प्रिय शिव,
कळत नाही कसे लिहू? आणि काय काय लिहू? पण तुझ्याशी हे बोलुही शकत नाही रे! म्हणून मनातलं सगळं कागदावर उतरून काढावसं वाटलं. तू हे वाचू शकशील की नाही, माहीत नाही! तुला हे कळेल की नाही, हे ही माहीत नाही! पण, आज तुझी खूप आठवण येतेय रे!
काल, नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी निघाले होते. हिवाळ्याचे दिवस, तरीही आभाळ भरून आलं होतं. वातावरण कुंद झालं होतं. संध्याकाळची वेळ होती. पाच साडे पाच वाजले होते. सिग्नलवर थांबले होते. नेहमीचाच सिग्नल अन त्यावर लावलेला भगवा दिसला. तेवढ्यात एक सात आठ वर्षांची मुलगी जवळ येऊन गुलाबाचं फुल देऊ लागली.
"ताई, घे ना! वीस रुपये फक्त!"
तिचा तो निरागस अन हसरा चेहरा पहिला. खूप गोड होती. पण फुल घेऊ वाटेना. अन तेवढ्यात टप टप टप पावसाचे थेंब पडू लागले. ती फुल घेण्यासाठी आग्रह करू लागली. मला राहवेना. तिनं दिलेलं ते सुंदर टवटवीत आणि नारंगी रंगाचं फुल पाहून मनात आठवणींचं वादळ उठलं. हे नारंगी रंगाचं गुलाबाचं फुलंच मला आजपर्यंत जगण्याचं बळ देत आलंय. लाल रंगाचं फुल तुला कधी आवडेलच नाही. फुलचं काय! तुला दुसरा कुठला रंगही कधी आवडला नाही. फक्त नारंगी, भगवा. म्हणे, भगवा माझ्या रक्तात मिसळलाय!
जेव्हा जेव्हा भगवा झेंडा दिसतो ना! तू दिसतोस! बघावं तेव्हा तोंडामध्ये शिवाजी महाराज, मावळे, सह्याद्री आणि इतिहासच! तुझ्यामुळेच कित्येक गड किल्ले पाहू शकले. अरे स्वप्नातही मला गड किल्ल्यांवर असल्याचं दिसायचं. किल्ल्यावरील बुरुंज, तटबंद्या, पायऱ्या, देवड्या, जंग्या आजही स्वप्नात दिसतात मला. जेव्हा जेव्हा तू जवळ असावं असं वाटतं, तेव्हा तेव्हा एखाद्या गडावर नक्की जाते. तू जवळ असल्याचा भास होतो. माझ्याबरोबर हिंडत, फिरत असल्यासारखं वाटतं. जेव्हा जेव्हा तुझ्या बरोबर फिरायचे, तेव्हा तेव्हा तूझ्या उत्साहाने, आनंदाने मी अगदी भारावून जायचे. तुझं ते इतिहास आणि शिवरायांप्रति असलेलं प्रेम पाहूनच मी तुझ्या कधी प्रेमात पडले कळलंच नाही वेड्या! मी कितीदा सांगायचा प्रयत्न केला, पण शक्यच नाही झालं. तू काहीना काही विषय काढून दुर्लक्ष कारायचास किंवा टाळायचास. तुझ्या पाणीदार काळ्याभोर डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेले शर्ट इन, बाह्या कोपरा पर्यंत दुमडलेल्या, कपाळावर चंद्रकोर. स्वतःला शिवरायांचा मावळाच समजायचास. तुझ्या कविता आजही माझ्या हृदयात साठवून ठेवल्यात.
डोंगर रांगा, दऱ्या-खोऱ्या,
उंचच उंच सह्याद्रीचे कडे,
जशी गालावर खळी तुझ्या पडे...
हे शांत शीतल वाहणारे झरे,
अन हिरवी झाडे पाने फुले,
जसे सोनेरी झुमके तुझ्या कानी डूले...
या सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट,
इथल्या दगडा दगडांत शिवशंभू वसे,
जसे खुदकन हसू तुझ्या चेहऱ्यावर दिसे...
तुला अस्सल प्रेम कविता कधी करताच नाही आल्या. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं रुसणं, तुझं रागावणं सगळंच मला मोहित करायचं. कायम तुझ्या बरोबर, तुझ्या जवळ असावं असं वाटायचं. तुझ्याशी बोलताना, तुला ऐकताना वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही. तुला पाऊस खूप आवडायचा, अगदी वेडा व्हायचास, चिंब चिंब भिजायचास आणि मलाही भिजवायचास! लहान मुलांसारखा बेधुंद होऊन नाचायचास, हात फैलावून पावसाला जणू कवेतच घेण्यासाठी आसुसलेला असायचास. तुझ्याबरोबर पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद कधीच विसरू नाही शकत. आता तुझ्याशिवाय नाही भिजू वाटत रे पावसात.
माझं लग्न होऊन दोन तीन वर्षे झाली आहेत. आता तुला पाहणं आणि भेटणं खूप कमी झालंय रे. पण मी माझ्या नवऱ्याला आधीच सांगून ठेवलंय, की जेव्हा मला तुझी आठवण येईल तेव्हा तुझ्याकडे तास दोन तास येऊन भेटून जाईन. तुझा शेवटचा श्वास चालू असे पर्यंत! अन तोही तयार झाला. खूप प्रेम करतो माझ्यावर, अगदी तुझ्यासारखं. एक मुलगा आहे. त्याच नाव काय ठेवलंय माहितेय? अरे वेड्या! तुझंच नाव दिलंय त्याला. माहीत नाही, देवाने त्याच्या रुपात तुलाच तर पुन्हा नाही पाठवलं ना!
जेव्हा जेव्हा त्याला पाहते, तू दिसतोस.
आणि तुला पाहिलं, की तो दिसतो.
मन तुझ्यात गुंतलंय पण हृदय त्याला देऊन बसलेय.
डोळ्यांत जरी तो असला तरी हृदयाच्या स्पंदनात फक्त तू आहेस.
कसले रे हे प्रेम??
खूप बोलायचं होत रे तुझ्याशी, मन मोकळं करायचं होतं. पण तुला पाहिलं की शब्दच फुटत नाहीत रे! तुझी ही अवस्था नाही पाहवत आता! तरीही मी तुझी साथ नाही सोडणार. शक्य होईल तेव्हा येईन, तुझ्याशी बोलेन, पण आता मला त्यालाही वेळ द्यावा लागेल.
हे नारंगी रंगाचं पत्र इथंच तुझ्या जवळ असेल. मी सांगेन मावशीला की, नेहमी हे पत्र तुझ्या शर्टच्या खिश्यात ठेवायला. जेव्हा कधी वास्तवात येशील तेव्हा नक्की वाच.
हे शेवटचंच बोलणं माझं, यानंतर मी तुझ्याशी बोलेन की नाही, माहीत नाही! पण खरंच रे, खूप प्रेम आहे तुझ्यावर, त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच आणि शेवटपर्यंत असेल.
संसार त्याच्याशी करतेय,
पण तुझ्याच बंधनात शेवटपर्यंत असेन.
हृदय जरी त्याला दिलं असलं,
तरी जीव मात्र तुझ्यातच अडकलाय रे!
संभाळ स्वतःला आणि सावर!