Mobile weda raghu in Marathi Children Stories by Uddhav Bhaiwal books and stories PDF | मोबाईलवेडा रघू

Featured Books
Categories
Share

मोबाईलवेडा रघू

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

मोबाईलवेडा रघू

रघू शाळेतून घरी आला आणि त्याने हातातले दप्तर सोफ्यावर पटकले. अंगातील गणवेशसुद्धा न काढता तो तसाच किचनमध्ये आईकडे गेला आणि आईला म्हणाला. "आई, मला आधी तुझा मोबाईल दे. मला एक गेम खेळायचाय त्याच्यावर."

"अरे, हो देते. पण आधी अंगातील गणवेश काढून ठेव. तोंड हातपाय धू. जेवण करून घे. मग मोबाईलवर काय खेळायचं ते खेळ." आई त्याला सांगू लागली. पण तो ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे "आधी मला मोबाईल दे. मग जेवायचं बघू." असा एकच धोशा त्याने लावला. शेवटी त्याच्या हट्टापुढे आईला नमते घ्यावे लागले. तिने शोकेसजवळ ठेवलेला मोबाईल त्याला दिला. मग काय, अंगातील गणवेश न काढता सोफ्यावर त्याने हातपाय पसरून दिले आणि मोबाईलमध्ये तो मग्न झाला. अधूनमधून आई त्याला जेवणाची आठवण करून देत होती. पण आईचे बोलणे त्याच्या डोक्यावरून जात होते. आईने मग हळूच आपल्या पदराने त्याचे हात पुसले आणि जेवणाचे ताट त्याच्याजवळ आणून ठेवले. त्या ताटाकडे पाहिल्यावर मात्र रघू एका हातात मोबाईल घेऊन दुसऱ्या हाताने कसाबसा जेवू लागला. त्याचे जेवण उरकल्यावर आईने तिथेच एक पातेले आणून त्या पातेल्यात त्याचे हात धुतले.

खरं म्हणजे रघू हा आठव्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी होता. परंतु अलीकडे त्याला मोबाईलचे वेड लागल्यामुळे अभ्यासाकडे आणि मैदानी खेळांकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तो आईचा जरा जास्तच लाडका होता. ती मनात म्हणायची, "तो शाळेतून थकून, दमून आलाय. मोबाईलवर गेम खेळतोय तर खेळू दे."

सायंकाळी रघूचे बाबा जेव्हा ऑफिसमधून घरी आले तेव्हा त्यांना मोबाईलमध्ये गुंग झालेला रघू दिसला. ते पाहून बाबा रघूला खूप रागावले. बाबांचा अवतार पाहून त्याने पटकन हातातला मोबाईल खाली ठेवून दिला आणि तो हातपाय धुण्यासाठी बाथरूमकडे गेला. गणवेश काढून ठेवून, कपडे बदलून रघू हॉलमध्ये आला. तोपर्यंत बाबांचा राग शांत झाला होता. रघूच्या आईने गरमागरम चहाचा कप बाबांच्या हातात ठेवला. चहाचे घोट घेत घेत बाबा रघूला समजावून सांगू लागले, " रघू बेटा, तू अजून लहान आहेस. इतक्यातच मोबाईलच्या नादी लागणे तुझ्यासाठी बरे नव्हे. त्याऐवजी तू अभ्यासाकडे लक्ष दे. तू हुशार आहेस. पण असे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन तुला परीक्षेत मार्क कमी पडले तर तुला चालेल का?"

"नाही." रघू म्हणाला. रघू बाबांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता.

पुढे रघूच्या शाळेचा वार्षिकोत्सव जवळ आला आणि त्यानिमिताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यातच एक वादविवाद स्पर्धादेखील होती. वादविवाद स्पर्धेचा विषय होता, " मोबाईल शाप की वरदान?"

या स्पर्धेविषयी जेव्हा रघूला कळले तेव्हा त्याचे मोबाईलप्रेम एकदम उफाळून आले आणि त्याने या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. रघू अर्थातच मोबाईलमुळे होणारे फायदे आपल्या भाषणात सांगणार होता आणि मोबाईल म्हणजे वरदान आहे असे ठासून सांगणार होता.

या स्पर्धेत तो भाग घेणार आहे असे जेव्हा त्याने घरी आई आणि बाबांना सांगितले, तेव्हा बाबांनी त्याला आधी विचारले की, "तू कोणत्या बाजूने बोलणार आहेस?" तेव्हा रघू म्हणाला, "अर्थातच मोबाईल हे सर्वांसाठी वरदान आहे हे मी माझ्या भाषणातून सर्वांना पटवून देणार आहे." हे ऐकल्यावर बाबांनी त्याला जवळ बसवले आणि ते सांगू लागले, " हे बघ, स्पर्धेत तुला कोणत्या बाजूने बोलायचे हे तू ठरवू शकतोस. परंतु त्याआधी माझे म्हणणे ऐकून घे."

"बोला बाबा" रघू म्हणाला.

मग बाबांनी सांगायला सुरुवात केली. " हे बघ रघू, जेव्हा आपण कबड्डी, खो-खो, फुटबॉल यासारखे खेळ खेळतो, तेव्हा आपल्या शरीराचा, मनाचा आणि बुद्धीचा विकास होत असतो. शरीरातून घामाच्या धारा निघतात, हातपाय मजबूत होतात, पचनक्रिया, श्वसनक्रिया इत्यादींचा विकास होतो. या उलट जी मुले लहानपणापासून मोबाईलच्या मागे लागतात, त्यांचे डोळे खराब होतात. डोळ्यांना चष्मा लागतो. मैदानी खेळ न खेळता मोबाईलसह बसून राहिल्यामुळे हालचाल कमी होते. शरीराचे वजन वाढते. नाही का?"

"बाबा, तुम्ही म्हणता ते खरंय. पण माझ्या मते मोबाईलद्वारे गुगलमुळे जगातील कुठलीही माहिती मिळवता येते. यू ट्यूबमुळेसुद्धा खूप ज्ञान मिळते. मोठमोठ्या लोकांचे विचार ऐकायला मिळतात, हे आपण मान्य कराल."

"रघू, हे बघ. आपल्या गुरुजनांना किंवा पाठ्यपुस्तकांना हा मोबाईल किंवा गुगल कधीच पर्याय होऊ शकत नाही. आपली संवेदनशीलता, विचार करण्याची पद्धत, समाजाविषयीची बांधिलकी याविषयींचे संस्कार आपले आईवडील, गुरुजी आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आपणावर करीत असतात. त्यांची जागा ही गुगल आणि इंटरनेटसारखी माध्यमे नाही घेऊ शकत. मोबाईलमुळे आणि कॅल्क्यूलेटरमुळे आपली गणितावरची पकड कमी होत आहे. हे ध्यानात येतंय का तुझ्या?"

" हो खरंय बाबा. पटलंय मला तुमचं म्हणणं. मी आता आमच्या शाळेतील वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेईन आणि मोबाईलमुळे आपली काय हानी होत आहे, हे सर्वाना पटवून देईन. मी सिद्ध करीन की, मोबाईलच्या अति वापरामुळे आमच्या बुद्धीवर गंज चढत आहे. डोळे खराब होत आहेत. मैदानी खेळांची सवय मोडल्यामुळे शरीराचे स्वास्थ्य आम्ही हरवून बसत आहोत. आता मोबाईलच्या सोबतचा वेळेचा अपव्यय बंद आणि लक्ष देऊन अभ्यास करणे, मैदानावर जाऊन खेळणे सुरु. आम्ही मोठे झाल्यावर मोबाईलचा खरा उपयोग आम्हाला कळेल तेव्हा आम्ही तारतम्याने त्याचा वापर करू." रघू आनंदाने म्हणाला.

"शाब्बास रे मेरे पठ्ठे" असे म्हणून बाबांनी रघूला जवळ घेतले आणि या दोघांचे संभाषण ऐकणाऱ्या आईच्या डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू वाहू लागले.

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९८३४११९४४१

email : ukbhaiwal@gmail.com