Ti Ek Shaapita - 3 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | ती एक शापिता! - 3

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

ती एक शापिता! - 3

ती एक शापिता!

(३)

सकाळी आलेले वर्तमानपत्र सुबोधने उचलले. वर्तमानपत्रात तोच भ्रष्टाचाराचा विषय होता. जिल्हा परिषदेचे भ्रष्टाचार प्रकरण भलतेच गाजत होते. अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले होते आणि एक कारकून पुरता अडकला होता. त्याला हथकड्या पडल्या होत्या. ती बातमी वाचून सुबोध अस्वस्थ झाला. त्याच्या ह्रदयाची धडधड वाढली. त्याला वाटले,

'उद्या माझ्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचा घोटाळा उघडकीस आला आणि साहेबांनी सारा दोष माझ्या माथी मारला तर? माझे आयुष्य खऱ्या अर्थाने आता सुरू होत असताना नसते लचांड मागे लागले तर? तसे मी साहेबांकडे हिस्सा मागतही नाही. साहेबच जुलमाने देतात. मी हिस्सा नाकारला तरी का साहेब हात आखडता घेणार आहेत? ते मारायचा तेवढा डल्ला मारणारच. मी पैसा घेतला नाही तरीही प्रकरण प्रकाशात आले आणि साहेबांनी हात झटकून सारी जबाबदारी माझ्यावर टाकली तर? काय करावं? पैसा खाणे हा जसा गुन्हा आहे, तसेच पैसा न खाणे हाही माझ्यासाठी गुन्हाच ठरतो की काय? त्यापेक्षा साहेबांच्या मर्जीने वागलं तर भविष्य सुधारेल आणि कदाचित एखाद्या प्रकरणात सापडलो तरी जमविलेल्या पुंजीमुळे सुहासिनी आणि कुटुंबाची काळजी तर राहणार नाही. शिवाय त्याच मायापुंजीतून वरिष्ठांचे हात भरुन सुटताही येईल. परंतु काही झाले तरी अशा वाममार्गाने पैसा कमाविणे केव्हाही वाईटच. त्या पैशाने शानशौक करता येईल, बरेच काही विकत घेता येईल पण समाधान विकत घेता येत नाही. एकप्रकारे अपराधीपणाची भावना मात्र निश्चित पदरी पाडून घेता येते. तरीही सुहासिनीचा सल्ला घ्यावा लागेल कारण यानंतर प्रत्येक गोष्टीत तिचा सिंहाचा वाटा असणार आहे. प्रसंगी निलेशसोबतही चर्चा करून निर्णय घ्यायला हरकत नाही...' तो तशा विचारात गुरफटलेला असताना बाहेरून आवाज आला,

"सुबोध, अरे, सुबोध..." पाठोपाठ निलेश आत आला. सुबोध पलंगावर बसलेला पाहून निलेश जवळजवळ ओरडला,

"हे काय तू अजून तयार झाला नाहीस?"

"क... क..."

"क ची बाराखडी काय म्हणतोस? अरे, आपल्याला आज विवाह नोंदणी कार्यालयात जायचं ना? आज तुझे सुहासिनीसोबत नोंदणीकृत लग्न आहे ना?"

"अरे, हो की. चल."

"व्वा! महाराज व्वा! लग्नाचा दिवसही विसरलात. चला आता पटकन!" निलेश हसत म्हणाला.

काही क्षणातच दोघे विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचले. सुहासिनी, तिची आई आणि सुबोधचे साहेब आधीच पोहोचले होते. सुबोध उशिरा पोहोचल्याचा राग सुहासिनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. चेहरा रागाने फुरफुरत नसला तरीही बोलके मृगनयनी डोळे बरेच काही सांगत होते. सुबोध- सुहासिनी यांनी अधिकाऱ्याने पुढे केलेल्या पंजिकेवर स्वाक्षऱ्या केल्या. नोंदणी अधिकाऱ्याने त्यांना प्रमाणपत्र दिले. त्यांच्या समक्ष आणि इतर उपस्थितीतांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना हार घातले.सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तितक्यात सुबोध-सुहासिनी यांचे साहेब म्हणाले,

"दोघांचेही अभिनंदन! माझ्याकडून दोघांनाही छोटीशी भेट..." असे म्हणत त्यांनी खिशातून चमचमणारी एक अंगठी काढली आणि सुबोधचे बोट धरून त्यात घातली. पाठोपाठ दुसऱ्या खिशातून तशीच चमचमणारी अंगठी काढली तेव्हा सुबोधला वाटले की, साहेब ती अंगठी त्याच्या हातात देऊन ती सुहासिनीच्या बोटात घालायला सांगतील. परंतु साहेबांनी स्वतःच तिचा हात हातात घेतला. सुहासिनीनेही न संकोचता, आढेवेढे न घेता हात साहेबांच्या हातात दिला. साहेब बोटात अंगठी घालत असताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक सुबोधला जाणवली. सोबतच साहेबांचा हात जास्त वेळ तिच्या हातात रेंगाळत असल्याचे सुबोधला वाटले.

सारे बाहेर आले तसा निलेश म्हणाला, "साहेब, चला ना. माझ्यातर्फे जेवण आहे."

"व्वा! व्वा! क्या बात है। नेक काम को देरी क्यों? चला." साहेब म्हणाले.

"सुहा, मी येते गं..." सुहासिनीची आई म्हणाली तेव्हा प्रथमच वातावरण गंभीर झाले. दोघींचेही डोळे पाणावले. नवरा-नवरीला कर्तव्याची जाणीव झाली. दोघेही आईच्या पायाशी वाकले. त्याक्षणीच काय तो लग्नसोहळा वाटला, नाही तर जणू नाटकातील एखादा प्रसंग वाटत होता. लग्नाचा तो प्रसंग कसा तासाभराचा खेळ! ना अक्षता, ना मंगलाष्टके, ना बँड, ना गोतावळा...

"सुहा, सांभाळ गं. जावईबापू, सांभाळून घ्या हो. बापाच्या माघारी सांभाळताना सारे हट्ट पुरविल्यामुळे जराशी हट्टी आहे. आजवर होती माझी, आज झाली तुमची."

"आई, असे काय करता? आपण का परगावी आहोत का? आठवण झाली की, केव्हाही या. आम्हीही नेहमीच येत राहू..." सुबोधने बोलता बोलता एक ऑटो थांबविला. तशी आई जड अंतःकरणाने डोळ्याला पदर लावत ऑटोत बसून निघून गेली. नंतर सारे जण हॉटेलमध्ये गेले. तसे साहेबांनी विचारले,

"काय मि. सुबोध, कुठे जाणार हनिमुनला?"

"हनिमून? कुठे जाणार? घरीच..."

"काय म्हणता? हनिमून आणि घरीच? नेवर... नेवर, नो! हा प्रसंग का आयुष्यात नेहमी नेहमी येतो का? तुमच्या जीवनात तर नक्कीच नाही. अहो, असा प्रसंग अविस्मरणीय बनला पाहिजे. हे क्षण म्हातारपणीही आठवले तर श्वास गरम झाला पाहिजे. तरुण झाल्याचा भास झाला पाहिजे. त्यातल्या त्यात सुहासिनीसारखी सौंदर्यसम्राज्ञी सोबत असताना मी तर बाबा सरळ परदेशात महिना घालवला असता." असे म्हणत साहेबांनी सुहासिनीकडे पाहिलं तशी तिने लाजून मान खाली घातली. त्यावेळी तिच्या गालावर पसरलेल्या मनमोहक लालीने आणि आकर्षक खळीने सर्वांना वेड लावले. जेवण झाले आणि साहेबांसोबत निलेश कार्यालयाकडे निघाले. सुबोध-सुहासिनी त्यांच्या खोलीकडे निघाले. जातांना दोघेही निःशब्द होते. सुबोधने खोलीचे कुलूप काढले आणि सुहासिनीला म्हणाला,

"मी आलोच हं." असे म्हणत तो पटकन मागे वळला. त्याच्या खोलीसमोर असलेल्या ओट्यावर गल्लीतील चार-पाच तरुणांचा घोळका बसला होता. सुबोधला पाहताच एक जण म्हणाला,

"काय साहेब, वाजलं वाटते?"

"हो.. हो..."

"असे गुप? पत्रिका नाही, जेवण नाही..."

"नाही. नाही. रजिस्टर मॅरेज केलंय..." असे म्हणत शक्य तेवढ्या लवकर तो पुढे निघाला. पाठीमागे कानावर शब्द आले,

"काय भाग्य म्हणावे रे एकेकाचे?"

"षंढाच्या गळ्यात मेनका पडाल्याप्रमाणे आहे सारे."

"परंतु ही मेनका का..." म्हणत त्याने अर्थपूर्ण दृष्टीने इतरांकडे पाहिले.

"बरोबर. अशी सौंदर्यवती आणि नोकरीला असणारी का कुमारिका असणार आहे..." ते ऐकणाऱ्या सुबोधच्या पावलांनी वेग घेतला. तसे ते आवाज दूर होत गेले.

अर्ध्या तासाने सुबोध परतला त्यावेळी सुहासिनी खोली आवरत होती. सुबोधच्या हातात बऱ्याच पिशव्या होत्या. सुबोध त्या पिशव्या ठेवत म्हणाला,

"बघ काय आणलंय?"

"काय आणलंत?" आवाजातला त्रासिकपणा शक्य तेवढा लपवत सुहासिनी म्हणाली. सुबोधला नोंदणी कार्यालयात पोहोचायला झालेला उशीर आणि घरी परतल्यावर लगेच त्याचे बाहेर जाणे ह्याचा राग तिला आला होता. एक एक वस्तू काढून पलंगावर टाकत सुबोध म्हणाला,

"ही बेडशीट. ह्या पिलो कव्हर्स. ही गादीवर टाकायला आणि तुला केसात माळायला ही फुलं. ही..ही.. मी तुला आणलेली पहिली साडी..." साडी हातात घेऊन सुहासिनी पाहत असताना सुबोधने पुन्हा विचारले,

"कशी आहे."

"ठीक आहे.." सुहासिनी नाराजीने म्हणाली.

"फक्त ठीक? नऊशे रुपयांच्या साडीला तू ठीक म्हणतेस?"

"मग काय अत्यंत चांगली म्हणू? साडी आणायला चाललो असे सांगितले असते तर मी आले असते. येतानाच आपण याच किंमतीत छान साडी आणली असती."

"का गं, आवडली नाही का?" सुबोधने विचारले.

"तुम्हालाच कशी आवडली हो? रंग पहा. त्यावरील डिझाईन पहा. कशी बटबट वाटतेय हो. हा पदर आहे की ..." सुहासिनी सांगत असताना खोलीसमोरून कुणीतरी शिट्टी वाजवत गेले. जाताना तो आवाज काही क्षण खोलीसमोर रेंगाळल्याचे दोघांनाही जाणवले. दोघांनी मुकपणे एक क्षण एकमेकांकडे पाहिले.

सायंकाळी दोघे फिरायला गेले. हॉटेलमध्ये जेवण करून येताना दोघे तिच्या आईकडे गेले. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून रात्री साधारण नऊच्या सुमारास दोघे खोलीवर परतले. समोरच्या ओट्यावर तरूणांचे टोळके बसले होते. खोली उघडून सुबोधने लाईट लावला. कपडे बदलून तो खुर्चीवर बसला आणि त्याचवेळी सुहासिनी म्हणाली,

"अहो, थोडे खोलीबाहेर थांबता का? म.. म..मला कपडे बदलायचे आहेत."

"अग, कशाला बदलतेस? काही वेळाने..."

"काय म्हणालात?" असे म्हणत सुहासिनीने त्याच्या हाताला धरून खोलीबाहेर ढकलले. तो दारात थांबला. तसे कुणीतरी म्हणाले,

"काय साहेब? झोपायचे नाही का? एंट्री आहे ना ... तुम्हाला?"

"हो..हो.." सुबोध कसे तरी म्हणाला.

"मज्जा आहे बुवा साहेबांची."

"नाही तर काय? अशी बायको मिळणे म्हणजे भाग्यच की. सारे थोडीच नशीबवान असतात साहेबांप्रमाणे..."

"अरे, जाऊ देत रे त्यांना. वहिनी वाट बघत असतील ."

सुबोध आत आला. त्याने आतून दार लावले. त्याचे लक्ष सुहासिनीकडे गेले आणि तो भान हरपून बघतच राहिला. सुहासिनी गाऊन घालून त्याचे स्वागत करीत होती. गाऊन झिरझिरीत नसला तरीही तिचे सौंदर्य तो सामावून घेऊ शकत नव्हता. सुहासिनी पलंगावर नवीन चादर टाकून त्यावर फुले टाकत होती म्हणून सुबोध शेजारच्या खुर्चीवर बसला. त्याचवेळी सुहासिनी पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन फुले पसरवत असताना ओणवी झाल्यामुळे झालेल्या दर्शनाने सुबोध सुखावला. शरीरात काही तरी सळसळत असल्याचा त्याला भास झाला. तितक्यात कार्यालयातील चर्चा आठवली. कुणीतरी त्याला दिलेली काडी पैलवान ही पदवीही आठवली. सोबतच पुस्तकातील 'तो' मजकूर त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागला. दुसऱ्याच क्षणी सुबोधच्या चेहऱ्यावर घर्मबिंदूनी गर्दी केली. त्याच्या कानावर...'मेनका, रंभा...सौंदर्यवती.... काटकुळा..' असे शब्द एकामागोमाग एक आदळत होते.

"काय झाले? डोके दुखतेय का?" त्याच्या जवळ येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून तिने पुन्हा काळजीने विचारले, "काय झाले? घामही आलाय की?" असे विचारत तिने तारेवरचा टॉवेल ओढला आणि त्याच्या कपाळावरील घाम टिपला. घाम टिपून झाल्यावर तिने त्याचे डोके चेपायला सुरुवात केली. ती त्याच्यासमोरच्या बाजूने वाकली असताना पुन्हा त्या दर्शनाने आणि तिच्या मृदू स्पर्शाने हलकेच, नकळत त्याच्या हाताचा विळखा तिच्या कमरेभोवती पडला. काही क्षणात दोघे आनंद सागरात विहार करीत असताना अचानक दारावर थाप पडली. दुसऱ्याच क्षणी कुणीतरी हसतच पळत गेल्याचा आवाज आला. त्यामुळे त्याच्या शरीरातील लहरी थंडावल्या आणि तो सुहासिनीपासून दूर झाला. तसा सुहासिनीचा हिरमोड झाला. दुसरीकडे सुबोध तिच्याशेजारी कलंडला आणि काही क्षणातच ग्लानीत शिरला. शेजारी सुहासिनी तळमळत होती...

रात्री केव्हातरी सुबोधला जाग आली. त्याला काही तरी आठवले. त्याने शेजारी बघितले. सुहासिनी चक्क नैसर्गिक अवस्थेत त्याच्या शेजारी पहुडली होती. तो भान हरपून त्या सुंदरतेचे निरीक्षण करीत असताना पुन्हा सहकाऱ्यांचे तेच शब्द, पुस्तकातील ते वर्णन त्याच्याशी गुजगोष्टी करत असताना त्याने तिला मिठीत घेतले. दुसऱ्या क्षणी सुहासिनीलाही जाग आली. तीही त्याला साथ देऊ लागली पण काही क्षणातच डाव अर्ध्यावर सोडून सुबोध बाजूला झाला... सुहासिनीला तळमळत सोडून...

सकाळी उशिरा उठलेल्या सुबोधने आजूबाजूला पाहिले. सुहासिनी पलंगावर नव्हती तो उठून बसला. त्याने पलंगावर बघितले. रात्रीची फुले बरीच सुकली होती, तरीही कुस्करली गेली नव्हती. त्यांच्या पाकळ्या पाकळ्याही झाल्या नव्हत्या. अनेक तर कळ्या तशाच राहिल्या होत्या. कळीचे फूल होण्यापूर्वीच त्या कोमेजून गेल्या होत्या. तितक्यात पाण्याची भरलेली कळशी घेऊन प्रवेश केलेल्या सुहासिनीकडे त्याचे लक्ष गेले. ती सुस्त आणि बरीच सुकलेली दिसत होती. चेहऱ्यावरचा टवटवीतपणा लोप पावला होता. कळशी रिकामी करून सुबोधकडे पाहत एकप्रकारचे निर्जीव हास्य चेहऱ्यावर आणत ती पुन्हा बाहेर गेले. कळशी आणताना कपड्यावर सांडलेले पाणी पाहणारांसाठी बरेच काही उजागर करीत होते.

'ही अश्या कपड्यात पाणी भरतेय? हे का मोठे शहर आहे असे कपडे घालून बाहेर जायला?' असे पुटपुटत सुबोध खोलीला असलेल्या एकमेव खिडकीजवळ गेला. हलकेच खिडकी ढकलून त्याने बाहेर डोकावले आणि तो दचकला. सुहासिनी पाणी भरत असलेल्या नळावर तीन-चार तरुण पाणी भरत होते. त्या खोलीत राहायला येऊन सुबोधला चार वर्षे झाली होती परंतु त्याने कधीच त्यांना पाणी भरताना पाहिले नव्हते. तो मनाशीच म्हणाला,

'ही पोरं आजच का नळावर आली आहेत?' त्याने पुन्हा नळाकडे पाहिलं पाणी भरताना सुहासिनी वाकली होती आणि त्या पोरांच्या नजरा नेमक्या नको तिथे खोलवर डोकावण्याचा प्रयत्न करीत होत्या. सुबोधला वाटलं,

'हां. आले लक्षात. सुहासिनी तशा अवस्थेत नळावर गेलीय. फुकटात बरेच काही पाहायला मिळतंय म्हणून हे पोट्टे नळावर आलीत तर...' तितक्यात एकाने सुहासिनीला विचारले,

"वहिनी, साहेब उठले नाहीत का?"

"ए गध्या, काही अक्कल आहे का? रात्री जागरण झाले म्हटल्यावर कुणी सकाळी सकाळी उठते का?"

"अबे, जागरण तर वहिनींचे पण झाले असेलच की. पण त्या उठल्याच की." ते एकणाऱ्या सुहासिनीने रागारागाने कळशी उचलली आणि ती खोलीकडे निघाली. तसा एक जण म्हणाला,

"अरे, वहिनी रागावल्या म्हणजे काही तरी बिनसलंय हे नक्की..."

"आपण करूया का मदत?"

तिकडे सुहासिनी खोलीत पोहोचली. सुबोधला खिडकीजवळ उभा असलेला पाहून म्हणाली,

"बघा. कशी टारगट काट्टी आहेत. त्यांना थोडं समजावून सांगा. आता सुरुवातीलाच यांचा इंगा नाही दाबला तर पुढे चालून आपल्या डोक्यावर मिरे वाटतील, जगणं मुश्कील करतील."

"अग, ते वहिनीच्या नात्याने गंमत करीत असतील." सुबोध वेळ निभावून न्यावी म्हणून म्हणाला.

"वहिनीचे नाते?" सुहासिनीने विचारले.

"हो. असे समज, मला लहान भाऊ असता तर दिराच्या नात्याने तो असाच बोलला असता ना?"

"आपल्या माणसाचे वेगळे असते. या मुलांचे वागणे, त्यांच्या नजरा काही वेगळंच सांगतात. तुम्ही त्यांना सांगा..."

"काय सांगू? तुझी सुंदरता आणि नेमक्या ठिकाणी भिजलेलं शरीर... अग, भल्याभल्यांना मोहिनी घालणारे हे शरीर त्या तरुणांना भुरळ घालत असतील तर त्यात त्यांचा दोष तो काय? नुकतेच तारुण्यात पाऊल टाकलेली, कुठलंही बंधन नसलेली व्रात्य पोरे ती. उद्या त्यांची लग्नं झाली म्हणजे आपोआपच..."

"अहो, पण त्यांच्या लग्नापूर्वीच त्यांनी काही केले म्हणजे?"

"न..न..नाही. ते तसे काहीही करणार नाहीत..." सुबोध तसे समजावून सांगत असताना सुहासिनी फणकाऱ्याने कामाला लागली खरी पर त्याच्या तशा 'थंड'पणाने, वागण्याने आणि बोलण्यामुळे तिच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण केले....

*****