Love me for a reason.. let the reason be love - 11 in Marathi Drama by Aniket Samudra books and stories PDF | लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)

Featured Books
Categories
Share

लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ११)

“गुड मॉर्नींग डार्लींग..” जोसेफने डोळे उघडले तेंव्हा चक्क समोर नाईट-ड्रेसमध्ये रोशनी चहाचा ट्रे घेउन उभी होती.

खिडकीतुन येणार्‍या कोवळ्या सुर्यप्रकाशात पांढर्‍या सिल्कचा नाईटड्रेस घातलेली रोशनी क्षणभर जोसेफला एखाद्या छोट्याश्या परीसारखी भासली.

“गुड मॉर्नींग डीअर..”, उठुन बसत जोसेफ म्हणाला

“चल पटकन तयार हो, आणि दिवसांतली कामं संपवुन टाक..”, रोशनी म्हणाली..

“का? काय झालं?”, जोसेफ

“अरे का काय? संध्याकाळी जायचे आहे ना पार्टीला संध्याकाळी. मला कुठलीही कारणं नक्को आहेत बरं का..”, लटक्या रागाने रोशनी म्हणाली…”आयुष्यात मी खुप पार्टीज मिस्स केल्या आहेत, पण आता तु बरोबर असताना त्याच पार्ट्या मी खुप एन्जॉय करते आहे..” केसांची बट कानामागे सारत रोशनी म्हणाली.

“हो डिअर, मी प्रयत्न करीन.. नक्की जाऊ आपण..”, जोसेफ

*********************************************

दिवसभर जोसेफचे कामापेक्षा घड्याळाकडेच लक्ष होते. दिवस मावळतीकडे सरकु लागला तसा जोसेफ बैचेन होऊ लागला. त्याच्या वागण्यातला बदल त्याच्या एक दोन सहकार्‍यांनी हेरला सुध्दा..”काय रे जोसेफ? तब्येत बरी नाही का?”, एकाने विचारले होते, पण जोसेफने त्याचे बोलणे हसण्यावारी न्हेले.

संध्याकाळ झाली तशी जोसेफ ऑफीसमधुन बाहेर पडला. सेक्युरीटीकडुन रोशनी आधीच ऑफीसमधुन बाहेर पडल्याचे त्याला कळले तसे त्याने गाडी सरळ घराकडेच घेतली.

जोसेफ घरी पोहोचला तेंव्हा रोशनी जवळ जवळ तयारच होती.

जोसेफ सावकाश चालत बेडरुममध्ये जाऊन बसला.

“अरे!!, बसलास काय? चल ना, आवर लवकर, एक तर आधीच उशीरा आलास..”., आवरता आवरता रोशनी म्हणाली.

जोसेफ काही नं बोलता नुसता बसुन राहीला होता. खरं तर त्याला सुध्दा रोशनीबरोबर जायची फार इच्छा होती. तिच्याबरोबर पार्टीत मिरवणं, मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी करुन घेणे ह्यात त्याला मज्जा वाटत होती. लोकांकडुन मिळणारे ऍटेंशनची त्याला सवय होत होती. त्यामुळे विनाकारण रोशनीचे मन मोडणे त्याला जिवावर येत होते. परंतु त्याचा नाईलाज होता. नैना-ख्रिसने त्याला जाळ्यात अडकवले होते आणि त्यामुळे त्याच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता.

“काय झालं? आवर ना रे..”, रोशनी वैतागुन म्हणाली..
“हो आवरतो.. आत्ताच आलो आहे ऑफीसमधुन..”, असं म्हणत तो उठला आणि किचेनमध्ये गेला. फ्रिजमधुन त्याने फ्रेश लाईम ज्युसचा कॅन काढला, दोन ग्लास भरले. मग हळुच रोशनीच्या गोळ्यांचा ट्रिपल डोस त्यात टाकला आणि तो परत बेडरुममध्ये आला.

“घे ज्युस पी..” असे म्हणत त्याने गोळ्या घातलेला ज्युसचा ग्लास रोशनीकडे दिला आणि तो परत खुर्चीत डोळे मिटुन ज्युसचे घोट घेत आरामात पडुन राहीला.

“जोसेफ!!.. काय झालं? आवरतो आहेस ना?”, ज्युसचा रिकामा ग्लास टेबलावर ठेवत रोशनी म्हणाली.

जोसेफने डोळे उघडुन एकवार रोशनीचा ज्युसचा ग्लास रिकामा असल्याची खात्री केली आणि मग

“काय कटकटं आहे तुझी?.. मला वाटतं तु जा एकटी, माझा मुड नाहीये आज.”, जवळ जवळ ओरडतच जोसेफ म्हणाला..

“एss!, काय रे, आपलं ठरलं होतं ना?, मग मुड नसायला काय झालं?” जोसेफच्या गळ्यात हात टाकत रोशनी म्हणाली.

“प्लिज रोशनी, स्टॉप धिस. माझा मुड नाहीये सांगीतले ना, तु जा..”, जोसेफ
“मी एकटी नाही जाणार, तु पण चल बरोबर..फार तर थोडे उशीरा जाऊ..”, रोशनी

“तुला एकदा सांगीतलेले कळत नाही का?”, जोसेफने हातातला काचेचा ज्युसचा ग्लास जोरात खाली आपटला, जेणे करुन तो आवाज बाहेरील लोकांना ऐकु जाईल.. “.. उगाच डोकं नको खाऊ माझं.. जा तु..”

रोशनीने त्याला खुप मनवायचा प्रयत्न केला पण जोसेफ ऐकतच नव्हता, उलट प्रत्येक वेळेस तो मोठ्या आवाजातच तिला उत्तर देत होता. रोशनी मात्र शांत होती आणि ह्याचेच जोसेफला राहुन राहुन आश्चर्य वाटत होते. शेवटी बर्‍यापैकी वेळ ओरडा-आरडी केल्यावर जोसेफ तणतणत बाहेर पडला. जाताना त्याने एकवार रोशनीकडे पाहीले..

“ही शेवटची वेळ..तिला जिवंत पहाण्याची..”,मनोमन जोसेफ उद्गगारला.

पार्कींगमधुन त्याने गाडी काढली आणि सुसाट वेगाने तो बाहेर पडला. रहदारीतुन गाडीचा योग्य वेग राखत तो जेथे नैना भेटणार होती तेथे गेला.

नैना त्याची वाटच बघत होती.

जोसेफ पोहोचताच ती म्हणाली, “सगळं ठिक?”
“हम्म..” जोसेफ म्हणाला आणि त्याने नैनाला गाडीची डिक्की उघडुन दिली. नैना शरीराचे मुटकुळे करुन डिक्कीत जाऊन बसली.

जोसेफने दार लावले आणि त्याने गाडी परत माघारी, घराकडे घेतली.

मागच्या गेटमधुन गाडी त्याने आतमध्ये घेतली. एकवार त्याने खोलीकडे नजर टाकली. बेडरुममधला दिवा बंद होता. रोशनीची गाडी अजुनही पार्कींगमध्येच होती ह्याचा अर्थ ती अजुनही घरातच होती आणि एव्हाना गोळ्यांच्या अतीडोसामुळे नक्कीच शुध्द हरपुन खोलीमध्ये पडलेली असणार.

जोसेफला मनोमन वाईट वाटत होते. हे सगळं अश्याप्रकारे संपायला नको होते. रोशनी त्याच्या मनामध्ये भरली होती. एखाद्याला त्याच्या लाडक्या पत्नीबद्दल जे जे भाव असतील ते ते सर्व जोसेफच्या मनामध्ये होते.

जोसेफ सावकाशपणे घरात शिरला. अंधारात चाचपडत तो बेडरुमपाशी पोहोचला. त्याने दार उघडले. “आय एम सो सॉरी रोशनी.. मी तुला फसवलं, तुझ्या प्रेमाला, तुला धोका दिला.. शक्य झालं तर माफ कर..” असंच काहीसं मनोमन बोलत तो आतमध्ये शिरला. हळुवारपणे पावलं टाकत तो बेडपाशी आला. त्याने चाचपडतच बेडवर रोशनी कुठे आहे हे तपासायला सुरुवात केली. पण रोशनीचा कुठेच पत्ता नव्हता.

“आयला.. ही गेली कुठं.. कदाचीत मध्येच कुठे चक्कर येऊन पडली की काय?”, असा विचार करत जोसेफ बेडपासुन बाजुला झाला..

“कुणाला शोधतो आहेस जोसेफ?? मला????”, रोशनीचा धिरगंभीर आवाज जोसेफच्या कानावर पडला..

अंधारलेल्या एकाकी स्मशानात अचानक समोर कुणीतरी यावं तेंव्हा जसं दचकायला होईल, तस्सेच जोसेफ दचकला आणि तो मागे वळला.

त्याचवेळी दिव्यांच्या प्रकाशाने खोली उजळुन निघाली. दिव्यांच्या प्रकाशात जोसेफने पाहीले बेडरुमच्या दारातच, हातात .३२ ची मॅग्नम रिव्हॉल्व्हर घेऊन रोशनी उभी होती.

****************************************************

ख्रिसने एकवार हातातल्या घड्याळात पाहीले.

“अजुन १५-२० मिनीटं आणि ’ते’ कुठल्याही क्षणी इथे येतील”, लोटस हिल्सवरील एका मोठ्या खडकाच्या आडोश्याला उभ्या असणार्‍या ख्रिसने मनोमन विचार केला.

जोसेफवर तो काय किंवा नैना काय विश्वास ठेवायला तयार नव्हते. रोशनीबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेला बदल दोघांनीही अचुक हेरला होता. वेळ-काळ साधुन तो आपल्याला मार्गातुन हटवायला पुढे मागे पहाणार नाही ह्याची त्यांना खात्री होती आणि त्यामुळेच नैनाला एकटीला नं सोडता ख्रिससुध्दा तेथे आधीपासुनच दडी मारुन बसला होता.

जोसेफने ऐनवेळेस काही दगा-फटका करायचा प्रयत्न केल्यास ख्रिस त्याला योग्य तो धडा शिकवण्यासाठी सज्ज होता. परंतु त्या वेळेस त्याला रोशनी-जोसेफ मध्ये काय घडते आहे ह्याची यत्किंचीतही कल्पना नव्हती.

****************************************************

“मलाच शोधत होतास ना जोसेफ?”, रोशनीने अजुनही पिस्तुलची नळी जोसेफवरच रोखलेली होती.

“अं..नाही.. म्हणजे हो…”, चाचरतच जोसेफ म्हणाला.. “ही.. ही बंदुक! कश्याला रोशनी?”
“नको?? मग मी मला तुझ्या हवेली करु?? मारण्यासाठी??”
“काय बोलती आहेस तु रोशनी? मी तर उलट तुला सर्प्राईझ द्यायला आलो. मी विचार बदलला रोशनी. चल जाऊ आपण पार्टीला.. माफ कर मगाशी मी जरा उगाचच जास्ती चिडलो होतो..”, सारवा-सारव करत जोसेफ म्हणाला
“पार्टीला? अरे मग नैना गाडीच्या डिक्कीत बसुन काय करणार?? तिला पण घ्यायचे का बरोबर?”, रोशनी भुवया उंचावत म्हणाली.

त्या थंडगार संध्याकाळीसुध्दा जोसेफला घाम फुटला..

“तु काय बोलते आहेस रोशनी? मला काहीच कळत नाहीये!!”, जोसेफ.

“बरं.. मग मी दाखवतेच तुला काही तरी.. बस इथे..” खुर्चीकडे बोट दाखवत रोशनी म्हणाली.

जोसेफ आज्ञाधारकपणे खुर्चीत बसला.

रोशनीने बेडसमोरचा आपला ४२” एल.सी.डी चालु केला आणि डि.व्ही.डी. प्लेअरमध्ये एक सि.डी. सरकवली.

टिव्हि. वर एका अलीशान बेडवर एकमेकांच्या प्रेमात मग्न असलेले एक तरूण-तरूणी दिसत होते. ते दुसरे-तिसरे कोणी नसुन आपण आणि नैना आहोत हे कळायला जोसेफला फार वेळ लागला नाही. अस्वस्थपणे तो खुर्चीत सरकुन बसला. पुढील काही मिनीटं दोघांची कामक्रिडा आणि त्यानंतर नैना आणि जोसेफने आखलेला रोशनीच्या खुनाचा प्लॅन हे सर्व काही त्या सि.डी.मध्ये होते.

“कुणाचा प्लॅन ऐकतोस तु जोसेफ? त्या मुर्ख नैनाचा? इतकी वर्ष माझ्याबरोबर काम करुन सुध्दा तिला इतकं साधं लक्षात नाही की माझा पुर्ण बंगला सि.सि.टी.व्ही कॅमेराखाली आहे. अर्थात माझी बेडरुमचे टेप्स इतर कुणाकडे नसतात. ती प्रायव्हसी मी जपते आणि म्हणुनच तु आत्तापर्यंत मोकळा होतास. ह्या टेप्स पप्पांनी पाहील्या असत्या तर तु ह्या जगातुन केंव्हाच गेला असतास जोसेफ.

माझी तुझ्यावर नजर वगैरे ठेवायची बिल्कुल इच्छा नव्हती पण गडबडीत कॅमेरा चालुच राहीला. अमेरीकेला जाताना मी बंद करायचं पुर्णपणे विसरुनच गेले..

परत आल्यानंतर अचानकच कॅमेरा चालुच असल्याचे लक्षात आले. मग म्हणलं बघु तरी, मी नसताना तु कसे दुःखात दिवस काढलेस!!, म्हणुन पाहीलं तर पहिल्या दिवशीच मला ’हे’ बघायला मिळालं.

खुःप दुःख झालं मला जोसेफ. तु सुध्दा इतरांसारखाच निघालास, ह्याच जास्त वाईट वाटलं.”


काय होणार पुढे? जोसेफ ह्यातुन सहीसलामत सुटणार का? रोशनी, नैना, ख्रिस की जोसेफ स्वतः. कुणाकुणाचा बळी जाणार? वाचत रहा “लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह..”


[क्रमशः]