नर्मदा परिक्रमा भाग १
रेवा, अमरजा, मैकलकन्या अशी नावे धारण करणारी ही उत्तर भारत व दख्खन पठार यांच्या सीमेवरील खचदरीतून पश्चिमेकडे वाहणारी नदी. लांबी १,३१० किमी. व जलवाहन क्षेत्र ९८,४२० चौ. किमी. ही मध्य प्रदेश राज्यातील मैकल पर्वतश्रेणीच्या अमरकंटक पठारावर, सु. १,०५७ मी. उंचीवर एका झऱ्यातून उगम पावून त्या राज्यातून१,०७८ किमी. वाहते. नंतरचे ३२ किमी. ती मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि त्यानंतरचे ४० किमी. महाराष्ट्र व गुजरात राज्यांची सीमा बनते. शेवटचे १६० किमी. ती गुजरात राज्यातून जाऊन भडोचजवळ अरबी समुद्राच्या खंबायतच्या आखातास मिळते. दख्खन पठारावरील इतर नद्या सामान्यतः पूर्वेकडे वा आग्नेयेकडे वाहतात. परंतु तापीप्रमाणेच नर्मदाही पश्चिमवाहिनी आहे. तिच्या मार्गात अनेक छोटेछोटे धबधबे व द्रुतवाह आहेत. त्यामुळे तिचे ‘उड्या मारीत जाणारी’ या अर्थाचे रेवा हे नाव सार्थ ठरते.
असे म्हणतात .
हीला रेवा हे नाम श्री रामाने दिले आहे असेही म्हणतात .
इतर नद्यांप्रमाणे ती ‘प्रौढ’ किंवा ‘वृद्ध’ झालेली नसून अद्याप ‘तरुण’ आहे. तिचे खोरे लांबट व अरुंद असून त्यात हिमालयाच्या उत्थानाच्या वेळी झालेल्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या खचदरीचा समावेश आहे.
या खचदरीच्या तळाशी खडक असून त्यावर १५० मी. पेक्षा जास्त जाडीचा गाळाचा थर आहे. या खोऱ्यात बेसाल्ट, चुनखडक, वालुकाश्म, ग्रॅनाइट व नाइस, डोलोमाइट, शेल, संगमरवर इ. प्रकारचे खडक असून त्यांत लोखंड, मँगॅनीज, कोळसा, डोलोमाइट, संगमरवर, चुनखडक इ. खनीजे सापडतात. येथे सुपीक काळी माती व गाळमाती असून नदीच्या वरच्या डोंगराळ भागात तांदूळ व भरडधान्ये, वरच्या सपाट भागात गहू व ज्वारी आणि खालच्या भागात कापूस, तेलबिया व ज्वारी ही मुख्य पिके होतात.
उगमानंतर नदी प्रथम उत्तरेस व वायव्येस वाहते. सु. २५ मी. उंचीच्या कपिलधारा धबधब्यावरून खाली कोसळून ती डोंगराळ भागातून अनेक तीव्र वळणे घेऊन खोल व अरुंद खोऱ्यातून एका तीव्र वळणाजवळ मंडला येथे येते. मंडला व जबलपूर यांदरम्यान नर्मदा खोरे सापेक्षतः रुंद आहे. जबलपूरजवळ अरुंद घळईतून ती धुवांधार धबधब्यावरून ३५ मी. खाली येते. एके ठिकाणी ही घळई एखादे माकड किंवा हरिण सहज उडी मारून पलीकडे जाईल इतकी अरुंद आहे. तेथे तिला बंदरकुदी किंवा हरणफाळ म्हणतात.
यानंतर तिची ३ किमी. लांबीची सुप्रसिद्ध भेडाघाटची संगमरवरी खडकांची घळई आहे. तिचे खडे काठ १२–१५ मी. उंच, संगमरवर व बेसाल्ट यांनी युक्त आहेत. यानंतर नदी जबलपूर ते हंडिया या ३५० किमी.च्या सुपीक, मैदानी भागात येते. तथापि त्याला उत्तरेस विंध्य व दक्षिणेस सातपुडा यांची स्पष्ट नैसर्गिक सीमा आहे. उत्तरेकडील उभ्या भिंतीसारख्या भृगूचा माथा एकसलग असून त्यात एक-दोनच खिंडी आहेत. त्यामुळे नर्मदेला उत्तरेकडून हिरण ही एकच प्रमुख उपनदी मिळते.
इतर उजवीकडील उपनद्या बरना, कोलार व ओसरंग या आहेत .
सातपुड्याच्या उत्तर उतारावरून मात्र बंजार, शेर, शक्कर, गंजाल, तवा, छोटी तवा, कुंडी इ. उपनद्या येऊन मिळतात. छोटी तवा संगमाजवळ मंधार व दर्डी हे प्रत्येकी १२ मी. उंचीचे धबधबे आहेत. मंधार प्रपाताच्या अलीकडे ३४ किमी. पुनासा धरणाची जागा आहे. नर्मदाकाठावरील महेश्वर या अहिल्याबाई होळकरांच्या राजधानीपासून ८ किमी. सहस्त्रधारा हा धबधबा आहे.
मांधातानंतरच्या डोंगरातून बाहेर पडून नर्मदा १५० किमी. च्या सुपीक मंडलेश्वर मैदानात येते. मग हरिंगपालजवळच्या १५० किमी.च्या शेवटच्या घळईतून ती राजपीपलाच्या पूर्वेस गुजरातच्या मैदानात येते. तेथे वळणे घेत घेत ती ८० किमी.वरील भडोच शहराखाली रुंद होऊन २८ किमी. रुंदीच्या व २५ किमी. लांबीच्या खाडीने समुद्रास मिळते.
नर्मदा खोऱ्यात पाऊस भरपूर पडतो. मैकल पर्वतभागात १४० सेंमी.पेक्षा जास्त, सातपुडा भागात ११४ ते १२७ सेंमी., खालच्या मैदानी प्रदेशात ६४ ते ७६ सेंमी. व गुजरातच्या मैदानी प्रदेशात १०२ ते १२७ सेंमी. पाऊस पडतो. नर्मदेला व तिच्या उपनद्यांना मोठमोठे पूर येतात. सतलज व बिआस मिळून जेवढे पाणी वाहते, त्यापेक्षा जास्त पाणी नर्मदा आणते परंतु ते बहुतेक सर्व तसेच समुद्रास जाऊन मिळते.
नर्मदेच्या दोन्ही तीरांवर, विशेषतः डोंगराळ भागात, साग, साल इ. उपयुक्त वृक्षांची घनदाट अरण्ये असून त्यांपैकी शूलपाणी, ओंकार, छोटे महारण व मोठे महारण ही प्रमुख आहेत. खोऱ्याचा १/३ भाग अरण्यमय असून १७ लक्ष हे क्षेत्र राखीव जंगल आहे.येथे महिष, हरिण, वानर, व्याघ्र इ. प्राणी व चक्रवाक, कारंड व हंस, जलकुक्कुट, सारस इ. पक्षी आहेत.
पुराणकाळात रावण, सहस्त्रार्जुन, परशुराम इत्यादींची युद्धे नर्मदा परिसरात झाली. रामायण-महाभारत काळांतील अनेक ऋषींचे आश्रम व तपोभूमी नर्मदा परिसरात होत्या. इतिहासकालात गुप्त, शक, वाकाटक, भारशिव, अहीर तसेच हर्ष, पुलकेशी इत्यादींच्या सत्ता नर्मदा परिसरात झाल्या. त्यापुढील काळात मोगल, मराठे, इंग्रज यांच्या सत्ता झाल्या व आता स्वतंत्र भारतात हा परिसर समाविष्ट आहे. येथील जंगलात आदिवासींची वस्ती बरीच आहे.
हिंदूंच्या दृष्टीने नर्मदा नदीला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे.
शिव शंकराने विष प्राशन केल्यावर त्याच्या परिणाम स्वरूप त्याला भरपुर घाम आला.
त्या थेंबातून एका कन्येचा जन्म झाला .
ती शिवाच्या अंगापासून निघाली असे मानतात.
गंगा स्नाना मुळे पुण्य लाभते असे म्हणतात पण नर्मदेच्या फक्त दर्शनाने पापक्षालन होते .
नर्मदा शिवाची कन्या असल्याने “नर्मदाका हर कंकर है शंकर “असा वाक्प्रचार आहे .
इथला दगड सुद्धा पूजनीय मानतात .त्यामुळे ती गंगेखालोखाल पवित्र मानली जाते.
एकमेकांशी बोलताना “नर्मदे हर “असा सतत गजर लोकांच्या तोंडी असतो .
हर हे शिवाचे एक नाव आहे तसेच हर म्हणजे नाहीशी कर अथवा हरण कर .
आमची सर्व दुख्खे व ताप तु हरण कर म्हणजे नाहीशी कर अशी नर्मदा मातेला प्रार्थना असते .
नर्मदेच्या काठी कोटितीर्थ, कपिलधारा, ओंकार मांधाता, सहस्त्रधारा, शूलपाणी, महेश्वर, विमलेश्वर इ. शिवतीर्थे असून मंडला, जबलपूर, हुशंगाबाद, हंडिया, महेश्वर, गरुडेश्वर, हापेश्वर, निमावर, भडोच इ. नगरे वसलेली आहेत.
शुक्लतीर्थ येथील वडाच्या झाडाला संत कबीराचे नाव आहे व भडोचजवळ बळी राजाने केलेल्या अश्वमेधाची जागा दाखवितात.
फक्त नर्मदा ही एकच नदी अशी आहे जिची परिक्रमा केली जाते .
नर्मदेच्या मुखापासून एका काठाने उगमापर्यंत व दुसऱ्या काठाने उगमापासून मुखापर्यंत काही विशिष्ट बंधने पाळून पायी ‘नर्मदा परिक्रमा’ करणे, हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
नर्मदे हर .