अघटीत भाग ८
रात्री दहा वाजता पद्मनाभ घरी आला
आल्याबरोबर ताबडतोब हात पाय धुवुन जेवण टेबलावर आला
वरदाने त्याला हात पुसायला टॉवेल दिला आणि वाढायला घेतले .
बरेच दिवसांनी असा तो घरी जेवायला आला होता.
आजकाल उशीर झाला तर तो बाहेरच खात असे .
दोघे जेवायला बसली ..”प्रिन्सेस जेवली का आमची ?त्याने विचारले .
“हो रे ती आणि आई दोघीपण जेवल्या आणि झोपल्या सुद्धा ..
आता गेले कित्येक दिवस तुझी माझी सुद्धा भेट होत नाहीये .
मग जेवताना पद्मनाभने तिला सांगितले त्याला दोन दिवस सुट्टी मिळाली आहे
तेव्हा ते सर्व कुठेतरी जाऊ शकतात
खुप दिवस झाले ते सर्व असे निवांत भेटले नाहीतच
वरदा खुष झाली ..
तिने पण थोडी क्षिप्राविषयीचीची काळजी बोलून दाखवली ,जी तिच्या सासुबाईनी तिला बोलून दाखवली होती
पण पद्मनाभने ते फार सिरीयस नाही घेतले .
“अग वय आहे तिचे एन्जोय करायचे नका तिला जास्त बंधनात ठेवू “
असे बोलल्यावर वरदा निरुत्तर झाली .
तो फुल सुटीच्या मूड मध्ये होता .
सकाळी क्षिप्रा उठून चहासाठी किचन मध्ये आली .
आज गौतमला भेटायचा प्लान होता ..सकाळी त्याचा मेसेज आला की ठरणार होते .
बाबाला टेबलवर पाहून तिला खुप आनंद झाला ..
“ओह बाबा बरे झाले तु आहेस ते आपण खुप दिवस एकत्र चहा नाही घेतला .”
“पद्मनाभने क्षिप्राला जवळ ओढुन तिच्या गालाची पापी घेतली आणि म्हणाला
“चहा काय घेऊन बसलीस प्रिन्सेस ....आपण तर बाहेर फिरायला निघालोय .
“कुठे जायचे फिरायला?
आणि किती वाजेपर्यंत येऊ आपण ?
कॉलेज आहे बर का मला .
“पद्मनाभ गडगडाट करून जोरात हसला आणि म्हणाला ..
“कॉलेजको मारो गोली आपण महाबळेश्वरला जातोय फिरायला सुटी मिळाली आहे दोन दिवस मला ..
असे म्हणून त्याने गर्रकन क्षिप्राला आपल्या भवती फिरवले ..
हे पाहून वरदा आणि आजी पण हसायला लागल्या
“पद्मनाभ काय हा पोरकटपणा ..!!असे त्याची आई म्हणाली सुद्धा ..
बाबाचा हा प्लान ऐकुन क्षिप्राचा चेहेरा पडला ..
सगळाच गोंधळ झाला होता आता दोन तीन दिवस घरच्या लोकांसोबत राहावे लागणार होते .
जे काही ठरवले होते ते फिसकटणार होते .
तिचा चेहेरा पाहुन पद्मनाभ म्हणाला ..”काय झाले इतका मस्त प्लान आणि आमच्या प्रिन्सेसचा चेहेरा असा का ?डोन्ट वरी आपण भरपूर शोप्पिंग करू अगदी आई नाही म्हणली तरी ओक्के ?”
चला आवरायला लागा निघूया आपण नाश्ता आवरून ..
तोवर मी माझे काही फोन करून घेतो .
मग सगळी गडबड सुरु झाली .
दोन तीन दिवसासाठी आजीला प्रतिमाच्या, त्यांच्या लेकीच्या घरी पाठवायचे ठरले
मग तिची पण बांधाबांध सुरु झाली ,प्रतिमाला फोन गेला .
ड्रायव्हर जाऊन सोडुन येणार होता आजीना .
वरदाची पण आवराआवरी सुरु झाली .क्षिप्रा पण उसने हसुन आवरायला आत गेली .
आत जाऊन दरवाजा लोटून घेऊन आधी तिने गौतमला फोन केला .
पण फोन वाजतच राहिला सात साडेसात ही त्याची उठायची वेळच नव्हती .
नऊ शिवाय तो उठतच नसे .
मग नाईलाजाने तिने स्वतःचे प्याकिंग केले आणि अंघोळीला गेली .
ती बाहेर आली तेव्हा फोन वाजत होता आणि बाबा तिच्या खोलीत आला होता .
“आवरले का ग तुझे चल की नाश्त्याला “
आणि हा फोन कुणाचा वाजतो आहे घे न “
क्षिप्राने फोन कट केला..
बाबा समोर गौतमशी बोलता येणे अशक्य होते .
“मैत्रिणीचा आहे काही फार महत्वाचा नाहीये मी करेन नंतर परत तिला “
क्षिप्राने उत्तर दिले
“वाह मस्त ठेवली आहेस तु खोली आणि आहे पण खुप मोठी .”
या घरात आल्यापासुन इतक्या निवांत तो पहिल्यांदा तिची खोली पाहत होता .
बाथरूमच्या जवळ गेल्यावर तो अचानक म्हणाला ..
“इथे जळका असा कसला वास येतोय ग ?
क्षिप्राच्या छातीत धस्स झाले ..जवळच्या ड्रावर मध्ये सिगारेट पाकीट आणि लायटर होता .
चुकून जरी बाबाने उघडला असता तरी तिची धडगत नव्हती
“अरे आपला ड्रायव्हर सारखा या खिडकीखाली उभा राहून सिगारेट ओढत असतो त्याचा वास आला असेल तुला “क्षिप्रा म्हणाली ..
“चल आवरल आहे बर का माझे असे म्हणून तिने बाबाचे लक्ष दुसरीकडे वेधले .
आणि त्याला ओढतच बाहेर घेऊन गेली .
क्रमशः