३
परिचयाचा इंट्रो
एकेकाच्या काय सवयी असतात नाही? आपल्या सवयी ही नंतर सवयीने सवयीच्या होऊन जातात! हे माझे एक जनरल आॅब्झर्व्हेशन.. आणि काही नाही!
तर माझी ही सवयच आहे.. माझ्या सवयीचा परिचय करून द्यायलाच हवा.. तर हीच ती सवय.. परिचय अर्थात इंट्रोडक्शन. म्हणजे लहानपणी निबंध लिहिताना माझी इंट्रोच मूळ मुद्द्याहून मोठी असायची. इंट्रो म्हणजे परिचय! मूळ विषयास येण्याआधी नमनास घडाभर तेल. पामोलिन नाही अगदी ऑलिव्ह ऑईल.. बोलाच्याच तेलात कशाला हवी कंजूसी.. घाला अगदी महागडे शेरभर ऑलिव्ह ऑईल आणि काय! पण ही लांबलचक इंट्रोची
सवय इतकी महाग पडेलसे वाटले नव्हते. म्हणजे झाले असे होते की निबंधात माझी परिचयात्मक माहितीच एवढी असायची की एकदा आमच्या मराठीच्या बर्वे बाईंनी मला खास ओरडा दिला होता. म्हणाल्या, अरे एवढा लिहितोस पण जरा विषयास धरून लिही.. थोडक्यात विषय राहिला बाजूला.. त्यापर्यत पोहोचण्याआधीच शेर सव्वाशेर तेल टाकले जायचे माझ्या कडून. तर हा नुसताच इंट्रो द्यायची सवय वैदेहीबरोबर बोलताना ही कायम राहिली.. मूळ मुद्द्यास हात घालणे नाही नि मग त्यामुळे बस मिस होतेय की काय याचा धोका निर्माण झाला.. पण ती गोष्ट नंतरची. वैदेही कोण आणि ती गोष्ट काय.. आताच नाही सांगत.. पुढे येईलच ती गोष्ट. तूर्तास सीरियलवाले कसे उद्याच्या नि परवाच्या भागात काय आहे ते दाखवतात तेवढीच ही झलक! आणि फक्त आजच्या होतकरूंनी ध्यानात घ्यावे ते इतकेच.. लहानपणीच योग्य सवयी लावल्या की पुढे उपयोगी पडतात.. मी काही तसा पोक्त नाही.. पण हा पोक्तपणाचा सल्ला आणि काय! तर या इंट्रोचीही पण लांबलचक इंट्रो न होवो!
झाले काय ना की.. लग्न म्हटले की लग्नघर आले. नशिबाने ते दूर होते! आता नशिबाने असे म्हणतोय मी. पण खरेतर आई म्हणालेली, 'आता आपल्याला चारेक दिवस आधी आणि चारेक दिवस नंतर राहावेच लागेल तिथे..'
तेव्हा पहिला निषेधाचा झेंडा मी दाखवला होता! 'इतके दिवस? काय करणार? मी नंतर येईन..' असा!
"माणूसघाणेपण सोड आता. लग्न म्हटले की चार माणसं येणार, लग्नघरात सतराशे साठ व्यवधानं असतात. मदत लागते. तेव्हा तिथे न थांबता पळून येणार? सगळेच गुण बापाचे नको घ्यायला."
आईची ही एक सवयच आहे. मला ओरडतेच ती पण काही संबंध असो नसो, बाबांना टोमणा मारून घेते त्यातच ती. कदाचित एका ओरड्यावर एक ओरडा फ्री अशी काही स्कीम असावी तिची. ओरडायचेच तर बाबांना त्यात ओढायलाच हवे.. तर आईने खरडपट्टी काढल्यावर मला तयार व्हावेच लागले.
तर दैवगती अगाध आहे.. होनी को कौन टाल सकता है.. और जो टाल सकते हैं उसे होनी कैसे कह सकते हैं? थोडक्यात मी जायला नि तिथे आठवडाभर रहायला तयार झालो! ते लग्नघर दूर नसते तर कसला मी आठवडाभर राहिला असतो नि कसली भेटली असती ती? तर योगायोग म्हणतात तो हा नि असाच असावा.. आणि घडणाऱ्या गोष्टी न टळण्यास कारणीभूत असलेच योगायोग असावेत.
काकाचे घर मोठे. वर गच्ची.. पुढे झोपाळा. मोठी बाग. घरातल्या घरात वर चढायला सिनेमात असतो तसा जिना. हे सगळे मी का सांगतोय? कारण माझ्या स्टोरीत.. म्हणजे लव्हस्टोरीत हे सगळेच महत्त्वाचे होते. म्हणजे काका जवळ राहते.. त्यांचे घर लहान असते.. अगदी त्यांच्या घरात झोपाळा नसता तरी माझ्या या सीरियल मधले काही एपिसोड गळले असते. थोडक्यात एवढेच.. आमची वरात निघाली आणि लग्नघरी येऊन पोहोचली!
मला वाटते इतपत इंट्रो पुरे. मी इतक्यात थांबलो इंट्रो मध्ये हे पाहून बर्वेबाईंना भरून आले असते! गेल्या कधीच देवाघरी बिचाऱ्या पण अशा आठवण रुपी उरल्या आहेत. आणि अजून एक.. माझी मुख्य गोष्ट इंट्रोपेक्षा मोठीच असणार आहे! बर्वे बाईंना तर हे ऐकून गहिवरच आला असता. बाईंची आज खूप काढून झाली आठवण.. त्या तिथे लागत असेल का उचकी? कोणास ठाऊक!
तर आम्ही पोहोचलो काकाकडे.. मुक्काम पोस्ट काकास हाऊस! म्हणजे ग्राऊंड झीरो!