radhey - pustakanubhav in Marathi Book Reviews by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | राधेय - पुस्तकानुभव

Featured Books
Categories
Share

राधेय - पुस्तकानुभव

लॉकडाउन_पुस्तक_वाचन
राधेय
लेखक - रणजित देसाई
(अनुभव, समीक्षा, माहिती)


"मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही."
"जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध, अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे."
"त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे."

पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलेली वाक्यं कर्णाविषयी खूप काही सांगून जातात. आयुष्यभर ज्याला सूतपुत्र म्हणून हिनवण्यात आलं, पदोपदी अपमानित करण्यात आलं, कौंत्येय असूनही राधेय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णाची हि कहाणी रणजित देसाई यांनी जबरदस्त साकारली आहे.

महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेचं लहान थोर अबाल वृद्धानमध्ये एक वेगळलंच स्थान आहे. त्याच्यामध्ये असलेल्या नानाविध गुणांनी अनेक लेखकांना त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिण्यासाठी भुरळ घातली आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे, मृत्युंजयकार शिवाजी सावंत, गोनिदा यांचे श्रीकर्णायन, पणशीकरांचं 'कर्ण खरा कोण होता?', शिरवाडकरांचे 'कौंत्येय', रवींद्र ठाकूर यांचे धर्मयुद्ध. तसेच रणजित देसाई यांच्या 'राधेय' चा उल्लेखही आवर्जून करण्यासारखा.

आपल्या जन्म माहीत नसल्यामुळे पदोपदी त्याला हीन वागणूक आणि अपमानाचा सामना करावा लागला. आणि हाच जातीभेद मिटवण्यासाठी त्याला जीवनभर संघर्ष करत राहिला. आपली ओळख, ही जन्माने नाही तर कर्माने निर्माण होत असते, हे त्याने सिद्ध केलं. कर्ण कुंतीचा प्रथम पुत्र असूनही कौंत्येय नाही तर राधेय म्हणून ओळखला गेला. कारण, राधा आणि अधिरथ हे त्याचे पालक माता पिता.

आपण आजही बऱ्याच वेळा, 'हां... लय दानशूर लागून गेलास!', म्हणून एखाद्याला हिणवतो. पण फक्त दानशूर म्हणूनच कर्ण ओळखला जातो का? अतूट मैत्री जपणारा, सुखात आणि दुःख्खात सदा साथ करणारा, चुका दाखवणारा, वाईट गोष्टींपासून परावृत्त करणारा, सदा धर्माची कास धरणारा, दिलेला शब्द हेच वचन मानणारा आणि त्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा. रणभूमीमध्ये समोर कृष्ण आहे, आपला पराभव अटळ आहे असे माहित असतानांही, आपल्या मित्राची साथ न सोडणार, त्याला जिंकण्याचा विश्वास देणारा, आणि शेवटी मृत्यूला हसत हसत सामोरा जाणारा, असा हा कर्ण राधेय मध्ये आपणास पाहायला मिळेल.

जिवनातील तत्त्वज्ञान सांगणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी प्रत्येकाच्या बोलण्यातून आपल्याला कळतात. आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात. रणजित देसाईंनी कादंबरीमध्ये अतिशय प्रेरणादायी विचार मांडलेले आहेत. त्यासाठी अगदी लक्षपूर्वक वाचावं लागतं. कादंबरीची सुरुवात युद्धामधे वीरगती मिळालेल्या सर्वांना, युधिष्ठिर गंगेच्या विस्तीर्ण पात्रात उभा राहून तिलांजली देत असतानाच्या प्रसंगापासून होते. कादंबरी आपणांस कर्णाची आणि कृष्णाची पहिली भेट झाल्यापासून ते अंतापर्यंतचा प्रवास घडवते. वाचता वाचता आपण कधी कर्णाशी एकरूप होऊन जातो, कळतही नाही.

आपला प्रिय मित्र आणि सारथी असलेला चित्ररथ, त्याचा मुलगा जेव्हा राजसूय यज्ञावेळी भीमासोबत झालेल्या युद्धात मारलं गेला तेव्हा, कर्ण प्रसादामध्ये घडलेल्या प्रसंगावेळची काही वाक्यं,

"युवराज, शेकडो बाण लागले तरी, जीव जातो फक्त एकाच बाणाने, जो काळजात घुसतो..."
"मित्रा, बाण आरपार निघून गेला."

स्वयंवरावेळी कर्ण लक्षभेद करताना द्रौपदीने म्हटलेलं वाक्य, "मी एका सुतपुत्राला वरणार नाही."

द्रौपदी वस्रहरणाच्या प्रसंगावेळी तिने भीष्मांना विचारलेला प्रश्न,
"स्वतःला पणाला लावून जो स्वतःच दास बनला आहे. त्याला पत्नीला पणाला लावण्याचा काय अधिकार?"

कृष्ण जेव्हा कर्णाला पांडवांच्या बाजूने विनवण्यासाठीचा प्रसंगात कर्ण म्हणतो,
"क्षत्रिय कधीही मैत्रीला पारखा होत नाही."
"युद्धभूमीवर आपण सामोरे असताना, प्रत्यंचा खेचण्याचं बळ मला यावं."
"जीवन निष्कलंक आणि मृत्यू वीरोचित यावा."
"आप्तस्वकियांचा वध माझ्या हातून घडू नये..."

युद्धामध्ये अर्जुनावर बाण सोडताना कर्णाला कुंतीला दिलेला शेवटचे दिलेले शब्द आठवले,
"तू निवडलेले पाचच तुला मिळतील. सहावा पाचवा कसा बनेल!
पहिला असूनही, सहावा बनण्याचा पराजय मी तुझ्या साठी आनंदाने पत्करील."

युद्धामध्ये दुःशासन मारला गेल्यावर, चक्रधरच्या पाठीत कुऱ्हाडीचा वार झाला. कर्णाशी बोलताना तो म्हणतो,
"कर्णा, हे रणांगण खरं नाही. इथं फक्त धर्माचा वल्गना, कृती मात्र अधर्माची. या रणभूमीत तुला यश नाही. सावध राहा."

भर दुपारी रणरणत्या उन्हात दुर्योधनाच्या मांडीवर मृत्यूशय्येवर असलेला कर्ण म्हणतो,
"युवराज, मध्यान्हकाळी सूर्य अस्ताला जाताना तुम्ही कधी पाहिलं आहे का?"

असे अनेक हृदयद्रावक प्रसंग मन चक्षु पटलावर नकळत उभे राहतात. डोळ्यांत अश्रू तरळतात. आपण त्या प्रसंगाचे साक्षीदार बनतो. शरपंजरी पडलेले भीष्म शेवटी जेव्हा बाणांच्या मृत्यूशय्येवर इच्छामरणाची वाट पाहत निद्रा घेत असतात, तेव्हा कर्ण त्यांना भेटून येतो. नदीकिनाऱ्यावर पलीकडे कृष्ण बासरी वाजवत असताना कर्ण अगदी मंत्रमुग्ध होऊन बासरी ऐकण्यात मग्न झालेला असतो. त्याच्या मनातील विचार पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहेत. आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. शेवटची काही पानं वाचताना तर अक्षरशः डोळे पाणावतात.

खरंच, जर कर्ण वाईटच होता.

तर मग कृष्णाने युद्धाच्याच आधी कर्णाला त्याचं जन्म रहस्य का सांगितलं?
पांडवांच्या पक्षामध्ये येण्यासाठी का आग्रह केला?
त्याने स्वतःची कवच कुंडले समोर साक्षात देवराज इंद्र असतानाही दान का केली?
का, पितामह भीष्म यांनी जो पर्यंत मी रणांगणात आहे, तो पर्यंत कर्ण शस्त्र उचलणार नाही म्हणून घोषणा केली?
शेवट पर्यंत युद्धामध्ये कर्णाने का एकदाही अधर्म वा नियम भंग केला नाही?

अशा एक ना अनेक गोष्टी, प्रसंग आहेत कि, ज्यामुळे कर्ण त्याचं वेगळेपण, श्रेष्ठत्व सिद्ध करतो. तो असेलही अहंकारी! झाल्याही असतील त्याच्याकडून काही चुका! असेलही तो चुकीच्या पक्षामध्ये! पण तरीही आपल्या वचनापासून कधीही विमुख झाला नाही! आपलं कर्तव्य, प्राणाचं मोल देऊनही पार पाडलं! मैत्रीच्या नात्याला कधीही अंतर दिलं नाही! त्याची क्षमता, योग्यता आणि सामर्थ्य हे सदैव प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.

एक गोष्ठ आवर्जून सांगावीशी वाटते कि, धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा, सामर्थ्यशाली, स्वाभिमानी आणि योग्यता असतानाही कर्णाच्याच वाट्याला हा अपमान, निंदा, हेटाळणी का आली? त्याला जातीवादाशी का संघर्ष करावा लागला? याच एकच उत्तर आहे, ते म्हणजे तो विशेष होता, अतुलनीय होता, सर्वश्रेष्ठ होता. आणि जे विशेष असतात त्यांची परीक्षाही विशेष असते. लोहाराच्या भट्टीमध्ये लोखंडाला नाही सोन्यालाच वितळवलं जातं, कारण त्यापासूनच आकर्षक दागिना बनवला जाऊ शकतो.

कर्णाच्या संघर्षमय जोवनातून आपल्याला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत.

"जन्मानं तुमचं कर्म सिद्ध होत नाही. त्यासाठी अथक परिश्रम, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असावी लागते."
"काम हे काम असतं. लहान असो वा मोठं. ते करण्यासाठी लाज कसली."
"जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये कि, जी तुम्ही मिळवू शकत नाही. त्यासाठी तुमची अथक परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. आणि त्यासाठी संयम बाळगला पाहिजे."
"स्वतःच श्रेष्ठत्व आणि योग्यता हे जातीपातीनं नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करायचं असतं."
"योध्दयाने जय पराजयाची चिंता करायची नसते, त्याने फक्त लढायचं असतं. कष्ट आणि प्रयत्न करत राहा, यश अपयशाचा विचार नका करू."

जाता जाता शेवटी सोनी चॅनेलवरील "सूर्यपुत्र कर्ण" मालिकेमध्ये मरण समोर आलेलं असताना कर्णाच्या तोंडून आलेले शब्द आठवले,
"हे मृत्यू, है तैयार यदि तू आने को... प्रसन्न मुख आ..."
"द्वार खुला है, तेरा स्वागत... प्रसन्न मुख आ..."

- धन्यवाद
- ईश्वर त्रिंबकराव आगम
- वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.
==========================