MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 4 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 4

Featured Books
Categories
Share

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 4

नक्षत्राचे दर्शन

तर मु.पो.काकाचे घर!

हा काका म्हणजे दिन्या काका. माझ्या बाबांहून लहान. आम्ही त्याला एकेरीतच हाक मारायचो. दिन्या काका तसा लहान भाऊ असला तरी शिस्तीचा कडक. काकू म्हणजे रमाकाकू त्याच्याच सारखी. कडकलक्ष्मी! अर्थात दोघे तसे प्रेमळ होते. पण कर्मठ होते. आमच्या घरी बाबा असे नव्हते. देवधर्म वगैरे जेवढ्यास तेवढे. आई पण तशी धार्मिक नव्हती. पण काका मात्र अत्यंत काटेकोरपणे सारे देवधर्म पाळे आणि त्यातली चूक त्याला खपत नसे. त्यामुळे त्याच्या घरी मला त्याच्या शिस्तीचे टेन्शन असे. त्या शिस्तीच्या चिखलात माझ्या प्रेमकहाणीचे कमळ त्यामुळे अगदी उठून दिसते मला तरी आज मागे वळून पाहताना. काकाचे घर मोठे असले तरी

काकाने लग्नासाठी बाजूच्या एका घरात तात्पुरती सोय ही केलेली पाहुण्यांची. तेथे मग लोक येऊन बसायला लागले, गप्पांचा फड जमवायला लागले, दुपारी डोळे मिटून पडायला लागले. दोन्ही घरे तशी मोठी, सर्वांना पुरेशी पडतील अशी, तरीही लग्नघराचा गोंगाट काही चुकायचा नाही. त्यामुळे शांतपणे मनन चिंतनासाठी हे बाजूचे घर बेस्टच होते. मला पण ते आवडले पहिल्यांदा.. पण ती गोष्ट वैदेहीच्या आगमनाच्या आधीची.

पहिला दिवस काकाच्या घरी तसा बोअर होता. दिवस म्हणावा तर खरेतर संध्याकाळपर्यंत . म्हणजे काका काकू भेटले. रागिणी भेटली. तिची चेष्टामस्करी केली. तिच्या सासरावरून नि होणाऱ्या नवऱ्यावरून चिडवायला नाही म्हटले तरी गंमत आली. पण सारे कसे काकाच्या करड्या शिस्तीत बसवून. काका बहुधा दिवसात किती हसावे याचा पण कोटा सकाळी ठरवून देत असावा. म्हणजे 'आजचा हास्य कोटा वाटप : रोज सकाळी सात वाजता..' अशी काही नोटिस नव्हती त्याच्या घरी, पण मोजून मापून हसताना हे असे असणारच नाही असे नाही असे वाटले मला. आम्ही गेलो त्यादिवशी अजून कोणी पोहोचले नव्हते. पण नाही कशाला म्हणू.. रागिणीच्या कोण कोण मैत्रिणी येतील आणि त्या कशा असतील याची उत्सुकता होतीच. आडून आडून मी तिला विचारले ही.. माझे प्रश्न वाढत गेले.. पण ते फारसे आडून नसणार कदाचित. कारण माझ्या काही प्रश्नानंतर रागिणी म्हणाली, “तू माझ्या लग्नालाच आलायस ना.. की माझ्या मैत्रिणींची मैत्रीपूर्ण चौकशी करायला?”

मी कानाला खडा लावला. उगाच उघड गैरसमज नको कुणाचा. अर्थात गैरसमज कशाला म्हणा? तसा मी अगदीच ताकाला गेलो नव्हतो असे नाही पण तरीही आता भांडे लपवणे गरजेचे! आधी तिच्या येतील त्या मैतरणी पाहू मग ठरवू.. ताक वगैरे हवंय की नाही! भांड्यांचे काय.. दिसला एखादा सुंदर नमुना तर तर भांडंही काढू बाहेर आणि काय! अर्थात हे सारे आई वगैरे समोर नसताना. आणि माझी त्यात चूक काय होती? माझ्या त्या वयात मी दुसरे काय करायला हवे होते? तरी बरे काकांचे श्री जगद्गुरू जगदानंद जगदाळे स्वामी म्हणतात, 'सारे कसे वेळच्या वेळी होऊन जाऊ द्या नाहीतर नंतर पस्तावाल!' हे स्वामी प्रकरण मला माहिती नव्हते. पण आल्या आल्या.. म्हणजे आम्ही काकाच्या घरी आल्या आल्या काकाच बाबांना म्हणालेला तसे.. 'जगदानंदांची कृपा दादा.. स्वामी म्हणतात तसे सारे वेळच्या वेळी झाले.' पुढची तीन मिनिटे काकाने त्या जगद्गुरू बद्दल काही वाक्ये बोलली.. त्यातले ते मी वर उद्धृत केले ते! ( वरील वाक्यात वाक्ये बोलली ही चुकीची भाषा बोलली गेली असेल पण उद्धृत सारखा अवघड शब्द उद्धृत करून त्याचे कॉम्पनसेशन केले की नाही? शेवटी मराठीची काळजी आपणच नको घ्यायला? न वापराने उद्धृत सारखा एखादा शब्द गुडुप नको व्हायला!)

तर, मी तिथे तसा बोअर झालो होतो. नाही म्हणायला काकाची बाईक घेऊन मी थोडा फेरफटका मारून आजूबाजूच्या सौंदर्यस्थळांचा अंदाज घेतलेला. तेवढेच मनोरंजन. विशेष हाती काही लागले नाही. आणि दुपारी उन्ह चढल्यावर घरी परतावेच लागले. आणि हे जे स्थळ निरीक्षण आहे ते बाईक वरून नीट बारकाईने होत नाही.. तेथे चालणेच गरजेचे. हे एक आजच्या होतकरूंनी ध्यानात घ्यावे.

दुपार तशी लोळून काढली मी. कंटाळा येणार होताच. बाजूच्या घरात कॉटवर छान ताणून दिली. इकडे काकाच्या घरात कोणी न कोणी येत होते. धावपळ सुरू असावी. मध्येच काही मंजूळ आवाज ऐकून मी उठून पाहात होतो पण एकूण टेहळणीसाठी हे घर योग्य नव्हतेच.. फक्त या घरातल्या मागच्या व्हरांड्यातून काही आवाजांचा स्पष्ट अंदाज येई तो भाग वगळता. माझ्या कहाणीत हा व्हरांडा पण महत्वाचा होता.. पण ती पुढची गोष्ट.

संध्याकाळी माझ्या कंटाळ्याचा कडेलोट झाला. आईचे ऐकून उगाच इकडे आलो असे वाटायला लागले. कंटाळून तसाच झोपेतून उठून मी काकाच्या घरात शिरलो.

बाहेर काही चपला पडलेल्या. त्यात काही नाजूक लेडिज सॅंडल्सही होत्या. म्हटले काही नवीन चेहरे दिसतील अशी शक्यता आहे. शितावरून भाताची घेतात तशी चपलांवरून आतील उपस्थित कन्यावर्गाची परीक्षा करीत मी दरवाज्यात पाऊल टाकले. समोरच्या जिन्यावरच आई कुणाशी बोलत होती. त्या बाहेरील सुंदर चपलांपैकी एकीची ती सुंदर तरूण मालकीण होती. ती कोण होती.. तेव्हा मला ठाऊक नव्हतेच. पण माझ्या अजागळ आणि गबाळ्या राहण्याबद्दल मला तेव्हा प्रकर्षाने जाणीव झाली. ती सुकांत चंद्रानना कोण असावी? एका नजरेत मला ती आवडून गेली. पण मी तिच्या समोर आता जाऊही शकत नव्हतो. अशा गबाळग्रंथी अवताराचे मला मनापासून वाईट वाटले. ती कोण आहे यापासून सुरूवात.. मी दरवाज्याच्या पाठी हळूच लपून अंदाज घेऊ लागलो. आई पाठमोरी होती आणि ती सुबक ठेंगणी आईशी मस्त गप्पा मारत होती. हसत होती. छानच होती. खरेतर ती ठेंगणी नव्हतीच पण उगाच बोलायची एक पद्धत. तिला पाहिले नि माझा कंटाळा क्षणार्धात दूर झाला. आता माझ्या लग्नघरात असण्याला प्रयोजन मिळाले होते. मला उगाच पेपरात वाचलेला ह. भ. प. बाळकृष्णबुवा पांगारकरांचा उपदेश आठवला.. बुवा म्हणाले होते, 'मनुजा, जीवनाचे प्रयोजन काय.. ते प्रथम शोध. निरूद्देश भटकू नकोस कारण तसे भटकताना तुला आयुष्य नीरस आणि कंटाळवाणे वाटू लागेल. पण जीवनाचे उद्दिष्ट ठरवले की मग हेच आयुष्य मंजुळ गाण्यासारखे सुमधुर भासू लागते. मनुजा, आयुष्यात उद्दिष्ट ठरव आणि मगच तुझी प्रगतीपथावर वाटचाल होईल!' आजवर मी हे हसण्यावारी नेलेले पण इंग्रजीत मोमेंट ऑफ ट्रूथ म्हणतात ते याबद्दलच असावे. आता मला जीवनाचा उद्देश सापडला.. ती दिसली.. ती कोण आहे यापासून सुरूवात खरी पण ती या लग्नघरातीलच असणार.. त्यामुळे सापडेलच. आता माझ्या इथे असण्यासही अर्थ आला. पण फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन म्हणतात.. ते तसे खरेच ठरू नये म्हणून प्रथम आपला अवतार सुधारला पाहिजे. नशीब मी नको नको म्हणत असताना आईने माझे काही चांगले टी शर्ट टाकले होते सामानात. कुणाच्या ध्यानात येऊ नये अशा बेताने मी दरवाजामागे उभा होतो. ती बोलत होती.. बोलता बोलता हसत होती.. आणि मध्येच आपल्या ओढणीशी खेळत होती. इकडे मी वेडापिसा उभा होतो. आता तयार होऊन यावे आणि ही निघून गेली तर? आणि हिला शोधू तर कुठल्या नावे? मी मनातल्या मनात तिचे नाव काय असावे याची कल्पना करू लागलो.. तिचे एकच नाव सुचले मला.. नक्षत्रा! आता तिच्याशी ओळख होईपर्यंत हेच नाव वापरेन मी! नक्षत्रा! वा! छान आहे नाव. इकडे आई बहुधा जाण्याच्या बेतात असावी. नक्षत्रा तिला हसून काही बोलली. वा!

पुढे मात्र माझ्या पाठीत धपाटा पडला. तो हात दिन्याकाकाचा होता! "काय रे.. इथे काय करतोयस?"

इथे मला एक तात्विक आणि सात्विक प्रश्न पडलाय तो विचारून टाकतो. म्हणजे बघा मोठमोठे महात्मे होऊन गेले.. सत्य हेच सर्वात श्रेष्ठ असे काहीबाही सत्य सांगणारे. सत्यमेव जयते पण म्हणून गेले. तर आता या इथे मी ते सत्याचे प्रयोग करावेत का? म्हणजे काकाला सरळ सांगून टाकावे.. 'ती जी सुकांत सुहास्य वदना अनामिका आहे.. पहाताच ती रम्य बाला.. कलिजा खलास झाला.. तिला पाहतोय.. आणि मनात मांडे खातोय..' असला रोखठोक कारभार मी करावा की नाही सत्यास स्मरून? पण माझे मन तसे हुशारीने वागले.. अशा प्रेमात चोरटेपणा आपसूक येतोच म्हणे. म्हणजे सत्याचा बट्याबोळ! असू देत. युद्धात आणि प्रेमात सारेच क्षम्य.. तर हे असत्यकथन त्यातच मोडले पाहिजे. मी माझ्या मनाचेच ऐकले आणि म्हणालो, “काही नाही काका चाललो होतो बाहेर, पाय मोकळे करायला?”

“हा असा?”

माझ्या अवताराकडे पाहात तो म्हणाला. म्हणजे माझे माझ्याच कपड्यांबद्दलचे स्वयं मूल्यमापन बरोबर होते. काकाशी बोलण्यात वेळ दवडणे आता योग्य ही नव्हते नि धोक्याचेही होते. नक्षत्रा कुठल्याही क्षणी बाहेर आली तर काका माझी डायरेक्ट ओळखबिळख करून द्यायचा..

मी बाहेरच्या चपलांतील तरूणींच्या अशाव्यात अशांची नोंद मनात केली. काकाला 'अरे तिकडे काहीतरी विसरलो' म्हणून मागच्या बाजूस सटकलो.. पाठच्या दरवाजातून आत शिरताना ती नक्षत्रा पुढे येऊन ठाकेल याची काय कल्पना? मी त्या चेक्स च्या लुंगीबद्दल त्या क्षणी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला.. 'या नंतर चेक्सच्या लुंग्या बाद.. नाही.. लुंग्याच बाद.. मनातल्या मनात मी शपथ घेतली, यापुढे स्मार्ट राहिन आणि स्मार्ट दिसेन.. अगदी झोपतानाही, म्हणजे झोपेतून उठताना ती समोर आली तर.. सो, नो मोअर लुंगीस ..'

आणि तिच्याकडे पाहून न पाहता सटकलो.

मुली किती हुशार असतात पहा.. पुढची गोष्ट ही.. पण एकदा तिने माझ्यासाठी मुद्दाम चेक्सची लुंगी आणली.. खास भेट म्हणून.. देताना म्हणाली.. 'लाजू नकोस.. घाल.. यातच तर तुला मी पहिल्यांदा पाहिलेले..' तर ही अशी लबाड हे मला खूप नंतर कळाले.. खरे सांगू तर मी स्वतःला बावळट स्मार्ट समजत होतो.. आणि ही तर अती हुशार लबाड होती!