ट्रेन
दुपारच्या तीनची वेळ सूर्य भलताच तापला होता .ऑफिसमध्ये भयाण शांतता पसरली होती. मॅनेजर त्याच्या केबिनमधून अधूनमधून काचे मधुन बाहेर नजर भिरकावत होता .अचानक मोबाईल वाजू लागला. सूरज थोडा बाजूला येऊन बोलू लागला. सूरज तसा दिसायला सावळा जेमतेम उंची असलेला एक सत्तावीस वर्षाचा तरुण.
पलीकडून सागर उत्सुकतेने विचारतो, "सूरज कुठे आहेस? तुला ठाऊक आहे ना ,आज आपल्याला निघायच् आहे नागपूरला? झाली का तयारी?"
खरतर सूरज च्या लक्ष्यात नसते कि आज निघायचे आहे . त्याने उद्या निघायचे आहे असे गृहित धरलेले असते . 6:15 ला ट्रेन पुणे स्टेशनवरून निघणार असते. आता कसे पोहोचायचे याचा विचार करत शिफ्ट संपवून तो 3:05 ला ऑफिस च्या बाहेर पडतो . दुपारच्या वेळ असल्याने ट्रॅफिक कमी असते त्यामूळे वेगात तो घरी निघतो. घराच्या समोर आल्यानंतर हातातल्या घड्याळाकडे 3:35 झालेले बघून तो दुसर्या हाताने बेल वाजवतो . घरातून बाहेर पडायला त्याला पंधरा मिनिटे लागतात .
सवा चारला 'आकुर्डी रेल्वे स्टेशन' सूरज पोहोचतो. सागर 'पुणे स्टेशन' ची तिकिटे हातात घेऊन सूरज ची वाट बघत असतो . सागर हा सूरज सारखाच समवयीन मुलगा आहे. दिसायला सूरज पेक्षा उंचीला जास्त असलेला , गौर वर्ण असलेला तरूण.
सूरज : कस जायचय?
सागर : येथून लोकल ने पुणे स्टेशन ला जाऊ मग तिथून दुसरी ट्रेन...
ट्रेन 4:30 ला येणार असल्याने ते गप्पा मारत असताना ट्रेन उशिरा असल्याची सूचना त्यांच्या कानावर पडते . तसं पण आपल्याला हा ट्रेन चा प्रवास आवडत नाही . शुभमच लग्न नसत व मित्रांनी आग्रह केला नसता तर आपण या भानगडीत पडलोच नसतो ,असा विचार सूरज मनातल्या मनात करत असतो. दोघेही टॅक्सी करून पुणे स्टेशन ला जायला निघतात . जाताना सागर आझाद हिंद एक्सप्रेस ची सहा तिकिटे त्याला दाखवतो व बाकीचे चौघे ट्रेन मध्ये पोचले म्हणून सांगतो .
‘ गेट नंबर 6 ‘वर टॅक्सी थांबते फक्त तीन मिनिटे बाकी असतात तेवढ्यात गाडी निघण्याची सूचना त्यांच्या कानावर पडते . पाठीमागे बॅग घेऊन दोघे चालत्या ट्रेन मध्ये उडी मारतात . आणि ट्रेन स्टेशन सोडून पुढे जाते …..
ट्रेन मध्ये सगळीकडे लोकांची गडबड सुरू असते. कोणी आपापल्या बॅग ठेवत असतात. लहान मुलांचा रडण्याचा आवाज व वृद्ध लोकांचा आवाज सगळीकडे येत असतो. काही लोक आपापल्या जागा सोडण्यासाठी इतराना ढकलत पुढे जात असतात. तर काही ट्रेन कधी सुटेल याचा विचार करत आलेला घाम पुसण्यात मग्न असतात. तिकीट वरचा नंबर शोधत ते दोघे एका बोगी मध्ये जातात समोरच प्रशांत, गणेश व वैभव बसलेले दिसतात. हे सगळे मित्रमंडळी एकाच कॉलेज मध्ये शिकलेली होती . सागर प्रशांत ला विचारतो, "अक्षय दिसत नाही रे ? " तो नगर ला चढणार असल्याचे प्रशांत त्याला सांगतो.. सूरज दर वेळी सारखं खिडकी शेजारी बसलेला असतो . प्रशांत त्याच्या शेजारी व गणेश त्याच्या समोर बसलेला असतो .
खिडकीतून बाहेर बघून जोरात पळणारी झाडे व तोंडावर मारा करणारा वारा बघून सूरजच्या डोक्यात विचार येऊ लागतात . जेव्हा तो वीस वर्षाचा होता, तेव्हा अश्याच एका ट्रेन मध्ये त्याच्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून याच मित्रांनी त्याला साथ दिली होती. आणि त्यामुळेच तो त्यांचा मान राखण्यासाठी परत ट्रेन ने प्रवास करत होता . तेवढ्यात प्रशांत बिस्किटे देता देता मस्करी करावी म्हणून न विचारावा असा एक प्रश्न विचारतो, " सूरज त्या सपनाचे काय झाले रे ? " ……सूरज त्यातले बिस्किट घेत म्हणतो ,"काही माहीत नाही, रे" आणि थोडा रागातच म्हणतो, " झाल ना यार आता माझ लग्न, निशा सारखी बायको आहे, सुखाने संसार चालू आहे, नको त्या जुन्या गोष्टी काढूस……"
सूरज विषय टाळण्यासाठी खिडकीतून बाहेर बघत असतो . माणसाचे मन पण कसे असते ना ज्या गोष्टी चा विचार करायचा नाही अस माणूस ठरवितो तीच सारखी त्याच्या मनात डोकावत असते . तीन वर्षांपूर्वी ची गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागते .