ते सर्वजण अनयच्या घरासमोर येऊन उभे होते. आधीच त्या आवारात बाहेरच्या भागाच्या मानाने कडाक्याची थंडी जाणवत होती. तेवढ्या आवारातील हवा कोंडल्यामुळे कोंदट बनली होती. बाहेरच्या हवेला आत यायला त्या शक्तीने मज्जाव टाकला होता. मलूल होऊन जमिनीवर पडलेली बागेतील झाड आपलं लुळ अंग सावरत म्लान नजरेने त्यांना आत न जाण्याचा इशारा करत होती. तिथलं एकंदर वातावरण पाहूनच अंगावर शिसारी येत होती. पण घराची अवस्था पाहून सर्वांच्याच हृदयात धडकी भरली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून सफेद धुराचे लोटच लोट निघत होते... जणू काही घरात आग लागली होती... घरावर हिरव्या काळसर ढगांचा एक जाडजूड थर घरावर कोसळण्याच्या तयारीत होता आणि तो धूर हवेत विरून जायच्या ऐवजी घरावर साचलेल्या त्या मोठ्या हिरवट ढगांमध्ये जमा होत होता.
" त्याने.....ह्या जगात प्रवेश केलाय..." भयभीत नजरेने घराकडे पाहत गुरुजींच्या थरथरत्या ओठांतून शब्द उमटले. भीतीने विस्फारलेल्या त्यांच्या डोळ्यातील शिरा ताठरून रक्तळल्या. बोचऱ्या थंडीतही त्यांच्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला.
" पण... अजुन ग्रहण तर चालू झालं नाहीये...." ओमने शंका उपस्थित केली.
" हा घरातून निघणार धूर... हे साचलेले ढग.. ही मलूल झालेली बाग... विचित्र घोंगवणारा वारा.. हे आपोआप नाही झालंय... ते आलेत.. त्यांनी इथल्या सगळ्यांवर कब्जा केलाय व सर्व विद्या मिळवण्याचा विधी चालू केलाय...त्यांच्या इच्छेविरुद्ध इथे काहीच घडणार नाही.. अगदी हे चंद्रग्रहणसुद्धा थांबणार नाही." गुरुजी गंभीर स्वरात बोलत होते.
" तीच काय झालं असेल...ती कशी असेल... तिला मारलं तर नसेल..." अनय भीतीने नखशिखांत हादरला. ते जे काही आहे ते आपल्या जगात आलाय म्हणजे तिला सोडणार नाहीत हे त्याला पक्क ठावूक होत. तिला काही झालं असेल ह्या विचारानेच तो गळून पडला.
" नाही अजुन... त्यांना फक्त आपल्या जगात प्रवेश मिळालाय... मात्र ह्या परिघाच्या बाहेर त्यांचं राज्य स्थापन करण्याकरिता त्यांना इथल्या अजुन काही शक्तींना प्रसन्न करून घ्यावं लागेल. आणि आता कदाचित तेच हवन चालू आहे.... आपल्याला घाई करायचीय.... आपण त्वरित पूजा चालू करुया..नाहीतर..." वाक्य पूर्ण न करताच ओमने हाताने आधार देत अनयला उठवल. हातातील पिशव्या खाली ठेवून कोणाकडे न पाहता त्याने एकेक वस्तू काढायला सुरुवात केली.
" ओम... पूजा घराच्या आत केली पाहिजे.." गुरुजींनी किंचित दटावणीच्या स्वरात ओमला विरोध केला. त्याच्या अचानक बदललेल्या वागण्याने ते आधीच अचंबित झाले होते... आणि त्यात त्याचा हा असा पवित्रा त्यांना अपेक्षित नव्हता.
" ह्याक्षणी घरात त्यांचं राज्य आहे.. आपण आत जायचा प्रयत्न जरी केला तरी आपल्या चिंधड्या उडतील.. आत जायचं तर अगदी लपून... आणि ह्या शक्तींपासून लपण कठीण आहे... आपल्याला आत शिरायचं असेल तर त्यांना बाहेर पाचारण केलं पाहिजे.." हातातील काम न थांबवता ओम बोलला.
" ठीक आहे.." ओमच्या विचारांचं गुरुजींना अगदी कौतुक वाटल. अटीतटीच्या वेळीही तो आपली विवेकबुध्दी शाबूत ठेवून होता... अगदी विश्वनाथशास्त्रींसारखी.... मनातल्या विचारांवर ते दचकलेच... क्षणभर त्यांनी ओमकडे पाहिलं. तो अगदी सहजपणे अनयला सोबत घेऊन पूजा मांडत होता.. एखाद्या अनुभवी तांत्रिकाप्रमाणे... ह्या सगळ्यात बाबा मात्र शून्यात नजर लावून आपल्या कर्माला दोष देत उभे होते.
सगळे मिळून भराभर पूजा मांडायला लागले. मात्र इतका वेळ स्तब्ध कोंडून असलेलं वातावरण पूजेच्या वस्तूंच्या नुसत्या स्पर्शाने ढवळून निघालं. आतमध्ये त्याला समजून चुकलं की पुन्हा त्याला टक्कर द्यायला कोणीतरी आला आहे. तो रागाने पिसाळून उठला. इतक्या वर्षांची प्रतीक्षा त्याला आता पुन्हा वाया घालवायची नव्हती. एक एक क्षण त्याने ह्या जगावर आपल साम्राज्य निर्माण करण्याच्या मनिषेने वाट पाहत व्यतीत केला होता.. आणि आता त्यामध्ये खोडा घालायला कोणीच नको होता.... त्याने आपला मोर्चा बाहेर त्याला विरोध करणाऱ्या तिघांकडे वळवला... वाऱ्याच्याही वेगाने..... घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने ओमने आपले कान टवकारले. त्याला माहित होत ह्यावेळी तो त्यांना नक्कीच सोडणार नाही. क्षणाचाही विलंब न लावता अर्धवट मांडलेल्या यज्ञात त्याने पटकन अग्नी प्रज्वलित केला. त्याच्या कृतीवर गुरुजींचा पारा चढला. आधीच लाल झालेले डोळे यज्ञाच्या भडक्यासारखेच रागाने भडकले. मात्र ओमच्या चेहऱ्याकडे पाहताच ते शांत बसले. आज त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. गुरुजींनी नजर ओमच्या मागे पडली आणि पोटात भीतीने मोठा गोळा आला. तो... कराल.... इतक्या वर्षांनी त्याच्या रौद्र रुपात पुन्हा अवतरला होता. त्याला ओळखायला त्याने क्रौर्याने काठोकाठ भरलेले त्याचे भयानक मोठे डोळे पुरेसे होते. चेहरा वाटावा अश्या साधारण ओबडधोबड आकारातील दोन खोबण्यात लालबुंद खड्यासारखे त्याचे डोळे रागाने अजुनच चमकत होते. त्याभोवती काजळ भरल्यासारखी काळी वर्तुळ त्याच्या क्रूर नजरेला अधोरेखित करत होती. त्याच्या गर्द हिरव्या विचित्र आकाराच्या धिप्पाड शरीराभोवती सफेद रंगाच धुकं पसरलं होत. ओठांच्या जागी हिरवट काळपट छटांत त्याचे हिरवट पिवळे आ वासलेले दात विकट हास्य दर्शवत होते. त्याच्या विचित्र शरीरावर बरेचसे खडबडीत उंचवटे होते. त्यातून काहीतरी हिरवट काळसर चिकट द्राव गळत होता. त्याच्याच बाजूला हवेतच विरून गेलेली व धुक्याचा अभ्यास निर्माण करणारी आकृती म्हणजे त्याचा साथी चांद्रहास आहे हे सांगायला कोणाची गरज नव्हती. तो म्हणजे कित्येक ढगांचा गोळा केलेला पुंजका. त्याला ना धड आकार ना शरीर... परंतु जबरदस्त संमोहन शक्ती धारण केलेला एक साधारण दिसणारा धुक्याचा गोळा... मात्र त्याच्याच जोरावर त्याने तिला वश करून घेतलं होत. ते दोघेही पूर्ण तयारीने सज्ज होते ह्यांना मात द्यायला.
गुरुजींनी आकाशात पाहिले.. चंद्रग्रहण कधीच चालू झाले होते. त्या ग्रहणातून सुटेपर्यंत जर ह्या दोघांना त्यांच्या मितित पाठविण्यास अपयश आले तर..... तर सगळच अशक्य होईल. ह्या जगावर फक्त आणि फक्त करालच अघोरी राज्य चालू होईल.... त्यांच्या मनातील विचार गुरुजींचा पडलेला चेहरा वाचून ओमला लगेच कळले. त्याने इशारा करताच गुरुजींनी मंतरलेल्या समिधा यज्ञात अर्पण केल्या. समिधांचा स्पर्श होताच आगीचा भडका उडाला. तिच्या लवलवत्या ज्वाला आपल्या जिभल्या चाटत कराल व चांद्रहासच्या दिशेने वळल्या. अचानक असा काही प्रतिकार होईल ह्याची करालला कल्पनाच नव्हती. उलट आपण क्षणात ह्या क्षुद्र मानवांना चिलटासारख चिरडून टाकू ह्याचा त्याला आत्मविश्वास होता. परंतु समोर ओमला पाहून तो चमकला होता. आणि हीच संधी साधून ओम आपली चाल चालला होता. काय होतंय हे करालला लक्षात येईपर्यंत अग्निज्वाला त्याला स्पर्शायला पुढे आली... अग्निचा स्पर्श होताच त्याच विचित्र शरीर जळायला सुरुवात झाली असती. व कोणतीच शक्ती त्याला त्या मंतरलेल्या अग्नीज्वाळेपासून वाचवू शकली नसती. तिचा स्पर्श होणार...... इतक्यात एक अतिशय थंड धुक्याचा पुंजका हलकासा तरंगत त्यांच्या मधातून पिसासारखा पार झाला. त्यांचा पहिलाच वार वाया गेला. धगधगती ज्वाला काळवंडून आपल्या पराभवाने आल्या पावली यज्ञकुंडात परतली.
कराल मात्र आता ऐकणार नव्हता. त्याचे लालबुंद डोळे निखाऱ्यासारखे धगधगून पेटले.... त्या ज्वालेपेक्षाही प्रखर... कराल चवताळला. आपले हिरवट पिवळे दात विचकत त्याने आपला चेहरा आक्रसला. हिरवट काळसर हात छातीवर आपटत त्याने कर्णकर्कश्य आरोळी ठोकली... इतकी भयावह आरोळी.... त्याच्या आवाजाने क्षणभर वाराही थांबला. एवढा वेळ गर्भगळीत होऊन ओरडणारे प्राणी त्याच्या किंकाळीच्या आवाजाने ओरडायचे थांबले.. त्याचा कर्णकटू आवाज सहन न होऊन बाबाही बेशुद्ध झाले. गुरुजी व ओम कसेतरी शुद्धीत होते परंतु त्यांच्या कानात अजूनही ती किंकाळी गुंजत होती. त्या आवाजाने त्यांच्या कानाच्या पडद्यांसहीत त्यांच्या मेंदूवर पण आक्रमण केले. किंकाळीच्या तीव्रतेने डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्यांना काही समजायच्या आधीच करालच्या अवाढव्य धुडाने अर्धवट मांडलेली पूजा पायाखाली उधळून लावली. यज्ञकुंड जमिनीवर आपटत त्याने मनसोक्त तुडवले. कित्येक वेळ त्याचा थयथयाट चालू होता. संतापलेला त्याचा भलामोठा देह थरथरत होता. चांद्रहास त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता परंतु तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी चांद्रहासने आपल्या शक्तीने थंडीची अजुन एक तीव्र लहर पसरली. हलके हलके धुक्याचे पुंजके तरंगत सगळीकडे पसरले. गुरुजी आणि ओमच्या मानवी शरीराला ही इतकी थंडी सहन होणारी नव्हती. हळू हळू बर्फाच्या लादीत गोठल्यासारखे ते निपचित पडले. त्यांच्या शरीराला थरथर करायचीसुद्धा जाणीव नव्हती. आत्यंतिक थंडीने त्यांचं सर्वांग पांढर पडत चालल होत. त्यावर गोठत चाललेल्या काळपट शिरा उठून दिसत होत्या. हवेतून सावकाश उतरत थोडंसं जाडसर धुक त्या दोघांच्या सर्वांगाभोवती गोलाकार फिरत दोऱ्यासारख सर्वांगाला गुंडाळल गेलं. धुक्याच्या धुरकट दोरांनी त्यांना आपल्या मायावी बेड्यांत पुरेपूर जखडून ठेवले. त्यांना अशा बंदिस्त अवस्थेत पाहून करालच्या हिरव्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. त्याच्या ओबडधोबड चेहऱ्यावरच्या रेषा रुंदावल्या. काहीतरी विचित्र बडबडत करालने एक जोराची लाथ ओमच्या पोटात मारली. परंतु त्या थंडीत ओमच्या बधीर झालेल्या शरीराला त्याची जाणीवही झाली नाही. त्याच्या अर्धवट उघड्या निस्तेज होत जाणाऱ्या त्याच्या डोळ्यांना एक हिरवट आकार घराच्या दरवाजातून आत जाताना दिसला.