Goti, ga-hana aani wi-fi in Marathi Comedy stories by Lekhanwala books and stories PDF | ओटी, गा-हाणा आणि वायफाय

Featured Books
Categories
Share

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, तरीपण दोघवे काल संध्याकाळी मामाकडे ईलापासून हिरमुसले हूते. चारीबाजूनं डोंगर असल्याकारणानं मोबाईलचा नेटवरक दर दोन-दोन मिनिटानं येत-जायत व्हता. आता सकाळी ते दोघवे आवशीबरोबर देवळाकडे चाले हूते. एकदाचो इलो सडो! वीस मिनिटाची घाटी चलून घामाघूम झालेले झीलाकां बघून सुनंदा म्हणता “अरे हैतेशे आम्ही दिवसाचो पन्नासएक खैपा घालू…. आज तैची फळा तुमचो मामा खाता… माझी भैहनची बोळवण दरवरशी दोन आबेंच्या पेटायेवर करता हा…” देवळ्यालागी ईल्याबरोबर सुंनदाचो बारको झील नाराजीनं म्हणता ”मामा बोला होता इकडे सडयावर रेजं पकडेल म्हणून”
“तात्यानू वळखलास की नायं…”सुनंदानं देवळाच्या पाय-याकडे चप्पल काढीत गुरवाक हाक दिलानं. पण दोघा पोरग्याचा लक्ष अजून पण मोबाईलमध्ये “दादा इथं देवळात पण रेजं नाय… नीट… शीट…” गुरवानं सुंनदाक वळखलानं. “आता नजर कमजोर झाली म्हणून आपल्या वाडीतल्या चेडवाक ओळखल्याशिवाय रहवानं काय, महादेव सुताराची लेकना तू, खयंगो दिलेला तुका”” हातातली उरलेली दोन फुलां पिडीसमोर ठेवीत म्हटलानं.
“वारंगावात” खांदयाक लावलेल्या बॅगेसून ओटी काढीत सुनंदा बोला. गुरवानं पाट देवीच्या मूरतीसमोर ठेवत बोलो “पावणे नाय येवकं?” “मिस्टराक सुटटी नाय भेटली यंदा कामावरना, तेनी, मग रेल्वेत बसवलानीं, आता काय पोरगे हतं वागडानं… मग काय प्रवासाचां टेशनं नाय” सुनंदानं नारळ आणि ब्लाऊजपीस पाटावर ठेवीत म्हटलानं.
सुनंदाच्या दोघव्या झीलानी देवळाच्या आत इल्यावर मोबाईल खिश्यात ठेवल्यानी खरे, पन दोघावंचा लक्ष अरध्यामुडदया नेटवरकवरती ‘प्राफाईल पिचर’ अपलोडिगंकडे लागून रहवला हुता. दोघवाचां एकडेतकडें बघत देवळच्या भितींवरच्या देणगीदारात मामाचां नाव शोधूचा चालला हुता. ”मला दिसलं मामाचं नाव एकशे एकावन्न रुपये….” थोरल्यानं बारक्याक म्हटलानं. तकडे देवळाच्या पडवीत थव्यानं बसलेल्या पोराचो खिदडण्याचो आवाज केवढयानतरी येत हुतो. गुरव कशी तयारी करता तें आता दोघवे बघत हुते…गुरव हातानं काम करती जरी असलो तरी तोंड काय बंद नव्हता “फाटफटी सहा वाजोच्या आधीपासून, हल्ली पोराचो घोळको जमान तयार! मुबंईवाल्यानी गावच्यानसाठी म्हणून एक कायतो राऊटर लावून दिल्यापासून बघूकच नको…” राऊटर ऐकल्याबरोबर दोघवे मुबंईवाले पोरगें चाट पडले. आणि दोघवांनी आपल्या खिशातून मोबाईल काढलानीपनं. “मेलो यता तो हय देवळ्च्या पडवीलागी येवून बसता, राडेच्याका देवीक वाकून नमस्कार घालूचा म्हणशाल तर शपथ…चार फूला काढून आनूक सांगितली तर नाय म्हणती…या बावडेचा पानी उन्हाळ्यात रहवता हा….त्या साखरकराच्या नळाकडना आणूचा लागता…सगळे येवून आपलो मोबाईल घेवून नुसते चकाळतत नुसते…आपला पाचट हसना…ता पन देवीसामनी…या जा काय चाला हा ता काय बरा दिसत नाय… त्या मुबंईवाल्याक लय गावचो कळवळो म्हणन या कवतीक दिलानी बसवून देवळात…” साठी गाठलेलो तात्या गुरव उघडया अंगान सगळी तयारी करीत बडबडत हुतो.
“स्वयंभू पाषाणी पावणाईदेवीचा मंदिर हा कायतरी अपशकूनी घडात तेव्हा कळात” सुनंदा आपलो पदर सावरीत बोलला. गुरवानं देवीसमोर नारळ ठेवलानं खरो पण तेचो लक्ष सतत अकडे-तकडे काय चालला हा तेच्याकंडेच होता …आता कुणाक तरी बघितलानं. सुनंदाक तेच्याकडे बोट करीत दिखवून म्हणता….“तो तो बघ तो जाबुरकराच्या नानाचो धाकटो…बघ अवतार बघ…जीनच्यो पॅन्टी घालणार काय…फटफटी घेवून शायनींग काय…अरे मुंबईवाले पण अशो फॅशनीन रवत नाय…या मायझव्या कामा काय असततं…मुबंईक जाऊन दोन-चार पैशे कमवाचा धाडस नाय, बसतत हय येवून टावळको करत…”
गुरवानं सुनंदान आणलेलो अगरबत्तीक पेटवूक माचीसची काडी काढलानं. “तू खय रहवतसं मुबंईक” तात्या गुरव बोलतं हुतो. इकडे या गुरवाचं बोलणा ऐकल्यापासून सुनंदाचे दोघव्या झीलाका ख-या अर्थोनं देवी पावल्यासारखा वाटत हुता. मामाकडें ईल्यापासून काय तरी चुकचुकल्यासारखं वाटत हुता, “वायफाय आहे इथं…तो ही फुल रेंज अरे वा… पण….लॉक आहे” धाकटयानं थोरल्याकं मोबाईल दाखवत म्हटलानं. तिथं बसलेल्या घोळक्याकं पासवरड ईचारूची थोरल्याची हिमंत व्हतं नव्हती पण वायफाय वापरुकं आतून जीव कासावीस झालो हुतो …. दोघावकं मागच्या दोन दिवसापासूनचे मॅसेज चेक करुचे हुते, स्टेटस अपडेट करुचे हुते, प्रॉफिल पिचंरा चेजं करुची हूती, अकडे बारक्यानं थयचं पडवीत बसलेल्या एकाकं “पासवरड काय” विचारुनं नेट चालू पण केलानं…
“सांग, मला पासवरड काय आहे तो” थोरल्यानं मग आता धाकटयाकं विचारालानं. धाकटा हसत हसत म्हणाला “पावणाईदेवी”
“होत का नाहीयं…” थोरला रागानं म्हटलानं.
“पी कॅपिटल…टाकं…” धाकटा पुन्हा हसत हसत बोला…. आता दोघावें जाम खूश दिसत हुते…दोघवानीं देवीच्या मूर्ती बघितलनी…मोबाईल खिश्यात ठेवून…. दोन्ही हातानी नमस्कार केलानी…आता तेका देवीच्या मूर्तीतं तेज दिसत हुता…
सुनंदा बोलत हुती “मी आता बदलापूरका रहवतयं….पहली रहवत हूतावं लालबागका पेरुच्या चाळीत पण जशजशी सगळ्या दीराची लग्ना झाली तशी रहवक जागा कमी होवक लागली …आमच्या मिस्टरचा कुटूंब काय न्हानं हा….मग काय…चौघाच्या मालकीची ती रुम विकालानी… वाटणी करुन टाकली नी आमच्या हिस्साचो म आम्ही बदलापूरका फॅल्ट घातलो”. तात्या गुरवाच्यां डोळ्यासमोरुन झराझरा मुबंई समोर येवकं लागली. तेंनीं असुयेचो आवढों गिळत म्हटलानं “…आजून म्हणून तकडे काळाचौकीक काय दहा बाय दहाचो रुमचे भाव काय कमी हत…करोडोचो भाव चाललो हा म्हणततं……त काय? आपला मुबंईक स्वत:चा घर तरी झाला नाय गो”.
“तुमचे झील खय असततं” सुनंदाक एकदा काय माहेरचा माणूस भेटला की मग विचारता सोय नायं…. बोलणं काही थाबंत नव्हतं….देवीक ओटीभरुक आणलेलं तांदूळ सूपात ठेवूचा चाललां हूता…तिचें दोघवे झील आता त्या पडवीच्या भितींजवळ बसलेल्या बाकीच्या टोळक्यात जाऊन मिसळलेपण….तात्यागुरव खूजो अभिमान आणित बोलत हुतो “माझे दोनी झील मुबंईकच असतत विरार का….आमच्या जावयाचो बिल्डींगमध्ये रुम असा…आमचे दोघवे जेवक चेडवाकडेच असतं …रहवोक अशी बैठया चाळीतच रुम घेतालानी… भाडयानं हा… त काय आपला खानावळी आणि आपला कपडालत्ताचा भैहन हा म्हणून चालून जाता…नायतर परत यांच्या आवशीक पाठवूचा लागला असता…. समजूदे तेकां पन बापसान काय दिवस काढलान हुते…ते…आता पासून व्हवहार कळोक लागलो त उदया बायका इलो को परपजं चालवूक मोकळे..त काय…“ तात्या गुरवाचो गळो जरासो का होईना कापरो झालो हुतो…डोळे थोडेशे पाणावल्यासारखे झाले हुते…मिल सुटल्यावर थयचं खयतरी झोपडा बांधून रहवलं असतयं तर आज पोरा का असा मुबंईक भाडयानं रहवचा लागला नसता…मोठो झील म्हणत व्हतो….बाबानो कलमा विकून विरार का रुम घेवून देवा…म्हटला आता तूका घेवून दिलय तर परत बारको झील पण हा…. उदया तो पण मागतलो… आणि रेवती हाच, माझा चेडू… आता परक्या घरचा आपण म्हणू गो… कायदयानं पोरीक तेवढोचं हिस्सो देवचो लागता…चेडू आपला… जावई आपलो नाय…आणि फटकीखावून ईली कलमा पन नाय ना तीन-चार वरश्या झाली…सगळो आंबो कलटावर यंदापण…एक फळ चांगला नाय….काय पेटयो पाठवणार दलालाका…त्यात आणखी पावस…सगळो मोहर गेलो ना वाया…. आणि शेती काय माझ्यानं काय आता व्हतायं एकटानं…आमच्या हिचा आयुष्य गेला चुलीजवळ आता काय होणार हा….तिच्यानं… सगळी बरगडयो गेलो कामातून… तेव्हा अख्खो सडो चलणारी बाई आता दोन पावला चली तरी श्वास कोंडता…तरी बरा आता गावात तो सिलिडंर येवक लागलो… आमची शेती… ती तशीच मागची दोन वरशा पडोन असता …..तेच्या अगोदर परयत तो रघ्याचो झीलगो व्हतो तवसर दोघा भुतू वारगुळ्यात करीत हुतावं… तो रघ्याचो नितो… तकडे बाहेरगावी गेलो ना कोईटला-दुबईक… गेलो त्या रफीकाबरोबर…आता काय बापसाक दर महिनाकं पाच हजार पाठवता…तो तरी कशाक म्हणून शेती करीत वारगुळ्यात.. म्हटलं माज्याकडनं त काय व्हवहाचा नायं एवढा खंडीभर भात लावूकं, लावणी करुकं, दाढ काढूकं, यंदा पंचायतच्या मिटींगीत ठरला हुता…त्या बापूमास्तराची सून संरपच हा ना काय बरा तीचा नाव…” तात्या ओटी भरुचा सामान जवळ करीत हूतो.
सुनंदानं अवाक होऊन म्हटलानं “बापूमास्तराची सून!”
एक घटका थांबत तात्या गुरव पाटावर ठेवलेले दोन्ही हात कपाळावर ठेवीत डोळे बंद करीत नाव आठवूक बघित हुतो….पुटपुटत हुतो “नाव असा तोडावर हा बघ… शेम नाव…बघं संध्याकाळच्या सिरयलीमधला नटीचा नाव हा गो…शिरापडली तोंडावर…काय बरा….हा… कल्याणी!… कल्याणी म्हणतं व्हती यंदा वाडीवाडीचे गट करुन सगळ्यानीं ट्रक्टर लावयचो सगळ्या वावळीत….त्या रांडेच्या त्या आमच्या विठोबा गुरवाचा त्योडं सकाळी उठून बघू नये…खयं ख्वाड घालूचा ता येचो पहलो नंबर…वरगनीक तयार पन झाले सगळे वाडीतले….पन हयं राडचों तालूक्याकं कधी गेलो नसात…म्हणता या सगळा घाटावरचा हयं चालूचा नाय… राडचें जळततं एकमेकावरं… यो हुदूदू…गोधळं….एकमेकाकं मारुक काय उठले नी काय… काय ना वरसून आदेश येततं याच्यां साहेबाचे…. आमदारा-खासदाराचे… अनी हे तशे वागततं……बिनपैशाचो तमाशो…ती बापूमास्तराची सून.. संरपच हा नावाक…सगळा काय यो आमचो विठो गुरव बोलणार नी ती कल्याणी ऐकणार…म्हटलां बघितला असता ट्रक्टरनी शेती करुन…आता यंदा काय व्हना नाय…वाटतं… तिघां पोराकां सागूंन ठेवलयं… माझी लाकडा एकदा मसणात गेली की मग काय तो हिस्सो करुन घ्येवा…तवसंर माझ्या जीवान कायं व्हवचा नाय”
सुनंदान दोन्ही पोराकां खूणेनं बोलावानं. मोबाईल खिश्यात ठेवून दोघवें हात जोडून उभे रहवले. देवीपुढे पेढाचों पुडो सुनंदेनं ठेवीत तात्याक बोली ”तात्यातून गा-हाणा घाला यंदा पोरगो ग्रजुअशनच्या शेवटच्या वरसा असा…यंदा पास होवून चांगल्या कंपनीत लागलो तर पुढच्या वरशी पाच नारळाचा तोराण देईन देवीक…” माहेरवशीननं बोलायची खोटी की अकडे तात्या गुरवानं “हे देवी पावणाई…ही माहेरवशीन सुनंदा तुझी न चुकता दरवरशी परमान यंदापन वटी भरुक इली हा….ती पावणं करुन घे… तिच्या मालकाक, मुलाबाळाक सुखात ठेव…..तिचो पोरगो यंदा” गुरवाचां थांबलेला गा-हाणा बघून थोरलो बोलो “शेवटच्या वर्षाला”, “शेवटच्या वरश्याक बसलो असा… तैका चांगल्या मारकानं पास कर… आणि पुढच्या वरशी चांगल्या कंपनीत रहवलो की ही माहीरवशीण तुका पाच नारळ्याचा तोराण घालीत“
…गाभा-यात नारळ फुटलो…खोबरयाचें बारीक तुकडे करताना पडवीजवळ बसलेल्याचां खिदडना तात्याच्यांक काय रुचतं नव्हता. तात्या गुरव बोलत सुटलो “राडंच्यानो मुबंईक नाय रहोक जमत तर गावक रहोन कलमा शिपा ता पन नाय…चिखलात हात घालूक लाज वाटता…मोठे झाटलीमन हे… आता यो बबन्या गुरवाचो लेक अगो दारु म्हणो नको… सिगरेट म्हणनू नको…अरे जातीचे गुरव नारे…कसो तुमका देव पावात…आपल्या कुळात कोंबडो बकरो खाउ का नाय…तरी तकडे तालुक्याक जाऊन चायनीज कायता हासडततयं… अरे देव बघता…मागे आवस खुळावली हुती…बापूस पन अडमिट हुतो सायन हॉस्पीटलात मुंबईक…यास हा कुटंबाक…अख्खा घरदार भोगता मग…”“पहिली काय भरभराट हुती नाय तात्यानूं..” सुनंदा आजूबाजूक बघीत हलक्या आवाजात बोलला.गुरवही मग आवाज ब-यापैकी खाली नेत बोलत हुतो “अगो काय तरी हुता गुतांड करुन ठेवल्यानी……वस्तू हुती घरात…देवदेवस्की काय कमी हा…आता नाबूत झाली खयं वस्तू…मरु देत करीत ता निस्तारीत… कोण कसो वागतां तां…देवी पावणाई बघता हा…”
“…तर आता काय रवला नाय पयल्यासारखा तात्यानू…आमच्या सासरी सगळे भट आता मच्छी-मटाण खाततं…तकडे मुबंई तर सगळा आपला चालता” सुनंदानं नाराज होवून म्हणत हुता. खोंब-यांचे तुकडे गुरवानं सुनंदाच्या हातावरं ठेवीत बोलो “नाय पन गावाकं शंभू भटांन तरी टिकवलान हा…. तेचो एक झिल पुण्याक असता…विधी वैगरा शिकता हा…आता बापसानंतर तोच चालवितसा वाटता”
सुनंदान खोब-यांचो तुकडो देवीक नमस्कार करीत तोडांत घातलानं “आणि त्यांचा चेडूचा…झाला काय लगीन…?” सुनंदाक सगळां लफडा माहित असून पण मुददाम कुचाटन्या काढूचा म्हणून विषय काढलानं…गुरवाक पन असले विषय चगळीत बसूची सवय….आजूबाजूक नजर फिरवीत कोण बघीत नायना येच्याकडे बारीक लक्ष देत सुनदांक सागोक लागलो “जायत हुता तेलयाबरोबर पळून…आवझारी आवस-बापूस दोघवा बारामाशी… चेडू खय जातां येता तेच्यावर लकक्ष नको…वाडीतले बाकीचे प्योर बघितचं व्हतें कोण करता काय…हंत आजून दोघं-तिघं अशी लफडयावालीं…गावातं रहोन हेच धंदे सुचततं…म्हणून आमच्या दोघवाकं मुबंईक पिटाळलें…म्हटलं हयं रवले तर…चिरे फोडाता फोडता… संगतीनं खयचे तरी नुकोतो वासे मांडवाक लावचा बघती…” पण सुनंदाची दोंघंव झील मागसंपासून पडवीजवळ…. मोबाईलवरुसून देवीचे फोटो अपलोड करण्यात दंग झाले हुते…
“देवाच्या गाभा-यात पण शांती ठेवलानी नाय फटकेक नायती कुळकशा होउदेत रांडच्याचो…ते बघं अजून दोघेजण इले मायझवे….देवापुढे विडे पन ठेवचो माग रहवलो नाय आताअक्करमाशानो….दुपारतिपराचा झोप म्हणून पण नाय… तो बाबा मेरोपकर येवदे यंदा गावच्या मिटीगं नाय ते का झाडून टाकतय की नाय ता बघ…राडच्यानू तुमच्या त्या बंद घरापुढ लावा तो वायफाय कायतो..हयं देवळालागी नको…मोठे मुंबईवाले ना मायझवे..” तात्या गुरवानं पाच पेढे आणि अरधी नारळाची वाटी सुंनदाक देत बाकीचो सगळो मेवो आपल्या खुटयेक टांगलेल्या पिशवीत टाकीत बोलत हुतो. सुनंदाची एक नजर गुरवाच्या पिशवीतल्या पेढयाकडे कितीवेळ टिकून हुती…
“अरे त्या ईलास दुसनकराची आऊस लयं सिरीयस हा…..! काय जगातशी वाटत नाय म्हातारी… ! पुढच्या क्षणाक डोळें मिटातशी वाटता” पक्यानं व्हाटसअपवर इलेलो मॅसेज सुधीराक दाखवित म्हटलानं. सुनंदा आणि तिचे दोघवे झील चप्पल घालूक लागले, गुरव आता थयसर येवून सुनंदेक बोलता “या बघ……मुबंई कुणाचा काय झाला ता सगळा वाडीभर अगदी दुस-या मिनीटाक कळतां आणि गावाकं जरा काय साटंसुट झाली रे झाली की मुबंईक बातमी वा-यासारखी पसरता….”
“चला तात्यानू चलतयं….आज संध्याकाळी जावचा नाधीवडयात सासरका” सुनंदा गुरवाच्या पाया पडीत म्हटलानं….दोघवे झील आता खूश हुते…सगळा तेच्या मनासारखां झाल्यासारखा दिसत हुता…मोबाईल पॅन्टच्या खिश्यात ठेवत तेनी मग गुरवाच्या पायाक हात लावलानी… “बाबोनो म्हातारे-शितारे व्हावा….हेतेशेच येतं रहावा मामाकडे…मामाकं पोरगी नसली म्हणून काय झाला…”तात्या गुरवान दोघवाच्या डोकावरना हात फिरवलानं…सुनंदा आणि पोरा निघाली. आता मघाच्या पक्याच्या बोलण्याकडे तात्याचों लक्ष हुतोच…गुरवच तो आता ऐकलान हा तर गप्प कसो रवतालो ”…जास्त सीरीयस हा की? मोठया झीलाकडे राहवं गेली होती ना? फटखी खाव दें आता खयं म्हातारीचे खावचे दिवसं सुरु झालेनी…या असा…” गुरवानं खोबराचे तुकडे पडवीत बसलेल्या बाकीच्याक वाटूकं लागलो… तात्या गुरवानं असा म्हणोक की सुधीरानं व्हाटसअपवर इलेलो म्हातारेचे सलाईना लावलेलो फोटो गुरवाक दाखवलनं, ”तो आमचो थोरल्या काकाचों अजितनी गेले हुते बघुगं सायनका.. यो फोटो काडलानी तेव्हा” “बाकी कुकूं आजून तसाच्या तसा हानारे” गुरवानं मोबाईलच्या स्क्रीनवरच्या फोटोकडे बघतं म्हटलानं. “राडच्यानं आमच्या अजितानं सोळा मेगापिकसलवालो मोबाईल घितलान हा …कुकं भडक दिसात नाय तर काय? म्हातारेन उदयाचो दिवस तरी काढूक हवो नायतर उदया परशुरामाच्या घरीचो बारसो बारगळलो म्हणून समजा…हा तेका आणखी आता धाकधूक म्हातारेच्या तब्यतेचो…” सुधीर काळजीनं म्हणतं हुतो. “सगळा आणून ठेवलान हा वेपर, फरसान, झीलगाच नाव कोरुक थरमकाल, हा आपलो रातरी बसूचो पण बेत ठरलोलो हा पण या म्हातारेवर हा….!” पक्यानं आपल्या जवळची खबर सांगत म्हटलानं. तेवढयात निलेशानं म्हटलानं “पन वाडीत सांगोचाच नायाना…बारसो व्हयंसर… पयली आदी पावशेर घशाच्या खाली उतरु दे मग काय तो गावभर डको पीटा…तं काय….मुकेशाक आणि बाकी पोराका तसा सांगोन ठेव”
आता सुनंदा जाऊन सुतारवाडीतला अजूऩ एक नवीन जोडपा देवीच्या दरशानक ईला हुता. गुरव आता त्येंका सांगत हुतो “या बघ या असा चालेला सगळा आमच्या टाईमाक माणूस मरुन चार दिवस झाल्यावर मुबंईत पत्र यायचा नि आता थय माणूस हार्ट अटैक येवच्या अगोदर हय बारावाचा जेवान बनवूक लागले पण…”

————————————

-लेखनवाला