राजेश…. चाळीत राहणार एक सर्वसामान्य मुलगा. ४ वर्षाचा असताना, एक दिवस अचानक… कोणाला न सांगता, त्याचे वडील कूठेतरी निघून गेले… का गेले ते फक्त आणि फक्त त्यांनाच ठावूक… ते अजूनही परत आलेले नाहीत. छोट्या राजेशला आईनेच सांभाळलं. वडील अचानक निघून गेल्याने, त्याच्या बाल मनावर परिणाम झालेला. तेव्हापासून राजेश काहीसा अबोल. जास्त कोणाशी मिसळणे नाही… फारच कमी बोलायचा. कधी कधी तर स्वतःमधेच गुरफटलेला. साधा, सरळमार्गी. कोणाचं वाईट करू नये आणि कोणाविषयी वाईट चिंतू नये. अश्या मनाचा. पण खूप हळवा. भावूक मनाचा. रस्त्यावरल्या किती मुलांना तो मदत करायचा. स्वतः गरीब होता तरी पोटाला चिमटा काढून त्यातलं त्या मुलांना देयाचा थोडंतरी… आईचा खूप जीव राजेशवर. कधी कधी तिला त्याच्या साधेपणाची चिंता वाटायची. कोणावरही विश्वास ठेवायचा लगेच, म्हणून.… राजेशला सगळे "राजा" बोलायचे.Thanks to मंगेश, कॉलेजमध्ये नाटक केल्यापासून आणि नाटकाच्या सवयीमुळे…. मंगेशने प्रथम राजेशला "राजा" बोलायला सुरुवात केली. मग हळू हळू संपूर्ण चाळ त्याला "राजा" याच नावाने ओळखायला लागली. तरी सुद्धा तो "राजा"च होता… सगळ्यांना आवडायचा तो. काही वाईट गुण नव्हता त्यात. शिवाय गरीब मुलांना मदत करायचा. राजेश नावाने आणि मनाने सुद्धा " राजा " होता.
मंगेश…. राजेशचा मित्र. चाळीत शेजारी शेजारीच रहायचे. स्वभाव मात्र राजेशच्या उलट अगदी. मंगेश सगळ्यात मिळून मिसळून वागणारा. दुनियादारी माहित असलेला. बडबड्या… समोरचा अनोळखी असला तरी काही वेळातच त्याच्याबरोबर ओळख करणारा. सांगायचं झालं तर एकदम मस्तमौला माणूस. त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याचे खूप मित्र होते. पण राजेश त्याला जवळचा वाटायचा. तो समजून घ्यायचा राजेशला. जणू काही त्याला राजेशच्या मनातलं कळायचं. दोघांमध्ये एक गोष्ट common होती… कोणालाही मदत करायला तयार असायचे नेहमी.
आणि राहिली निलम… या दोघांपासून भिन्न…. सगळ्याच बाबतीत… हुशार, इतर गोष्टीपेक्षा अभ्यासात जास्त आवड. पहिल्यापासून काहीतरी मोठ्ठ करून दाखवायचं हे ध्येय. घरची परिस्तिथी श्रीमंतीची, त्यामुळे लागेल ते आणि लागेल तेव्हा हातात देण्याची घरच्यांची तयारी. त्याचा गैरवापर कधी केला नाही निलमने. बारीक शरीरयष्टीची, दिसायला एकदम अप्सरा वगैरे नसली तर छान होती दिसायला. "नाकी-डोळी नीटसं "…. एखादी आपली 'Best Friend' असते ना, जिच्याबरोबर आपण आपले "secret, personal matter" share करतो ना…. अगदी तशीच होती निलम. कॉलेजमध्ये जास्त कोणाशी मुददाम मैत्री केली नाही तिने. होत्या त्या तीन मैत्रिणी फक्त. नाटकाच्या तालिमी सोबत राजेश, मंगेश यांची भेट झाली. राजेशचा स्वभाव आणि मंगेशची दुनियादारी आवडली तिला. म्हणून त्यांच्यासोबत "दोस्ती" आपोआप झाली तिची, ती कायमची.
तसे तिघे एकाच area मध्ये राहायचे. राजेश, मंगेश चाळीत… तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर निलमची सोसायटी होती. बहुतेकदा तिघे कॉलेजमधून एकत्र घरी यायचे. निलमला चाळीतल्या त्यांच्या घरात खूप आवडायचं. कधी कधी परस्पर राजेशच्या घरीच जायची निलम,त्याच्या आईला भेटायला. राजेशची आई जेवण छान बनवायची. कधी सुट्टी असली कि निलम मुददाम राजेशच्या घरी जायची जेवायला. आता निलमच्या घरी ते माहित होतं. त्यांना राजेश आणि मंगेश बाबत माहिती होती. त्यामुळे त्यांना या मैत्रीत काहीच प्रोब्लेम नव्हता. अशीच त्यांची मैत्री होती…. छान अशी.
त्यात खंड पडला तो कॉलेज संपल्यावर. निलमला M.B.A. साठी बंगलोरला जायचे होते. राजेश तसा अभ्यासात हुशार नव्हता. पास झाला तेच बरं झालं. त्याला कूठे जाता येणार होतं M.B.A. साठी, शिवाय तेवढे पैसे आणि M.B.A. साठी लागणारी हुशारी त्यात नव्हती. मग काय करणार ना… कॉलेज संपल्या संपल्या नोकरीला लागला. निलमपासून दूर होणं त्याला रुचलं नव्हतं… कसं ना, ५ वर्षाची मैत्री कशी break होणार पटकन. सुरुवातीला तसंच वाटलं राजेशला. राजेश इथे तर निलम बंगलोरला. मोबाईल काय साधा घरी फोनही नव्हता राजेशकडे. काही फोन वगैरे असतील तर ते मंगेशच्या घरी यायचे. मंगेशला राजेशचे मन कळायचं. त्यानेच मग स्वतः पैसे साठवून राजेशला एक "second hand"मोबाईल घेऊन दिला. नकोच म्हणत होता राजेश. पण जबरदस्ती केली तेव्हा त्याला मोबाईल घ्यावा लागला. निलमकडे साहजिकच होता मोबाईल. मंगेशने लगेच तिला फोन लावला आणि या दोघांचे बोलणे पुन्हा सुरु झालं.
तीन वर्ष होती निलम बंगलोरला. एकदाही मुंबईला आली नाही. पण या दोघांचे बोलणं असायचं नेहमी, दिवसातून एकदा तरी. मैत्री तुटू दिली नाही तिघांनी. दरम्यान, राजेश आणि मंगेशला चांगला जॉब मिळाला होता. जरा लांब होता, तरी salary बऱ्यापैकी ठीक होती. पैसे साठवून राजेशने स्वतःला आणि मंगेशला गिफ्ट म्हणून नवीन मोबाईल घेऊन दिला. रोज call करायची निलम. दिवसभरात काय काय झालं ते सांगायची राजेशला. कधी घरी असताना call आला तर आई बरोबर गप्पा व्हायच्या. आईला बरं वाटायचं. लांब जाऊन पण 'राणी' विसरली नाही आपल्याला आणि 'राजा' ला सुद्धा. निलमला राजेशची आई "राणी" म्हणूनच हाक मारायची. कधी कधी मंगेशसमोर बोलून दाखवायची,"राजा आणि राणीचा जोडा छान दिसतो." मंगेश हसायचा, त्याला माहित होतं…. राजेशला निलम खूप आवडायची. फक्त अबोल स्वभावामुळे तिला कधी बोलून दाखवलं नव्हतं.
M.B.A. चे शिक्षण पूर्ण करून निलम मुंबईत आली. आणि आल्या आल्या एका मोठया कंपनीत रुजू झाली. खूप हुशार निलम… त्यामुळे फक्त सहा महिन्यातच तिची पोस्ट वाढून assistant manager झाली. योगायोग बघा किती. निलमचे ऑफिस आणि या दोघां मित्रांचे ऑफिस, एकाच ठिकाणी… काही मिनिटांच्या अंतरावर. पुन्हा तिघे एकत्र आले. निलमला कंपनीने प्रवासासाठी कार दिली होती. मग काय… कधी लवकर निघाले तर तिघे एकत्रच घरी यायचे. छान चाललेलं तिघांचे.… निलम आता खूप छान दिसायची. किती फरक पडला होता तिच्या personality मध्ये. जास्त confident झाली होती ती. पण आपला राजेश तसाच राहिला होता, अबोल… अजून पुढे ३ वर्ष निघून गेली. या तिघांची मैत्री जास्तच घट्ट झाली होती. ऑफिसमधून निघाले कि निलम सोबतच घरी यायचे. सुट्टी असली कि निलम राजेशकडे यायची. आईला भेटायला. छान गप्पा जमायच्या मग. वरचेवर फिरायला जायचे तिघे. मंगेश कधी कधी मुद्दाम बहाणा काढून घरी थांबायचा. दोघांना एकत्र काही वेळ मिळावा म्हणून, पण राजेश कसलं तिला मनातलं सांगतोय. मग मंगेशला राग यायचा. बोलून दाखवायचा राजेशला सरळ… राजेश फक्त हसण्यावर न्यायचा. त्यालाही वाटायचं… एकदा तरी विचारावे लागेल तिला.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश: