Ek hota raja - 1 in Marathi Love Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | एक होता राजा…. (भाग १)

Featured Books
Categories
Share

एक होता राजा…. (भाग १)

"Hello….Hello…. राजेश… ",

" हा… बोलं गं… ",

"अरे… तुझा आवाज clear येत नाही आहे.… Hello…?",

"थांब जरा… बाहेर येऊन बोलतो." राजेश ऑफिसच्या बाहेर आला.

"हा, येतो आहे का आवाज आता…. बोल मग. ",

"हा… आता येतो आहे clear… कसा आहेस तू…",

"मी ठीक आहे आणि तू कधी आलीस केरळ ट्रीप वरून…. फोटो बघितले तुझे…. सगळे फोटो छान आहेत हा… ",

"हो का…. तूला तर सगळेच फोटो आवडतात माझे. असा एक तरी फोटो आहे का जो तुला आवडला नाही… सांग. ",

"ते तर आहेच… कारण तू दिसतेस सुद्धा छान…. मग चांगलेच असणार ना फोटो… " त्यावर निलम हसली. " तू पण ना राजेश… बरं ते जाऊ दे… तुला एक good news सांगायची आहे." राजेशला त्याचचं टेंशन होतं.

" हा … बोलं…" जरा चाचरत बोलला राजेश.

" अरे…. लग्न ठरलं माझं…" राजेशच्या मनात लागलं कूठेतरी. " हो… " तेवढंच बोलला राजेश.

" अरे… हो काय… अभिनंदन नाही करणार का ? " ,

"हं … हो… congratulations निलम." राजेश उगाचच आनंदाचा आव आणत बोलला. " चल… तुला नंतर call करतो. बॉसने बोलावलं आहे." राजेश खोटंच बोलला. "Ok…. Bye then…. भेटू संध्याकाळी… " म्हणत निलमने call कट्ट केला.


तसाच थोडावेळ उभा होता राजेश. निलमचं लग्न ठरलं… कधी… कळलचं नाही मला. तिने तरी सांगायचे होते ना मला… हं… तिला ते सांगणं महत्वाचं वाटलं नसेल मला कदाचित… राजेश विचार करत उभा होता." अरे राजा…. " मागून कोणीतरी आवाज दिला. तेव्हा राजेश भानावर आला. मंगेश होता तो. " अरे राजा… इकडे काय करतो तू ? … चल ना, lunch time झाला,जेवायचे नाही का… " राजेशची भूक पळून गेली होती.
"नको रे… भूक नाही… तू जा जेवून घे." ,
"Tiffin आणला नाहीस का…नसेल तर माझ्याकडे आहे तो अर्धा-अर्धा share करू… चल. ",
"tiffin आहे रे… पण… " मंगेशने ओळखलं, राजेश जरा नाराज आहे ते.
"काय झालं राजा… ",
"काही नाही… जा तू, जेवून घे… मी येतो आत थोडयावेळाने." मंगेशने त्याला जबरदस्ती केली नाही मग. तो गेला आत ऑफिसमध्ये. राजेश बाहेरच थांबला विचार करत.


आज सगळा दिवस, राजेश कसल्याश्या विचारात होता. मंगेशला कळलं ते. त्याने पुन्हा त्याला विचारलं नाही. संध्याकाळ झाली, ऑफिस मधून निघायची वेळ… मंगेश राजेश जवळ आला. " राजा… " राजेश तसाच बसून खुर्चीवर. " ये राजा… " मंगेशने पुन्हा हाक मारली.
" हं… हा… काय… काय झालं… ",
"अरे निघूया ना घरी… चल.",
"हा… सामान आवरतो मग निघू. "राजेशने पटपट सामान आवरलं आणि निघाले दोघे. Bus stop वर पोहोचले. ऑफिस ते bus stop … १० मिनिटाचा रस्ता. या वेळात राजेशने एक शब्द काढला नाही तोंडातून. मंगेश सुद्धा काही बोलला नाही मग. पाचचं मिनिटं झाली असतील तिथे येऊन, अचानक निलमची गाडी आली समोर." हे निलम… " मंगेशने निलमला हाक मारली. धावतच गेला गाडीजवळ.
" अरे… कधी आलीस केरळ वरुन…",
"पहिला गाडीच्या आत तर ये.… घरी सोडते दोघांना. " मंगेश पटकन जाऊन बसला गाडीत. राजेश तसाच उभा bus stop वर. निलम आणि मंगेश एकमेकांकडे पाहू लागले. मंगेश गाडीतून उतरला… " अबे… राजा, ये राजेश… चल ना पटकन… नाहीतर ट्राफिक जाम होईल पुन्हा." मनात नसताना राजेश गाडीत, मागच्या सीटवर जाऊन बसला. आता ही सुद्धा नवलाईची गोष्ट होती, निलम आणि मंगेश साठी. निलम सोबतच म्हणजे तिच्या बाजूलाच बसायचा गाडीत नेहमी. आणि आज चक्क मागच्या सीटवर. मंगेश पुढे बसला. निलमने राजेशकडे एक नजर टाकली आणि गाडी सुरु केली.


"बरं… कधी आलीस आणि कशी झाली केरळ ट्रीप… ?", मंगेशने विचारलं.
" धम्माल रे… काय मस्त वातावरण असते रे तिथे… म्हणजे शब्दात वर्णन करू शकत नाही असं… beautiful environment… अरे राजाने फोटो दाखवले नाहीत का… काय रे राजा… " राजेश गाडीच्या बाहेर बघत होता. त्याचं लक्ष बाहेरच होतं, त्याच्याच दुनियेत… मंगेश राजेशकडे बघत होता. निलमला कळलं नाही, कि राजेश का उत्तर देत नाही ते. विषय बदलण्यासाठी मंगेश बोलला.
"बरं झालं हा, तू भेटलीस ते… नाहीतर अजून कितीवेळ बसची वाट पहावी लागली असती देव जाणे… मग तिथून ट्रेनची वाट बघायची… कटकट नुसती… आज आरामात घरी.",
" घरी नको निलम… स्टेशनला सोड. " खूप वेळाने राजेश पहिल्यांदा बोलला.
" अरे… स्टेशन कशाला… सोडते ना घरी.",
"नको… तुला लांब पडेल ते." ,
" काहीच काय राजा… इतर वेळेस सोडते ना घरी दोघांना… तेव्हा असं बोलला नाहीस कधी.",
"तसं नाही… पण आज लवकर जायचे आहे घरी… ट्रेनने लवकर पोहोचेन, कार पेक्षा.",
"राजेश… मित्रा… कारने आरामात जाऊ कि…" मंगेश मधेच बोलला.
" तुला कारने सोडेल ती, मी ट्रेनने जातो आहे…" राजेश बोलला. मंगेश गप्प झाला. निलमने दोघांना स्टेशनला सोडलं आणि ती गेली पुढे निघून.


३ character's … निलम,राजेश आणि मंगेश… तिघे जवळचे मित्र. त्यातले राजेश आणि मंगेश, हे दोघे लहानपणापासूनचे मित्र… एकाच शाळेत नसले तरी एकाच चाळीत, शेजारी-शेजारी होते. निलमची ओळख कॉलेजमधली. त्यात मात्र तिघे एकत्र होते. फक्त निलम commerce ला होती आणि हे दोघे Arts ला होते. शाखा वेगळ्या असल्या तरी त्याचं भेटणं असायचं रोज. आता निलम आणि त्यांची ओळख कशी…? ११ वीला असताना, एक नाटक बसवलं होतं कॉलेजमध्ये. त्यात या तिघांनी भाग घेतला होता. राजेशला मूळातच आवड अभिनयाची. मंगेशने राजेश होता म्हणून स्वतःच नाव दिलं होतं नाटकात. तर निलम फक्त एक टाईमपास करण्यासाठी म्हणून ते नाटक करत होती. नाटक पूर्ण तयार झालेलं. कास्टिंग तेवढी बाकी होती. राजेश छान अभिनय करायचा. त्यामुळे त्याला प्रमुख भूमिका होती. नाटक पौराणिक विषयावर आधारित होते. त्यात राजेश " राजा" चा रोल करत होता. राजेशच्या सांगण्यावरून, मंगेशला प्रधानमंत्री केलं होतं. ऐनवेळी राणीची भूमिका करणारी आजारी पडली आणि फक्त टाईमपास साठी आलेली निलम… तिच्या वाटणीला "राणी" चा रोल आला तो, ती चांगली दिसायची म्हणून. नाटक छान बसलं आणि सगळ्यांना आवडलं सुद्धा. त्याच्या तालिमी चालायच्या रोज कॉलेजमध्ये. रोज भेटणं व्हायचं तिघांचे. त्यातून मैत्री झाली तिघांची. नाटक संपल तरी मैत्री राहिली. ११ वी संपून १२ वी सुरु झाली. निलमचा तिचा असा ग्रुप होता, परंतू या दोघांबरोबर आपलं tuning छान जुळते, हे तिला समजलं होतं. मग काय, ११ वीत सुरु झालेली friendship… अगदी १५ वी म्हणजे कॉलेज सुटे पर्यत होती.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: