२४ डिसेंबर
आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील. अर्थात मला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या सहा महीन्याची माझ्या डायरीची पानं तुम्ही चाळलीत तरी तुमच्या आपसुकच लक्षात येईल.
त्याला अचानकपणे येताना पहाताच खरं सांगु तर माझा माझ्यावरच ताबा राहीला नाही आणि नकळतच मी आशुचा हात इतका जोराने दाबला होता की न रहावुन ती ओरडलीच.
मी म्हणलं आशुला, ‘स्वॉरी यार, उन्हाने तापलेल्या धर्तीवर, पाना-फुलांवर पावसाचा एक थेंब पडला तरी सगळे कसे झुमुन उठतात इथे तर माझ्यावर साक्षात एक सर कोसळली होती..’
तर म्हणते कशी, ‘अदिती.. बास आता.. राज तुला किती आवडतो हे मलाच काय पुर्ण स्टुडीओ ला माहीत झालंय..’
‘म्हणजे??? मी इतकी ऑब्व्हीयस वागते की काय?‘
‘तो समोर आला कि तुझा चेहरा बघ कित्ती बदलतो. लाजतेस काय, एकटीच हसतेस काय, पायाच्या अंगठ्याने जमीनीवर लिहीतेस काय..’
आशु बोलत होती, माझ्या मनात मात्र ते गीत गुणगणत होते.. ‘लाज लाजली त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी, मनात हसली, मनात रुसली, खुदकन हसली ती फुलराणी’
‘काय बोलते आहेस तु आशु? अगं मग हे आधी नाही का सांगायचं? राजला तर नसेल ना हे कळलं? काय म्हणेल तो? एक फडतुस गाण्यामध्ये ‘कोरस’ आवाज देणारी अदिती.. माझ्यावर प्रेम करते..!! हसला असेल तो स्वतःशीच.. शट्ट यार..’
तर म्हणते कशी..’अगं काही हसतं वगैरे नाही.. त्याला सवय आहे अश्या गोष्टींची.. तु एकटी का आहेस त्याच्यावर प्रेम करणारी..’ खरंच सांगते इतका राग आला होता ना असतील हजारो प्रेम करण्याऱ्या, पण माझ्याइतके नक्कीच नाही.
‘हाय आशु.. हाय अदिती..’ राज अचानक कुठुनतरी समोर आला. इतका हॅन्ड्सम दिसत होता ना.. माझं नाव त्याला माहीत आहे हे कळल्यावर तर इतका आनंद झाला ना.. मला काही बोलताच येईना.. शब्दच अडकले.. मग आशुच म्हणाली.. ‘हॅलो राज..’
‘शी कित्ती मुर्ख आहे ना मी.. कित्ती बावळट दिसले असेन?’
‘उद्या संध्याकाळी माझ्या घरी यायचं..सगळ्यांनाच बोलावले आहे.. तुम्ही सुध्दा या. क्रिसमस निमीत्त पार्टी ठेवली आहे, ८.३० वाजता, नक्की या’ एवढे बोलुन गेला सुध्दा.
‘मला खुप काही बोलायचे होते. त्याला सांगायचे होते.. त्याचा आवाज खुप आवडतो मला.. त्याच्याबरोबर एक-दोन गाणी सुध्दा मी गायली आहेत.. पण कध्धी.. माझ्या तोंडातुन तर हॅलो सुध्दा नाही फुटले.. खरचं अदिती बिनडोक आहेस तु..’
ख्रिसमसच्या आधी किंवा ख्रिसमसला बर्फ पडणे शुभ मानतात.. माझ्या अंगावर तर आज थंडगार बर्फाची एक कोमल, शितल चादरच लपेटल्यासारखे वाटले.. आज पहिल्यांदा राज माझ्या इतक्या जवळ होता.. शुभ-शकुनच म्हणायचा..
२५ डिसेंबर
केवढी धांदल उडाली होती माझी सकाळी उठल्यापासुन. काय करु आणि काय नाही असं झालं होतं. सकाळ्ळीच पार्लर मध्ये जाऊन आले, दहा वेळा कपाट उपसुन एकदाचा ड्रेस फायनल केला. शंभरवेळा आरश्यासमोर उभे राहुन स्वतःला न्याहाळले, केसांचे तर नानाविवीध प्रकार करुन पाहीले पण एक पसंत पडेल तर शप्पथ. गरज असली ना की हे बरोब्बर धोका देतात आपल्याला.
दिवस कसाबसा सरला, पण संध्याकाळ संपता संपेना. आशु न्यायला येणार होती त्यामुळे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. मॅडम नेहमीप्रमाणे उशीराच आल्या. मी माझा सर्वात आवडता पांढरा घागरा घातला होता. आशुने आज मनापासुन कॉम्लीमेंट दिले. छान वाटलं. ‘राज’च्या बंगल्यावर पोहोचलो. दिव्यांच्या झगमगाटाने बंगला उजळुन निघाला होता. राजच्या शब्दाला मान देऊन कित्तेक लोकं त्याच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. राज आहेच तसा, सगळ्यांना ‘आपला’ वाटणारा.
आशु तर मागेच लागली होती.. अदिती तु आज बोलच राजशी. त्याला नक्की माहीती असणार तुला तो आवडतो ते. आणि तुझ्यात तरी काय कमी आहे गं? तुला नाही म्हणुच शकणार नाही तो.
खरंच आशु.. असं झालं तर? पण माझे शब्दच खुंणतात गं तो समोर आला की. आपलेच शब्द आपल्याला अनोळखी होतात..
राजने स्वतः होऊन आमची भेट घेतली, आम्हाला काय हवं काय नको ते बघीतले. खुप ‘केअरींग’ आहे तो. तो समोर असला ना, म्हणजे मला एखादी छोटी मुलगी झाल्यासारखं वाटतं. त्याच्यासमोर आपणं खुपच छोटे, क्षुल्लक असल्याची भावना मनामध्ये प्रबळ होते. असं वाटतं.. स्वतःला त्याच्या घट्ट मिठीमध्ये झोकुन द्याव!
मनामध्ये विचारांचा गोंधळ उडाला होता. आशु म्हणते तसं खरंच बोलावं का त्याच्याशी. कित्ती दिवस हे असे नुसते बघुन उसासे घेत बसणार? करावं का त्याच्याजवळं आपलं मन मोकळं? पण वाईट तर नाहीना दिसणार? काय म्हणेल तो? मला तर तो फारसं ओळखतही नसेल. असे कित्तीसे बोललो आपण एकत्र?
इतक्यात टाळ्यांचा कडकडाट झाला तशी माझी तंद्री भंगली. समोर उभारलेल्या एका उंचवट्यावर राज उभा होता. त्याने पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत केले. ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. तो बोलत होता.. पण मनावर कसलेतरी दडपण येत होते… कसले?? नाही सांगता येत.. कदाचीत मगाचपासुन त्याच्याबरोबर असणाऱ्या त्या ‘निधी मेहता’ मुळे. सतत ती राजच्या बरोबर होती. म्हणे सुप्रसिध्द गायीका. कसली सुप्रसिध्द.. एक दोन किंचाळणाऱ्या आवाजातली आयटम-सॉग्स सोडली तर एक हिट गाणं नाही तिच्या नावावर.
राजने तिला जवळ बोलावले आणि.. आणि…
सर्व जग डोळ्यासमोर गोल फिरत होते.. विश्वास बसत नव्हता काही क्षणांपुर्वी माझ्या राजची.. त्या निधीशी ऐंन्गेजमेंट झाली होती. एकमेकांना त्यांनी अंगठ्या घातल्या होत्या.. काय झालं हे.. कसं झालं.. गर्दीपासुन दुरवर एकटीच हातामध्ये ऑरेंज ज्युस घेउन उभी होते. डोळ्यातुन ओघळणारे खारटं पाणी त्यामध्ये पडुन त्या ज्युस मधील गोडवाच जणु गेला होता.
आशु शोधत शोधत माझ्यामागे येऊन उभी राहीली. आम्ही दोघीही गप्प होतो..पण आमचा मुक संवाद दोघींनाही कळत होता.. आशु म्हणत होती.. असे एकटे राहुन काय होणार.. चल राजला शुभेच्छा दे त्याच्या भावी आयुष्यासाठी.. हा एकटेपणा आत्ताच दुर कर नाहीतर तो तुझ्या सोबतीला राहील कायमचा..
मी मात्र म्हणत होते..
“आहेच मी जरा तशी
एकटी एकटी राहणारी
वाळकं पान सुध्दा गळताना
तन्मयतेने पाहणारी..”
२८ डिसेंबर
दोन दिवस मी घरीच बसुन होते. कुठे जाण्याचा मुडच नव्हता. २६ च्या पेपरमध्ये राज च्या ऐंन्गेजमेंटबद्दल बातम्या झळकुन गेल्या.
त्या दिवशीचे अनेक लोकांचे चेहरे मला अजुनही आठवत होते. आशु म्हणाली होती ते खरंच होतं. माझ वागणं इतक ऑब्व्हियस होतं की सगळ्यांनाच राज बद्दल मला वाटणारे आकर्षण, प्रेम माहीती झाले होते. माझ्या चेहऱ्यावर कोसळलेल्या दुःखाचे कुणाला खरंच वाईट वाटले तर कुणाला फिदीफिदि हसायला कारणंच मिळाले. कुणी सहानभुती दाखवली तर कुणी आडुन-आडुन का होईना थट्टा करुन घेतली. आता हा विषय निदान काही आठवडे तरी चघळला जाणार यात काहीच शंका नव्हती.
सकाळी रेकॉर्डींग होते, पण काही केल्या आवाजच लागेना. शेवटी मला वगळुन रेकॉर्डिंग केले गेले. खुप वाईट वाटले. पण त्यांचाही नाईलाजच होता ना.
“एका ओसाड माळरानावर, माझं मन उदास पडलेलं,
तिथंसुध्दा वेडं, तुझ्याच आठवणीत बुडलेलं..”
[क्रमशः]
कथेच्या या भागातील आणि पुढील भागात वापरण्यात आलेल्या कविता, चारोळ्या ह्या माझ्या नाहीत. त्या इंटरनेटवरुन घेतलेल्या आहेत. त्याचे आधिकार ज्या त्या कविला राखीव..