काही काळापूर्वी लिखाण सार्वत्रिक करण्यासाठी मुद्रित माध्यमांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आणि या माध्यमातून लिखाण प्रसिध्द होणे ही काही सोपी प्रक्रिया नव्हती. प्रसिध्दीसाठी आलेले लिखाण प्रसिध्दीयोग्य आहे की नाही, समाजजीवनावर त्याचे काय परिणाम होतील याची खात्री करुन, त्यातील मजकूराची सत्यता पडताळून मग त्यावर संपादकीय संस्कार, मुद्रितशोधन संस्कार असे सोपस्कार पार पडल्यानंतरच ते लिखाण प्रसिध्द होत असे. आणि आजही मुद्रित माध्यमे ही किचकट परंतु आवश्यक अशी जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत आहेत.
काळानुसार सगळ्याच क्षेत्रात बदल होत चालले, त्यामुळे प्रकाशन क्षेत्र तरी त्याला अपवाद कसे असणार. याही क्षेत्रात पुढे ब्लॉगींग सारखी माध्यमे उदयास आली. ब्लॉगींगच्या माध्यमातून लेखन स्वतःच प्रसिध्द करायचे असल्यामुळे, कोणत्याही संपादकीय सोपस्काराच्या अडथळ्याविना ते प्रकाशित करता येणे सहज शक्य झाले.
पण इंटरनेटवर ब्लॉग शोधून वाचन करणारांची संख्या मर्यादित प्रमाणात असल्यामुळे ब्लॉगवरील लिखाणाला फार मोठी वाचकसंख्या गाठण्यासाठी काही मर्यादा आहेत ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. त्याशिवाय अँड्रॉईड आयओएस मोबाईल येण्यापूर्वी संगणक वापरकर्तेच ब्लॉगवरील लिखाण वाचू शकत होते. तशी या माध्यमाची लोकप्रियताही मर्यादितच आहे.
अलिकडील काळात फीचर मोबाईल फोनची पुढची पिढी म्हणजे अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर आधारित मोबाईल आले, आणि प्रकाशनाची व्याख्याच बदलून गेली. या बदलामुळे समाजमाध्यमातून झटपट प्रसिध्दीचे एक नविन विश्व लोकांच्या अक्षरशः खिशात आले. त्यातच जिओने दूरसंचारक्षेत्रात क्रांती करत स्वस्त दरात इंटरनेट उपलब्ध करुन दिल्यानंतर तर समाजमाध्यमांचा वापर अगदी मुक्तहस्ताने आणि थेट ग्रामिण भागांत सुध्दा सुरु झाला.
आत्ताच्या घडीला उपलब्ध असलेल्या समाजमाध्यमापैकी व्हॉटस्अप या समाजमाध्यमाने भारतीय वापरकर्त्यांच्या मनावर मोठे गारुड घातले आहे. लॉगीन करण्याची आवश्यकता नाही, आणि वापरायला अतिशय सोपे. या दोन ठळक वैशिष्ट्यामुळे अल्पावधीतच ते एक अत्यंत लोकप्रिय असे समाजमाध्यम ठरले. सुरुवातीच्या काळात व्हॉटस्अपचा वापर हाय, हॅलो, सुप्रभात, वाढदिवसाच्या शुभेच्छा अश्या प्राथमिक स्वरुपात केला जात होता.
पुढे पुढे लोकांच्या लक्षात आले की, कोणत्याही बंधनाशिवाय, कोणत्याही सेन्सॉरशिपशिवाय स्वतःला वाटेल ते साहित्य मग ते टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ अशा कोणत्याही स्वरुपातील असो, ते व्हॉटस्अपवर टाकून क्षणार्धात असंख्य लोकांपर्यंत पोहोचविता येतं आणि झटपट प्रसिध्दी मिळविता येते. त्यामुळे साहजिकच याची भुरळ सगळ्यांनाच पडू लागली.
पण त्यासोबतच व्हॉटस्अप हे दुधारी शस्त्र आहे याचा विसर लोकांना पडला. त्यामुळे काही चांगल्या उपयुक्त लिखाणासोबतच या माध्यमाचा उपयोग चुकीच्या, खोट्यानाट्या, दिशाभूल करणाऱ्या बातम्या, कुणा एखाद्याची बदनामी होईल असे खोडसाळ स्वरुपाचे लिखाण, प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर, किंवा पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नांवे वापरुन इतरांनी लिहलेल्या मजकूरांचे संदेश, स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखविणाऱ्या फिशिंग लिंक्सचे संदेश, चुकीच्या आणि अर्धवट वैद्यकीय माहितीवर आधारित आरोग्यविषयक संदेश, समाजात तेढ निर्माण होईल अशा संवेदनशील स्वरुपाचे लिखाण, त्याचबरोबर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि अफवा पसरविणे यासाठी होऊ लागला. त्यामुळे व्हॉटस्अपची ‘धार’ आता ‘वार’ करण्यासाठी ही वापरली जाऊ लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बरे याचे स्वरुप इथपर्यंतच मर्यादित राहिले असते तरी एकवेळ ठीक होते, पण ‘फॉरवर्ड’ नावाच्या सुविधेचा गिअर टाकून व्हॉटस्अपची गाडी आता सुसाट वेगाने निघाली आहे. हा एक प्रकारचा धोक्याचा इशारा आहे. स्पीड अलर्ट मिळताच वाहनचालक जसा वेळीच सावध होऊन वेग कमी करतो, त्याप्रमाणे आता व्हॉटस्अपच्या नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या वेगाबाबत वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे.
व्हॉटस्अपवरुन आलेला मजकूर, इमेजेस, व्हिडिओ-ऑडिओ क्लिप्स तितक्याच तत्परतेने आपल्या कॉन्टॅक्टस् मधील सगळ्यांना पटापट ‘फॉरवर्ड’ करण्याची जणू काही स्पर्धाच लागल्याचे जे चित्र सध्या बघायला मिळत आहे, त्याबद्दल वापरकर्त्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
व्हॉटस्अपवरुन आपण पुढे काय पाठवत आहोत, त्याचे काय परिणाम होणार आहेत याबद्दल फारसा विचार न करता, कसलीही शहानिशा न करता संदेश ‘फॉरवर्ड’ करत रहाणे हा लोकांच्या समाजमाध्यमावरील जीवनशैलीचा एक भाग झाला आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ नजिक रसायनाच्या टँकरचा स्फोट होऊन आग लागली आहे, त्यामुळे तो महामार्ग वाहतूकीसाठी बंद केला आहे. अशा आशयाचा संदेश कुणीतरी व्हॉटस्अपवर पाठविला. तो वाचून लोकांनीही वाऱ्याच्या वेगाने तो व्हायरल केला. परिणाम काय झाला पोलीसांना त्याचा मनःस्ताप विनाकारण सहन करावा लागला. एवढी महत्वाची बातमी वृत्तवाहिन्यावर दाखविली जात आहे की नाही हे तपासून बघण्याची तसदीही ‘फॉरवर्ड’ करण्याआधी कुणी घेतली नाही.
खोट्या अफवा पसरविणारे संदेश फॉरवर्ड केल्याने त्याचे काय परिणाम होतात याचा विचार करण्याच्या मनःस्थितित आता कुणीही राहिलेले नाहीत. यापूर्वी मुले पळविणारी टोळी आली आहे, असे संदेश व्हायरल केल्यामुळे मॉबलिचिंग प्रकारात काही जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत, पण दुर्दैवाने लोक अशा गोष्टी फार लवकर विसरतात.
अशा प्रकारच्या अफवांना आळा बसावा म्हणून व्हॉटस्अपने काही दिवसांपूर्वी जनजागृती मोहिम चालविली, एका वेळेस फक्त पाच जणांनाच संदेश फॉरवर्ड करता येण्याचे बंधन आणले. पण तरीही लोकांचा ‘फॉरवर्ड फिव्हर’ कमी व्हायला तयार नाही.
आता आणखीन एक ताजे उदाहरण बघू. मा. पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी एक उपापयोजना म्हणून २२ मार्च २०२० रोजी १ दिवसीय जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. आणि त्यानंतर सायंकाळी ५ वाजता डॉक्टर्स, व सर्व सरकारी कर्मचारी अहोरात्र सेवा देत असल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या थाळ्या वाजविण्याचेही आवाहन केले होते.
त्यावर काही मंडळींनी या उपक्रमाविषयी उपरोधिक, उपहासात्मक लिखाण केले. एकाने लिहले, ‘मोदीजींनी टाळ्या थाळ्या वाजवा सांगितले ते काल मला पटले नव्हते, पण आज पटले. ज्या कोणी ही कल्पना मोदीजींना सांगितली ते योगाच्या ५ व्या किंवा ६ व्या आयमतील योगी नक्कीच असणार इ.’ तर दुसऱ्या एकाने लिहले, ‘रविवार म्हणजे राहू २२ तारीख म्हणजे २ अधिक २ चार म्हणजे परत राहूच, एकूण मास्टरस्ट्रोक’ याप्रकारे अंकशास्त्र, ज्योतिष्यशास्त्र यांचा संदर्भ दिल्याचा अविर्भाव आणत उपहासात्मक टीका करणारे लिखाण केले. फेसबुकवरील एका लेखकाने तर ‘उपग्रह किंवा विमानाद्वारे २२ तारखेला फवारणी केली जाणार’ अशा आशयाची मोदींच्या निर्णयाची स्तुती केल्याप्रमाणे, खरी वाटेल अशी अत्यंत उपहासात्मक पोस्ट लिहली. या पोस्ट काही लोकांनी व्हॉटस्अपवर टाकल्या.
त्याचा परिणाम असा झाला की, अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने ते लिखाण व्हायरल झाले. त्याला कारण ठरले खात्री न करताच ‘फॉरवर्ड’ करण्याची लोकांची सवय. त्या लिखाणातील ‘उपहास’ लक्षात येण्यासाठी बुध्दीचा वापर करायची तसदी बहुतेकांनी घेतलीच नाही. मोदीजींच्या निर्णयाबद्दल स्तुतीपर लिखाण आहे असे समजून, ते ‘फॉरवर्ड’ करुन आपण कसे मोदीप्रेमी आहोत हे दाखविण्याची जणू स्पर्धा सुरु झाली होती.
काही लोकांनी ‘फॉरवर्ड’ करणारांना त्यातील उपहास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर उलट त्यांच्यावरच मोदीविरोधी, राष्ट्रद्रोही असे शिक्के मारण्यात आले. शेवटी परिणाम तोच झाला. ‘कडू औषधाच्या गोळीला वरुन साखरेचा मुलामा’ दिलेला असतो त्याप्रमाणे ‘वरुन कौतुक पण प्रत्यक्ष आतून खोचक टीका’ असलेले लिखाण लोकांनी ‘फॉरवर्ड’ करुन व्हायरल केले. ज्यांनी लिहले आणि ज्यांना समजले ते गालातल्या गालात हसत राहिले. आणि मग नंतर जेव्हा ‘फॉरवर्ड’ करणारांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा ते खजील झाले, पण तोपर्यंत उशीर झालेला होता.
हे सगळे बघता, आता व्हॉटस्अप वापरकर्त्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहेत. आपल्याकडे आलेली प्रत्येक पोस्ट ही दुसऱ्यांकडे फॉरवर्ड करायलाच पाहिजे असे काही बंधन नाही. केवळ सर्वात आधी मलाच हे माहित झाले, सगळ्यात आधी मीच पोस्ट केले अशी फुशारकी मारण्यासाठी पोस्ट ‘फॉरवर्ड’ करणे टाळावे. कोणतीही आलेली पोस्ट मग ती मजकूर, इमेज, ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स कोणत्याही स्वरुपातील असो, त्याची आपण स्वतः आधी शहानिशा करुन घेण्याची सवय प्रत्येकाने लावून घेणे आवश्यक आहे.
येथे एका गोष्टीचा आठवणीने उल्लेख करायला पाहिजे, तो म्हणजे ‘फोटो किंवा ऑडिओ व्हिडिओ क्लिपवर’ बरेच लोक पटकन विश्वास ठेवतात आणि लगेच ‘फॉरवर्ड’ करतात. पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की, काही सॉफ्टवेअर्स आणि अप्सच्या मदतीने फोटो, ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स सुध्दा एडिट करुन त्यात पाहिजे ते बदल करता येतात. त्यामुळे खात्री पटल्याशिवाय असे कोणतेही संदेश पुढे पाठवू नयेत. शंकास्पद फोटो व्हिडिओंची सत्यता जाणून घेण्यासाठी गुगल इमेजवरील ‘रिव्हर्स इमेज’ किंवा तत्सम सुविधांचा उपयोग करता येईल.
त्याचप्रमाणे आलेल्या प्रत्येक संदेशाविषयी, तो खरा आहे का अशी शंका तुमच्या मनात यायला पाहिजे, त्यासंदर्भात काही प्रश्न मनात उपस्थित झाले पाहिजेत. असे होत असेल तर तुमचे अभिनंदन. नक्कीच तुम्ही तुमच्या विचारक्षमतेचा योग्य प्रकारे वापर करत आहात हे स्पष्ट आहे.
आणि जर आपले स्वतःचेच शंका समाधान होत नसेल तर असे संदेश पुढे कोणालाही न पाठविता लगेच डिलीट करुन टाकण्याची सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजेच ही साखळी तिथेच तुटेल. परिणामी ‘फॉरवर्ड’ गिअरमधील सुसाट व्हॉटस्अपचा वेग आटोक्यात आणण्यासाठी आपल्या परीने थोडी तरी मदत होईल.
कोरोनाच्या संदर्भात ‘सोशल डिस्टस्निंग’ ही संकल्पना आपण सर्वांनी ऐकली आहेच, त्याचप्रमाणे चुकीची माहिती, अफवा पसरविणाऱ्या संदेशापासून सुध्दा आपण ‘सोशल डिस्टन्स’ ठेवण्याची ‘स्वयंशिस्त’ पाळण्याची गरज आहे.
आपण किमान इतके जरी करु शकलो तरी, आपण एक ‘जबाबदार नागरिक’ या नात्याने आपण आपली सामाजिक, नैतिक जबाबदारी पार पाडत असल्याचे ‘आत्मसमाधान’ नक्कीच मिळेल. तेव्हा आता याबद्दल आपण ‘स्वयंशिस्त’ लावून घ्या, ‘जागरुक व्हा’ आणि इतरांनाही जागरुक करण्याचा प्रयत्न करा.
...