावसाहेबांच्या वडिलांनी त्यांना बोलावलं. “मी काय ऐकतोय ते खरं आहे का?” त्यांनी रावसाहेबांना विचारलं. “तुम्ही बकुळाबद्दल बोलताय ना?” रावसाहेब न बिचकता बोलले. “हे सगळं बंद कर. माझ्या पाहण्यात तुझ्यासाठी खूप सुंदर आणि सुशील मुली आहेत. तुझं लग्न लावायचं मी ठरवलं आहे. तेव्हा हे सगळे चाळे बंद कर. आधीच गावात चर्चा सुरू आहे.” रावसाहेबांचे वडील म्हणाले. चाळे हा शब्द ऐकताच रावसाहेब चांगलेच संतापले होते पण कसंबस स्वतःला शांत करत ते अतिशय खंबीर आणि स्पष्टपणे म्हणाले, “मी बकुळाशी लग्न करणार आहे.” हे ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संतापामुळे त्यांचं सारं शरीर थरथरत होत. बराचवेळ त्यांनी आपल्या मुलाच्या नावाचा उद्धार केला, त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. रावसाहेबांनी अतिशय शांतपणे सर्व ऐकून घेतलं व ते खोलीतून बाहेर आले. दुसऱ्या दिवशी रावसाहेबांच्या आईनेही त्यांची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला पण त्यांना आता बकुळा सोडून दुसरं काहीच दिसत नव्हतं. शेवटी आईनेही हार मानली.
दुसऱ्या दिवशी सकाळी रावसाहेब फडावर गेले. बकुळाला त्यांनी बाहेर बोलावलं. दोघेही नदीच्या काठावर गेले. “आपण लग्न करूयात.” रावसाहेब बकुळाला म्हणाले. हे ऐकून बकुळा थोडी गोंधळली. तिचं रावसाहेबांवर खरोखरच फार प्रेम होतं. पण ती ज्या समाजात ज्या वातावरणात वाढली होती तिथे लग्न, संसार यासारख्या गोष्टींना थारा नव्हता. लग्न करतात म्हणजे नक्की काय करतात याची तिला कल्पनादेखील नव्हती. एकमेकांवर भरभरून प्रेम करायचं एवढंच तिला कळत होतं. ती काहीच बोलत नाही हे पाहून रावसाहेब वैतागले. डोळ्यात पाणी आणून ते म्हणाले, “तुला समजत कसं नाही बकुळा. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय!” त्यावर बकुळा म्हणाली, “तुमी म्हनता ते बराबर हाय. पन माझं तुम्हावर लै परेम हाय अन तुमचं बी माझावर लै परेम हाय, मंग लग्नाची काय गरज हाय?” आता रावसाहेब थोडे शांत झाले होते. त्यांना बकुळाच्या मनातली शंका समजली होती. ते म्हणाले, “हे बघ बकुळा. गावात तुला माझी रखेल म्हणून तुझी हेटाळणी करणारे लोक खूप आहेत. आपलं लग्न झालं तर सगळ्यांची तोंडं बंद होतील आणि तुझ्यासाठी मी माझी मिलीट्रीची नोकरी सोडायलाही तयार आहे. तेव्हा तू फक्त हो म्हण.” शेवटी बकुळा लग्नाला तयार झाली. ते दोघे गावातून पळून जाणार होते. मुंबईला जाऊन रावसाहेब नोकरी शोधणार होते.
रात्रीचे बारा वाजले होते. ठरल्याप्रमाणे रावसाहेबांनी मोजकं सामान बरोबर घेतलं. गज्या वाड्याच्या दारात आधीच येऊन थांबला होता. रावसाहेबांनी सामान गाडीत मागच्या सीटवर ठेवलं व ते गज्याच्या बाजूला बसले. थोड्याच वेळात ते फडाच्या ठिकाणी पोहोचले आणि समोरचं दृश्य पाहून रावसाहेबांना धक्काच बसला. समोरचं मैदान पूर्ण मोकळं होतं. रावसाहेबांचं अवसान गळालं आणि ते डोकं हातात धरून बाजूच्या खडकावर बसले. आता सगळं संपलं होतं. गज्या त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्याचे शब्द रावसाहेबांपर्यंत जणू पोहोचतच नव्हते. गज्याने गाडीतला टॉर्च घेतला आणि तो नदीच्या दिशेने जाऊ लागला. कदाचित कोणीतरी भेटेल अशी त्याला आशा होती. नदीकडे जाताना टॉर्चच्या उजेडात काहीतरी चमकल्यासारखं त्याला दिसलं. त्याने जवळ जाऊन पाहिलं व चमकणारी वस्तू उचलली. तो बकुळाचा फोटो होता. गज्या धावतच रावसाहेबांपाशी गेला आणि त्याने तो फोटो रावसाहेबांच्या हातात दिला. रावसाहेबांनी त्या फोटोकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तो फोटो त्यांनी शर्टाच्या खिशात ठेवला व ते तिथून निघाले.
त्या घटनेपासून रावसाहेब पूर्णपणे बदलले. ते कोणाशीच बोलत नव्हते. त्यांना वाड्याबाहेर पडून देखील आता बरेच दिवस झाले होते. त्यांच्या आईनेही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही बोलली की ते तिच्याच अंगावर खेकसायचे. त्यांचा स्वभाव दिवसेंदिवस जास्तच चिडचीडा होत होता. आता परत ड्युटीवर जायची वेळ आली होती. ते परत जातील असं कुणालाच वाटत नव्हतं पण सर्वांचाच समज चुकीचा ठरवत ते ठरलेल्या दिवशी काश्मीरला जायला गावातून बाहेर पडले. आता ते गावाला कायमचेच दुरावले होते. इतक्या वर्षात ते एकदाही गावात आले नाहीत. आले ते सैन्यातून निवृत्त झाल्यावर. वाड्यात येताच सर्वात पहिलं त्यांनी ते पेंटिंग भिंतीवर लावलं. ते पेंटिंग त्यांनी मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकाराकडून बनवून घेतलं होतं. बकुळाचा फोटोही त्यांनी अजूनही जपून ठेवला होता.
क्रमशः