ती एक शापिता!
(७)
नव्या विचाराने प्रेरित झालेला, नवी वाट निश्चित केलेल्या सुबोधला एकदम हायसे वाटले. त्याच्या शरीरात एक नवे चैतन्य शिरले. तो एवढा प्रफुल्लित झाला की, मलेरियाच्या आजारातून दोन दिवसातच ठणठणीत बरा झाला. एका नवीन उमेदीने तो तिसऱ्याच दिवशी कामावर परतला. कार्यालयातील त्याची उपस्थिती तशी नगण्य ठरली. कुणी त्याची साधी दखलही घेतली नाही. साहेबांची भेट घेऊन तो स्वतःच्या कामात मग्न झाला. सुहासिनी साहेबांच्या दालनात गेली परंतु नवदृष्टी स्वीकारलेल्या सुबोधला त्याचे काही वैषम्य वाटले नाही. नेहमीप्रमाणे हात जडावले नाहीत, कपाळावर आठ्यांचं जाळ घट्ट झालं नाही, चेहरा उतरला नाही की औदासिन्य पसरलं नाही. उलट त्याला कसं मोकळं मोकळं वाटलं. एक वेगळेच समाधान, आगळेच तेज त्याच्या चेहऱ्यावर पसरले. काही क्षणातच साहेबांच्या दालनातून नेहमीचेच हसणे कानावर आले. परंतु त्या हास्याने नेहमीप्रमाणे त्याच्या कानाला चटके बसले नाहीत तर ते आवाज त्याला गोड, अवीट अशी संवेदना देऊन गेले. इतरांच्या नजरेला नजर भिडताच त्याने खाली नजर वळवली नाही तर सर्वांकडे बघत त्याने मंद स्मित केले. त्याचे ते स्मित इतरांना स्तिमित करणारे ठरले. अनेकांना ते हसणेही लोचटपणाचे वाटले. आज इतरांनी त्याच्या नजरेला नजर भिडविण्याचे टाळले. सहकाऱ्यांचा हा बदलही त्याला भावला, वेगळे समाधान देऊन गेला. सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारलेल्या सुबोधला सारे कसे सुसह्य आणि प्रसन्न असे वाटत होते.
साहेबांच्या दालनाचे दार कुरकुरले पण त्यातही एक सुमधुर संगीत असल्याचा भास सुबोधला झाला. सुहासिनी नेहमीप्रमाणे हसतच बाहेर आली पण सुबोधच्या अंगाची लाहीलाही झाली नाही तर त्याने हसतच विचारले,
"काय म्हणाले साहेब?" सुबोधच्या तशा अनपेक्षित प्रश्नाने गडबडलेली सुहासिनी म्हणाली,
"काही नाही. सहजच..."
त्यानंतर दिवसभर सुबोध सुहासिनीसह सर्वांशी हसत-खेळत, गप्पागोष्टी, विनोद करीत होता. त्याच्या त्या बदलेल्या रुपामुळे सुहासिनीसह सारेच आश्चर्यचकित झाले. घरी परतल्यावरही सुबोध प्रत्येक क्षणी सुहासिनीसोबत विनोद करु लागला. अशोकसोबत खेळू लागला. त्याच्या तशा वागण्यामुळे घरात वास्तव्याला असलेला ताण, निराशा काही प्रमाणात निवळली. नंतर काही वेळाने सुहासिनीही त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारु लागली. तशाच प्रसन्न वातावरणात स्वयंपाक झाला. स्वयंपाकाची स्तुती करताना, विनोद करताना दोघांची जेवणेही झाली. रात्र झाली. अशोक झोपला. एका अनामिक हुरहुरीने दोघांनाही अंकित केले. सुहासिनीला कसे वेगळेच वाटू लागले. तिच्या आशेचा दीपक पूर्ण तेजाने तळपू लागला. तिला वाटले,
'आज प्रथमच खूप दिवसांनी सुबोध हसतोय, खेळतोय. हा काय बदल म्हणावा? सकाळी साहेबांकडून बाहेर आले तेव्हाही सुबोधच्या चेहऱ्यावर हसू होते. रोज त्याच्या कपाळावर असलेल्या आठ्या, त्याची संशयित नजर आज दिसली नाही. घरी आल्यापासून सुबोध एकदम आनंदी आहे. काही औषध वगैरे... त्यादिवशीप्रमाणे कुणाकडून गोळी वगैरे तर घेतली नसेल? नशापाणी तर तो कधी करतच नाही. मग आजचा त्याचा मूड इतका चांगला? काही का असेना स्वारी आज दिलखुश आहे. लग्नानंतर न सापडलेला फार्म तर सापडला नसावा? बॅड पॅच तर संपला नसेल? काय असेल या बदललेल्या स्वभावामागची भूमिका? काही का असेना आज माझी उपासमार संपणार असे दिसतंय. तसे झाले तर माझ्या सारखी भाग्यवान मीच...' असा विचार मनात येताच सुहासिनी मनाशीच खुदकन हसली. ते पाहून सुबोधनेही हसतच विचारले,
"का गं काय झाले?"
"काही नाही. आज कसे मोकळे वाटतेय. आकाशात उंचच उंच उडावेसे वाटते. परंतु..."
"काय झाले? सांग तर खरे." सुबोधने लाडात येत विचारले.
"आकाशात उडताना शरीर माझे असेल परंतु आधाराचे पंख मात्र तुझे असावेत. सुब्बू, खरेच आज अनेक महिन्यानंतर लग्नापूर्वीचा सुबोध मला भेटला, भावला, आवडला."
"सुहा, आपल्या संसारावर असंख्य काळे ढग जमा झाले होते. आपण दोघे मिळून ते ढग एक-एक करीत दूर करुया. अर्थात त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे." सुबोध भावनिक होत म्हणाला.
"मी का नाही म्हणेन? तुझं सुख ते माझेच सुख. सांग बरे काय करायचे आपल्याला?" त्याच्या छातीवर डोके टेकवत सुहासिनीने विचारले.
"मला एक सांग, लग्नापूर्वी तुझं कुणावर प्रेम होते का?"
"सुबू, हा कसला प्रश्न? तुला तर सारेच माहिती आहे. माझे पहिले आणि शेवटचे प्रेम म्हणजे तू आणि तुच..." सुहासिनी त्याला घट्ट आवळत म्हणाली.
"माझ्या संदर्भात नाही विचारत मी. आपले प्रेम म्हणजे नोकरी लागल्यानंतरचे. तत्पूर्वी म्हणजे कॉलेजमध्ये असताना..."
"सु.. बो..ध.."
"अग, थांब. थांब. मी खरेच विचारतोय. खरं सांग ना ग..."
"जा. मी अशाने बोलणारच नाही गडे." सुहासिनी रुसल्याचा आव आणत त्याच्यापासून दूर होत म्हणाली.
"नको गं, तसे नको म्हणू. माझं सुख तुझ्या हसण्या-बोलण्यावरच अवलंबून आहे. तू अशीच हसतखेळत राहावीस म्हणून माझ्यासाठी एक करशील?"
"ते काय?"
"समज हं...समज. रागावू नकोस हं. अग, 'त्या' सुखाच्या बाबतीत मी असा कायम अपंग असल्यामुळे तुझा तो हक्क... होय, शरीरसुख मिळविणे हा प्रत्येकाचा... प्रत्येक स्त्री-पुरुषाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. परंतु माझ्या अशा अर्धवटपणामुळे तुझा तो हक्क हिरावला जातोय याची मला जाणीव आहे. दुर्दैवाने विद्यालयीन जीवनात माझे कुणाशी प्रेम जमलंच नाही. तसे कुणावर प्रेम जमलं असतं, त्या युवतीशी माझे 'तसे' संबंध स्थापित झाले असते किंवा आपलं प्रेम जमल्यावरही मर्यादेत न राहता प्रेमाची 'ती' पायरी ओलांडून एक झालो असतो तर कदाचित... कदाचित मी पूर्ण पुरुष नाही... मी स्त्रीला समाधान देऊ शकणार नाही ही जाणीव त्या संबंधातून असती तर... तर..."
"तर काय केले असते?"
"तर कदाचित मी ... मी लग्न केलेच नसते... परंतु जाऊ दे. तू मात्र माझ्या प्रश्नाला बगल देऊ नको."
"कोणता प्रश्न? प्रेमाचा? नाही. तसं कुणी माझ्या आयुष्यात आले नाही. अगदी तुझी शप्पथ..."
"नको. नको. शपथ नको. माझा विश्वास आहे पण समजा तुझा कुणी प्रियकर असता तर.. तर..."
"तर काय झाले असते?" तिने शंकित स्वरात विचारले.
"तर.. तर.. मी त्याला इथे.. आपल्या घरी बोलावले असते."
"काय...घरी? कशाला?"
"तुला माझ्याकडून न मिळणारे सुख त्याच्याकडून..."
"सु..बो..ध.. काय म्हणतोस तू? कळतंय का तुला?"
"पूर्णपणे कळतंय. अगदी मनापासून बोलतोय हे मी. रात्र-रात्र तुला तळमळताना नाही पाहू शकत मी...नाही पाहू शकत गं..."
"अरे, पण तो..."
"नाही तो व्यभिचार नाही ठरणार. मला न सांगता, तू चोरून त.. तसे संबंध वाढविले तर तो व्यभिचार ठरेल, विश्वासघात ठरेल. सध्या तू निलेशकडून जे सुख मिळवितेस तेच सुख राजरोसपणे घेण्याचा मी तुला परवाना देतोय... "सुबोधचे हे विचार ऐकताना सुहासिनीच्या रागाचा पारा चढत गेला. ती काही बोलण्यापूर्वीच सुबोधने तिला गच्च मिठीत आवळून तिच्या ओठांवर ओठ ठेवले...
त्याप्रकाराने सुहासिनीच्या शरीरात दबून बसलेल्या वासनेने डोके वर काढले. तिच्या मनात विचार आला, आज बऱ्याच दिवसांनी सुबोध हसतोय-खेळतोय तर आज नक्कीच तो.. तो मला पूर्ण साथ देईल, माझी नौका पैलतीरी नेऊन पोहोचवेल. याविचाराने तीही भरभरून सहभागी होत असताना, तिची नाव ऐन मध्यावर असतानाच सुबोधने तिची साथ सोडली. तिला तळमळत सोडून तो बाजूला झाला. सुहासिनीच्या नशिबी पुन्हा नेहमीचीच निराशा पदरी पडली. तिच्या शरीरात प्रज्वलित झालेल्या कामवासनेच्या निखाऱ्यावर विचारांची खिचडी शिजू लागली...
'आज सुबोधने हे काय नवीनच खुळ काढले आहे? त्याच्या डोक्यात असा विचार आलाच कसा? एखादा माणूस स्वतःच्या पत्नीला कुणाच्या मिठीत सहनच कसा काय करु शकतो? पण .. पण.. सुबोध खरेच तसा विचार करतोय की, त्याच्या मनात वेगळंच काही खदखदतंय? मागे एकदा मारायला उठला होता. मी होकार देताच सरड्याप्रमाणे रंग तर बदलणार नाही ना? साहेब, निलेश किंवा इतर कुणाशी माझे संबंध आहेत हे गोड गोड बोलून माझ्याकडून वदवून घ्यायचा तर विचार नसेल ना? खरंच त्याच्या मनात काय शिजत असेल?
निलेशची पत्नी.. लक्ष्मी! ही पत्नी कशी असावी ह्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. निलेशला विरोध करणे तर सोडा परंतु त्याच्यापुढे 'नाही' हा शब्दही कधी उच्चारत नाही उलट निलेशची सारी कामे करताना रोज रात्री त्याचं अंग आणि पायही चेपते. अशा युगात स्त्रीमुक्तीची वावटळ किती काळ गरगरणार आहे? ते काहीही असलं तरी सुबोध असा विचार करुच कसा शकतो? स्वतःच्या साक्षीने पत्नीला दुसऱ्याच्या मिठीत पाठवण्याचा विचार त्याला सुचलाच कसा? ही गोष्ट समाजाला कशी मान्य होईल? प्रवाहाच्या विरोधात जाण्याची शक्ती सुबोधजवळ आहे का? उद्या कुणी मला वेश्या आणि सुबोधला दलाल तोही पत्नीचा म्हटलं तर सुबोधला सहन होईल? या समाजात स्वतःच्या रखेलीकडे कुणी वाईट नजर टाकली तर सहन होत नाही तिथं प्रत्यक्ष पत्नीबाबत असा विचार?...' विचारांच्या गर्दीत अडकलेल्या सुहासिनीला रात्री उशिरा झोप लागली...
दुसऱ्या दिवशी सुबोध थोडा उशिरा उठला. नेहमीप्रमाणेच त्याला थकवा जाणवत होता. मलेरियाच्या आजारात आलेला थकवा, अशक्तपणा काही केले तरी जात नव्हता. त्या शारीरिक थकव्याचे कारण मानसिक चिंता आणि थकवा असू शकतो. थोडसं चाललं, कार्यालयात थोडे लेखी काम केले तरी त्याला दम लागायचा. कामाचा कंटाळा यायचा. परंतु तो तिकडे दुर्लक्ष करीत असे. तोच थकवा त्याला सुहासिनीपासून दूर नेत असे. आळसावलेल्या शरीराने उठून त्याने दात घासले. तितक्यात सुहासिनी कोरड्या ओकाऱ्या देत असल्याचे पाहून त्याने विचारले,
"का गं काय झाले?"
"काही विशेष नाही. मळमळते आहे."
"डॉक्टरांना बोलावू का?"
"नको. आता असे होणारच."
"म्हणजे? त.. त.. तुला..."
"ह..ह..होय. दिवस आहेत." सुहासिनी म्हणाली. कुणी काही बोलण्यापूर्वीच बाहेरून निलेशचा आवाज आला आणि सुबोधने चमकून वेगळ्याच नजरेने सुहासिनीकडे पाहिले. सुबोधच्या मनात विचार आला,
'सुहासिनीचे अभिनंदन करू की निलेशचे? त्याच्यामुळे सुहासिनीला समाधान मिळतेय आणि आम्हा दोघांना अपत्य! ती शक्ती नसताना अशोकच्या पाठोपाठ अजून एका मुलाचा मी बाप बनतोय. निलेश! एका अर्थाने आमचा रखवालदार झालाय. तो नसता आणि सुहासिनीने तिसऱ्याच कुणाला जवळ केले असते आणि नंतर त्याने तिला धोका दिला असता, ब्लॅकमेल केले असते, कुंटणखान्यात नेले नसते कशावरून? आम्हा पती-पत्नीला बदनामीच्या जाळ्यात ढकलले असते तर? पण नको. सध्या तरी मौनव्रत बरे! कारण त्याबाबतीत माझे दोन शब्दही स्फोटक ठरतील. कारण मला त्या दोघांचे 'ते' संबंध माहिती नाहीत या समजूतीने ते आनंदी आहेत. रात्रीच्या बोलण्यातून सुहासिनीला संशय आला असेलही परंतु सध्या दोघे आनंदात आहेत. 'त्या' सुखासोबत एक आनंद, वेगळेच समाधान त्यांना उपभोगू देण्यातच शहाणपण आहे...' सुबोध विचारात गुरफटलेला असताना निलेशने खोलीत प्रवेश केला. दोघांची नजरानजर झाली. सुबोधने पटकन सुहासिनीकडे पाहिले. त्याला तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली, समाधान दिसले...
*****