नैनाने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली ..
“सकाळी ११.०० वाजता “वर्ल्ड मनी” बॅकेचे जी.एम. येणार आहेत. आपण हाताळत असलेल्या नविन ऑटोमोबाईल प्रोजेक्टचे सर्व व्यवहार त्यांच्या बॅकेमार्फत व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याबाबत आपणास बॅक देऊ करत असलेल्या सुविधांबद्दल आणि इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी ते येणार आहेत. ह्या… ”
“मिटींग कॅन्सल कर.. ” रोशनी म्हणाली.
“.. पण मॅडम, श्री अविनाश वर्मा त्या बॅकेचे जि.एम आहेत आणि..”
“नेक्स्ट.. ” रोशनी म्हणाली..
“ओ.के मॅम.. १२ वाजता ‘कुल इंटीरेअर्स’ च्या मिस् भावना प्लॅंन्टच्या इंटेरिअर्सचे फायनल ड्राफ्ट्स घेउन येणार आहेत…”, नैनाने एक प्रश्नार्थक नजर रोशनीकडे टाकली आणि पुढे वाचायला सुरुवात केली..
“१.३० वाजता पुअर्स मेडीकल असोसीएशनचे काही लोक आपणास भेटायला येणार आहेत. आपल्या शहरामध्ये ही संस्था करत असलेल्या कार्या… ”
“मिटींग कॅन्सल कर आणि त्यांना हव्या असलेल्या रकमेचा चेक चॅरीटी म्हणुन देऊन टाक … नेक्स्ट ..”, रोशनी
नैना एक एक अपॉईंटमेंट्स वाचत होती आणि रोशनी त्यावर घेण्याच्या ऍक्शन्स नैनाला सांगत होती. शेवटी नैना ’त्या’ भेटीपाशी येऊन पोहोचली .. तिच्या मनामध्ये धाकधुक चालु होती. आज नाही तर पुढच्या महीन्यापर्यंत वाट पहावी लागेल. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली ..
“आजची शेवटची मिटींग ५.३० वाजता ’हेल्पलाईन फॉर हॅन्डीकॅप्ड्स’ संस्थेमध्ये आपणास बोलावले आहे. परीक्षेमध्ये किंवा अंतर्गत व्यवसायाभुमीक अभ्यासक्रमात यश मिळवलेल्या अनाथ आणि अपंग विद्यार्थ्यांचा आपल्या हस्ते सत्कार आहे .. आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे तसेच ती तेथील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारी ठरेल.” नैनाने रोशनीकडे नजर फिरवली
दीर्घ वेळ विचार केल्यानंतर रोशनी म्हणाली .. ”ठिक आहे, आपण जाऊ तिकडे.. ड्रायव्हरला सांगुन गाडी तयार ठेवायला सांग..”
“येस्स मॅम ..” नैनाच्या चेहर्यावर आनंदाची एक लहर चमकुन गेली. तिने आपला चेहरा क्षणात भावनाशुन्य केला आणि पुढील कामासाठी ती खोलीबाहेर पडली.
दिवसातला प्रत्येक क्षण, प्रत्येक तास मोठ्या मुश्कीलीने चालला होता. वेळ जाता जात नव्हता. नैना हातातील घड्याळात वेळ बघुन बघुन कंटाळली होती. शेवटी ती वेळ येताच नैना टेबल आवरुन बाहेर पडली. ड्रायव्हरला दहा वेळा बजावुन तिने गाडी वेळेत तयार ठेवली होती. ठरल्या वेळी रोशनी बाहेर आली आणि गाडीत येऊन बसली. त्या विचीत्र, अघळपघळ आकृतीशेजारी बसण्याचा विचारही नैनाला असह्य होत असे आणि म्हणुनच आदर असल्याचा बहाणा करुन ति पुढच्या सिटवर ड्रायव्हरशेजारीच बसणे पसंद करत असे.
’हेल्पलाईन फॉर हॅन्डीकॅप्ड्स’च्या प्रवेशद्वारातुन गाडी आतमध्ये गेली तशी नैनाची हृदयाची धडधड अजुन वाढली. हीच ती वेळ होती जेथुन खर्या अर्थाने त्यांच्या प्लॅनला सुरुवात होणार होती. सारे काही व्यवस्थीत घडणे गरजेचे होते.
रोशनीने नेहमीच्याच थंडाव्याने काही निवडक शब्दात आपले भाषण उरकले आणि विद्यार्थ्यांचा सत्कार सुरु झाला. एक एक विद्यार्थ्याचे नाव पुकारले जात होते आणि तो किंवा ती रोशनीपाशी येऊन आपले बक्षीस घेऊन जात होती. पुढचे नाव पुकारले गेले. तो अपंग विद्यार्थी स्टेजकडे येत होता आणि अचानक कश्याततरी पाय अडकुन तो धाडकन खाली पडला. कडेला उभे असलेल्या संयोजकांपैकी काहीजण त्या मुलाला उचलायला धावले तेवढ्यात दुसर्या एका कोपर्यातुन एक खणखणीत आवाज ऐकु आला..
“थांबा…… .. ”
सर्वजण जागच्याजागी थबकले आणि त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागले.
गर्दीतुन एक देखणा तरूण पुढे झाला.. खाली पडलेल्या त्या विद्यार्थ्याच्या दिशेने चालता चालता तो म्हणाला.. “कुणीही ह्या विद्यार्थ्याला उचलण्याची आवश्यकता नाही. स्वतःची काळजी स्वतः घेण्याची, स्वतःच्या अधु का असेना पायावर स्वतः उभे रहाण्याची धमक आणि हिंमत केवळ ह्याच नाही तर इथील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आहे.. किंबहुना आपल्या सारख्या धडधाकट माणसांपेक्षा काकणभर जास्तीच.
आज तुम्ही त्याला उठायला हातभार दिलात तर कदाचीत आयुष्यभर तो तुमच्या मदतीवर अवलंबुन राहील. त्याला कळु द्यात, त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीची जाण त्याला होऊ द्यात, नको असताना तुमचा मदतीचा हात पुढे करुन त्याला अधीक अपंग बनवु नका. त्याला तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे, पोकळ मदतीची, किव / दया भरलेल्या नजरांची नाही.”
खाली पडलेला तो विद्यार्थी खुदकन हसला आणि उठुन उभा राहीला.
सर्वत्र टाळ्यांचा एकच गजर झाला. नैनाची नजर मात्र एकटक रोशनीच्या चेहर्यावर खिळली होती. परंतु भावनाशुन्य रोशनीच्या चेहर्यावरची एखादी रेषाही हालल्याचे नैनाला जाणवले नाही.
जोसेफने आपले काम चोख केले होते, आता नशीबाचा कौल मिळणे गरजेचे होते. त्याने एक नजर नैनाकडे टाकली आणि तो परत गर्दीत जाऊन उभा राहीला.
कार्यक्रम संपला आणि नैना रोशनीबरोबर परत यायला निघाली. नैनाचे कान रोशनीचे शब्द ऐकण्यासाठी तरसले होते. परंतु रोशनी नेहमीप्रमाणेच स्वतःच्या विचारात मग्न, शांत होती. मेहतांच्या अलिशान बंगल्यात गाडी येऊन थांबली. रोशनी खाली उतरली आणि खुरडत खुरडत आत जाऊ लागली. नैनाची नजर अजुनही त्या पाठमोर्या आकृतीकडे लागली होती.
काही अंतर गेल्यावर रोशनी थांबली आणि मागे वळुन नैनाला म्हणाली, “नैना, मला त्या तरूणाबद्दलची सर्व माहीती उद्या संध्याकाळच्या आत माझ्या टेबलावर हवी आहे. आजच्या मिटींग संपल्या असल्याने तु आता गेलीस तरीही चालेल..” असे म्हणुन ती आतमध्ये निघुन गेली.
*******************************************
’ब्ल्यु-वेव्ह’ क्लब मध्ये नैना, ख्रिस आणि जोसेफ एकत्र ड्रिंक्स घेत बसले होते. नैनाच्या चेहर्यावरील आनंद काही केल्या लपत नव्हता.
“आज एकत्र अशी आपल्या तिघांची ही शेवटची भेट असेल. उद्यापासुन आपण एकत्र कुठेही दिसता कामा नये. प्लॅनचा पहीला टप्पा तरी निट पार पडला. उद्या रोशनीच्या टेबलावर जोसेफ बद्दलची सर्व ’खोटी’ माहीती मी पुरवीन. आय होप एव्हरीथींग विल गो वेल ..”
“जे काही करायचे आहे ते लवकर करा बाबा.. त्या घाणेरड्या संस्थेत, त्या अपंग, अनाथ मुलांबरोबर महीनाभर राहुन मी जाम कंटाळलो आहे, मला पहिले बाहेर काढा तेथुन..” जोसेफ वैतागुन बोलला.
त्याचे वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच नैना आणि मागोमाग ख्रिस उठुन उभे राहीले.
“गुड बाय जोसेफ ऍन्ड ऑल द बेस्ट ... ”, नैना जोसेफला म्हणाली आणि बाहेर पडली.
जोसेफ मागोमाग पळत बाहेर गेला.
“नैना ..” त्याने हाक मारली. त्या अंधार्या चिंचोळ्या बोळात त्याला केवळ नैना उभी असल्याचेच दिसत होते. तो काळाभिन्न ख्रिस अंधारात न हालता उभा होता का? आणि असेल तर कुठे होता ह्याची त्याला किंचीतशीही कल्पना येत नव्हती.
जोसेफने नैनाचा हात धरुन तिला जवळ ओढले आणि तिचे एक दीर्घ चुंबन घ्यायला तो पुढे सरकला .. परंतु नैनाने त्याला हातानेच ढकलले..
“ओह कम ऑन नैना .. एक महीना झाला मी त्या संस्थेत रहातो आहे.. बाहेरचे जग बघायला सुध्दा बाहेर पडलो नाही. आणि आपण परत कधी भेटु हेही सांगु शकत नाही. आजची रात्र, येतेस माझ्याबरोबर… ?” जोसेफ म्हणाला..
“लिव्ह मी अलोन जोसेफ”, नैना त्याच्या मिठीतुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत म्हणाली. परंतु जोसेफने त्याची पकड अधीक घट्ट केली. त्याचबरोबर त्याच्या खांद्यावर एक मजबुत हाताची थाप पडली..”सोड तिला!!” एखादी वार्याची झुळुक येऊन हलकेच कानात काहीतरी बोलावी तसे अगदी हळुवार आवाजातले शब्द त्याच्या कानावर पडले.. पण त्या आवाजात प्रचंड जरब होती.
जोसेफने मागे न बघताच नैनाला सोडुन दिले. नैना त्या बोळातुन बाहेर पडली, एखादी सावली जावी तशी एक काळी आकृती तिच्या मागोमाग बाहेर पडली.
आपला खांदा झटकत जोसेफ मनोमन बोलला .. ”ऑलराईट नैना, आज हा कुत्रा तुझ्याबरोबर आहे. पण कधीतरी तु मला एकटी सापडशीलच आणि त्यादिवशी तुला वाचवायला कोणी नसेल ..”
[क्रमशः]