आवाज
लेखक : मिलिन्द गीता रामदास राणे
बऱ्याचदा आपला अंदाज असा असतो की काही गोष्टी दुसऱ्यांच्या बाबतीत घडतील. पण नेमक्या त्या नकोश्या वाटण्याऱ्या गोष्टी आपल्याच बाबतीत घडतात तेव्हा मात्र होणारा आघात बऱ्याचदा सहन करण्याच्या पलीकडचा असू शकतो .
माझ्या बाबतीत हि आता असच घडतंय………..
मी आज संध्याकाळी कामा वरून आलो . रोजच्या सारखा . फ्रेश होउन चहा पिउन मी आमच्या पोटमाळ्यावर बसायला गेलो . आम्ही बैठ्या चाळीत राहतो . जागा दहा बाय दहा ची आहे . त्या मुळे चाळीतल्या लोकांनी बसण्या झोपण्यासाठी खोलीच्या आत पोटमाळे बनवून घेतले आहेत . आमचा पोट माळा म्हणजे माझ्या साठी माझा छोटासा बेडरूमच आहे . माझी झोपायची लोखंडाची खाट, लिहिण्यावाचण्यासाठी छोटंसं टेबल . मी माझा बराचसा वेळ तिथेच घालवतो .
आता हि मी रोजच्या सारखा वर्तमान पत्र घेऊन माळ्यावर आलो . मस्त पैकी खाटेवर झोपून मी वर्तमानपत्र वाचायला सुरवात केली . थंडी ची सुरवात झाली होती . डिसेंबर महिना चालू होता . मी वर्तमान पत्र वाचण्यात गुंग झालो होतो . आणि इतक्यात हळू हळू मला ते नकोसे वाटणारे आवाज येऊ लागले . मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि माझं लक्ष परत वर्तमान पत्र वाचण्यात गुंतवलं . पण ते आवाज रोज च्या सारखे हळू हळू करत वाढले . आणि आवाज करणारे कौलं व पत्र्यांवरून जोरात उड्या मारत इथून तिथून फिरू लागले .
ते आवाज बराच वेळ ऐकून माझं डोकं फिरलं . मी मनातल्या मनात एक जोरदार कचकचीत शिवी नकोशे आवाज करत फिरणाऱ्या त्या मांजरांना घातली .
हो मांजरांनाच . आता तुम्ही बोलाल मांजरांच्या आवाजाने इतकं चिडायला काय झालं ? पण कारणच तसं होतं . हि मांजर घश्यातुन विचित्र असा वेगळाच आवाज काढत फिरत "आंव आंव आंव ". .....
आणि हा आवाज ते वर्षातून ठराविक वेळेलाच काढत, ओरडत संपूर्ण चाळ भर फिरत . आणि ते आवाज ऐकले कि लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायची . मनात विचार यायचा आता या वेळी कोण ?
असं म्हणतात कि कुत्र्या, मांजरांना मृत्यु आधी दिसतो . आणि त्यांना पाहून ते विचित्र अशा आवाजात ओरडायला, विव्हळायला सुरवात करतात . आणि तेव्हाच थांबतात जेव्हा कोणाचा मृत्यू होतो . तुम्हाला कदाचित हे सगळं खोटं वाटेल पण काही वर्षांपासून मी याचा अनुभव घेतोय .
झालं अस कि मी काही वर्षांपूर्वी कॉलेज मध्ये होतो . थंडी चे दिवस चालू होते . मांजरं अचानक अशी विचित्र आवाज काढत फिरू लागली . लोक त्यांना आपल्या पत्र्यानं व कौलान वरून हाकलवून लावायची . "काय वात भरलाय या मांजरांना म्हणायची ". पण त्या आवाजां कडे दुर्लक्ष्य करायची .
थंडी खूप वाढली आणि वयोमानामुळे थंडी सहन न होऊन गायकवाडांची म्हातारी वारली . ती जशी मेली त्या दिवसां पासून मांजरे ओरडायची बंद झाली .
परत उन्हाळ्यात मांजरे त्याच कर्कश्य विव्हळण्याऱ्या आवाजात ओरडू लागली आणि काही दिवसांनी घाड्यांची म्हातारी वयोमान झाल्या मुळे गेली . ती जशी वारली मांजरे ओरडण्याची गप्प झाली .
रात्री चाळीत गप्पा मारत बसणाऱ्या आम्हा पोरांच्या बरोबर हि गोष्ट लक्षात आली . मांजरं ओरडायला लागली कि कोण तरी चाळीतल पिकलं पान गचकत आणि त्या नंतर मांजरं ओरडायची गप होतात हे आमच्या लक्षात आलं होतं .
त्या मुळे नंतर मांजरं ओरडायला लागली कि आम्ही पोरं मस्करीत वाडीतल कुठलं म्हातारं माणूस आता गचकणार याचा विचार करून त्या वर पैज लावत होतो आणि कोण गचकतय याची वाट बघत बसायचो . आमच्या साठी हे आता नॉर्मल झालं होतं .
पण मागच्या ३-४ वर्षांपासून मात्र अघटित घडायला लागलं . ....
३-४ वर्षांपूर्वी मांजरं अशीच विचित्र आवाजात विव्हळत ओरडत चाळीतल्या या घरावरून त्या घरावर उड्या मारत फिरू लागली . आम्हा पोरांचा विचार चालू झाला या वर्षी कोणाच्या घरातलं म्हातारं गचकणार ? पण झालं ते भयानकच शिंद्यांचा दोन नंबर चा मुलगा शितू मोटारसायकल अपघातात अचानक गेला . तो गेला आणि मांजरं ओरडण्याची थांबली . आता पर्यंत म्हातारी माणसे जात होती . त्यांचे मृत्यू बघून मांजरे ओरडत होती . आम्हाला हि मजा वाटत होती पण आता तरणाबांड शितू गेला होता. मांजरं आठवडाभर त्याच्या साठी ओरडत होती. हे पाहून ऐकून आम्हा पोरांना धक्काच बसला .
हि घटना होऊन सहा महिनेच झाले होते आणि मांजरं परत त्या विचित्र आवाजात विव्हळत ओरडत फिरू लागली . आणि अचानक साधं तापाचं निदान होऊन माझ्या शेजारी राहणाऱ्या माझ्या मित्राची ५ वर्षांची मुलगी गेली. ती गेली तशी मांजरं ओरडण्याची थांबली .
आता मांजरं ओरडायला लागली कि कोणी ना कोणी तरी लहान किंवा तरुण मृत्यू मुखी पडू लागला . त्यामुळे मांजरं त्या आवाजात विव्हळत घरांन वरणा फिरू लागली कि वाडीतली माणसं घाबरत . त्यांना काठीने हाकलवत . दगड मारून पळवून लावत . आपल्या घरावर बसून ओरडू नये म्हणून काळजी घेत . लोकांमध्ये त्या आवाजांची भीती बसली होती .
कोण तरी गेल्यावरच ती मांजरं गप होत . नाहीतर दिवसभर ओरडून ओरडून हैराण करत.
आता हि मागच्या चार दिवसांन पासून ती अशी मोठ्या आवाजात ओरडत विव्हळत घरांच्या कौलांवरून पत्र्यांवरून फिरू लागली होती संध्याकाळ झाली कि जास्तच ओरडत असत ते मध्यरात्री पर्यंत . सगळेच हैराण झाले होते . आपल्या घरावर बसून ओरडू नये म्हणून लोकं काळजी घेत होते .
मांजरांच्या ओरडण्या मुळे माझं वाचण्यातलं लक्ष उडालं . मी विचार करू लागलो की या वेळी हि मांजरं कोणासाठी ओरडत असतील ? चाळीत कोण आजारी आहे ? म्हाताऱ्या माणसासाठी ? कि कोणी तरुण , लहान मुलांसाठी ? मनात विचार आला आणि मी घाबरलो . या वेळी कोण चाळीतला जातोय देवालाच माहीत . मी मनात म्हटलं .
इतक्यात मला आईने खालून जेवायला येण्यासाठी आवाज दिला . मी मांजरांच्या विचाराच्या तंद्रीतून जागा झालो . आईला येतो म्हणून सांगितलं . वर्तमान पत्र बाजूला ठेवलं . लाईट बंद केला . आणि शिडी पकडून खाली उतरू लागलो . इतक्यात माझा अंदाज चुकून माझा पाय घसरला . शिडीला पकडलेला माझा हात सुटला मी सरळ खाली घसरलो आणि वरून खाली पडलो आणि माझ डोकं किचनच्या दगडी कठड्याला जोरात आपटलं . माझ्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं . शिडीचा आणि माझ्या पडण्याचा जोरात आवाज झाला . मी खाली जमिनीवर पडलो . मला खाली पडलेला बघून काम करत असलेली आई आणि बाहेर बोलत उभे असलेले वडील धावत घरात आले .आई घाबरून जोरात ओरडत रडू लागली . वडील घाबरले . शेजारचे धावत आमच्या घरात आले . एकच गोंधळ उडाला . कोणाला काहीच समजेना . घरात गर्दी झाली . माझं अंग खूप दुखत होत. डोक्यातून मार लागलेल्या जखमेतून खूप रक्त निघत होतं . लोकांची धावाधाव चालू होती . कोणी तरी माझ्या डोक्याला कपडा बांधून धरलं होतं .
मला काहीच समजत न्हवत. डोळ्यांन समोर अंधारी येत होती . शेजारी मला डॉक्टर कडे घेऊन जायची घाई करत होते . कोणी तरी बोलत होते सरळ हॉस्पिटलला घेऊन चला . सगळाच गोंधळ गडबड धावपळ रडारड चालू होती .
मला आता आजूबाजूचे आवाज कमी ऐकू येऊ लागले होते . पण त्यात पण एक आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता विचित्र आवाजात मोठ्याने विव्हळत ओरडण्याचा "आंव आंव आंव ".... जो माझ्या चांगलाच परिचयाचा होता . मांजरं मोठ्याने ओरडत घरावरून फिरत होती . कोणी तरी शेजारी त्यांना काठीने हाकलवण्याचा प्रयत्न करत होता . पण ती ओरडतच होती .. ..
आणि त्या वेळेला माझ्या मनात विचार आला कि इतके दिवस मांजरं ओरडायला लागली कि मी चाळीतला कोण जाणार याचा विचार करायचो . पण कधी विचारच केला नाही कि ती मांजर माझा पण मृत्यू पाहून ओरडत असतील .....
मला आता कमी ऐकायला येत होतं . आजूबाजूचं माझं भान हरपत चाललं होतं . माझ्या डोळ्यां समोर अंधारी पसरू लागली होती . माझे डोळे मिटू लागले होते . पण ते आवाज मला स्पष्ट ऐकू येत होते. माझा मृत्यू पाहून ओरडणारे "आंव आंव आंव "………..
... समाप्त....