एकलव्याची कहाणी
बालमित्रांनो, मी तुम्हाला आज अशा एका शिष्याची गोष्ट सांगणार आहे की ज्याने स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त केले.
बालमित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की, पांडव आणि कौरव यांचे गुरू द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्य त्यांना धनुर्विद्येचे ज्ञान देत असत. एक दिवस एकलव्य नावाचा अत्यंत गरीब मुलगा द्रोणाचार्यांकडे आला आणि द्रोणाचार्यांना म्हणाला, "मला धनुर्विद्या शिकायची आहे. तरी आपण मला धनुर्विद्येचे ज्ञान द्यावे." तेव्हा द्रोणाचार्य यांनी त्याला सांगितले, "बाळ, मी तुझी धनुर्विद्या शिकण्याची इच्छा समजू शकतो. परंतु मी फक्त पांडव आणि कौरव या राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवीन, इतर कुणाला शिकविणार नाही, असे वचन मी भीष्म पितामह यांना दिलेले आहे. त्यामुळे मी तुला धनुर्विद्या शिकवू शकत नाही. तू इतर कुठल्याही गुरूकडून धनुर्विद्या शिकून घे." हे ऐकताच एकलव्य खिन्न अंत:करणाने तिथून निघून गेला.
ही घटना घडल्यानंतर अनेक दिवसांनी गुरू द्रोणाचार्यांसह पांडव आणि कौरव सरावासाठी अरण्यात गेले. एक कुत्राही त्यांच्यासोबत गेला होता. पांडव आणि कौरव सराव करीत असतांना हा कुत्रा थोडा पुढे गेला आणि जोरजोराने भुंकू लागला. द्रोणाचार्य तसेच कौरव आणि पांडव या सर्वांना त्याचे भुंकणे ऐकू येत होते. नंतर मात्र अचानक त्या कुत्र्याचे भुंकणे बंद झाले. असे अचानक त्या कुत्र्याचे भुंकणे बंद झाल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. म्हणून सर्वजण त्या कुत्र्याच्या दिशेने गेले. जिथून कुत्र्याचे भुंकणे ऐकू येत होते, त्या जागेवर जेव्हा हे सर्वजण पोचले, तेव्हा त्यांना एक अत्यंत अविश्वसनीय गोष्ट पाहायला मिळाली. कुणीतरी त्या कुत्र्याला कुठलीही इजा न करता सात बाणांनी त्याचे तोंड बंद केले होते. त्यामुळे तो कुत्रा आता भुंकू शकत नव्हता. हे पाहून द्रोणाचार्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते मनाशी विचार करू लागले, "इतक्या कुशलतेने बाण चालवण्याचे ज्ञान तर मी माझा प्रिय शिष्य अर्जुन यालासुद्धा अद्याप
दिले नाही. तर मग असे अघटीत घडलेच कसे?"
इतक्यात समोरून आपल्या हातात धनुष्यबाण घेऊन येतांना त्यांना एकलव्य दिसला. त्याला पाहून गुरुदेव द्रोणाचार्य यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी एकलव्याला विचारले, "कुत्र्याला इजा न पोचवता त्याचे तोंड तू बाणांनी कसे काय बंद करू शकलास? तू हे कुठे शिकलास? तुझा गुरू कोण आहे?"
तेव्हा एकलव्याने त्यांना वंदन केले आणि म्हणाला, "गुरुदेव, आपणच माझे गुरू आहात."
हे ऐकून द्रोणाचार्य त्याला म्हणाले," तू असे कसे म्हणतोस? मी तर तुला धनुर्विद्या शिकवलेली नाही. तू जेव्हा माझ्याकडे धनुर्विद्या शिकण्याच्या इच्छेने आला होतास, तेव्हा तर मी तुला परत पाठवले होते."
"गुरुदेव, मी तुमची मातीची मूर्ती बनविली आहे. दररोज त्या मूर्तीला वंदन करूनच मी धनुर्विद्येचा सराव करीत असतो. या सरावामुळेच मी आज आपणासमोर धनुष्यबाण हातात घेऊन उभा राहण्यास पात्र झालो. म्हणूनच तुम्ही माझे गुरू आहात." असे एकलव्य म्हणाला.
हे ऐकताच द्रोणाचार्य त्याला म्हणाले, "तू जर स्वत:ला माझा शिष्य म्हणवतोस तर मग तू मला गुरुदक्षिणा द्यायला हवी."
गुरुदेवांच्या तोंडून बाहेर पडलेले हे शब्द ऐकताच एकलव्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, "आपणास काय गुरुदक्षिणा देऊ गुरुदेव?"
"तू मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे" द्रोणाचार्य म्हणाले.
द्रोणाचार्य असे म्हणताच एकलव्याने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पटकन आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून द्रोणाचार्यांना दिला. एकलव्याची ही निष्ठा पाहून द्रोणाचार्य खूप खुश झाले. त्यांनी त्वरित त्याला केवळ तर्जनी आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने बाण पकडून धनुष्याची दोरी कशी ओढायची याचे ज्ञान दिले.
नंतर एकलव्याने गुरूंना वंदन केले आणि तो आनंदाने तिथून निघून गेला.
केवळ गुरुंवरील निष्ठा आणि एकाग्रचित्ताने केलेली साधना यांच्या जोरावरच एकलव्य हा निष्णात धनुर्धर झाला.
बालमित्रांनो, आवडली ना तुम्हाला ही गोष्ट?
*************
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९८३४११९४४१
email : ukbhaiwal@gmail.