तरीही काहीजण परमेश्वर भक्तीची कास धरून लढा द्यायला उभे होते. मात्र करालच्या अमानुष महाभयंकर अत्याचारांसमोर कोणाचाच टिकाव लागला नाही. हे सगळं होत असताना एक व्यक्ती अखंड तपश्र्चर्येत लीन होती ती म्हणजे विश्वनाथशास्त्री. त्या भयंकर कोलाहलात स्वतःच्या मनाची शांती ढळू न देता भगवान शिवाची उपासना करणे हे एकच सत्य होत त्यांच्यासाठी. त्यांच्यावर प्रसन्न होऊन पुन्हा भगवंतांनी विश्वनाथशास्त्रीना आशीर्वाद दिला तो ह्याच भूमीवर. शत्रूचा नाश करायचा असेल तर आधी त्याचा मित्र व्हावं लागत ह्या उक्तीप्रमाणे विश्वनाथशास्त्रीही करालच्या समुदायात सामिल झाले. ह्या जगापासून अनभिज्ञ अशा कित्येक प्रकारच्या उपासना करालचे चेले करायचे. म्हणूनच आजवर कोणत्याच पुण्यात्म्याला करालला साधा स्पर्शही करणं जमलं नव्हत. तिथले प्रकार जाणून एक गोष्ट पक्की होती की सरळ लढून ही लढाई जिंकण अशक्य होत. करालला नेस्तनाबुत करण्यासाठी त्याचाच कपटीपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे होता. परंतु ते एकटे कितपत यशस्वी झाले असते ह्याच्यावर त्यांना स्वतःलाच शंका होती.
अशाच एका रात्री ध्यानस्थ असताना त्यांच्या कानांवर शिवस्तुतीची कवने पडली. कुठल्याशा अतीप्राचीन भाषेतील भगवान शिवाची सर्व नावे गुंफून बनवलेली ती शिवस्तुती... परंतु इतक्या रात्री शिव आराधना कोण करत असेल. ते तसेच ध्यान साधना आटोपती घेऊन त्या व्यक्तीच्या शोधात बाहेर पडले. त्यांच्या वाड्यापासून दूरवर एका झाडाखाली एक तरुण युवती नाजूक पदन्यास करत होती. तीच आरस्पानी सौंदर्य इतक्या दुरून त्या काळोखातही खुलून आल होत. तिच्या हालचाली इतक्या मोहक होत्या की एखादी स्वर्गलोकीची अप्सरा भासावी.... परंतु ती अशा अवेळी आणि ते ही करालच्या राज्यात भगवान शिवाचे चिंतन... नक्कीच काहीतरी वेगळं असाव... ते लपून तिच्या भेटीला गेले. त्यांना पाहिल्यावर तिला जाणीव झाली की आपली चोरी पकडली गेली परंतु ती अजिबातच घाबरली नाही. उलट तिच्या नाजूक गोऱ्यापान चेहऱ्यावर निडर भाव विलसत होते... जणू तिला आपल मरण माहीत होत. शास्त्री अशी व्यक्ती प्रथमच पाहत होते. तिला विश्वासात घेऊन विश्वनाथ शास्त्रींनी बरीच चर्चा केली आणि त्यातून त्यांना खूप गोष्टींचा उलगडा झाला. करालचा उजवा हात समजला जाणाऱ्या आणि त्याच्यापेक्षा कणभर जास्तच विकृत असणाऱ्या चांद्रहासाची ती स्त्री होती. देवाधर्माविरुद्ध असल्याने लग्नाचे असे कोणतेच पवित्र संस्कार त्यांच्यामध्ये झाले नव्हते. आणि त्याची त्यांना गरजही वाटत नव्हती. दोघेही त्यांच्या आयुष्यात अतिशय आनंदी होते. परंतु हे जगज्जेतेपदाचे खुळ डोक्यात शिरल्यापासून चांद्रहासाचे तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. तिच्या प्रेमात दिवस रात्र आकंठ बुडून राहणारा चांद्रहास तिला विसरून काळया शक्तींना प्रसन्न करायच्या मागे लागला. जरी तीच चांद्रहासवर प्रेम असलं तरीही परमेश्वरावर भक्ती होती. त्याच्यासोबत करालच्या मार्गावर चालणे तिला बिलकुल मंजूर नव्हते. म्हणून ती लपून छपून का होईना देवाची आराधना करायची. व आज.. आजची रात्र ही तिच्या जीवनातील शेवटची रात्र होती. उद्यानंतर कधी दुसरा दिवस पाहण्याची शक्यता नव्हती. उद्या सर्वात दुर्मिळ आणि शेकडो वर्षातून एकदा येणारा असा खास चंद्रग्रहणाचा मुहूर्त होता. शेकडो शक्तींना गुलाम बनवण्यासाठी आवाहन करून त्यांना इश्र्चीत बळी देऊन आपल्या शक्तित परावर्तित करायचं होत. चंद्रग्रहणसंपेपर्यंत कराल जगातील सर्व शक्तिमान बनलेला असणार होता.
त्या बळींच्या यादीत एक नाव शशीकलेचे होते. बऱ्याच वेगवेगळ्या चांगल्या वाईट शक्तिंसोबत कराल यक्षिणीनादेखील आवाहन करत होता. त्यातील एका अत्यंत शक्तिमान यक्षिणीला एका सुंदर तरुण स्त्रीचे नग्न शरीर हवे होते. करालच्या दृष्टीने ही मागणी अगदीच नगण्य होती. त्यासाठी त्यांच्या नजरेत शशिकला ही उत्तम पर्याय होती. तसेही चांद्रहासाला जगावर अधिराज्य गाजविन्यापलीकडे काहीच सुचत नव्हते. व शशीकलेची गरजही नव्हती. त्या बिचारीला माहित होत की वाचणे तर अशक्य आहे. त्यामुळे जस येईल तस मरण स्वीकारायला ती निधड्या छातीने तयार होती. बोलण्याच्या ओघात विश्वनाथ शास्त्रींनी अजुन बरीच माहिती काढून घेतली. काहीतरी विचार करत तिथून निघताना त्यांनी शशीकलेला एक सफेद रंगाचा खडा दिला. तो खडा घेऊन ती विषण्णतेने हसली व निघून गेली.