आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(10)
‘‘ठीक आहे! तुला जसं वाटतंय तसं तू वागू शकतोस. आमचं काही मत नाही. आम्ही जे योग्य आहे ते तुला सांगण्याचा आणि तुझी चूक तुला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या या भोळया स्वभावाचा ती गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करते आहे. तू जरी जाणूनबुजून कोणती चूक केली नसलीस तरी नकळत तुझ्या हातून चूक घडत आहे. इथून पुढं कसं वागायचं ते तुझं तू ठरवं.’’
‘‘बसं कर आता अनिल, खूप झालं तु चं बोलणं. इथून पुढं मला काहीच सांगण्याचा अगर माझी चूक काढण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. मी कसं वागायचं, कसं रहायचं हे माझं मी बघतो. तुमचा आणि माझा संबंध इथून पुढं संपला म्हणून समजा. आतापर्यंत खूप ऐकलं तुमचं, पण इथून पुढं मला ते जमणार नाही. मला जे योग्य वाटतंय ते मी करीन. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी काहीही चुकीचं करत नाही, वागत नाही. शुद्ध मित्रत्वाचं नातं शिकविणारे तुम्ही मित्रत्वाला कलंक लावत आहात हे विसरू नका.’’
‘‘अरे काय बोलतोयस हे प्रशांत, तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. अरे आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. तुझं वाईट व्हावं, हा आमचा मुळीच उद्देश नाही.’’
‘‘काही गरज नाही. संदिप, मला चांगलं काय आणि वाईट काय हे पटवून सांगण्याची. माझं भलं करण्याची. इथून पुढं मला तुमच्याबरोबर राहायचंच नाही.’’
‘‘तुझ्या मताशी तू जर ठाम असशील तर ठीक आहे! पुन्हा आम्ही तुला काही सांगणारही नाही. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो.’’
‘‘मला तुम्ही सांगूही नका आणि माझ्याशी बोलूही नका.’’
‘‘अरे प्रशांत, काय बोलतायस तू?’’
‘‘अनिल, त्याला जसं वागायचं आहे तसं वागू दे.’’
‘‘पण.’’
‘‘पण वगैरे काही नाही. एक ना एक दिवस नक्कीच त्याची चूक त्याला समजून येईल. आणि एक ना एक दिवस त्याला आमचे विचार पटल्याशिवाय राहणार नाहीत.’’
‘‘प्रशांत तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ शकतोस. पत्र लिहून तुला दुखविल्याबद्दल हवं तर मला माफ कर.”
अशा पद्धतीचं सारं बोलणं ऐकून सर्वजण माझ्या भावनेशी खेळ खेळत आहेतअसं वाटत होतं. मी खूप दुखावलो गेलो होतो. त्यांच्यापासून अलिप्त राहणं हा माझ्याकडे एकमेव पर्याय होता. मी अलिप्त राहण्याचं ठरविलं. अभ्यासाचं कारण सांगून मी हॉस्टेलच्या कोपऱ्यावर असलेल्या खोलीमध्ये एकटाच राहण्याचं ठरविलं.
घडलेली घटना कुणालाही सांगितली नाही. विशेषत: स्पेशल खोली कुणालाही राहायला देत नसत. पण माझी अभ्यासातील प्रगती आणि सांगितलेलं अभ्यासाचं कारण यामुळे सरांनी परवानगी दिली होती.
मित्रांच्यात रुळलेला मी त्यांच्यापासून दूर झाल्याचं मनाला वाईटही वाटत होतं. एकटे एकटे वाटत होतं. मन रमत नव्हतं. पण मनाचा निश्चय पक्का केला. आपली चूक नसताना जाणूनबुजून त्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत. एक ना एक दिवस माझी काहीही चूक नाही हे त्यांना सिद्ध करून दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता कितीही संकटे येऊ
देत, त्यांच्या आधाराशिवाय आपण खंबीरपणे रहायचं असं मनाशी निश्चय पक्का केला होता.
मी त्या तिघांपासून अलिप्त राहतोय, हे क्लासमधल्या रोहन, सुरज, स्नेहल, सुमैया, शबाना या माझ्या मित्रमैत्रिणींना समजलं होतं. त्यांच्यापासूनही मी अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतोय हे ते जाणून होते. रोहन आणि सुरज मधल्या सुट्टीत मला भेटायला आले. मी एकटाच बागेत बसलो होतो. अचानक दोघे जण तिथे आले.
‘‘प्रशांत, असं काय घडलंय तुझ्याबाबतीत ते तरी आम्हाला सांगशील? का असा आमच्यापासून तू लांब लांब राहतोस, हेच आम्हाला काही कळत नाही.’’
‘‘प्लीज मला एकटेच राहू द्या. माझा मैत्रीबद्दलचा मनात असलेला विश्वासच उडलाय. मला कुणाशीही मैत्री करायची नाही आणि कुणाबरोबरही राहायचं नाही. मी ठरवलंय एकटं राहण्याचं.’’
‘‘अरे प्रशांत, असं वेड्यासारखं काय बोलतोयंस. मनातला चुकीचा गैरसमज काढून टाक.’’
‘‘नाही तो गैरसमज नाही. जे माझ्याबाबतीत घडलंय तेच मी बोलतोय.’’
‘‘ठीक आहे. तर मग जे झालेलं आहे ते विसरुन जा.’’
‘‘नाही, जे माझ्याबाबतीत घडलंय ते मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी माझ्याविरुद्ध सूडाच्या भावनेने वागून माझ्यावर जो आरोप केलेला आहे तो चुकीचा आहे.’’
‘‘अरे प्रशांत, तुझ्यावर लावलेला तो आरोप नाही किंवा तुझी चूक नाही
फक्त त्यांनी तुला सुमैयापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.’’
‘‘अरे रोहन, पण दूर राहण्याचा प्रश्नच काय येतो? तिच्या, माझ्या मनात एकमेकांबद्दल वाईट भावना नसेल तर.”
‘‘ठीक आहे! तुझ्या मनात तिच्याबद्दल वाईट भावना नाही. पण तुझ्याबद्दल तिच्या मनात वाईट भावना नाही, हे तू कसे सिद्ध करून दाखविणार?’’
‘‘तेच तर सिद्ध करून दाखविण्याची मी शपथ घेतलीय आणि त्यांच्या मनात जे आमच्याबद्दल वाईट विचार आहेत ते आमच्या दोघांच्या मनात
एकमेकांबद्दल अजिबात नाहीत. आमचं नातं हे शुद्ध मैत्रीचं आहे. हे त्यांना एक ना एक दिवस पटवून दाखविल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.’’
‘‘ठीक आहे! तुला सिद्ध करुन दाखवायचच आहे, तर तू अवश्य दाखव.पण आम्हाला त्याची का शिक्षा देतोस. मला नाही समजलं.’’
‘‘अरे तू, आमच्यापासून दूर राहण्याचा का विचार करतोयस. अलिप्त राहून, कुणाशीही न भेटून तुझा प्रश्न सुटणार नाही. उलट तुझ्या अभ्यासावर वाईट परिणाम होणार आहे. तुझा दुसरा कुठलाच उद्योग चाललेला नाही. या अविर्भावात तुला चारचौघात वावरले पाहिजे, राहिले पाहिजे असं संशयी आणि व्देषाच्या भावनेनं वागून तुझी प्रगती नाही तर अधोगतीच होणार आहे. त्याचा तुझ्या मनावरती वाईट परिणाम होणार आहे. तू हजारवेळा ही गोष्ट बोलून दाखविण्यापेक्षा तुला हे सिद्ध करुन दाखविलं पाहिजे की तु चं नातं हे शुद्ध मैत्रीचं आहे.’’
‘‘होय, रोहन शुद्ध मैत्रीचंच आहे. सुमैयावर माझा विश्वास आहे. तू जे मला सांगितलं तेही मला पटलेले आहे.’’
सुरज रोहनचं आणि माझं चाललेलं बोलणं ऐकत होता. तोही रोहनच्या मताशी सहमत होता.
‘‘पडला ना आता डोक्यात प्रकाश, मग आता लागा कामाला.’’
सुरज खूप वेळ शांत उभा असलेला एकदाचा बोलून गेला. इतक्यात बेलचा आवाज झाला. आम्ही वर्गाकडे गेलो.
वारंवार मनात एकच विचार येत होता. सुमैयाच्या मनात माझ्याबाबतीत शुद्ध मैत्री आहे. तिचं माझ्यावर एकतर्फी प्रेम नाही हे सिद्ध कसं करून दाखवायचं? सुरेश, अनिल, संदिप आणि रोहन, सुरजला सोडून मैत्रिणींच्यात मात्र ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. माहित होतं फक्त सुरेश, अनिल आणि संदिप यांच्यापासून मी अलिप्त राहतोय एवढंच. अलिप्त राहण्याचं कारण त्यांना माहीत नव्हतं आणि रोहननं जरी मित्रांपासून अलिप्त न राहण्याचा आणि बोलण्याचा सल्ला मला दिला असला तरी सुरेश, अनिल आणि संदिपबरोबर मी बोलत नव्हतो. कारण त्यांच्या बाबतीत माझ्या मनात असलेला राग.
हॉस्टेलवर एका खोलीत एकटाच राहत होतो. पूर्वीसारखं हसणं, खिदळणं बंद होतं. अभ्यास बाकी गप्पाटप्पांवर नियंत्रण होतं. संदिप, सुरेश, अनिल हे तिघे सोडून बाकीच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मिसळत होतो. पण त्यांच्यापासून दूर होण्याचं कारण कोणाला सांगत नव्हतो. एकटं राहण्याचं थोडं दु:खही वाटत होतं. दोन वर्षे एका रूममध्ये एका क्लासमध्ये असलेले आम्ही अचानक साध्या कारणांवरुन दूर होणं खूप मोठी वाईट गोष्ट होती. ते तसे कधीच माझ्याशी वाईट वागले नव्हते, पण आताच अचानक असे का वागले असतील? अलिप्त राहण्याचा अथवा न बोलण्याचा त्यांनी विषयही काढला नव्हता. मीच त्यांच्यापासून दूर झालो. त्यांना माझं वाईटच चिंतायचं असतं अथवा सूडाच्या भावनेनं वागायचं असतं तर ते याच्या अगोदरही वागले असते, पण आताच का असं? ते खरोखरच तसे वागत होते का? खरंच मी रागाच्या भरात खूप काही बोललो. मी चुकीचा निर्णय घेतला. त्यांच्यापासून अलिप्त न राहता सुमैयाचं माझ्यावर एकतर्फी प्रे आहे का? हे सिद्ध करणं काहीच अडचणीचं नव्हतं. हे सिद्ध करायला अलिप्त राहण्याची अथवा न बोलण्याची काहीच आवश्यकता नव्हती.
*****