प्रिय पाऊस..,
कसा आहेस. खुप दिवसांपासून इच्छा होती कि तुला एक पत्र लिहायचं. पत्र तेव्हा लिहितात जेव्हा आपण आपल्या भावना एखाद्या समोर व्यक्त करू शकत नाही. त्यावेळी हे पत्र आपल्या कामी येत. मला ही तुझ्याकडे काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. एका मित्राकडे करतात ना अगदी तशाच. माझ्या कोणत्याही बोलण्याने तुला काही वाईट वाटलं तर समजून घे हा मला. म्हणुन आधीच बिग सॉरी माझ्या लाडक्या पावसा. चला मग पत्र सुरु करते.
आधी मला ना तुझा खुप कंटाळा यायचा, सॉरी हा. पण माणसाने कधी कधी खरं बोलावं. कंटाळा कशाचा तर होणाऱ्या चिखलाचा. काय व्हायचं, मी शाळेत जायची ना तेव्हा त्या चपलांमुळे सगळा चिखल माझ्या कपड्यांवर उडायचा, मग सगळे चिडवायचे म्हणुन जरा रागच यायचा तुझा.
आणि कधी कधी तर तु जो सकाळी चालु व्हायचास तो दिवसभर चालू राहायचास त्यामुळे शाळेत जाताना खुप त्रास व्हायचा रे. म्हणजे मध्यमवर्गीय घरातुन असल्याने आमच्याकडे प्रत्येकाकडे एक एकच छत्री होती. जी आम्हाला पुढच्या दोन-तीन वर्ष तरी वापरावी लागायची. त्या छत्रीतील छिद्रातून तुझं रोज दर्शन व्हायचं हा. पण खरं सांगू का...?, तु खुप जोरात यायचास ना तेव्हा आमच्या शाळेजवळ पाणी साचायच मग आम्ही त्यात छोट्या-छोट्या
होड्या करून सोडायचो. मज्जा यायची. नाही तर त्या डबक्यात उद्या मारायचो. घरी आलो की आईचा ओरडा ही खायचो. मज्जेत होते ते दिवस.
तु आलास ना की, खुप भारी वाटत हा. मन एकदम प्रसन्न होऊन जात. आता आठवतात ना त्या आठवणी. मन परत एकदा शाळेच्या त्या सुंदर आठवणी जगुन घेत. पावसाळा म्हणजे नवीन वर्ग, नवीन वह्या- पुस्तके, नवीन युनिफॉर्म. सगळं कसं नवीन मिळायचं. नवीन पुस्तकांचा, वह्यांचा तो गंध अजून मी मनाच्या खोलवर दरवळतो आहे. तुझ्या येण्याने मी मात्र त्या आठवणींच्या गर्द रानात हरवून जाते.
तुला म्हाहित आहे का, एकदा काय झालं.., मी तेव्हा तिसरीमध्ये होते. मधल्या सुट्टीमध्ये मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी शाळेच्या पटांगणात स्टाईल लावल्या होत्या आणि त्यावर साठलेला शेवाळामुळे पकडा पकडी खेळत असताना त्यावरून सरकली आणि पडली तेही तोंडावर. चांगलंच लागलं मला. मेन म्हणजे माझा खालचा ओठ पूर्णपणे फाटला होता. त्यातुन येणार रक्त पकडून मी शिक्षकांच्या रूममध्ये गेली आणि त्यांनी त्यावर औषध लावलं. त्यांचा ओरडा ही खाल्ला हा आणि घरी आल्यावर आईचा ओरडा हा वेगळा. मग काही दिवस चहा पण प्यायला मिळाला नव्हता. एकतर तु येऊन गेलास की किती थंडी लागायची. मग स्वेटर घालुन बसावं लागायचं दुसरा काही ऑपशन नव्हतच माझ्याकडे. त्या दिवशी जरा जास्तच राग आलेला. पण आता हसु येतंय. कारण चूक माझीच होती ना, त्या ओल्या पटांगणात खेळले नसते तर तसे झालेच नसते. त्यामुळे मी आता तुझी मनापासून माफी मागते. अगदी कान धरून, तू बोलत असशील तर उठाबशा ही काढेन.
पण जस जशी मोठी होत गेले ना तुझं महत्व कळत गेलं आणि त्या दिवसापासुन तु माझा लाडका झालास. त्यानंतर मन निसर्गाकडे जास्त धाव घेत गेलं. आता तर मला निसर्गच खुप जवळचा वाटतो आणि त्यात तु आलास की "दुग्धशर्करा", योगच काहीसा. त्यामुळे तु आता माझ्या मनाच्या खूप जवळ आहेस. तु आलास की, शाळेच्या सुखद आठवणी मला आठवतात.
अजून एक म्हणजे; मी तुझ्याकडुन एक गोष्ट छान शिकलीये. दुसऱ्यासाठी जगणं. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांसाठी काही करणं. आपल्याला काही मिळणार नाहीये तरीही दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहणं त्यातच आपला आनंद मानणारा असा हा तुच. तु आम्हाला प्रेम कसं करायचं ते शिकवतोस, मैत्री कशी निभावावी ते शिकवतो. स्वतः रडून दुसऱ्याला आनंद द्यायला शिकवतोस. मित्रा खुप काही शिकवतोस रे तु.
तु आलास ना की, कांदाभजी खावीशी वाटते. ते गरमा गरम जेवण तुझी आठवण करून देतं. पाऊस म्हटला की येतात त्या ट्रिप्स. निसर्गात रमण, बागडन, मज्जा करणं. बस एक विनंती करते तुझ्याकडे की, जिथे खुप गरज आहे अशा जागेवर ही पडत जा. म्हणजे तिथल्या लोकांना भेट, त्यांचे पाण्याचे प्रश्न सोडव. बाकी तु हुशार आहेसच.
चला आता जास्त नाही लांबवर हे पत्र. तु देखील काळजी घे स्वतःची. सारखा पडून थकत असशील ना. अशक्तपणा येईल अशाने, त्यामुळे मध्ये मध्ये पड म्हणजे जास्त थकणार नाहीस तु.
असच आमच्यावर प्रेम करत रहा. माझही तुझ्यावर खुप प्रेम आहे. काळजी घे लाडक्या.
तुझी एक मैत्रीण.
पाऊसवेडी