Aaghat - Ek Pramkatha - 4 in Marathi Love Stories by parashuram mali books and stories PDF | आघात - एक प्रेम कथा - 4

Featured Books
  • આંખની વાતો

      પુષ્ટિ  બગીચામાં ફરતી હતી અને પોતાના ભૂતકાળની વાતો યાદ કરત...

  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

Categories
Share

आघात - एक प्रेम कथा - 4

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(4)

तिथे मी भेटू शकलो नाही. पुन्हा ते भर पावसात हॉस्टेलकडे चालत आले. त्यांनी माझ्या बॅगेवर जेवण ठेवलं आणि निघून गेले. त्यादिवशी आजोबा भेटू शकले नाहीत याचं दु:ख तर वाटलंच. पण त्या भर पावसात ते चार मैल भिजत चालत आले याची कल्पना मी त्यावेळी करू शकलो नाही. तरी आज मला त्या कल्पनेनं शहारे येतात. कारण त्यावेळी त्यांचं वय होतं ७९ वर्षे. उन्हाळयाची सुट्टी पडली की आम्ही आनंदून जायचो. उन्हाळयाच्या सुट्टीत गावी आल्यानंतर मी शेतामध्ये आजी-आजोबांना मदत करणं, जनावरांना गवत आणणं हा दररोजचा दिनक्रम ठरलेला. आजी-आजोबा यांचे चेहरे उजळून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठे समाधान असायचे. घरातील छोटी कामं करणं, शेतात कामावर जाणं, त्या पैशातून कॉलेजचा खर्च भागविणं, अशा पद्धतीनं तडजोड केल्याशिवाय पर्याय नसायचा. डोळयासमोर एकच लक्ष असायचं. जिद्दीनं शिकायचं, काहीतरी वेगळं करायचं. गावाकडं आलो की गावातली लोक कौतुक करायची. आपल्या उनाड पोरांना माझ्या समोर समज द्यायची. बघ ते आई-बा नसलेलं पोरं किती सुधारलंय. बोर्डींगला राहून शिक्षण घेतंय आणि तुम्हांला सगळं असून शिकायला नको. गावातून उनाडक्या करत फिरायला पाहिजे. चारचौघात असे बोलले म्हणजे मला उमेद यायची शिकायची, तर दुसऱ्या बाजूस काहीजण टोचूनही बोलायचे, म्हणायचे, बोर्डींगला आसतोस होय? जेवण चांगलं असतं का? शिळं पाकं खात जाऊ नकोस. त्यांच्या बोलण्यातला गर्भित अर्थ मला समजायचा. मी म्हणायचो, ताजे असल्यावर शिळं खायचं काही प्रश्नच येत नाही. त्यानंतर ते शांत व्हायचे. पण माझ्या मनाला खूप वाईट वाटायचे. पण कुणाच्या चांगल्या बोलण्याने मी जास्त हुरळूनही जात नव्हतो आणि कुणाच्या वाईट बोलण्याने मी खचूनही जात नव्हतो, कारण माझे लक्ष होतं ध्येयपूर्तीसाठी लढणं. कुणाच्या वाईट बोलण्यानं कठीण परिस्थितीत खचून जायचं नव्हतं.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं कॉलेज आता उत्साहित झालं होतं. सगळीकडे कार्यक्रमाची तयारी चालू होती. जो तो सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेला प्रत्येकजण वैयक्तिक जे कौशल्य सादर करायचे आहे त्याची तयारी

करीत होता. महाविद्यालयाच्या बागेत मुलामुलींची या विषयावर चर्चा रंगली होती. शिल्पाने आनंदला प्रश्न केला.

‘‘ए आनंदा, तू काय सादर करणार आहेस?’’

‘‘मी गाणे सादर करणार आहे.’’

‘‘ए कोणतं गाणं म्हणणार रे सांग ना आम्हाला?’’

स्नेहलने उत्साहाच्या भरात आनंदला विचारले.

‘‘काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. हे भावगीत म्हणणार आहे.’’

‘‘वा! छान आहे नक्की म्हणं.’’

स्नेहल म्हणाली.

‘‘सुरेश तू काय सादर करणार आहेस?’’ राजने प्रश्न केला.

‘‘मी एक हिंदी गीत गाणार आहे. जीना यहाँ मरना यहाँ...’’

सुमैया यावर हसत म्हणाली,

‘‘मरने की बात मर कर यार, अभी जीना बहुत बाकी है!’’

यावर सारेजण हसू लागले. मी शांत होतो. माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटले नाही म्हणून सुमैयाने विचारले,

‘‘अरे, प्रशांत तू उदास का आहेस?’’

‘‘नाही उदास वगैरे काही नाही.’’

‘‘अरे ते जाऊ दे तू काय सादर करणार? सांग.”

‘‘नाही, मी काही नाही सादर करणार.’’

‘‘कारण सगळेजण सादर करायला लागले तर बघायचं कोण?’’

‘‘हे काही नाही चालायचं बरं का.’’

‘‘काहीतरी तुला सादर करायलाच हवं.’’

‘‘ए तू माझ्या आवडीचं गाणं म्हणशील ना?’’

‘‘नको सुमैया,मला उगीच राजी करू नकोस. मी काही म्हणणार नाही.’’

आमची दोघांची चाललेली कैफियत सगळेजण पाहत होते. गालातल्या गालात हसत होते. सगळेजण माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण मी काही राजी झालो नाही. त्या दिवशी खरंच मी मूडमध्ये नव्हतो.

मनावर कोणती तरी मळभ होती. उत्साह जाणवत नव्हता. मन नाराज होतं. मी तिथून रागाने निघून गेलो, तसं साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. आज याला झालंय तरी काय! असं सारे पुटपुटत होते. सुमैया माझ्या पाठोपाठ येऊ लागली. ती बोलवत होती. पण मी काही तिला प्रतिसाद देत नव्हतो. कॉलेजच्या आवारातील सगळे विद्यार्थी, विद्यार्थिनी आमच्याकडे बघत

होते.

‘‘प्रशांत थांब! तुला माझी शपथ आहे. अरे मी काय सांगते ते तरी एैक

आणि मग पुढे जा.’’

यावर मी थांबलो.

‘‘हे बघ तुला जरी काहीच सादर करायचे नसेल तरी राहू दे. आमची काहीच जबरदस्ती नाही. पण तुझ्या मनातलं दु:ख तरी या तुझ्या मैत्रिणीला सांगणार आहेस की नाही?’’

(आमचं बोलणं चालूच होतं. तो परिसर अगदी शांत होता. सभोवताली दाट झाडी होती.)

‘‘प्लीज, सुमैया मला आग्रह करू नको. मी भाग न घेण्याचं असं कारण वगैरे काहीच नाही.’’

‘‘प्रशांत, मैत्रिणीपासून काही लपवायचा प्रयत्न करू नको. खरे खरे सांग.’’

मी काहीच न बोलता तिथून निघून आलो.

‘‘खरं तर मी भाग न घेण्याचं खूप वेगळं कारण होतं. मला आमच्याच क्लासमधल्या तीन-चार मुलांनी मी भाग घेऊ नये म्हणून धमकी दिली होती. याचं कारण मला समजत नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं की, मला जाणून-बुजून

मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. कारण क्लासमध्ये पडणारा माझा प्रभाव आणि माझं हुशारपण त्यांना रुचत नव्हतं, पण मी हे काही समैयाला सांगितलं नाही.’’

शेवटी ती नाराज झाली. डोळयात अश्रू आणून ती घरी निघून गेली. मला आश्चर्य वाटलं. मी कार्यक्रमात भाग न घेण्याचं, मी दु:खी असण्याचं हिला काय एवढं दु:ख?

एकीकडे अनिल, सुरेश आणि संदीपने भाग घेतला होता. पण मी भाग घेतला नसल्यामुळे त्यांनीही माघार घेतली होती.

मी त्यांना विचारलं, अरे तुम्ही का भाग घेत नाही कार्यक्रमात?

पहिल्यांदा आम्हांला तू सांग? तू का भाग घेत नाहीस?

‘‘सुमैयाने एवढी विनंती करूनही तू तिला काहीच सांगितलं नाहीस.

आम्हांला तरी तू काय सांगणार पण तुला सांगायची काही गरज नाही. तू का भाग घेत नाहीस याचे कारण आम्हांला समजले आहे.’’

‘‘तुला सतीशने आणि त्यांच्या दोन मित्रांनी मिळून भाग न घेण्याची दिलेली धमकी हेच कारण आहे ना? ठीक आहे, तू त्यांना घाबरलास म्हणून तू माघार घेतलीस. तु माघार घेतलीस म्हणून आम्हीही माघार घेतली. तुला आमच्या मनातले चार शब्द सांगणार आहे. तुला पटलं तू होकार दे. अगर तुझ्या नकाराबरोबर आमचाही नकार.”

अनिलचं बोलणं थांबलं आणि सुरेशने सांगायला सुरुवात केली, ‘‘हे बघ प्रशांत, आपण असं प्रत्येकाच्या धमकीला घाबरून जर गप्प बसू लागलो, तर प्रत्येकजण आपल्याला पायाखाली तुडवायला बघेल. आपल्या निष्क्रियतेचा फायदा घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करेल.’’ माझं ठाम मत आहे त्यांच्या धमकीलान जुमानता आपण बिनधास्तपणे भाग घ्यायला हवा.

‘‘होय प्रशांत, सुरेशचे बरोबर आहे. त्यांना न जुमानता भाग घ्यायला हवा. अन्यथा आपल्याला सगळयांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.’’ संदिप म्हणाला.

त्यावर मी म्हणालो, ‘‘आपण बाहेर गावातून शिक्षणासाठी आलेलो आहोत. आपली परिस्थिती गरीबीची. नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा विनाकारण त्याचं शत्रुत्व ओढवून घेण्यापेक्षा आपण अलिप्तच राहिलेलं बरं.’’

‘‘तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे. पण येथून पुढे सगळे आपला गैरफायदा घ्यायला मागेपुऐ बघणार नाहीत. आपल्याला निर्भिडपणे त्यांचं आव्हानं पेललं पाहिजे. तरच थोडी फार आपली वचक त्यांच्यावर राहील. भले आपण गरीब असलो तरी काय झाले. आपला स्वाभिमान दुसऱ्याजवळ गहाण ठेवायचा काय?’’

अनिलचं हे निर्भिड बोलणं माझ्या मनाला पटलं आणि सगळयांनी आम्ही इर्षेनं भाग घेण्याचं ठरवलं. आम्ही भाग घेणार नाही हे सगळया मित्रमैत्रिणींना माहीत होतं पण आम्ही आमच्या क्लास टीचरांकडे जाऊन पुन्हा नाव नोंदवलं. पण ही गोष्ट आम्ही चौघे मित्रांना सोडून बाकी कोणाला माहीत नव्हतं. पण एक प्रश्न माझ्यापुढे होता तो म्हणजे सुमैयाचे आवडते गीत कोणतं? कारण तिला त्यावेळी मी खूप नाराज केलं होतं. ती माझ्यावर खूप चिडली होती.