उद्धव भयवाळ
औरंगाबाद
जादूचा आरसा
बालमित्रांनो, फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एक होतं गाव. त्या गावाचं नाव होतं आनंदपूर. त्या गावाच्या नावाप्रमाणेच तेथील सर्व लोक आनंदी होते. सुखासमाधानाने जीवन जगात होते. नेहमी सत्य बोलत होते; आणि इतरांशी बंधुभावाने वागत होते. तसेच व्यवहारास प्रामाणिक होते. त्यामुळे त्या गावात कधीच कुणाचे कुणाशी भांडण होत नसे.
पण एक दिवस काय झालं, त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहण्यासाठी आला. त्याचं नाव होतं धनराज. त्याच्याजवळ खूप संपत्ती होती पण तो फार कंजूष होता. तो नेहमी खोटे बोलायचा. व्यवहारामध्ये इतरांना फसविण्यात त्याला धन्यता वाटायची. तो फार दुष्ट होता. दारी आलेल्या याचकास कधीही भिक्षा वाढीत नसे. कुणी गरीब माणूस मदतीच्या अपेक्षेने त्याच्याकडे आला तर त्याला धक्के मारून हाकलून द्या यचा. काही कारण नसतांना इतरांशी भांडण उकरून काढायचा. दुसऱ्याचे चांगले झालेले त्याला बघवत नसे. धनराजला एक मुलगी होती. तिचे नाव होते शीला. ती स्वभावाने फार चांगली होती. सद्गुणी होती. तिला धनराजचे वागणे अजिबात पटत नव्हते. शीलाची आईसुद्धा शीलासारखीच स्वभावाने चांगली होती. ती धनराजला नेहमी समजावून सांगायची. पण तो तिचे ऐकत नसे. तिला तो फार त्रास देत असे. धनराजने शीलाच्या आईला छळून छळून मारले होते. धनराज शीलालाही छळायचा. धनराजचे फक्त पैशावर प्रेम होते. तो रोज स्वत: चांगले पक्वान्न खायचा आणि शीलाला शिळी भाकरी द्यायचा. शीलाचे वय फक्त बारा वर्षांचे होते. पण घरातील सर्व कामे तो शीलाकडून करवून घ्यायचा. तिला वेळेवर जेवायला देत नसे. कामाच्या ओझ्यामुळे आणि उपासमारीमुळे शीला खूप खराब झाली. कधी कधी ती आजारी पडायची. तरीही धनराजला तिची दया येत नसे. तशाही स्थितीत तो तिला सर्व कामे करायला लावीत असे. शीला रोज देवाला प्रार्थना करायची. म्हणायची, "देवा, माझ्या बाबांना चांगली बुद्धी दे. खोटे बोलण्याची आणि इतरांना फसविण्याची त्यांची सवय जाऊ दे."
पण देव काही तिचे ऐकत नव्हता. धनराजच्या स्वभावात काहीच फरक पडत नव्हता. धनराज शीलाला खूप त्रास द्यायचा. त्याच्या जाचाला शीला कंटाळली. एक दिवस तिच्यासाठी धनराजने काढून ठेवलेली शिळी भाकरी देखील तिने खाल्ली नाही. ती सारखी रडू लागली. तिने ती शिळी भाकरी एका फडक्यात बांधली. तिला वाटले, आता घरातून पळून जावे. खूप खूप दूर जावे. पुढे आपल्या जीवाचे काहीही होवो, पण या त्रासातून आपण मुक्त व्हायला हवे.
संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. धनराज कुठल्यातरी कामाकरता बाहेर गेलेला होता. शीलाला वाटले, पळून जाण्यासाठी ही संधी चांगली आहे. तिने इकडेतिकडे पहिले. भाकरीचे गाठोडे उचलले आणि वाड्याच्या मागील दारी ती आली. ती पळून जाण्याच्या बेतात असतांना तिला कुणाचा तरी कण्हण्याचा आवाज आला. तिने वळून पाहिले. एका कोपऱ्यात एक म्हातारी बसली होती. ती खूप थकलेली दिसत होती. शीला म्हातारीच्या जवळ गेली. म्हातारी तिला म्हणाली, " मला खूप भूक लागली आहे. तुझ्याजवळची शिळी भाकरी मला दे." शीलासुद्धा दिवसभर उपाशी होती. तरी तिला म्हातारीची दया आली. तिने तिची भाकरी त्या म्हातारीला दिली. म्हातारीने ती भाकरी खाल्ली. तेव्हा शीलाला खूप आनंद झाला. इतक्यात म्हातारीने आपले खरे रूप प्रगट केले. ती एक सुंदर परी होती. निळ्या निळ्या डोळ्यांची. सोनेरी केसांची. ती शीलाला म्हणाली, " मुली, मी तुझी परीक्षा पाहिली. तू स्वत: उपाशी असतांनाही तुझी भाकरी मला दिलीस. तू अंत:करणाने दयाळू आहेस. तुझे दु:ख काय आहे ते मला सांग. मी तुझे दु:ख दूर करीन."
शीलाने सर्व हकीकत त्या परीला सांगितली. पळून जाण्याचा बेतही सांगितला. तेव्हा त्या परीने शीलाला एक छोटासा आरसा दिला व सांगितले, " हा आरसा तुझ्याकडे ठेव. हा आरसा जादूचा आहे. नेहमी सत्य बोलणाऱ्या, प्रामाणिकपणे वागणाऱ्या आणि दयाळू अंत:करणाच्या व्यक्तीने जर या आरशात स्वत:चा चेहरा बघितला तर त्या व्यक्तीचा चेहरा अधिकाधिक सुंदर होतो आणि तिचे सर्व कष्ट दूर होतात. तसेच दुष्ट, कंजूष माणसाने जर यात स्वत:चा चेहरा बघितला तर त्याला याचे वाईट फळ मिळते. तू आता पळून जाऊ नकोस. इथेच राहा. सारे ठीक होईल." असे म्हणून ती परी अदृश्य झाली.
शीलाने आपला पळून जाण्याचा बेत रद्द केला आणि तिने त्या आरशात बघितले. ताबडतोब तिच्या चेहऱ्यावरील थकवा दूर झाला आणि तिचा चेहरा टवटवीत, प्रफुल्लित दिसू लागला.
शीला आता दररोज त्या आरशात बघू लागली. तिचे सौंदर्य अधिक अधिक खुलू लागले. ही गोष्ट धनराजच्या लक्षात आली. एक दिवस धनराजने शीलाच्या हातातून तो आरसा हिसकावून घेतला. त्या आरशात तो पुन्हा पुन्हा पाहू लागला. काही तासांच्या आतच धनराजचा चेहरा विद्रूप दिसू लागला. त्याचे हातपाय लुळे पडले. त्याला बोलताही येईना. लोकांना ही बातमी कळतच खूप आनंद झाला. सर्व लोक धनराजची ही अवस्था पाहण्यासाठी जमले. सर्वांनी शीलाला सांगितले, "या धनराजने आम्हा सर्वांना आणि तुलाही खूप छळले आहे. खूप त्रास दिला आहे. याचे गाठोडे बांधून आम्ही विहिरीत लोटतो." पण दयाळू शीलाने त्यांना तसे करू दिले नाही. तिने पांगळ्या वडिलांची देखभाल करण्यासाठी एक नोकर ठेवला. स्वतःस आणि वडिलांना पुरतील इतके पैसे ठेवून सर्व संपत्ती गरिबांना वाटून दिली. दयाळू शीला सुखी झाली. आनंदपूरचे सर्व लोक पूर्वीसारखेच आनंदित झाले.
*****************
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८